Part II – The Conversion of the Parivrajakas
The Conversion of the Parivrajakas PDF in English
द्वितीय खंड: धम्मदीक्षेची मोहीम
भाग दुसरा: परिव्राजकांची धम्मदीक्षा
Conversion of the Parivrajakas
१. सारनाथ येथे आगमन
१. आपल्या धम्माचा उपदेश करण्याचे ठरविल्यानंतर बुद्धाने स्वतःलाच विचारले की, “सर्वप्रथम मी धम्मोपदेश कुणाला देऊ?” त्याला आलारकालाम याची आठवण झाली. बुद्धाच्या मते तो विद्वान, शहाणा, बुद्धिमान व बराच शुद्धाचरणी होता. “त्यालाच मी प्रथम धम्मोपदेश दिला तर ?” परंतु आलारकाम मृत्यु पावल्याचे त्याला सांगण्यात आले.
२. नंतर त्याने उद्च रामपुत्ताला आपला धम्मोपदेश देण्याचा विचार केला. परंतु तोही मृत्यु पावला होता.
३. त्यानंतर त्याने आपल्या जुन्या पाच सोबत्यांचा विचार केला. निरंजना नदीच्या काठी त्याने उग्र तपर्श्वर्या चालविली असताना ते त्याच्या बरोबर होते आणि त्याने तपश्चर्येचा त्याग केल्यामुळे रागावून ते त्याला सोडून गेले होते.
४. तो स्वत:शीच म्हणाला, “त्यांनी माझ्यासाठी पुष्कळच केले. त्यांनी माझी सेवा केली. त्यांनी माझी पुष्कळ काळजी घेतली. मग मी त्यांनाच माझ्या धम्माचा उपदेश प्रथम दिला तर काय हरकत आहे?”
५. त्याने त्यांच्या ठावठिकाण्याची चौकशी केली. तेव्हा त्याला समजले की, ते सारनाथला इसिपतनच्या मृगदायवनात राहात आहेत. तेव्हा तो त्यांच्या शोधार्थ तिकडे निघाला.
६. त्या पांच जणांनी जेव्हा बुद्ध येत असल्याचे पाहिले तेव्हा त्याचे स्वागत करावयाचे नाही असे त्यांनी ठरविले. त्यांच्यापैकी एकजण म्हणाला, “मित्रांनो, हा श्रमण गौतम येत आहे. तपश्चर्येचा मार्ग सोडून देऊन हा समृद्धीच्या आणि चैनीच्या जीवनाकडे वळला होता. त्याने पाप केले आहे म्हणून आपण त्याचे स्वागत करता कामा नये, त्याला मान देण्यासाठी उभे राहता कामा नये, किंवा त्याचे भिक्षापात्र आणि चीवर आपण आपल्या हाती घेता कामा नये. आपण त्याच्यासाठी फक्त एक आसन बाजूला ठेवून देऊ. त्याची इच्छा असल्यास तो तेथे बसेल.” सर्वानी हे मान्य केले.
७. परंतु बुद्ध जेव्हा त्यांच्याजवळ आला तेव्हा ते पांच परिव्राजक आपल्या निश्चयानुसार वागू शकले नाहीत. बुद्धाच्या व्यक्तीमत्त्वाचा त्यांच्यावर इतका प्रभाव पडला की, ते आपल्या जागेवर उठून उभे राहिले. एकाने त्याचे पात्र घेतले, एकाने त्याचे चीवर सांभाळले. एकाने त्याच्यासाठी आसन तयार केले आणि एकाने त्याचे पाय धुण्यासाठी पाणी आणले.
८. खरोखर हे एका अप्रिय अतिथीचे असाधारण स्वागत होते.
९. अशाप्रकारे जे त्याचा उपहास करणार होते ते त्याची पूजा करू लागले.
२. बुद्धाचे पहिले प्रवचन
१. परस्परांना अभिवादन करून कुशलक्षेम विचारल्यावर त्या पाच परिव्राजकानी भगवान बुद्धाला विचारले, “तपश्चर्येवर तुमचा अजूनही विश्वास आहे काय?” बुद्धाने नकारात्मक उत्तर दिले.
२. बुद्ध म्हणाला, “जीवनाची आत्यंतिक अशी दोन टोके आहेत. एक सुखोपभोगाचे व दुसरे आत्मक्लेशाचे.”
३. “एक म्हणतो, खा, प्या, मजा करा. कारण उद्या आपण मरणारच आहोत. दुसरा म्हणतो, सर्व वासना मारून टाका. कारण त्या पुनर्जन्माचे मूळ आहेत.” हे दोन्ही मार्ग माणसाला न शोभण्यासारखे म्हणून त्याने ते नाकारले.
४. भगवान बुद्ध मध्यम मार्ग मानणारे होते – मज्जिमम पतिपद – मधला मार्ग, जो उपभोगाचाही मार्ग नाही आणि आत्मक्लेशाचाही नाही.
५. बुद्ध परिव्राजकांना म्हणाला, “माझ्या या प्रश्नाचे उत्तर द्या. जोपर्यंत तुमचे स्वत्व कार्यप्रवृत्त असते आणि त्याला ऐहिक व पारलौकिक भोगाची अभिलाषा असते तोपर्यंत सर्व आत्मक्लेश व्यर्थच नाहीत काय?” ते उत्तरले, “आपण म्हणता ते बरोबर आहे.”
