Part VII — Conversion of Women
Conversion of Women PDF in English
खंड २ : धम्म दीक्षेची मोहीम
भाग सातवा: स्त्रियांची धम्मदीक्षा
Conversion of Women
१. महाप्रजापती गौतमी, यशोधरा आणि तिच्या मैत्रिणी यांना धम्मदीक्षा
१. जेव्हा भगवान बुद्धांनी कपिलवस्तूला भेट दिली तेव्हा शाक्य पुरुषांप्रमाणे शाक्य स्त्रियांनादेखील संघात प्रविष्ट होण्याची उत्सुकता होती.
२. अशा स्त्रियांचे नेतृत्व महाप्रजापती गौतमीकडे होते.
३.ज्या वेळी भगवंत शाक्यासह न्यग्नोधारामात राहात होते त्या वेळी महाप्रजापती गौतमी त्यांच्याकडे जाऊन म्हणाली: “भगवान तथागतांनी सांगितलेल्या धम्म आणि विनयानुसार स्त्रियांना प्रवज्ज्या देऊन त्यांना संघात प्रवेश देण्याची अनुज्ञा दिली तर फार चांगले होईल!”
४. “नको गौतमी, असा विचार तुझ्या मनात येऊ देऊ नकोस!” पुन्हा दुसऱ्यादा आणि तिसऱ्यादा गौतमीने तीच विनंती त्याच शब्दात केली आणि दोन्ही वेळा बुद्धाने तिला तेच उत्तर दिले.
५. नंतर निराश आणि दुःखी झालेल्या गौतमीने भगवन्तांना वंदन केले आणि अश्रु ढाळीत रडत ती परत गेली.
६. पुढील प्रवासाकरिता भगवतांनी न्यग्नोधाराम सोडल्यानंतर महाप्रजापती आणि शाक्य स्त्रिया एकत्र बसल्या आणि आपली संघप्रवेशाची विनंती व भगवंतांनी त्या विनंतीला दिलेला नकार याविषयी त्या विचार करु लागल्या.
७. भगवंतांचा नकार अंतिम आहे असे मानण्यास शाक्य स्त्रिया तयार नव्हत्या. त्यांनी यापुढे जाऊन परिव्राजिकेचा स्वत:च वेष धारण करुन भगवंतांसमोर उभे राहण्याचे आणि आपण अगोदरच प्रत्रज्ज्य घेतली असल्याचे भगवंतांच्या निदर्शनास आणून देण्याचे ठरविले.
८. तदनुसार महाप्रजापतीने मुंडन केले. पीतवस्त्रे धारण केली आणि शाक्य कुळातील अनेक स्त्रियांसह ती भगवंतांना भेटण्यासाठी निघाली. भगवंतांनी त्या वेळी वैशाली येथे महावनातील कूटागार भवनात वास्तव्य केले होते.
९. महाप्रजापती गौतमी आपल्या सोबतिणींसह धीरे धीरे वैशालीला य्रेऊन पोहोचली आणि धुळीने माखलेल्या व सुजलेल्या पायांनी ती कूटागाराच्या सभागृहात आली.
१०. तथागत न्यग्नोधारामात वास्तव्य करीत असताना त्यांना तिने जी विनंती केली होती तीच विनंती तिने पुन्हा एकदा केली आणि भगवंतांनी ती पुन्हा नाकारली.
११. आपल्या विनंतीला दुसर्यांदा नकार मिळाल्यानंतर महाप्रजापती मागे फिरून सभागृहाच्या प्रवेशद्वारापाशी जाऊन उभी राहिली. काय करावे हे तिला सुचेना. ती याप्रमाणे उभी राहिली असतानाच सभागृहाकडे येत असलेल्या आनंदाने तिला पाहिले आणि ओळखले.
१२. तेव्हा त्यांनी महाप्रजापतीला विचारले, “सुजलेल्या आणि धुळीने माखलेल्या पायांनी प्रवेशद्वाराबाहेर अशी दुःखाने रडत आणि अश्रु ढाळीत का उभी आहेस?” “कारण, आनंदा, गृहत्याग करुन भगवंताचा धम्म व विनय याचा स्वीकार करुन गृहहीन जीवन जगण्याची अनुज्ञा तथागत स्त्रियांना देत नाहीत” महाप्रजापती म्हणाली.
