Part VI — Conversion of the Low and the Lowly
Conversion of the Low and the Lowly PDF in English
द्वितीय खंड: धम्मदीक्षेची मोहीम
भाग सहावा: कनिष्ठ आणि सामान्यजनांची धम्मदीक्षा
Low and the Lowly
१. उपाली न्हाव्यास धम्मदीक्षा
१. परत जात असताना उपाली न्हावी विचार करू लागला. “शाक्य हे भयंकर लोक आहेत. या अलंकारांसह मी परत गेलो तर मी माझ्या सोबत्यांना ठार मारले आणि त्यांचे अलंकार घेऊन पळालो असे समजून ते मला ठार मारतील. मग शाक्य कुळातील हे तरुण ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने मी का जाऊ नये?”
२. “खरोखरच मी का जाऊ नये?” उपालीने स्वतःलाच विचारले आणि ते अलंकाराचे गाठोडे पाठीवरून खाली उतरून एक झाडाला ते टांगून तो म्हणाला, “ज्वाला, हे सापडेल त्याने भेट म्हणून ते घेऊन जावे.” आणि तो शाक्य तरुणांच्या मागोमाग जाण्यासाठी मागे फिरला.
३. शाक्यांनी त्याला दूरूनच येताना पाहिले आणि ते त्याला म्हणाले, “उपाली, तू परत का आलास?”
४. तेव्हा त्याने आपल्याला काय वाटले ते त्यांना सांगितले. त्यावर ते म्हणाले, “उपाली, तू परत गेला नाहीस हे बरे केलेस; कारण शाक्य हे भयंकर लोक आहेत आणि त्यांनी तुला ठार मारले असते.”
५. आणि जेथे भगवान बुद्ध होते तेथे ते उपाली न्हाव्याला बरोबर घेऊन गेले. तेथे पोहोचल्यावर त्यांनी भगवन्तांना वंदन केले आणि ते एका बाजूला बसले. याप्रमाणे बसल्यावर ते तथागतास म्हणाले, “भगवन्त, आम्ही शाक्य गर्विष्ठ आहोत. आणि हा उपाली न्हावी बऱ्या च दिवसांपासून आमची सेवा करीत आहे.भगवन्तांनी आमच्या अगोदर त्याला आपल्या भिक्खु संघात घ्यावे. म्हणजे त्याला आम्ही योग्य तो आदर आणि मान देऊ आणि आमच्यातील जेष्ठ म्हणून आम्ही त्याला हात जोडून वंदन करू. म्हणजे अशा रीतीने आमच्यातील शाकक्यत्वाचा गर्व नष्ट होईल.”
६. तेव्हा तथागताने पहिल्या प्रथम उपाली न्हाव्याला प्रत्रज्ज्या देऊन भिक्खु संघात सामील करुन घेतले आणि त्यानंतर त्या शाक्य कुळातील तरुणांना भिक्खू संघाची दीक्षा दिली.
२. सुनीत नावाच्या भंग्यास धम्मदीक्षा
१. राजगुहात सुनीत नावाचा एक भंगी राहात होता. लोकांनी रस्त्यावर टाकलेला केरकचरा व घाण काढणारा रसत्यावरील झाडूवाला म्हणून काम करून तो आपला उदरनिर्वाह करीत असे. हलका आणि पिढीजात असा त्याचा धंदा होता.
२. एके दिवशी पहाटे भगवन्त उठले, त्यांनी चीवर धारण केले व बऱ्याचशा भिक्खूंसह भिक्षा मागण्यासाठी ते राजगृहात गेले. त्यावेळी सुनीत रस्ता झाडीत, कचऱ्याचे व घाणीचे ढीग गोळा करीत होता व ते टोपलीत भरून हातगाडीवर ओढीत नेत होता.
४. आणि ज्या वेळी त्याने भगवन्तांना आणि त्यांच्यामागून चालणाऱ्या भिक्खूगणांना येताना पाहिले त्या वेळी त्याचे अंत:करण आनंदाने भरून गेले. परंतु त्याला त्यांची भीतीही वाटली.