६. “जर तुम्ही आत्मक्लेशाच्या मार्गाने आपला कामास़री शांत करू शकत नाही, तर आत्मक््लेशाचे दरिद्री जीवन जगून आपण स्वतःला कसे काय जिंकू शकाल?” त्यानी उत्तर दिले, “आपण म्हणता ते बरोबर आहे.”
७. “जेव्हा तुम्ही स्वत:वर विजय मिळवू शकाल तेव्हाच फक्त तुम्ही कामतृष्णेपासून मुक्त होऊ शकाल. मग तुम्हाला ऐहिक सुखोपभोगाची इच्छा होणार नाही आणि नैसर्गिक गरजांच्या तृप्तीमुळे तुमच्यात मलीन विकार निर्माण होणार नाहीत. तुमच्या शारीरीक गरजेनुसार तुम्ही खा, प्या.”
८. “सर्व प्रकारची विषयासक्ती उत्तेजक असते. विषयासक्त मनुष्य कामवासनांचा गुलाम बनतो. सर्व प्रकारची सुखासक्ती अध:पतन करणारी व नीच कर्म असते. तथापि माझे तुम्हाला सांगणे असे की, जीवनाच्या स्वाभाविक गरजांची पूर्ती करणे ही वाईट गोष्ट नाही. शरीराचे आरोग्य राखणे हे आपले कर्तव्य आहे. नाहीतर तुम्ही तुमचे मन सुदृढ आणि स्वच्छ ठेवू शकणार नाही आणि प्रज्ञारूपी प्रदीपही प्रज्वलित राखू शकणार नाही.”
९. “हे परिव्राजक, ही गोष्ट समजून घ्यावी की, ही दोन अत्यंतिक टोके अशी आहेत की, माणसाने त्याचा कधीही अवलंब करू नये. एक टोक म्हणजे ज्या गोष्टीचे आकर्षण कामवासनेच्या तृष्णेमुळे होते, त्या गोष्टीत आणि विशेषत: विषयासक्तीत सतत डुंबत राहणे. तृप्ती मिळविण्याचा हा मार्ग अगदी हलक्या दर्जाचा, रानटीपणाचा, अयोग्य आणि हानिकारक आहे. दुसरे टोक म्हणजे तपश्चर्या किंवा आत्मक्लेश. हा मार्गही दुःखदायक, अयोग्य आणि हानिकारक आहे.”
१०. “ही दोन्ही आत्यंतिक टोके ज्यामुळे टाळता येतात असा एक मध्यम मार्ग आहे. ध्यानात ठेवा, मी त्याच मध्यम मार्गाची शिकवण देतो आहे.”
११. त्या पांच परिव्राजकांनी त्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले. भगवान बुद्धाच्या मध्यम मार्गासंबंधी उत्तरादाखल काय बोलावे हे न समजल्यामुळे मुले त्यांनी त्याला विचारले की, “आपणाला आम्ही सोडून आल्यावर आपण काय काय केले?” तेव्हा आपण गयेला कसे गेलो, पिंपळाच्या झाडाखाली आपण चिंतन करीत कसे बसलो आणि चार आठवडे सतत चिंतन केल्यानंतर आपणास ज्ञानप्राप्ती झाल्यामुळे आपण नवा जीवनमार्ग कसा शोधून काढला हे सर्व भगवान बुद्धांनी त्याना सांगितले.
१२. हे ऐकल्यावर तो मार्ग कोणता हे जाणून घेण्यास ते परिव्राजक अधीर झाले आणि तो मार्ग स्पष्ट करून सांगण्याविषयी त्यांनी भगवान बुद्धाला प्रार्थना केली.
१३. भगवान बुद्धाने त्यांची विनंती मान्य केली.
१४. सुरुवातीलाच भगवान बुद्धाने त्यांना सांगितले की, आपला जो मार्ग जो धम्म आहे त्याला ईश्वर आणि आत्मा यांच्याशी काहीही कर्तव्य नाही. त्याचा मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही. तसेच त्या धम्माचा कर्मकाण्डाशी काही संबंध नाही.
१५. माणुस आणि माणसाचे माणसाशी या जगातील नाते हा बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे.
१६. बुद्धाने सांगितले की, आपल्या धम्माचे हे पहिले अधिष्ठान आहे.
१७. मनुष्यप्राणी दुःखात, दैन्यात आणि दारिद्रांत राहात आहे हे त्याचे दुसरे तत्व होय. हे सर्व जग दु:खाने भरले आहे, आणि जगातून हे दुःख नाहीसे करणे हा एकच धम्माचा उद्देश आहे. यापेक्षा धम्म म्हणजे दुसरे तिसरे काहीही नाही.
१८. दु:खाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हाच भगवान बुद्धाच्या धम्माचा पाया होय.
१९. हाच एक केवळ धम्माचा पाया होऊ शकतो आणि यावरच त्याचे समर्थन अवलंबून आहे. जो धर्म या प्राथमिक गोष्टीचा स्वीकार करीत नाही तो धर्मच नव्हे.
२०. “खरोखर, हे परिव्राजक हो! जगातील दुःख आणि त्या दु:खापासून मुक्तता करण्याचा उपाय हाच धम्माचा मुख्य प्रश्न आहे. हे ज्या श्रमणांना आणि ब्राम्हणांना (धर्मोपदेशकांना ) हे समजत नाही ते माझ्या मते, श्रमण आणि ब्राम्हण नव्हेतच. याच जीवनात धम्माचा खराखरा अर्थ काय आहे? स्वतःला श्रेष्ठ समजणार्यांना समजतच नाही.”
