Buddha and His Vishad Yoga

BUDDHA AND HIS VISHAD YOGA

Buddha and His Vishad Yoga

Buddha and His Vishad Yoga PDF in English

द्वितीय खंड: धम्मदीक्षेची मोहीम

भाग पहिला: भगवान बुद्ध आणि त्यांचा विषादयोग

Buddha and His Vishad Yoga

  Previous page                                                    Next page

१. धर्मोपदेश करावा की करू नये ?

१. ज्ञान प्राप्ती करून घेतल्यावर आणि आपल्या धम्म मार्गाची रूपरेखा निश्चित केल्यावर भगवान बुद्धाच्या मनात एक प्रश्‍न उभा राहिला. पुढे जाऊन दुसर्यांना धर्मोपदेश करावा की स्वतःची व्यक्‍तिगत पूर्णावस्था प्राप्त करुन घेण्यासाठी आपले जीवन व्यतीत करावे ? 

२. ते स्वतःशीच म्हणाले, “नव्या तत्त्वज्ञानाचा मला लाभ झाला आहे हे खरे; परंतु सामान्य माणसाला ते तत्त्व मान्य करणे आणि त्याचे अनुकरण करणे अत्यंत कठीण आहे. बुद्धिमान लोकाना देखील ते सहजासहजी कळणार नाही.” 

३. “ईश्वर आणि आत्मा यांच्या गुंतागुंतीतून स्वत:ची सुटका करून घेणे मानवाला कठीण आहे. धार्मिक विधी आणि समारंभ यांच्यावरील श्रद्धेचा त्याग करणे माणसाला कठीण आहे. माणसाला कर्मवादापासून स्वत:ची मुक्‍तता करून घेणे कठीण आहे.”

४. “आत्मा अमर आहे या श्रद्रेचा त्याग करणे आणि आत्म्याला स्वतंत्र अस्तिस्व नाही व तो मृत्यूनंतर  अस्तित्वात राहात नाही, हा माझा सिद्धांत मान्य करणेही लोकांना कठीण आहे.”

५. “मनुष्य जात स्वार्थरत आहे आणि त्यातच ती आनंद आणि सुख मानते. स्वार्थ सोडून सदाचरणाची शिकवण मान्य करणे मनुष्य जातीला कठीण आहे.”

६. “जर मी माध्या सिद्धांताची शिकवण दिली आणि इतरांना ती समजली नाही किंवा समजल्यावरही त्यांनी  ती मान्य केली नाही किंवा मान्य करूनही ते ती अनुसरले नाहीत तर त्यांना तो एक त्रास आणि मलाही तो एक तापच होऊन बसेल.”

७. “जगापासून दूर असा एक संन्याशीच राहून माझ्या या तत्त्वज्ञानाचा उपयोग स्वतःला पूर्णावस्था प्राप्त करून घेण्यासाठी का करू नये?” त्यांनी स्वतःलाच प्रश्‍न केला, “निदान मी स्वतःचे तरी कल्याण करून घेऊ शकेन.” 

८. याप्रमाणे विचार करीत असताना भगवान बुद्धाचे मन त्यांच्या तत्वज्ञानाची इतरांना शिकवण देण्याकडे न वळता निष्क्रियतेकडे झुकले. 

९. भगवान बुद्धाच्या मनात काय चालले आहे हे जाणून ब्रम्ह सहंपती विचार करू लागला, “खरोखर जग नष्ट होत आहे. सम्यक्‌ संबुद्ध तथागत जर निष्क्रियतेकडे झुकतील व ते आपल्या धम्माची शिकवण इतरांना देणार नसतील तर या जगावर खरोखरीच विनाश ओढवेल.” 

१०. चिन्ताग्रस्त असा ब्रम्ह सहंपती ब्रम्हलोक सोडून आला व बुद्धाच्यापुढे उभा राहिला. आपले उत्तरीय वस्त्र खांद्यावर नीट सावरून नम्रतेने हात जोडून तो म्हणाला, “आपण आता सिद्धार्थ गौतम नसून भगवान बुद्ध आहात. आपण सम्यक्‌ संबुद्धत्व प्राप्त झालेले भगवंत आहात. आपण तथागत आहात. आपण जगताला अंध:कारातून मुक्‍त करण्याचे कसे नाकारू शकता? सन्मार्गापासून चुकत असलेल्या मानव जातीचे रक्षण करण्याच्या कार्यापासून आपण कसे विन्मुख होऊ शकता?” 

११. “आपला सद्धम्म ऐकावयास न मिळाल्यामुळे या जगात वावरणार्या अशुद्ध मनाच्या माणसाचा अधःपातपात होत आहे. 

१२. ब्रम्ह सहंपती पुढे म्हणाला, “भगवंत जाणतच आहेत की, प्राचीन कालापासून मगधवासीयांत अनेक दोषांनी भरलेला एक अशुद्ध धर्म प्रचलित आहे.” 

