Conversion Resumed

CAMPAIGN FOR CONVERSION RESUMED

Part V — Campaign for Conversion Resumed

Campaign for Conversion Resumed PDF in English

द्वितीय खंड: धम्मदीक्षेची मोहीम

भाग पाचवा: धम्मदीक्षेच्या मोहिमेस पुन्हा सुरुवात 

Conversion Resumed

Previous page                                                         Next page

१. खेडवळ ब्राम्हणांना धम्मदीक्षा

१. गृधकूट पर्वताच्या पाठीमागे राजगृहाजवळच एक खेडे होते. तेथे सुमारे सत्तर कुटुंबे होती; आणि ती सर्व ब्राम्हणांची होती.

२. या लोकांना आपल्या धम्माची दीक्षा देण्याच्या इच्छेने भगवान बुद्ध तेथे आले आणि एका झाडाखाली बसले. 

३. त्यांचे तेजस्वी व्यक्तीमत्व व दिव्य कांती पाहून लोक त्यांच्या भोवती जमले. तेव्हा त्यांनी ब्राम्हणांना विचारले, “तुम्ही या पर्वताजवळ किती वर्षे राहात आहात? आणि तुम्ही कोणता व्यवसाय करता?” 

४. यावर त्यांनी उत्तर दिले, “आमच्या येथे तीस पिढ्या होऊन गेल्या आहेत. आणि गुरेढोरे पाळणे हा आमचा व्यवसाय आहे.” 

५. त्यांच्या धार्मिक श्रद्धेविषयी विचारता ते म्हणाले, “ निरनिराळ्या ऋतू नुसार आम्ही सूर्य, चंद्र, पर्जन्य आणि अग्नी यांची पूजा करतो, व त्यांना होमहवन करतो.” 

६. “ जर एखाद्याला मृत्यु आला तर आम्ही एकत्र येतो आणि ब्रम्हलोकात त्याला जन्म मिळावा आणि अशा प्रकारे जन्ममरणाच्या फेर्यांतून तो मुक्‍त व्हावा म्हणून प्रार्थना करतो.”

७. भगवान बुद्धांनी उत्तर दिले, “ हा सुरक्षित मार्ग नव्हे. यापासून तुमचा काहीच फायदा होणार नाही. माझ्या मार्गाचे अनुकरण करणे, खरे श्रमण बनणे, आणि निर्वाणप्राप्तीसाठी आत्मसंयमाचा अभ्यास करणे हाच खरा मार्ग होय.” आणि ते पुढे म्हणाले; 

८. “जे थोतांडाचा अवलंब करून असत्याला सत्य आणि सत्याला असत्य समजतात त्यांना कधीही सद्गती  प्राप्त होत नाही.” 

९. “ परंतु सत्याला सत्य म्हणून ओळखणे आणि असत्याला असत्यच मानणे, ही खरी सम्यक्‌ दुष्टी होय. हिच्यामुळेच तुम्हाला सद्वती लाभेल.” 

१०. जगात मृत्यु सर्वत्र आहे – त्याच्यापासून कोणाचीही सुटका नाही.

११. “ज्याला मृत्यु नाही असे काहीही जन्माला येऊ शकत नाही. ही गोष्ट सर्व प्राणिमात्राच्या बाबतीत लक्षात घेणे आणि म्हणून जन्ममृत्यूच्या बंधनातून सुटण्याची इच्छा करणे म्हणजेच खरी धर्मसाधना होय.”

१२. हे शब्द ऐकल्याबरोबर त्या सत्तर ब्राम्हणांनी श्रमण होण्याची इच्छा प्रगट केली आणि भगवान बुद्धांनी त्यांना अनुमती दिल्यावर त्यांचे मुंडन करण्यात आले; आणि ते खरे श्रमण दिसू लागले. 

१३. नंतर ते सर्व विहाराकडे जाण्यासाठी निघाले. वाटेत त्यांना आपल्या बायका मुलांविषयीचे विचार सतावू लागले. परंतु त्याच वेळी जोराची पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे ते पुढे जाऊ शकले नाहीत. 

१४. रसत्याच्या बाजूला सुमारे दहा घरे होती. त्यांत त्यांनी आसरा घेण्याचा प्रयत्न केला. परंतु एका घरात प्रवेश करताच, छप्परातून पाऊस गळत आहे आणि पावसापासून रक्षण करणे शक्‍य नाही, असे त्यांना दिसून आले.