५. लपून राहण्यास रसत्यावर जागा न मिळाल्यामुळे त्याने आपल्या गाडीचे जोखड भिंतीच्या एका वाकणावर ठेवले व तो भिंतीला चिकटून उभा राहिला आणि हात जोडून त्याने भगवन्तांना नमस्कार केला.
६. त्याच्या जवळ आल्यावर भगवंत आपल्या दिव्य, मधुर वाणीने त्याला म्हणाले, “सुनीता, असल्या जिण्याचा तुला काय उपयोग आहे? गृहत्याग करून तू माझ्या संघात येतोस का?”
७. आणि अमृतवर्षावाचा आनंद अनुभवीत सुनीत म्हणाला, “या जीवनात भगवन्तासारखे थोर पुरुषही जर या संघात आहेत तर मी का जाऊ नये! भगवन्तांनी मला कृपा करून संघात सामील करून घ्यावे.”
८. तेव्हा भगवन्त म्हणाले, “भिक्खू ये!” आणि त्या शब्दोच्चाराबरोबर सुनीताला प्रवज्ज्या आणि उपसंपदा मिळाली आणि त्याला चीवर आणि भिक्षापात्र देण्यात आले.
९. भगवन्तांनी त्याला विहारात नेऊन धम्म आणि विनय यांची शिकवण दिली आणि ते म्हणाले, “शील, संयम आणि दमन यांमुळे मनुष्य पवित्र होतो.”
१०. सुनीत इतका थोर कसा झाला हे विचारले असता भगवान बुद्ध म्हणाले, “राजमार्गावर टाकलेल्या उकिरड्यावर ज्याप्रमाणे सुगंधित व सुंदर कमलपुष्प उमलावे, त्याप्रमाणे अंतर्दुष्टी नसलेल्या ह्या क्षुद्र प्राण्याच्या आंधळ्या जगात बुद्धपुत्र प्रकाशमान होतो.”
३. सोपाक आणि सुप्पीय या अस्पृश्यांना धम्मदीक्षा
१. सोपाक हा श्रावस्तीचा एक अस्पृश्य होता. त्याच्या जन्माच्या वेळी प्रसूति वेदनेमुळे त्याची आई बराच वेळ मूच्छित होऊन पडली होती. त्यामुळे तिच्या पतीला व नातलगांना वाटले की, ती मेली. त्यांनी तिला स्मशानात नेले व तिचे प्रेत जाळण्याची तयारी केली.
२. परंतु वारा आणि पाऊस यांच्या माऱ्या मुळे अग्नी पेट घेऊ शकला नाही. म्हणून सोपाकाच्या आईला चितेवर ठेवून ते निघून गेले.
३. सोपाकाची आई त्या वेळी मेलेली नव्हती. ती नंतर मेली. मृत्यूपूर्वी तिने मुलाला जन्म दिला.
४. स्मशानाच्या पहारेक ऱ्या ने त्या मुलाला दत्तक घेतले आणि सुप्पीय नावाच्या स्वत:च्या मुलाबरोबरच त्याचेही पालनपोषण केले. त्या मुलाच्या आईच्या जातीचे नाव सोपाक होते, त्यामुळे ते मूलही त्या नावाने ओळखले जाऊ लागले.
५. एके दिवशी भगवान बुद्ध त्या स्मणानाजवळून जात होते. भगवंताना पाहून सोपाक त्यांच्यासमोर आला. भगवंतांना वंदन करुन त्यांचा शिष्य म्हणून त्यांच्या बरोबर येण्यास त्याने त्यांची अनुज्ञा मागितली.
६. सोपाक त्या वेळी फक्त सात वर्षांचा होता. म्हणूनन भगवंतांनी त्याला वडिलांची संमती मिळविण्यास सांगितले.
७. सोपाक गेला आणि आपल्या वडिलांना घेऊन आला. वडिलांनी भगवंतांना वंदन केले आणि आपल्या मुलाला त्यांच्या संघात घेण्याविषयी त्यांना विनंती केली.
८. तो जरी अस्पृश्य जातीचा होता तरीही भगवंतांनी त्याला आपल्या संघात घेतले आणि त्यांनी आपला धम्म व विनय यांची शिकवण त्याला दिली.