२१. नंतर परिव्राजकांनी बुद्धाला विचारले, “दु:खाचे अस्तित्व मान्य करणे आणि दुःख नाहीसे करणे हाच जर आपल्या धम्माचा पाया असेल तर आपला धम्म दुःख कसे नाहीसे करतो सांगा.”
२२. भगवान बुद्धाने सांगितले की, या धम्मानुसार जर प्रत्येकाने
(१) पावित्र्याचा मार्ग अनुसरला,
(२) सदाचरणाचा मार्ग स्वीकारला, आणि
(३) शीलमार्गाचा अवलंब केला तर त्यामुळे या दु:खाचा निरोध होईल.
२३. आणि त्यांनी सांगितले की अशा धम्माचा आविष्कार आपण केला आहे.
३. भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन–विशुद्धी मार्ग
१. परिव्राजकांनी नंतर भगवान बुद्धाला आपला धम्म समजावून सांगण्याची प्रार्थना केली.
२. भगवान बुद्धाने त्यांची विनंती आनंदाने मान्य केली.
३. त्याने पहिल्याप्रथम त्यांना विशुद्धी मार्ग समजावून सांगितला.
४. त्याने परिव्राजकांना सांगितले की, “ज्याला चांगला मनुष्य होण्याची इच्छा आहे त्याने जीवनाची तत्वे म्हणून काही तत्वे पाळली पाहिजेत, ही विशुद्धी मार्गाची शिकवण आहे.”
५. “माझ्या विशुद्धीच्या मार्गानुसार चांगल्या जीवनाची पाच तत्वे आहेत:
(१) कोणत्याही प्राण्याची हिंसा न करणे व त्याला इजा न करणे,
(२) चोरी न करणे अर्थात् दुसर्याच्या मालकीची वस्तु न बळकावणे,
(३) व्यभिचार न करणे,
(४) असत्य न बोलणे,
(५) मादक पेय ग्रहण न करणे.”
६. “माझे असे म्हणणे आहे की, प्रत्येक माणसाने ही तत्वे मान्य करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण, प्रत्येक मनुष्य जे जे काही करतो त्याचे मूल्यमापन करण्यासाठी त्याच्यापाशी काही एक परिमापन असले पाहिजे की ज्याच्यामुळे तो आपल्या चांगल्या अथवा वाईट वर्तणुकीचे मोजमाप करू शकेल. आणि माझ्या शिकवणुकीप्रमाणे हीच पाच तत्वे किंवा शीले माणसाच्या चांगल्या अथवा वाईट कृतीचे मोजमाप करण्याचा मापदंड आहे.
७. “जगात सर्वत्र पतित लोक असतात. परंतु पतितांचे दोन वर्ग असतात; ज्यांच्यासमोर काही आदर्श आहे असे पतित आणि ज्यांच्यासमोर कोणताच आदर्श नाही असे पतित.”
८. “ज्याच्यासमोर कोणताच आदर्श नाही, अशा पतिताला आपण पतित आहोत हेच कळत नाही. त्यामुळे तो नेहमीच पतित राहतो. याउलट ज्याच्यासमोर एखादा आदर्श आहे, असा पतित आपल्या पतितावस्थेतून वर येण्यासाठी प्रयत्न करीत असतो. कां? याचे उत्तर असे की, आपण पतित आहोत हे त्याला माहीत असते.
९. “मनुष्याचे जीवन नियमित करण्यासाठी त्याच्यासमोर एखादा आदर्श असणे आणि कोणताच आदर्श नसणे याच्यातील हा फरक आहे. महत्वाची गोष्ट माणसाचा अध:पात ही नसून त्या अवस्थेत मुक्त होण्याच्या आदर्शाचा अभाव हीच होय.”
१०. “परिव्राजक, तुम्ही विचाराल की, जीवनाचा आदर्श म्हणून मान्य करण्यास हीच तत्वे योग्य का?”
११. “या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला स्वतःलाच सापडेल, जर तुम्ही स्वतःलाच असा प्रश्न केलात की, ‘ही तत्वे व्यक्तीच्या हितासाठी आहेत काय?” किंवा ‘ती सामाजिक हित साधणारी आहेत काय?’”
१२. “जर या प्रश्नांना तुमची उत्तरे होकारात्मक असतील तर माझ्या विशुद्धी मार्गाची तत्वे, जीवनाचा खरा आदर्श म्हणून मान्यता मिळविण्यास लायक आहेत, हेच त्यावरून सिद्ध होईल.”
४. भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन (चालू )–अष्टांगिक मार्ग किवा सदाचाराचा मार्ग
१. नंतर भगवान बुद्धाने परिव्राजकांना अष्टांगिक मार्गाविषयी प्रवचन दिले. भगवान बुद्धाने सांगितले की, अष्टांगिक मार्गाचे आठ घटक आहेत.
२. अष्टांगिक मार्गाचे सर्वात पहिले महत्वाचे अग-सम्मा दिट्टि (सम्यक् दृष्टी ). याच्या स्पष्टीकरणाने भगवान बुद्धाने आपल्या प्रवचनास सुरुवात केली.
३. सम्यक् दृष्टीचे महत्व समजण्याकरिता भगवान बुद्ध परिव्राजकांना म्हणाला-
४. “परिव्राजक हो, जग ही एक अंधारकोठडी असून मनुष्य हा तिच्यातील एक कैदी आहे, हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे.”