१३. नंतर स्थविर आनंद ज्या ठिकाणी तथागत होते त्या ठिकाणी गेला. त्याने तथागतास अभिवादन केले आणि ‘एका बाजूला बसल्यावर तो भगवंतांना म्हणाला, “पहा भगवन्, महाप्रजापती गौतमी प्रवेशद्वाराबाहेर उभी आहे; तिचे पाय सुजलेले आहेत आणि ते धुळीने माखलेले आहेत; दुःखी कष्टी होऊन रडत ती अश्रु ढाळीत आहे. कारण गृहत्याग करुन आणि भगवंतांचा धम्म व विनय याचा स्वीकार करुन गृहहीन जीवन जगण्याची अनुज्ञा भगवंत स्त्रियांना देत नाहीत. भगवन्, तिच्या इच्छेनुसार स्त्रियांना अनुज्ञा दिली तर बरे होईल.”
१४. “महाप्रजापतीने मावशी आणि दाई या नात्याने तथागतांचे पालनपोषण केले, त्यांना दूध दिले, आणि तथागतांच्या मातेच्या मृत्यूनंतर तिने त्यांना अंगावर पाजले. याप्रमाणे तिने आपली उपयुक्तता सिद्ध केली नाही काय? म्हणून हे भगवन्, संसारत्याग करुन गृहहीन जीवन जगण्याची आणि तथागतांनी सांगितलेला धम्म आणि विनय पाळण्याची अनुज्ञा स्त्रियांना देणे योग्य होईल.”
१५. “नको, आनंदा, स्त्रियांना तसे करण्याला संमती देणे योग्य नाही.” आनंदाने पुन्हा दुसर्यांदा आणि तिसर्यांदा त्याच शब्दांत तीच विनंती केली आणि त्याला तेच उत्तर मिळाले.
१६. नंतर स्थविर आनंदाने तथागतास विचारले, “स्त्रियांना परिव्रजा घेण्यास आपण अनुज्ञा देत नाही याचे कारण काय?”
१७. “शूद्र आणि स्त्रिया अस्वच्छ आणि हीन दर्जाच्या असल्यामुळे त्यांना मोक्ष मिळू शकत नाही असे ब्राम्हण मानतात, हे भगवंतांना माहीत आहे. म्हणून ते शूद्र आणि स्त्रिया यांना परिव्रज्या घेऊ देत नाहीत. तथागतांचे मत ब्राम्हणांप्रमाणेच आहे काय?”
१८. “ब्राम्हणाप्रमाणेच शूद्रांनादेखील परिव्रजा घेऊन संघप्रवेश करण्यास तथागतांनी संमती दिली नाही काय? भगवन्, स्त्रियांच्या बाबतीत असा भेदभाव करण्याचे कारण काय?”
१९. “तथागतांनी सांगितलेला धम्म आणि विनय यांचा स्वीकार करून निब्बाण प्राप्त करून घेण्यास स्त्रिया समर्थ नाहीत असे तथागतांना वाटते काय?”
२०. तथागतांनी उत्तर दिले, “आनंदा, गैरसमज करून घेऊ नकोस. निब्बाणाप्रत पोहोचण्यास पुरुषाइतक्याच स्त्रिया समर्थ आहेत असे माझे मत आहे. आनंदा! माझ्याविषयी गैरसमज करून घेऊ नकोस स्त्रीपुरुषांतील विषमतेच्या तत्वांचा मी पुरस्कर्ता नाही. महाप्रजापतीच्या विनंतीला मी दिलेला नकार हा स्त्रीपुरुषांतील विषमतेवर आधारलेला नाही. तो व्यावहारिक करणांवर आधारलेला आहे.”
२१. “भगवन्, खरे कारण समजल्यामुळे मला फार आनंद झाला आहे; परंतु व्यावहारिक अडचणीमुळे भगवन्तांनी तिची विनंती अमान्य केलीच पाहिजे काय? या कृत्यामुळे धम्माला कमीपणा येणार नाही काय? आणि स्त्रीपुरुषांतील असमानतेच्या निदेला तो पात्र ठरणार नाही काय? भगवन्तांना ज्याची काळजी वाटते ते अशा प्रकारच्या व्यावहारिक अडचणीतून पार पडण्यासाठी काही नियम भगवंतांना तयार करता येणार नाहीत काय?”
२२. “ठीक आहे; आनंदा ! माझा धम्म आणि विनय यांचे पालन करुन परिव्रज्या घेण्याची अनुज्ञा स्त्रियांना दिलीच पाहिजे असा जर महाप्रजापती गौतमीचा आग्रह असेल तर मी त्याला संमती देतो. पण आठ अटींवर मी ती संमती देतो. ते आठ मुख्य नियम अंमलात आणण्याची जबाबदारी महाप्रजापती गौतमीने स्वतः घ्यावी. तोच तिचा संघ प्रवेशाचा प्रारंभ ठरेल.”