९. काही काळानंतर सोपाक एक ‘स्थविर’ झाला.
१०. सुप्पीय आणि सोपाक हे लहानपणापासून एकत्र वाढलेले होते आणि सोपाकाला सुप्पीयाच्या वडिलांनीच दत्तक घेऊन वाढविल्यामुळे सुप्पीय अपपला सोबती सोपाक याच्याकडून भगवंताचे धम्म व विनय शिकला. आणि जरी सोपाक हा सुप्पीयाच्या जातीपेक्षा हलक्या जातीतील होता तरी सुप्पीयाने सोपाकाला आपणाला प्रत्रज्ज्या देऊन संघात घेण्याची विनंती केली.
११. सोपाकाने ते मान्य केले आणि स्मशानातील पहारेकऱ्या चे काम करणार्या हीन दर्जाच्या जातीतील सुप्पीय हा एक भिक्खू बनला.
४. सुमंगल इत्यादि हीन जातीतील लोकांना धन्मदीक्षा
१. सुमंगल हा श्रावस्तीचा एक शेतकरी होता. विळा, नांगर आणि कुदळ यांच्या साहाय्याने शेतात काम करून तो आपली उपजीविका करीत असे.
२. छन्ना हा कपिलवस्तूचा रहिवाशी असून शूद्धोदनाज्या घरातील एक नोकर होता.
३. धन्तनीय हा राजगृहाचा रहिवाशी असून एक कुंभार होता.
४. कप्पत-कुर हा श्रावस्तीचा रहिवाशी होता. फाटक्या चिंध्या घालून, हातात थाळी घेऊन तांदळाच्या दाण्याची भीक मागत इकडे तिकडे फिरणे हा एकच जगण्याचा मार्ग त्याला माहीत होता. म्हणूनच तो कप्पत-कुर ( चिंध्या आणि तांदूळ ) या नावाने ओळखला जाऊ लागला. मोठा झाल्यावर गवत विकून तो आपली उपजीविकाकरीत असे. या सर्वांनी भगवान बुद्धांकडे भिक्खू होण्याची आणि त्यांच्या संघात सामील होण्याची अनुज्ञा मागितली.भगवान बुद्धांनी अनमान न करता आणि त्यांचा हीन जातीतील जन्म किंवा त्यांची पूर्वीची स्थिती यांची पर्वा न करता त्यांना आपल्या संघात घेतले.
५. महारोगी सुप्रबुद्धाची धम्मदीक्षा
१. एकदा भगवंत राजगृहाजवळील वेळुवनात जेथे खारींना दाणे चारले जात असत त्या ठिकाणी राहात होते.
२. त्या सुमारास राजगृहात सुप्रबुद्ध नावाचा एक दीन, दुःखी आणि दरिद्री असा महारोगी राहात होता.
३. त्यावेळी एका मोठ्या जनसमुदायात बसून भगवंत धम्माचा उपदेश करीत होते.
४. महारोगी सुप्रबुद्धाने तो जनसमुदाय दुरूनच पाहिला आणि तो विचार करू लागला, “त्या ठिकाणी पलीकडच्या बाजूला अन्नाची-ते बरे असो को वाईट असो भिक्षा वाढली जात आहे हे निःसंशय. समजा, मी पलीकडच्या जमावाकडे गेलो तर मला देखील थोडेसे बरेवाईट अन्न खायला मिळेल.”
५. म्हणून महारोगी सुप्रबुद्ध त्या जमावाजवळ गेला आणि उपदेश करीत असलेल्या भगवंतांना त्याने त्या प्रचंड समुदायात पाहिले. भगवंतांना पाहून त्याच्या मनात विचार आला, “नाही, या ठिकाणी अन्नाची भिक्षा वाढली जात नाही. श्रमण गौतम या लोकांना आपल्या धम्माचा उपदेश करीत आहे. मीही त्यांचा उपदेश ऐकला तर काय हरकत आहे?”
६. म्हणून एका बाजूला बसून तो विचार करू लागला, “मी देखील हा उपदेश ऐकेन.”