५. “ही अंधारकोठडी गडद अंधाराने भरलेली आहे. अंधार इतका आहे की, कैद्याला क्वचितच काही दिसू शकते. कैद्याला आपण कैदी आहोत हेही कळत नाही.”
६. “दीर्घकाल अंधारात राहिल्यामुळे मनुष्य केवळ आंधळा होऊन राहिलेला आहे. इतकेच नाही तर ज्याला प्रकाश म्हणतात अशी एखादी वस्तु अस्तित्वात असू शकते याबद्दल त्याला शंका वाटते.”
७. “मन हे एक असे साधन आहे की, ज्याच्यामुळे मनुष्याला प्रकाश मिळू शकतो.”
८. “तथापि, या अंधारकोठडीतील कैद्यांच्या मनाची अशी अवस्था नाही की त्यांचे मन हे या बाबतीत एक साधन ठरेल.”
९. “त्यांच्या मनाची अवस्था त्यांना केवळ दृष्टी असत्यामुळे, अंधारासारखी एक वस्तु अस्तित्वात आहे हे दाखविण्यापुरता अगदी थोडा प्रकाशच आत येऊ देते.”
१०. “अशा प्रकारे त्यांची आकलनशक्ती स्वभावत:च सदोष असते.”
११. “परंतु, परिव्राजक हो, या कैद्यांची स्थिती जितकी दिसते तितकी निराशाजनक नाही, हे लक्षात घ्या.” १२. “कारण, माणसात इच्छाशक्ती या नावाची एक शक्ती असते. जेव्हा योग्य हेतू निर्माण होतात तेव्हा या इच्छाशकक्तीला जागृत करता येते व तिला गती देता येते.”
१३. “कोणत्या दिशेने इच्छाशक्तीला गती द्यावी हे पाहण्याइतकाही जरी माणसाला प्रकाश मिळाला तरी तो मनुष्य अशा प्रकारे आपल्या इच्छाशक्तीला गतिमान करू शकेल की शेवटी त्याची इच्छाशक्ती त्याला बंधमुक्त करील.”
१४ “अशा प्रकारे मनुष्य जरी बंधनात असला तरी तो बंधमुक्त होऊ शकेल. शेवटी स्वातंत्र्याकडे नेणारी पावले टाकण्यास तो कोणत्याही क्षणी सुरुवात करील.”
१५. “आपणाला पाहिजे त्या दिशेने जाण्यासाठी आपल्या मनाला आपण वळण लावू शकतो, हे याचे कारण होय. मन हेच आपल्याला जीवनाच्या कारागृहात बंदिवान करीत असते आणि तेच आपल्याला तेथे डांबून ठेवते.”
१६. “पण मन जी गोष्ट निर्माण करते ती ते नष्टही करू शकते. जर मनाने माणसाला बंधनात टाकले असेल तर तेच मन योग्य दिशेने वळविल्यास त्याला बंधमुक्तही करू शकते.”
१७. “सम्यक् दृष्टी जे करू शकते ते हेच होय.”
१८. “सम्यक् दृष्टीचा अंतिम उद्देश काय आहे?” परिब्राजकांनी विचारले. भगवान बुद्धाने उत्तर दिले, “अविद्येचा विनाश हाच सम्यक् दृष्टीचा उद्देश आहे. सम्यक दृष्टी ही मिथ्या दृष्टीच्या अगदी उलट आहे.”
१९, “मनुष्याला दुःखाचे अस्तित्व आणि दु:खनिरोधाचा उपाय ही उदात्त सत्ये न समजणे न्हणजेच अविद्या होय.”
२०. “सम्यक दृष्टीचा हेतु माणसाने कर्मकांडाच्या विधींना व्यर्थ समजणे आणि शास्त्रांच्या पावित्र्यावरील मिथ्या विश्वास टाकून देणे हा आहे.”
२१. “सम्यक् दृष्टीकरिता माणसाने अद्भूत कल्पनांचा त्याग केला पाहिजे. निसर्गनियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट माणसाने मानता कामा नये.”
२२. “ज्या सिद्धांतांना वास्तवतेचा किंवा अनुभवाचा आधार नाही व ते केवळ काल्पनिक अनुमाने आहेत ते सिद्धांत सम्यक् दृष्टीसाठी त्याज्य आहेत.”
२३. “स्वतंत्र मन आणि स्वतंत्र विचार हे सम्यक् दृष्टीसाठी आवश्यक आहेत.”
२४. “प्रत्येक माणसाला काही ध्येये, आकांक्षा आणि महत्वाकांक्षा असतात.अशी ध्येये, आकांक्षा आणि महत्वाकांक्षा ही उदात्त आणि प्रशंसनीय असावी. ती क्षुद्र आणि अयोग्य नसावी. हा ‘सम्यक् संकल्पा चा आशय आहे.”
२५. ‘सम्यक वाचा” पुढील शिकवण देते-
(१) माणसाने जे सत्य असेल तेच बोलावे.
(२) असत्य बोलू नये.
(३) माणसाने दुसर्याविषयी वाईट बोलू नये.
(४) माणसाने दुसर्याची निदानालस्ती करण्यापासून परावृत्त व्हावे.
(५) माणसाने आपल्या लोकांविषयी रागाची किंवा शिवीगाळीची भाषा वापरू नये.
(६) माणसाने सर्वांशी आपुलकीने व सौजन्याने बोलावे.
(७) माणसाने अर्थहीन मूर्खपणाची बडबड करू नये. त्याचे बोलणे समंजसपणाचे व मुद्देसूद असावे.