१५. तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले, “ज्याप्रमाणे घराचे छप्पर शाबूत नसले म्हणजे पावसाचे पाणी आत येते व घर गळु लागते, त्याप्रमाणे ज्या वेळी आपल्या विचारावर आपले काळजीपूर्वक नियंत्रण नसते, त्या वेळी वासना (कामवासना ) आपल्या सर्व चांगल्या संकल्पांना पोखरून काढतात.” 

१६. “परंतु ज्या वेळी छप्पर मजबूत असते, त्या वेळी त्यातून पाणी गळत नाही; त्याप्रमाणे आपल्या चित्तवृत्तीवर नियंत्रण ठेवले आणि विचारपूर्वक वर्तन केले तर असल्या वासना निर्माण होत नाहीत किंवा  आपल्याला विचलित करू शकत नाहीत.” 

१७. हे ऐकून त्या सत्तर ब्राम्हणांना आपल्या वासना दोषास्पद आहेत याबद्दल जरी खात्री झाली तरी ते संपूर्ण संशयमुक्‍त झाले नव्हते. तरीसुद्धा ते पुढे जाऊ लागले. 

१८. पुढे जात असताना एक सुगंधित वेष्टण जमिनीवर पडलेले त्यांनी पाहिले आणि भगवान बुद्धांनी त्याकडे त्यांचे लक्ष वेधण्याची संधी घेतली. जरा पुढे गेल्यानंतर जवळच पक माशाचे आतडे पडलेले आढळले. त्याच्या दुर्गंधीकडे त्यांनी त्यांचे लक्ष वेधले आणि ते म्हणाले : 

१९, “जो शुद्र आणि नीच स्वभावाच्या माणसाची संगत करतो त्याची स्थिती दुर्गंधीयुक्त पदार्थ हातात धरणाऱ्या व त्यामुळे स्वतः दुर्गंधीत होणाऱ्या माणसा सारखी होते. तो अधिकाधिक वाईट बनत जातो, आणि कोणतेही कारण नसताना दुष्टपणात तरबेज होतो.” 

२०. “परंतु ज्याप्रमाणे सुगंधी द्रव्य हातात घेणार्याचा देहही सुगंधित होतो त्याप्रमाणे ( सज्जनांची संगत धरणारा ) शहाणा माणूसही अधिक सज्जन होतो. तो उत्तरोत्तर अधिक ज्ञानी, शीलवान व गुणवान होतो. त्याला या गुणात पूर्णत्व लाभून त्याला संतोष प्राप्त होतो.” 

२१. या गाथा ऐकून घरी परतण्याची व वैषयिक सुखात निमग्न होण्याची आपली इच्छा म्हणजे आपल्याला लागलेला कलंक होय अशी खात्री पटल्यानंतर त्या सत्तर ब्राम्हणांनी तो विचार सोडून दिला अणि शेवटी ते विहारात आले व काही काळाने त्यांनी अर्हतपद प्राप्त करून घेतले.

 

२. उत्तरावतीच्या ब्राम्हणांना धम्मदीक्षा

१. एकदा भगवान बुद्ध श्रावस्ती येथे जेतवनात राहात असताना मनुष्ये व देव यांच्या कल्याणार्थ आपल्या धम्माची शिकवण देत होते. त्या वेळी पूर्वेच्या बाजूला उत्तरावती नावाच्या प्रदेशात पाचशे ब्राम्हण राहात होते.  

२. अंगाला चिखल वगैरे फासून ऋषी होण्याच्या आकांक्षेने गंगेच्या काठावर राहणार्या एक निर्ग्रंथ  संन्याश्याच्या निवासस्थानी सर्वांनी मिळून जावे असे त्यांनी ठरविले होते. 

३. जाता जाता वालवंटात त्यांना तहान लागली. एक झाड दृष्टीस पडताच जवळपास मनुष्यवस्ती असावी या आशेने ते घाईघाईने तिकडे गेले. परंतु जेव्हा ते तेथे पोहोचले तेव्हा त्यांना मनुष्यवस्तीचे एकही चिन्ह आढळले नाही. 

४. अशा परिस्थितीत ते मोठमोठ्याने आक्रोश करू लागले. अकस्मात त्या झाडातून त्यांना तेथे झाडावर राहणाऱ्या  समंधाचा आवाज ऐकू आला. त्यांच्या आक्रोशाचे कारण त्याने विचारले आणि ते कारण ऐकल्यावर त्याने त्यांना यथेच्छ खाण्यापिण्यास दिले. 