७. त्या सबंध जनसमूहांचे विचार आपल्या विचारशक्तीने जाणणारे भगवंत स्वतःशीच म्हणाले, “येथे उपस्थित असलेल्यांपैकी सत्याचे आकलन करण्यास कोण समर्थ असावा बरे?” नंतर त्या समुदायात बसलेल्या सुप्रबुद्ध महारोग्याला त्यांनी पाहिले आणि त्याला पाहिल्याबरोबर त्यांनी जाणले की, “हाच सत्याचे ग्रहण करू शकेल.”
८. म्हणून महारोगी सुप्रबुद्धासाठी भगवंतांनी प्रवचन केले आणि त्यांत दानशील आणि स्वर्ग या विषयांवर उपदेश दिला. त्यांनी विषयवासनांचा क्षुद्रपणा आणि दुष्टपणा स्पष्ट करून सांगितला आणि वासनांपासून मुक्त होण्याचा लाभही दाखवून दिला.
९. महारोगी सुप्रबुद्धाचे अंतःकरण मृदु, लवचिक, बंधभुक्त, प्रमुदित आणि श्रद्धापूर्ण झाल्याचे भगवंतांनी जेन्हा पाहिले तेव्हा त्यांनी त्याला बुद्धाचा सर्वश्रेष्ठ धम्म सांगितला. म्हणजेच दुःख, दु:खाचे कारण, दु:खनिरोध आणि दु:खनिरोधाचा मार्ग यांचा उपदेश केला.
१०. निष्कलंक असे शुभ्र वस्त्र ज्याप्रमाणे कोणताही रंग धारण करण्यास तयार असते, त्याप्रमाणे महारोगी सुप्रबुद्धाच्या अंतःकरणात, तो त्याच स्थळी बसला असताना ज्याला आरंभ आहे आला अंत असलाच पाहिजे, या सत्याची शुद्ध आणि निष्कलंक जाणीव उत्पन्न झाली. महारोगी सुप्रबुद्धाने सत्य पाहिले. तो सत्याप्रत पोहोचला. त्याला सत्याचे ज्ञान झाले. तो सत्यात निमग्न झाला. तो संदेहाच्या पलीकडे गेला. संदेहमुक्त झाला. त्याच्यामध्ये विश्वास उत्पन्न झाला आणि आणखी कशाचीही गरज नसल्यामुळे, भगवंताचा उपदेश आत्मसात केल्यामुळे तो आपल्या जागेवरून उठला, त्यांच्या जवळ गेला आणि तेथे एका बाजूला बसला.
११. याप्रमाणे बसल्यानंतर तो भगवंतांना म्हणाला, “सर्वोत्तम, हे भगवन सर्वोत्तम! ज्याप्रमाणे पतिताला वर उचलावे, लपलेल्याला शोधून काढावे, गांगरून गेलेल्याला मार्ग दाखवावा आणि ‘ज्यांना पाहण्याची इच्छा आहे त्यांना साकार पदार्थ पाहता येतील’ असे म्हणून अंधारात प्रकाश दाखवावा, त्याप्रमाणे भगवंतानी निरनिराळ्या पद्धतींनी सत्याचे विवरण केले. मी, भगवान, मी देखील बुद्ध, धम्म आणि संघ यांना शरण आलो आहे. या क्षणापासून आयुष्याच्या अंतापर्यंत आपला शरणागत उपासक म्हणून भगवंतांनी माझा स्वीकार करावा.”
१२. नंतर भगवंतांच्या पवित्र वाणीने चैतन्ययुक्त, सिद्ध आणि जागृत झालेल्या व समाधान पावलेल्या महारोगी सुप्रबुद्धाने भगवंतांच्या उपदेशाचे स्तुतिपूर्वक स्वागत करून त्यांचे आभार मानले आणि आपल्या जागेवरून उठून, भगवंतांना वंदन करून तो तेथून निघून गेला.
१३. दुर्दैवाची गोष्ट अशी की, पुढे एका खोंडाने महारोगी सुप्रबुद्धाला खाली पाडले आणि शिंगांनी भोसकून ठार केले.