२३. नंतर तथागताकडून या आठ मुख्य नियमांचे ज्ञान करून घेतल्यावर स्थविर आनंद महाप्रजापती गौतमीकडे गेला आणि तथागतांचे सर्व म्हणणे त्याने तिला सांगितले.
२४. “आनंदा, अलंकारप्रिय कुमार किवा कुमारिका ज्याप्रमाणे स्वानानतर कमलपुष्पाच्या, जाइच्या फुलाच्या किंवा स्तिमुतक पुष्पांच्या मालेचा दोन्ही हातांनी स्वीकार करील आणि ती आपल्या शिरावर धारण करील त्याचप्रमाणे या आठ मुख्य नियमांचा मी स्वीकार करीत आहे आणि मी माइया आयुष्यात त्या नियमांचा कधीही भंग करणार नाही.” महाप्रजापती गौतमी आनंदास म्हणाली.
२५. नंतर स्थविर आनंद तथागताकडे परत गेला आणि त्यांना वंदन करुन तो त्यांच्या एका बाजूला बसला. याप्रमाणे बसल्यावर स्थविर आनंद तथागतास म्हणाला; “भगवन्, आठ मुख्य नियम अमलात आणण्याची जबाबदारी महाप्रजापती गौतमीने स्वीकारली आहे. म्हणून तिने उपसंपदा घेतली आहे आणि संघप्रवेश केला आहे भसे मानावे.”
२६. महाप्रजापतीला उपसंपदा मिळाली आणि तिच्यासह आलेल्या पाचशे शाक्य स्त्रियांनाही त्याच वेळी दीक्षा देण्यात आली. याप्रमाणे दीक्षा मिळाल्यावर महाप्रजापती भगवंतांसमोर आली आणि त्यांना अभिवादन करून एका बाजूला उभी राहिली व तथागतांनी तिला धम्म व विनय यांचा उपदेश दिला.
२७. इतर पाचशे भिक्षुणींना तथागतांचा एक शिष्य नंदक याने उपदेश दिला.
२८. महाप्रजापतीबरोबर ज्या शाक्य स्त्रिया भिक्खुणी झाल्या त्यात यशोधराही होती. तिच्या संघप्रवेशानंतर ती भद्दाकच्चाना ( भद्रा कात्यायना ) म्हणून ओळखली जाऊ लागली.
२. चंडालिका प्रकृतीची धम्मदीक्षा
१. एकदा श्रावस्ती येथे अनाथपिंडकाच्या जेतवन आश्रमात भगवान बुद्ध राहात होते.
२. भगवंतांचा शिष्य आनंद एकदा नगरात भिक्षा मागण्यासाठी गेला होता. भोजन केल्यावर पाणी पिण्यासाठी आनंद नदीवर जात होता.
३. त्याने तेथे भांड्यात पाणी भरत असलेली एक मुलगी पाहिली. आनंदाने तिच्याजवळ थोडेसे पाणी मागितले.
४. प्रकृती नावाच्या त्या मुलीने “मी चांडालिका आहे” असे म्हणून पाणी देण्याचे नाकारले.
५. आनंद म्हणाला, “मला पाणी हवे आहे. मला तुझ्या जातीशी कर्तव्य नाही.” मग त्या मुलीने आपल्या भांड्यातील थोडेसे पाणी त्याला दिले.
६. नंतर आनंद जेतवनाकडे जाण्यासाठी निघाला. ती मुलगी त्याच्या मागोमाग गेली. तो कुठे राहतो हे तिने पाहिले आणि तिला असे समजले की त्याचे नाव आनंद असून तो भगवान बुद्धाचा शिष्य आहे.
७. घरी आल्यावर तिने आपली आई मातंगी हिला सगळी हकीकत सांगितली आणि जमिनीवर पडून ती रडू लागली.
८. आईने तिला रडण्याचे कारण विचारले. सगळी हकीकत सांगून ती मुलगी म्हणाली, “जर माझे लग्न करण्याची तुझी इच्छा असेल तर मी आनंदाशीच लग्न करीन; मी दुसर्या कुणाशीही लग्न करणार नाही.”