२६. “मी सांगितल्याप्रमाणे सम्यक् वाचेचे पालन करणे हे कोणाच्या भीतीमुळे किंवा पक्षपाताने होता कामा नये. सम्यक् वाचेमुळे काय तोटा होईल किंवा आपल्या कृतीविषयी आपल्या वरिष्ठाला काय वाटेल याचा सम्यक् वाचेशी यत्किचितही संबंध असता कामा नये.”
२७. “वरिष्ठाची आज्ञा किंवा वैयक्तिक फायदा हे सम्यक् वाचेचे प्रमाण नाही.”
२८. “ सम्यक् कर्मान्त’ हे योग्य वर्तनाची शिकवण देते. दुसर्यांच्या भावना आणि त्यांचे हक्क यांचा मान राखून प्रत्येक कृती करावी अशी याची शिकवण आहे.”
२९. “सम्यक् कर्मान्ताचे प्रमाण कोणते? जीवनाच्या मूलभूत नियमांशी सुसंगत असे वर्तन, हे त्याचे प्रमाण होय.”
३०. “एखाद्याचे वर्तन ज्या वेळी या नियमांशी सुसंगत असते त्या वेळी ते सम्यक् कर्मान्ताशी सुसंगत आहे असे समजावे.”
३१. “प्रत्येक व्यक्तीला आपला चरितार्थ चालवावयाचा असतो. परंतु चरितार्थाचे अनेक मार्ग आहेत. काही वाईट आहेत, काही चांगले आहेत. ज्यांच्यामुळे इतरांची हानी होते किंवा इतरांच्यावर अन्याय होतो ते वाईट मार्ग होत. दुसर्यांची हानी किंवा त्यांच्यावर अन्याय न करता जगण्यापुरते मिळविण्याचे जे मार्ग ते चांगले होत.याला ‘सम्यक् आजीविका’ म्हणतात.”
३२. “सम्यक् व्यायाम’ म्हणजे अविद्या नष्ट करण्याचा प्राथमिक प्रयत्न होय.अविद्या नष्ट करणे म्हणजे या दुःखदायक कारागृहातून बाहेर जाण्याच्या दारापर्यन्त पोहोचून पुढील मार्ग मोकळा करणे होय.”
३३. “सम्यक् व्यायामाचे चार हेतू असतात.”
३४. “अष्टांग मार्गाशी विरोधी अशा चित्तवृत्तीचा प्रतिरोध करणे हा एक हेतू होय.”
३५. “अशा प्रकारच्या ज्या चित्तवृत्ती अगोदरच उत्पन्न झाल्या असतील तर त्या दाबून टाकणे हा दुसरा हेतू होय
३६. “अष्टांग मार्गाला आवश्यक अशा चित्तवृत्ती उत्पन्न करण्यास माणसाला साहाय्य करणे हा तिसरा हेतू होय.”
३७. “अशा प्रकारच्या ज्या चित्तवृत्ती अगोदरच अस्तित्वात आल्या असतील त्यांची वाढ आणि विकास करणे हा चवथा हेतू होय.”
३८. “सम्यक् स्मृतीला जागरूकपणा व विचारीपणा यांची आवश्यकता असते.मनाची सतत जागृति हा त्याचा अर्थ होय. दुष्ट वासनांवर मनाचा पहारा ठेवणे हे सम्यक् स्मृतीचे दुसरे नाव होय.”
३९. “परिव्राजक हो, सम्यक् दृष्टी, सम्यक् संकल्प, सम्यक् वाचा, सम्यक् कर्मान्त,सम्यक् आजीविका, सम्यक् व्यायाम आणि सम्यक् स्मृती प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करणार्या माणसांच्या मार्गावर पाच अडथळे किंवा बंधने असतात.”
४०. “लोभ, द्रेष, आळस व सुस्ती, संशय आणि अनिश्चय हे ते पाच अडथळे होत म्हणून हे अडथळे दूर करणे आवश्यक आहे. हे अडथळे म्हणजे बंधनेच होत; आणि ते दूर करण्याचा मार्ग समाधी हा होय. परंतु परिव्राजक हो, सम्यक् समाधी म्हणजे समाधि नव्हे हे लक्षात घ्या. तिचे स्वरूप अगदी निराळे आहे.”
४१. “समाधी म्हणजे केवळ चित्ताची एकाग्रता. वरील पाच अडथळयांना अटकाव करणार्या स्वयंप्रेरित अशा ध्यानावस्थांच्या मार्गावर ती आपत्याला नेते यात शंका नाही.”
४२. “परंतु ह्या ध्यानाच्या अवस्था तात्पुरत्या असतात. त्यामुळे अडथळ्यांना केलेला अटकाव हा देखील तात्पुरताच ठरतो. मनाला स्थायी स्वरूपाचे वळण लावणे हे आवश्यक आहे. अशा प्रकारचे कायम स्वरूपाचे वळण केवळ सम्यक् समाधीनेच लावता येईल.”
४३. “समाधीमुळे अडथळ्यांना फक्त तात्पुरता अटकाव होतो म्हणून ती केवळ नकारात्मक स्थिती होय. तिच्यात मनाला वळण लावले जात नाही, सम्यक् समाधि ही वास्तवात्मक असते. ती मनाला एकाग्रतेचे आणि एकाग्रतेच्या काळात कुशल कर्माचा विचार करण्याचे शिक्षण देते; आणि त्याला अनुसरूनच अडथळ्यामुळे निर्माण होणार्या अकुशल कर्माकडे आकर्षित होण्याची मनाची प्रवृत्तीही ती नष्ट करते.”
