Comparison and Contrast

What the Buddha Taught

Comparison and Contrast

Comparison and Contrast PDF in English

प्रथम खंड : सिद्धार्थ गौतम – बोधिसत्व बुद्ध कसे झाले

भाग ७ : साम्य व भेद

Comparison and Contrast

  Previous page                                                      Next Book

१. बुद्धाने काय त्याज्य ठरविले ?

१. या तात्विक आणि धार्मिक विचारसरणीच्या अवलोकनावरून असे दिसते की, बुद्धाने ज्या वेळी आपल्या  शासनाचा पाया रचला त्या वेळी काही कल्पनांनी लोकांच्या मनाची घट्ट पकड घेतली होती. त्या कल्पना अशा:-

 • (१). वेदप्रामाण्यावर विश्वास.

 • (२). आत्म्याची मुक्ति किंवा मोक्ष म्हणजेच त्याच्या पुनर्जन्माचा अंत, यावर विश्वास.

 • (३). मोक्षप्राप्तीची साधने या दृष्टीने धार्मिक विधी, समारंभ व यज्ञ यांवर विश्वास.

 • (४). समाज संघटनेसाठी चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा आदर्शावर विश्वास. 

 • (५). विश्वाचा निर्माता म्हणून ईश्वरावर आणि विश्वाचे मूलाधार तत्त्व म्हणून ब्रम्हावर विश्वास. 

 • (६). आत्म्यावर विश्वास. 

 • (७). ‘संसार’ किंवा आत्म्याचा पुनर्जन्म यावर विश्वास.

 • (८). कर्म म्हणजेच माणसाच्या पूर्वजन्मींच्या कृत्यामुळे त्याचे या जन्मीचे स्थान निश्चित होते या तत्त्वावर विश्वास.

२. आपल्या शासनाची तत्त्वे ठरविताना बुद्धाने आपल्या पद्धतीने या जुनाट कल्पनांचा समाचार घेतला.

३. पुढील कल्पना त्याने त्याज्य ठरविल्या:-

 • (१). मी कोण आहे, कोठून आलो, कोठे जाणार, याविषयी कल्पना करीत बसण्याच्या वृत्तीचा त्याने धिक्कार केला. 

 • (२). आत्म्याचे थोतांड त्याने धुडकावून लावले. आणि शरीर संवेदना, चेतना आणि विज्ञान यांपैकी कशालाही आत्मा मानण्याच्या कल्पनेचा त्याने त्याग केला. 

 • (३). काही धर्मगुरूंनीज्याचा प्रसार केला होता अशी शून्यावादी मते त्याने त्याज्य ठरविली.

 • (४). पाखंडी मताचा त्याने धिक्कार केला.

 • (५). विश्वाच्या विकासाचा प्रारंभकाळ सांगता येतो हे म्हणणे त्याने अमान्य केले. 

 • (६). देवाने माणसाला निर्माण केले, किंवा ब्रम्ह नावाच्या कोण्या एकाच्या शरीरातून त्याचा जन्म झाला हे म्हणणे त्याने त्याज्य ठरविले. 

 • (७). आत्म्याच्या अस्तित्वाकडे त्याने दुर्लक्ष तरी केले किंवा ते नाकारले.

 

२. बुद्धाने कोणते बदल केले ?

(१) कार्यकारणभावाचा अत्यंत महत्त्वाचा नियम आणि त्याचे उपसिद्धान्त त्याने मान्य केले. 

(२) जीवनाचा दैववादी दृष्टीकोन आणि मनुष्य व जग यांचे भवितव्य देवानेच पूर्वनियोजित केलेले आहे हा तितकाच मूर्खपणाचा दृष्टीकोन, हे दोन्हीही त्याने त्याज्य ठरविले.

(३) एखाद्या पूर्वजन्मी केलेल्या कृत्यात दुःख निर्माण करण्याचे आणि या जन्मातील कृत्ये परिणामशून्य करण्याचे सामर्थ्य आहे हे म्हणणे त्याने अमान्य केले. कर्माचा दैववादी दृष्टीकोन त्याने नाकारला. कर्माच्या या दृष्टीकोनाच्या ऐवजी त्याने अधिक शास्त्रीय दृष्टीकोन स्वीकारला. जुन्याच बाटलीत त्याने नवी दारू ओतली. 

(४) आत्म्याचा फेरा-संसार या तत्त्वांच्या जागी त्याने पुनर्जन्माच्या सिद्धांताला स्थान दिले. 

(५) आत्म्याची मुक्ति किंवा मोक्ष या तत्त्वांऐवजी त्याने निब्बान (निर्वाण) तत्त्व स्वीकारले.

(६) या प्रमाणे बुद्धणासन हे संपूर्ण नव्या विचारांनी भरले आहे. त्यात जे थोडेसे जुने आहे ते फेरबदल करून घेतलेले किंवा निराळ्या दृष्टीकोनातून मांडलेले असे आहे.

 

३. बुद्धाने काय स्वीकारले ?

१. बुद्धाच्या शिकवणीचे पहिले वैशिष्ट्य असे की, सर्व गोष्टींचा मध्यबिंदू मन आहे, हे त्याने मानले. 

२. मन सर्व वस्तूंच्या अग्रभागी असते (सर्व वस्तूंत श्रेष्ठ आहे ), ते सर्व वस्तूंवर अंमल चालविते, यांची निर्मिती करते. मनाचे आकलन झाले की सर्व वस्तूंचे आकलन होते. 

३. मन सर्व मानसिक क्रियांचे मार्गदर्शन करते. मन सर्व मानसिक शक्तीचे प्रमुख आहे. मन हे त्या शक्‍तींचेच बनलेले असते.

४. ज्या बाबीकडे लक्ष पुरविणे आवश्यक आहे अशी पहिली बाब म्हणजे मनाचे संस्कार.

५. बुद्धाच्या शिकवणीचे दुसरे वैशिष्ट्य असे की, आपल्यामध्ये निर्माण होणाऱ्या  आणि आपल्यावर बाहेरून ज्याचा परिणाम होतो अशा सर्व बऱ्या -वाईट गोष्टीचे मन हे उगमस्थान आहे.

६. जे जे वाईट आहे, वाईटाशी संबंधित आहे आणि त्याच्या आधीन आहे ते ते मनातूनच उत्पन्न होते. जे जे चांगले आहे, चांगल्याशी संबंधित आहे आणि त्याच्या आधीन आहे-ते ते सर्व मनातूनच उत्पन्न होते.

७. ज्याप्रमाणे गाडी ओढणाऱ्या  बैलांच्या पावलामागोमाग गाडीची चाके जातात त्याप्रमाणे अशुद्ध चित्ताने जो बोलतो किवा कृती करतो त्याच्या मागोमाग दु:ख येते. म्हणून चित्तशुद्धी हे धर्माचे सार होय.

८. बुद्धांच्या शिकवणीचे तिसरे वैशिष्ट्य पापकृत्ये टाळणे हे होय.

९. त्यांच्या शिकवणीचे चवथे वैशिष्टय असे की, खरा धर्म हा धर्मग्रंथात नसून धर्मतत्वाचे पालन करण्यात  आहे.

१०. बुद्धाचा धर्म ही त्याची स्वत:ची निर्मिती नव्हती असे कोणी म्हणू शकेल काय?

  Previous page                                                      Next Book


The Buddha and His Dhamma, by Dr. B. R. Ambedkar
error: Content is protected !!