९. आईने चौकशीला सुरुवात केली. परत आल्यावर तिने सांगितले की, “ हे लग्न अशक्य आहे; कारण आनंदाने ब्रम्हचर्याचे व्रत धारण केले आहे.”
१०. हे ऐकल्यावर त्या मुलीला अत्यंत दुःख झाले आणि तिने अन्नत्याग केला. ही परिस्थिती म्हणजे काही विधिलिखितच आहे असे मानावयास ती तयार नव्हती. म्हणून ती म्हणाली, “आई! तुला चेटुकाची कला अवगत आहे ना? मग आपला हेतू साध्य करण्यासाठी तू त्याचा उपयोग का करीत नाहीस?” आई म्हणाली, “काय करता येईल ते मी पाहते.”
११. मातंगीने आनंदाला आपल्या घरी भोजनाचे निमंत्रण दिले. मुलीला फारच आनंद झाला. त्या वेळी मातंगी आनंदाला म्हणाली, “माझी मुलगी आपल्याशी लग्न करायला फार उत्सुक आहे.” आनंदाने उत्तर दिले, “मी ब्रम्हचारी राहण्याचे व्रत घेतले आहे आणि म्हणून कोणत्याही स्त्रिशी मी विवाह करू शकत नाही.”
१२. “जर आपण माझ्या मुलीशी लग्न केले नाही तर ती आत्महत्या करील; इतकी ती आपल्याकडे आकर्षित झालेली आहे.” मातंगीने आनंदाला सांगितले. “पण मला नाइलाज आहे.” आनंदाने उत्तर दिले.
१३. मातंगी आत गेली आणि तिने आपल्या मुलीला आनंदाने लग्न करण्यास नकार दिल्याचे सांगितले.
१४. मुलीने ओरडून विचारले, “आई, तुझी ती चेटुक-विद्या गेली कुठे?” आई म्हणाली, “माझे चेटुक तथागतांच्या विरुद्ध चालू शकत नाही.”
१५. मुलगी ओरडून म्हणाली, “दार बंद कर आणि त्यांना बाहेर जाऊ देऊ नकोस. म्हणजे आज रात्रीच मी त्याना माझे पती व्हावयास लावते.”
१६. आईने मुलीच्या इच्छेप्रमाणे केले. रात्र झाल्यावर आईने एक बिछाना खोलीत आणला. उत्कृष्ट पोषाख करून मुलीने आत पाऊल टाकले. परंतु आनंद अचल राहिला.
१७. आईने शेवटी चेटुकाचा प्रयोग केला. त्यामुळे खोलीत आग भडकली. आईने आनंदाचे वस्त्र धरले आणि ती म्हणाली, “जर तुम्ही माझ्या मुलीबरोबर लग्न करणार नसाल, तर तुम्हाला मी या आगीत फेकून देईन.” तथापि आनंद शरण गेला नाही. आईने न व मुलीने असहाय होऊन त्याला सोडून दिले .
१८. आनंदाने परत आल्यावर तथागतांना सर्व हकीकत सांगितली.
११. दुसऱ्या दिवशी आनंदाचा शोध करीत ती मुलगी जेतवनात आली. आनंद भिक्षेसाठी बाहेर पडला होता. त्याने तिला पाहिले आणि तो तिला टाळू लागला. परंतु तो जिथे गेला तिथे तिथे ती मुलगीही त्याच्या मागोमाग गेली.
२०. जेव्हा आनंद जेतवनात परतला तेव्हा आपल्या विहाराजवळ ती मुलगी उभी असल्याचे त्याने पाहिले.
२१. या मुलीने आपला कसा पिच्छा पुरविला आहे हे आनंदाने तथागतांना सांगितले. भगवंतांनी तिला बोलाविण्या सांगितले.
२२. मुलगी समोर आल्यावर तथागतांनी तिला प्रश्न केला, “तू आनंदाचा पिच्छा का पुरवीत आहेस?” मुलगी म्हणाली, “त्यांच्याशी मला लग्न करायचे आहे. ते अविवाहित असल्याचे ऐकले आहे व मीही अविवाहित आहे.”
२३ भगवंत म्हणाले, “आनंद हा भिक्खु आहे; आणि त्याच्या डोक्यावर केस नाहीत. जर तूही संपूर्ण मुंडन केलेस तर मग काय करता येईल ते मी पाहीन.”
२४. मुलीने उत्तर दिले, “माझी तयारी आहे” भगवंत म्हणाले, “मुंडन करण्याविषयी तू आपल्या आईची संमती मिळविली पाहिजेस.”