४४. “सम्यक् समाधी मनाला चांगल्या गोष्टींचा विचार करण्याची व चांगल्या गोष्टीचाच नेहमीच विचार करण्याची सवय लावते. सम्यक् समाधि चांगल्या कृति करण्यास आवश्यक अशीच प्रेरणा मनामध्ये निर्माण करीत असते.”
५. भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन–शीलमार्ग ( चालू )
१. नंतर भगवान बुद्धाने परिव्राजकांना शीलमार्ग तथा सद्रणांचा मार्ग समजावून सांगितला.
२. त्याने त्यांना सांगितले की, शीलमार्ग म्हणजे पुढील गुणांचे पालन करणे होय :-
(१) शील,
(२) दान,
(३) उपेक्षा,
(४) नैष्क्रम्य,
(५) वीर्य,
(६) शान्ति,
(७) सत्य,
(८) अधिष्ठान,
(९) करुणा
(१०) मैत्री.
३. या सद्वणांचा अर्थ परिव्राजकांनी भगवान बुद्धाला विचारला.
४. त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान बुद्ध म्हणाले –
५. “शील म्हणजे नीतिमत्ता, वाईट गोष्टी न करण्याकडे आणि चांगल्या गोष्टी करण्याकडे असलेला मनाचा कल. अपराध करण्याची लाज वाटणे, शिक्षेच्या भीतीने वाईट गोष्ट करण्याचे टाळणे महणजे शील. शील म्हणजे पापभीरुता.”
६. “नैष्क्रम्य म्हणजे ऐहिक सुखाचा त्याग.”
७. “स्वार्थाची किवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसर्यांच्या भल्यासाठी स्वत:ची मालमत्ता, रक्त आणि देह अर्पण करणे, इतकेच नव्हे तर प्राणत्याग करणे म्हणजेच दान होय.”
८. “वीर्य म्हणजे योग्य (सम्यक्) प्रयत्न. हाती घेतलेले काम यत्किचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी पूर्ण करणे म्हणजे वीर्य.”
९. “शांती म्हणजे क्षमाशीलता. द्वेषाने द्रेषाला उत्तर न देणे हे याचे सार होय. कारण द्वेषाने द्रेष शमत नाही. तो क्षमाशीलतेनेच शांत होऊ शकतो.”
१०. “सत्य म्हणजे खरे. माणसाने कधीही खोटे बोलता कामा नये. त्याचे भाषण हे सत्यच असले पाहिजे. ते सत्याखेरीज दुसरे काहीही असता कामा नये.”
११. “अधिष्ठान म्हणजे ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय.”
१२. “करुणा म्हणजे सर्व मानवाविषयीची प्रेमपूर्ण दयाशीलता.”
१३. “मैत्री म्हणजे सर्व प्राण्यांविषयी-मित्राविषयीच नव्हे तर शत्रूविषयीदेखील, मनुष्यप्राण्याविषयीच नव्हे तर सर्व जीवमात्राविषयी बंधुभाव बाळगणे.”
१४. “उपेक्षा म्हणजे औदासीन्याहून निराळी अशी अलिप्तता, अनासक्ती,आवड किंवा नावड नसलेली ती एक मनाची स्थिती होय. फलप्राप्तीने विचलित न होणे; परंतु निरपेक्षतेने सतत प्रयत्न करीत राहणे म्हणजेच उपेक्षा.”
१५. “आपण्या कुवतीनुसार प्रत्येकाने या सद्रणाचे पालन केले पाहिजे.” म्हणूनच त्यांना पारमिता (पूर्णत्वाच्या अवस्था) असे म्हणतात.”
६. भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन (पूर्ण)
१. बुद्धाने आपला धम्म आणि त्यातील विषय समजावून सांगितल्यानंतर परिव्राजकांना विचारले :
२. “ व्यक्तिगत शुद्धी हा जगातील चांगल्या गोष्टींचा पाया नाही काय?” त्यांनी उत्तर दिले, “आपण म्हणता ते बरोबर आहे!”
३. नंतर बुद्धाने विचारले, “लोभ, क्रोध, अज्ञान, प्राणहत्या, चौर्य, व्यभिचार आणि खोटे बोलणे यामुळे व्यक्तीगत शुद्धीचा पाया ढासळत नाही काय? या वाईट गोष्टीवर ताबा ठेवता यावा म्हणून व्यक्तीगत शुद्धीकरिता चारित्र्याचे सामर्थ्य वाढविणे आवश्यक नाही काय? माणसांमध्ये जर व्यक्तीगत शुद्धी नसेल तर तो चांगल्या गोष्टी करण्यास साधनभूत कसा होऊ शकेल?” आणि परिव्राजकांनी उत्तर दिले, “आपण म्हणता तसेच आहे.”
४. “आणखी असे की, दुसर्यांना गुलाम करण्यात किंवा त्यांच्यावर सत्ता गाजविण्यात लोकांना हरकत का वाटत नाही? दुसर्याचे जीवन दुःखी करण्यात त्यांना काही का वाटत नाही? माणसे एकमेकाशी सदाचाराने वागत नाहीत हेच त्याचे कारण नव्हे काय?” आणि परिव्राजक उत्तरले, “बरोबर आहे.”