५. पुढे जाण्यास निघण्याची तयारी केल्यावर ब्राम्हणांनी त्या समंधास अशा स्वरूपाचा जन्म त्याला कसा प्राप्त झाला याचा पूर्वेतिहास विचारला.

६. त्यावर त्या वृक्ष-समंधाने सांगितले की, “ज्या वेळी अनाथ पिंडक सुदत्ताने भगवान बुद्धाला जेतवन उद्यान अर्पण केले त्या वेळी तेथे जमलेल्या भिक्खुंच्या सभेत तो गेला असताना तो त्या धम्मावरील प्रवचन रात्रभर ऐकत बसला, आणि परत जाताना त्याचा पाण्याचा पेला भरून त्याने तो त्या भिक्षूंना दान दिला.

७. दुसऱ्या  दिवशी सकाळी तो घरी परत आल्यावर “कसला त्रास झाला म्हणून तुम्ही रात्रभर घराबाहेर राहिलात?” असे त्याच्या पत्नीने त्याला रागाने विचारले. त्यावर तो म्हणाला, “मला कसलाही त्रास झाला नाही. परंतु जेतवनात भगवान बुद्धाचे प्रवचन ऐकण्यासाठी मी गेलो होतो.” 

८. तेव्हा त्याच्या पत्नीने भगवान बुद्धाला शिव्याशाप देण्यास सुरुवात केली व ती म्हणाली, “हा गौतम म्हणजे लोकांची फसवणूक करणारा एक वेडा धर्मोपदेशक आहे.” इत्यादि. 

९. “ तेव्हा तिच्या म्हणण्याला मी विरोध केला नाही; उलट त्या म्हणण्यापुढे मी मान तुकविली म्हणून मी मेल्यावर समंध झालो. परंतु माझ्या भित्रेपणामुळे मला या झाडावर डांबून ठेवण्यात आले आहे आणि नंतर  त्याने पुढील अर्थाचे श्लोक म्हटले;

१०. “यज्ञ इत्यादि क्रियाकर्म म्हणजे दु:खाचा उगम होय आणि रात्रंदिवस सहन करावे लागणारे ते एक चिंतेचे ओझे होय.” 

११. “दु:खमुक्‍त होण्यासाठी आणि शरीरधर्माचे निर्मूलन करण्यासाठी मनुष्याने ( बुद्धाच्या ) धम्माचे पालन करावे आणि ( ऋषीनी ) सांगितलेल्या ऐहिक धर्माच्या नियमांतून आपली सुटका करून घ्यावी.”

१२. हे शब्द ऐकल्यावर ब्राम्हणांनी श्रावस्तीला ज्या ठिकाणी भगवान बुद्ध होते त्या ठिकाणी जाण्याचे ठरविले. आपल्या भेटीचा उद्देश त्यांनी सांगितल्यावर जगदृंद्य भगवान बुद्ध त्यांना म्हणाले;

१३. “मनुष्य जरी केसांच्या जटा वाढवून नग्न राहू लागला किंवा शरीरावर त्याने थोडीशी पाने किंवा वल्कले धारण केली, जरी त्याने अंगाला चिखल फासला किंवा तो दगडावर झोपू लागला तरी दुर्विचारासून मुक्‍त होण्याच्या दृष्टीने त्याचा काय उपयोग?”

१४. “जो कलह करीत बसत नाही किंवा हत्या करीत नाही किंवा अग्नीच्या साहाय्याने नाश करीत नाही, ज्याला विजयाची इच्छा नसते, जो सगळ्या जगाविषयी सदिच्छा बाळगतो त्याच्या बाबतीत द्वेष किवा तिरस्काराची भावना निर्माण होण्यास कारण मिळत नाही.” 

१५. “ पुण्य लाभावे म्हणून भुताखेतांना जो बळी देतो किवा परलोकी सुखाच्या फळाची अपेक्षा करतो त्याला मिळणारे सुख हे सत्पुरुषाचा आदर करणार्या माणसाच्या सुखाच्या एक चतुर्थांशही बरोबर नसते. 

१६. “ जो सदाचाराविषयी तत्पर असतो आणि इतरांचा योग्य तो मान राखतो व वयोवृद्धांविषयी नेहमी आदर बाळगतो त्याला सौंदर्य, सामर्थ्य, आयुष्य आणि शांती या चार सुखांची प्राप्ती होते.” 

१७. पतीकडून हे ऐकल्यावर त्याची ती पत्नी शांत झाली.

Previous page                                                         Next page


The Buddha and His Dhamma, by Dr. B. R. Ambedkar
error: Content is protected !!