२५. मुलगी आईकडे आली आणि म्हणाली, “आई, तुला जे करता आले नाही ते मी केले आहे. मी मुंडन केले तर आनंदाशी माझे लग्न करण्याचे वचन भगवंतांनी दिले आहे.”
२६. आई रागावली आणि म्हणाली, “तू तसे मुळीच करता कामा नये. तू माझी मुलगी आहेस आणि तू केस राखलेच पाहिजेस. आनंदासारख्या श्रमणांशी लग्न करण्यास तू इतकी का उतावीळ झाली आहेस? त्यापेक्षा चांगल्या माणसाशी मी तुझे लग्न लावून देईन.”
२७. तिने उत्तर दिले, “मी आनंदाशीच लग्न करीन किंवा प्राण देईन माझ्यापुढे तिसरा पर्याय नाही.”
२८. आई म्हणाली, “तू माझा अपमान का करीत आहेस?” मुलगी म्हणाली, “जर तुझे माझ्यावर प्रेम असेल तर माझ्या इच्छेप्रमाणे मला करू दे.”
२९. आईने आपला विरोध मागे घेतला आणि मुलीने मुंडन करून घेतले.
३०. नंतर ती तथागतांच्या समोर गेली आणि म्हणाली, “आपण सांगितल्या प्रमाणे मी मुंडन केले आहे.”
३१. तथागतांनी तिला विचारले, “तुला काय पाहिजे आहे? त्याच्या शरीराचा कोणता भाग तुला आवडतो?”
मुलगी म्हणाली, “माझे त्यांच्या नाकावर प्रेम आहे. त्यांच्या मुखावर प्रेम आहे, त्यांच्या कानावर माझे प्रेम आहे, त्यांच्या आवाजावर माझे प्रेम आहे, त्यांच्या डोळ्यांवर माझे प्रेम आहे. आणि त्यांच्या चालण्याच्या पद्धतीवर माझे प्रेम आहे.”
३२. तेम्हा भगवंत त्या मुलीला म्हणाले, “डोळे हे अश्रूंचे घर आहे, नाक हे घाणीचे घर आहे, तोंड हे थूंकीचे घर आहे, कान हेही मळाचे घर आहे आणि शरीर हे मलमूत्राचे आगर आहे, हे तुला माहित आहे काय?”
३३. “जेव्हा स्त्रि-पुरुष एकत्र येतात तेव्हा ते संतती निर्माण करतात. परंतु जेथे जन्म आहे तेथे मृत्यूही आहे; जेथे मृत्यु आहे तेथे दु:खही आहे. मुली, आनंदाशी लग्न करून तुला काय मिळणार आहे, हे मला कळत नाही.”
३४. मुलगी विचार करू लागली आणि आनंदाशी लग्न करण्याचा तिने जो इतका आग्रह धरला होता त्यात काही अर्थ नाही हे तिने मान्य केले व भगवंतांना तसे सांगितले.
३५. भगवंतांना वंदन करून ती त्यांना म्हणाली, “अज्ञानामुळे मी आनंदाच्या मागे लागले होते. आता माझ्या मनात प्रकाश पडला आहे. माझी स्थिती वादळात सापडलेल्या पण नंतर किनाऱ्यास सुरक्षित पोचलेल्या नौकेवरील नाविकासारखी झाली आहे. निराश्रित झालेल्या वृद्धाला आश्रय मिळावा अशी मी झाले आहे. आंधळ्याला नवी दृष्टी लाभावी अशी माझी स्थिती झाली आहे. भगवन्तानी आपल्या सदुपदेशाने मला झोपेतून जागे केले आहे.”
३६. “प्रकृती, तू भाग्यवान आहेस; कारण तू चांडालिका असलीस तरी कुलीन स्त्रि-पुरुषांपुढील आदर्श आहेस. तू हीन जातीची आहेस पण ब्राम्हणही तुझ्यापासून धडा घेतील. न्याय आणि सदाचरण यांच्या मार्गावरुन तू ढळू नकोस म्हणजे सिंहासनावरील राजवैभव भोगणार्या राण्याही तुझ्यापुढे फिक्या पडतील.”
३७. विवाहाचा प्रश्न मिटल्यामुळे भिक्खुणींच्या संघात प्रवेश करणे हा एकच मार्ग तिच्यापुढे होता.
३८. त्याप्रमाणे तिने आपली इच्छा प्रकट केल्यावर जरी ती अंत्यज होती तरीही तिला संघात प्रवेश देण्यात आला.