५. “जर प्रत्येकाने अष्टांग मार्गाचा-सम्यक दृष्टी, सम्यक् संकल्प, सम्यक् वाचा, सम्यक आजीविका, सम्यक् कर्मान्त, सम्यक् व्यायाम, सम्यक् स्मृती आणि सम्यक् समाधी, यांचा-थोडक्यात सदाचार मार्गाचा-अवलंब केला तर एक माणुस दुसर्या माणसावर करीत असलेला अन्याय आणि अमानुषपणा दूर होणार नाही काय?” त्यावर ते म्हणाले, “होय”
६. शील किंवा सद्वणाच्या मार्गाचा उल्लेख करून बुद्धाने विचारले, “गरजू आणि गरीब लोकांचे दु:ख नाहीसे करण्यासाठी आणि सर्व लोकांचे कल्याण करण्यासाठी दान आवश्यक नाही काय? जेथे दारिद्र आणि दुःख आहे तेथे तेथे लक्ष पुरवून ते दूर करण्यासाठी करुणा आवश्यक नाही काय? निस्वार्थपणे करावयाचा कार्यासाठी निष्काम भावाची आवश्यकता नाही काय? वैयक्तिक लाभ होत नसला तरीही सतत प्रयत्लशील राहण्यासाठी उपेक्षा आवश्यक नाही काय?”
७. “माणसावर प्रेम करणे आवश्यक नाही काय?”? आणि ते म्हणाले, “होय.”
८. “याच्याही पुढे जाऊन मी म्हणतो, केवळ प्रेम करणे पुरेसे नाही. खरी आवश्यकता आहे ती मैत्रीची. ती प्रेमापेक्षा जास्त व्यापक आहे. केवळ मानवाविषयच नव्हे तर सर्व प्राणिमात्त्म्विषयी बंधुभाव वाटणे हा मैत्रीचा अर्थ आहे. ती मानवापुरत्ती मर्यादित नाही. अशा प्रकारची मैत्री आवश्यक नाही काय? आपले मन नि:पक्षपाती, मोकळे, प्रत्येकावर प्रेम करणारे, आणि कुणाचाही द्वेष न करणारे असे असावे म्हणून आपणा स्वत:ला जो आनंद हवा असतो तोच आनंद सर्व प्राणिमात्रांना मैत्रीखेरीज यापेक्षा दुसर्या कशाने मिळू शकेल?”
९. ते सर्व म्हणाले, “होय.”
१०. “परंतु या सर्व सद्रणांच्या रू च्या आचरणास प्रज्ञेची-बुद्धीची-जोड दिली पाहिजे.” व बुद्धाने विचारले, “प्रज्ञा आवश्यक नाही काय? “ परिव्राजकांनी काहीच उत्तर दिले नाही. आपल्या प्रश्नाचे उत्तर देणे त्यांना भाग पडण्यासाठी भगवान बुद्ध पुढे म्हणाले, “दुष्कर्म न करणे, वाईटाचा विचार न करणे, उपजीविकेसाठी कुमार्गाचा अवलंब न करणे आणि जे वाईट आहे किंवा दुसर्याला दु:ख देणारे आहे असे काहीही न बोलणे हे चांगल्या माणसाच्या अंगचे गुण होत.” परिव्राजक म्हणाले, “होय, ते बरोवर आहे.’
१२. “परंतु आंधळेपणाने सत्कृत्य करणे हे उचित आहे काय? “भगवान बुद्धाने विचारले, “मी म्हणतो ‘नाही’ हे पुरेसे नाही.” भगबान बुद्ध परिव्राजकांस पुढे म्हणाले, “हेच जर पुरेसे होते, तर तान्हे मूल नेहमीच चांगली कृत्ये करते असे म्हणावे लागेल. कारण, तान्ह्या मुलाला शरीर म्हणजे काय हे कळत नसते. पाय झाडण्याखेरीज ते आपल्या शरीराने दुसरे कोणतेही वाईट कृत्य करू शकणार नाही. बोलणे म्हणजे काय हे त्याला कळत नाही. त्या अर्थी रडण्यापलीकडे अधिक वाईट असे ते काही वोलूच शकणार नाही. आनंदाने किंकाळ्या मारण्यापलीकडे विचार म्हणजे काय हे त्याला कळत नाही. उपजीविका म्हणजे काय हे त्याला कळत नाही; त्या अर्थी आईचे स्तन चोखण्यापलीकडे जगण्याचा दुसरा कोणताही वाईट मार्ग ते अवलंबू शकणार नाही.”
१३. “प्रज्ञेच्या कसोटीला सद्गणमार्ग उतरला पाहिजे. म्हणून समज आणि बुद्धी हेच प्रज्ञेचे दुसरे नाव आहे.”
१ ४. “प्रज्ञा पारमिता ही इतकी महत्वाची व आवश्यक का आहे याचे दुसरेही एक कारण आहे. दान आवश्यक आहे. परंतु प्रज्ञेशिवाय दानाचा दुष्यरिणाम होऊ शकतो. करुणेची आवश्यकता आहे. परंतु प्रज्ञेशिवाय करुणेचा परिणाम वाईट गोष्टींना आधार देण्यात होण्याचा संभव आहे. पारमितेची प्रत्येक कृती ही प्रज्ञा पारमिताच्या कसोटीला उतरली पाहिजे. शहाणपण हे प्रज्ञा पारमिताचे दुसरे नाव आहे.”