१३. “आपल्या अविनाशी धम्माचे द्वार त्यांच्यासाठी भगवंत खुले करणार नाहीत काय?” 

१४. “पर्वत शिखरावर उभा राहणारा मनुष्य ज्याप्रमाणे आपल्या सभोवताली खाली उभे असलेल्या सर्व लोकांकडे पाहातो, त्याचप्रमाणे प्रज्ञेच्या शिखरावर चढून त्या सर्वोच्च स्थानावर उभे राहून पाहाणाऱ्या  हे दु:खमुक्‍त भगवन्‌, दु:खाच्या सागरात बुडालेल्या या लोकांकडे पाहा !” 

१५. “जन्मक्रणांतून मुक्‍त झालेल्या हे विजयी वीरा, ऊठ, जगाकडे जा, त्याच्याकडे पाठ फिरवू नको.” 

१६. “भगवन्‌, देव आणि मानव यांच्यावरील करुणा बुद्धीने त्यांना आपल्या सद्धम्माची शिकवण देण्याचा निश्चय करोत.” 

१७. भगवान बुद्धानी उत्तर दिले, “थोर मानवश्रेष्ठ ब्रम्हा, मी माझ्या धम्माचा सार्वजनिक उपदेश केला नाही, याचे कारण मला तसे करणे तापदायक होईल असे वाटले.” 

१८. जगामध्ये अतिशय दुःख आहे हे जाणून भगवान बुद्धाला पटले की, हात जोडून सन्याशी म्हणून स्वस्थ बसणे आणि जगात जसे घडते आहे तसेच घडू देणे हे योग्य नाही. 

१९. संन्यास निरुपयोगी असल्याचे त्याना दिसून आले. जगापासून दूर पळून जाण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ होय. सन्याशाला देखील जगापासून सुटका नाही. जगापासून दूर पळून जाण्यापेक्षा जग बदलून त्याची सुधारणा करणे हेच अवश्य आहे, हे त्यांनी जाणले. 

२०. भगवान बुद्धांना हे पटले की, त्यांनी संसाराचा त्याग यासाठी केला की, जगात इतका संघर्ष आहे व  त्यापासून जगात दुःख व दैन्य निर्माण झाले आहे आणि त्यावर त्यांना कोणताच उपाय माहीत नव्हता. जर आपल्या धम्मप्रचाराने जगातील दुःख आणि दैन्य दूर करता आले तर केवळ निष्क्रियतेचा पुतळा बनून स्वस्थ न बसता जगात पुनरपि जाऊन त्याची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे हे त्यांनी ओळखले. 

२१. म्हणून भगवान बुद्धांनी ब्रम्ह सहंपतीची विनंती मान्य केली आणि आपल्या सिद्धांताची शिकवण जगाला देण्याचा त्यानी निश्चय केला. 

 

२. ब्रम्ह सहंपती सुवार्ता जाहीर करतो

१. भगवान बुद्धांनी आपला उपदेश जनतेला देण्यासाठी त्यांना प्रवृत्त करण्यात आपण यश मिळविले हा विचार मनात येऊन ब्रम्ह सहंपतीला अतिशय आनंद झाला. त्याने भगवान बुद्धांना वंदन केले, त्यांस प्रदक्षिणा घातली आणि त्यांच्याकडे एकदा वळून पाहून तो निघून गेला. 

२. परत जाताना तो जगाला घोषित करीत होता की, “ही शुभवार्ता ऐकून आनंद व्यक्‍त करा. जगातील सर्व दुःखाचे व पापाचे मूळ भगवान बुद्धांनी शोधून काढले आहे. त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही त्यांना सापडला आहे.” 

३. “दुःखी व कष्टी जीवांना भगवान बुद्ध स्वास्थ्य देतील. युद्धपीडितांना ते शान्ती देतील. ज्यांचे हृदय विदीर्ण झाले आहे, ज्याचा धीर खचला आहे त्यांना ते धीर देतील. जे पददलित आहेत आणि जे जुलुमाखाली चिरडले गेले आहेत त्यांच्यात ते आशा आणि विश्वास निर्माण करतील.” 

४. “जगातील दुःखग्रस्तांनो, जीवन जगण्यासाठी झगडणाऱ्यानो, न्यायासाठी तळमळणाऱ्या जीवांनो, या शुभवार्तेने आनंदित व्हा !” 

५. “जखमी झालेल्यांनो, आपल्या जखमा बऱ्या झाल्याच असे समजा. भुकेलेल्यांनो, आता पोटभर  खा.थकलेल्यांनो, आता विश्रांती मिळालीच असे समजा. तृषार्तांनो, आपली तहान भागवून घ्या. अंधारात चाचपडणारांनो, आता प्रकाश प्राप्त करून घ्या. निरुत्साही जनहो, आता हर्षभरित व्हा !” 