१५. “माझे म्हणणे असे की, अकुशल कर्म कोणते आणि ते कसे घडून येते याचे ज्ञान आणि जाणीव असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कुशल र्क््म कोणते याचे ज्ञानव जाणीव असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अकुलश कर्म कोणते आणि कुशल कर्म कोणते याचे देखील ज्ञान आणि जाणीव असली पाहिजे. अशा ज्ञानाशिवाय कृती चागली असूनही खरा चांगुलपणा असू शकणार नाही. म्हणूनच मी म्हणतो की, प्रज्ञा हा एक आवश्यक असा सद्वण आहे.”
१६. नंतर परिव्राजकांना पुढीलप्रमाणे आदेश देऊन भगवान बुद्धाने आपले प्रवचन संपविले.
१७. “माझा धम्म निराशावादी आहे असे तुम्ही म्हणण्याचा संभव आहे. कारण तो दु:खाच्या अस्तित्वाकडे मानवजातीचे लक्ष वेधितो. मी असे सांगतो की, माझ्या धम्माविषयीचा हा दृष्टिकोन चुकीचा ठरेल.”
१८. “माझा धम्म दुःखाचे अस्तित्व मान्य करतो. यात शंका नाही; परंतु दुःखाचे निरसन करण्यावरही तो तितकाच जोर देतो हे विसरू नका.”
१९. “माझा धम्मामध्ये मानवी जीवनाचा उद्देश आणि आशा या दोहोंचाही अंतर्भाव आहे.”
२०. “माझ्या धम्माचा हेतू अविद्या नष्ट करणे हा आहे; अविद्या म्हणजे दुःखाच्या अस्तित्वाविषयीचे अज्ञान होय.”
२१. “त्यात आशा आहे. कारण मानवी दुखाचा अंत करष्याचा मार्ग तो दाखवितो.”
२२. “तुम्हाला हे म्हणणे मान्य आहे की नाही? ” आणि परिव्राजक म्हणाले, “होय, आम्हाला मान्य आहे.”
७. परिव्राजकांची प्रतिक्रिया
१. हा खरोखरच एक नवीन धम्म आहे याची परिव्राजकांना हां ताबडतोब जाणीव झाली. जीवनाच्या प्रश्नाकडे पाहण्याच्या या नव्या दृष्टीचा त्यांच्यावर इतका परिणाम झाला की, ते एकमताने म्हणाले, “जगाच्या इतिहासात आजपर्यंत मानवी दुःखाचे अस्तित्व मान्य करणे हाच धर्माचा खरा पाया आहे हे कोणत्याही धर्मसंस्थापकाने सांगितलेले नाही.”
२. “जगाच्या इतिहासात कोणत्याही धर्मसंस्थापकाने या दुःखाचा परिहार करणे हा धर्माचा खरा उद्देश आहे हे सांगितलेले नाही.”
३. “जगाच्या इतिहासात यापूर्वी मूलतःच इतका सरळ आणि साधा, अदभूतता आणि अतिमानुषी शक्तीपासून इतका मुक्त, आत्मा, ईश्वर आणि मरणोत्तर जीवन यापरील श्रद्धेपासून इतका स्वतंत्र, इतकेच नव्हे तर अशा श्रद्धेला विरोध असणारा मुक्तीचा मार्ग कधीही पुढे मांडण्यात आला नाही!”
४. “जगाच्या इतिहासात यापूर्वी कुणीही अशा धर्माची योजना पुढे मांडली नाही की, ज्यामध्ये दैवी साक्षात्काराला थारा नाही आणि ज्याच्या आज्ञा ह्या ईश्वराच्या आज्ञा नसून त्या माणसाच्या सामाजिक गरजांच्या चिकित्सेपोटी निर्माण झालेल्या आहेत!”
५. “जगाच्या इतिहासात मोक्ष हे असे सुखाचे वरदान आहे की, जे माणसाने स्वप्रयत्नाने व सदाचाराने वागुन याच जन्मात आणि याच पृथ्वीतलावर राहुन प्राप्त करावयाचे असते, हा मोक्षाचा अर्थ यापूर्वी कुणीही सांगितला नाही!”
६. भगवान बुद्धाचा नव्या धम्माचे प्रवचन ऐकल्यावर परिव्राजकांनी अशा भावना व्यक्त केल्या.
७. जो अत्युच्य नैतिक भावनेने प्रेरित झालेला आहे आणि जो आपल्या काळातील बौद्धिक ज्ञानात तज्ञ आहे, जो एक नव्या विचारांचा प्रणेता आहे. याच जगात, याच जीवनात आत्मविकास व आत्मसंयमन यांच्या योगाने झालेल्या आंतरिक हृदयपरिवर्तनाने मुक्ती मिळू शकते, हे आपले तत्व विरोधी प्रवृत्तीची जाणीव असूनही बुद्धिपुरस्सर पुढे मांडण्याचे ज्याच्यात धैर्य आहे अशा भगवान बुद्धाच्या रूपाने एक सूमाजसुधारक लाभला आहे असे त्यांना वाटले.
८. भगवान बुद्धाविषयी त्यांचा आदर इतका अमर्याद झाला की, ते त्यास ताबडतोब शरण गेले आणि आपले शिष्य म्हणून आपला स्वीकार करावा अशी त्यांनी त्यास विनंती केली.
९. “एहि भिक्खवे” (भिक्खुंनो, या.) हा मंत्र उच्चारून भगवान बुद्धाने त्यांना आपल्या धम्मात प्रविष्ट करून घेतले. ते पंचवर्गीय भिक्खू म्हणून पुढे ओळखले जाऊ लागले.