६. “भगवान बुद्धांच्या सिद्धांतात अशी उत्कट प्रेरणा आहे की, जे परित्यक्‍त अथवा अनाथ आहेत त्यांना  आपले करण्याची उल्कट इच्छा निर्माण होते. जे अध:पतित आहेत त्याना आपला उद्धार करून घेण्याची उदात्त प्रेरणा मिळते. आणि जे पददलित आहेत त्यांना प्रगतिपथावर नेणारा समतेचा प्रकाशझोत मिळतो.”

७. “भगवान बुद्धांचा धम्म हा सदाचाराची शिकवण देणारा धम्म आहे, आणि पृथ्वीवर सदाचरणाचे राज्य प्रस्थापित करणे हे त्याचे उदीष्ट आहे.” 

८. “त्यांचा धम्म म्हणजे सत्य, संपूर्ण सत्य, सत्याशिवाय दुसरे काहीही नसून ते केवळ सत्यच आहे.” 

९. “धन्य आहेत भगवान बुद्ध, की त्यांचा मार्ग बुद्धिवादी मार्ग आहे आणि तो धार्मिक भोळसटपणातून मुक्‍तता करणारा मार्ग आहे! धन्य आहेत भगवान बुद्ध, की जे मध्यम मार्गाचा उपदेश करतात! धन्य आहेत भगवान बुद्ध, की जे सद्धम्मच शिकवितात! धन्य आहेत भगवान बुद्ध, की जे शांति देणाऱ्या निब्बाणाची शिकवण देतात! धन्य आहेत भगवान बुद्ध, की जे मैत्री, करुणा, आणि भ्रातृभावाची शिकवण देतात की, जी माणसाला आपल्या बांधवांची बंधमुक्तता करण्यास सहाय्यभूत होते!” 

 

३. धम्मदीक्षेचे दोन प्रकार

१. भगवान बुद्धांच्या धम्मदीक्षेच्या योजनेत धम्मदीक्षेला दोन अर्थ आहेत.

२. ज्याला संघ म्हटले जाते त्या भिक्खू वर्गाचा सभासद होणे हा धम्मदीक्षेचा एक अर्थ.

३. भगवान बुद्धांच्या धम्माचा सामान्य अनुयायी किंवा उपासफ म्हणून गृहस्थाने धम्म दीक्षा घेणे हा दुसरा  अर्थ  होय. 

४ . भिक्खू कआणि उपासक यांच्या जीवन मार्गात चार बाबी वगळल्यास कोणताही फरक  नाही.

५. उपासक हा गृहस्थच राहतो, तर भिक्खू हा गृहहीन परिव्राजक बनतो. 

६. उपासक आणि भिक्खु या दोघांनाही आपल्या आयुष्यात काही नियमांचे पालन करावे लागते. 

७. भिक्खुंच्या बाबतीत या नियमाचे उल्लंघन दंडनीय ठरते. उपासकाच्या बाबतीत हे नियम म्हणजे आज्ञा होत. त्याने  आपत्या सामर्थ्यानुसार तु त्या शीलांचे जास्तीत जास्त पालन करावयाचे असते. 

८. उपासकाला संपत्ती बाळगता येते. भिक्खूला ती बाळगता येत नाही. 

९, उपासक होण्यासाठी कोणताही  ‘सस्कार’ करावा लागत नाही. 

१०. भिक्खू होण्यासाठी ‘उपसंपदा’ नावाचा संस्कारविधी करावा लागतो.

११. भगवान बुद्धांनी त्यांच्याकडे दीक्षेसाठी आलेल्यांना भिक्खु किवा उपासक बनविले.

१२. आपण भिक्खू व्हावे असे वाटल्यावर कोणत्याही उपासकाला भिक्खु होता येते. 

१३. जर भिक्खूने आपल्या मुख्य व्रतांचा भंग केला किवा भिक्खू संघाचे सभासदत्व सोडून देण्याची त्याची  इच्छा असली, तर तो भिक्खू राहात नसे. 

१४. ज्यांची नावे पुढील पृष्ठांत आली आहेत त्यांनाच भगवान बुद्धांनी दीक्षा दिली असे समजू नये. 

१५. जी निवडक उदाहरणे दिली आहेत ती आपल्या धम्माची शिकवण देण्याच्या किंवा आपल्या भिक्खू संघात प्रवेश देण्याच्या बाबतीत बुद्धांनी कोणत्याही प्रकारे स्त्रीपुरुष भेद किंवा जातिभेद मानला नाही, हे दाखविण्यासाठीच निवडली आहेत.

Previous page                                                    Next page


The Buddha and His Dhamma, by Dr. B. R. Ambedkar
error: Content is protected !!