The Buddha and His Predecessors

The Buddha and His Predecessors

Part V — The Buddha and His Predecessors

The Buddha and His Predecessors PDF in English

प्रथम खंड : सिद्धार्थ गौतम – बोधिसत्व बुद्ध कसे झाले

भाग ५ : बुद्ध व त्यांचे पूर्वकालीन

The Buddha and His Predecessors

Previous page                                                      Next page

१. बुद्ध आणि वैदिक ऋषी

१. वेद हा एक मंत्रांचा म्हणजेच क्रचा किवा स्त्रोत्रांचा संग्रह आहे. या क्रचांचे उच्चार करतात त्यांना ‘ऋषी’ म्हणतात.

२. मंत्र म्हणजे इंद्र, वरुण, अग्नि, सोम ईशान, प्रजापति, ब्रम्ह, महिद्धि, यम इत्यादी देवतांचा केवळ, धावा करणान्या प्रार्थना होत.

३. धावा म्हणजे शत्रूविरुद्ध साहाय्य करण्यासाठी, धनप्रातीसाठी भक्‍ताकडून अन्न, मांस आणि मद्य याचा नैवेद्य स्वीकारण्याची विनंती करण्यासाठी केलेली प्रार्थना होय.

४. वेदामध्ये फारसे तत्वज्ञान नाही. परंतु असे काही वैदिक ऋषी होते की, ज्यांनी तात्विक स्वरूपाच्या काही कल्पना मांडल्या होत्या.

५. (१) अघमर्षण, (२) प्रजापति परमेष्ठि, (३) ब्रम्हणस्पति किंवा बृहस्पति, (४) अनिल, (५) दीर्घतमा, (६) नारायण, (७) हिरण्यगर्भ, आणि (८) विश्वकर्मा, हे ते ऋषी होत.

६. या वैदिक तत्ववेत्यांपुढील मुख्य समस्या पुढीलप्रमाणे होत्या. जग उत्पन्न कसे झाले? वस्तूची निर्मिती कोणत्या पद्धतीने करण्यात आली? त्यांचे ऐक्य व अस्तित्व का आहे? निर्मिती कशी झाली आणि कुणाच्या आज्ञेने झाली? जग कशापासून निर्माण झाले आणि ते कुठे जाणार आहे?

७. अघमर्षण म्हणतो की, जग तपसपासून (उष्णतेपासून) निर्माण झाले. हे निर्मितीक्षम तत्व होय. त्यापासून अनाद्यनन्त असा नियम आणि सत्य याचा जन्म झाला. यांच्यापासून रात्र (तमस) उत्पन्न झाली. तमाने पाणी निर्माण केले आणि पाण्यापासून काळाची उत्पत्ती झाली. काळाने चन्द्र आणि सूर्य, स्वर्ग आणि पृथ्वी, आकाश आणि प्रकाश यांना जन्म दिला आणि दिवस व रात्र यांची व्यवस्था निर्माण केली.

८. ब्रम्हणस्पतीने ‘असत्‌’ पासून ‘सत्‌’ ची उत्पत्ती होते असा सिद्धांत गृहीत धरला. त्याने ‘असत’ या शब्दाचा अर्थ अनादि अनंत असा सांगितला. सत्‌ हे मूलत: असतपासून उत्पन्न झाले. जे जे सत्‌ (अस्तित्वात असलेले) आहे, आणि जे जे शक्‍य आहे आणि तरीही असत्‌ (अस्तित्वात नसलेले) आहे, त्या सर्वांचा असत्‌ हा मूलाधार आहे.

९. प्रजापति परमेष्ठीने “असतपासून सत्‌ निर्माण झाले काय?” या प्रश्‍नापासून सुरुवात केली. त्याचे म्हणणे असे की, या प्रश्‍नाचा प्रस्तुत विषयाशी संबधी नाही. त्यांच्या मते अस्तित्त्वात असलेल्या सर्व वस्तूंचे मूळ पाणी हे होय. त्यांच्या मते मूल पदार्थ जे पाणी ते सत्‌ आणि असत्‌ यांच्या व्याख्येत बसत नाही.

१०. परमेष्ठीने जडत्व आणि चेतना यांत भेद केला नाही. त्याच्या मते पाणी एका स्वाभाविक तत्वानुसार स्वतःचे रूपांतर विशिष्ट वस्तूमध्ये करून घेते. या तत्त्वाला ‘काम’ किंवा ‘वैश्विक इच्छा’ असे नाव त्याने दिले.

११. अनिल हा आणखी एक वैदिक तत्ववेत्ता होता. त्याच्या मते वायु हे मूलतत्त्व होय. त्याच्यात स्वाभाविक चैतन्यशक्ति निर्मितितत्व निसर्गत चैतन्यशक्ति असते. त्याव्यात त् :च असते.

१२. दीर्घतम याने सांगितले की, सर्व प्राणिमात्र शेवटी सूर्यावर अवलंवून असतात. स्वतःच्या स्वाभाविक सामर्थ्याचा आधार असलेला आणि त्यावरच हालचाल करणारा सूर्य पुढेमागे सरकत असतो.

१३. सूर्य करड्या रंगाच्या पदार्थाचा बनलेला असतो आणि विद्युत्‌ व अग्नी ही देखील त्याप्रमाणेच बनलेली असतात.

१४. सूर्य, विद्युत व अग्नी हे पदार्थ पाण्याचे बीज होत. पाणी हे वनस्पतीचे बीज होय. याप्रमाणे दीर्घतम याचे विचार होते.

१५. नारायणाच्या मतानुसार पुरुष (परमेश्वर ) हे पहिले जगत्कारण होय. सूर्य, चंद्र, पृथ्वी, पाणी, अग्नी, वायु, अंतरिक्ष, आकाश, क्षेत्र, क्रतु, पक्षी, सर्व पशु, मानवाच्या सर्व जाती आणि सर्व मानवी संस्था यांची उत्पत्ती पुरुषापासूनच होते.

१६. तात्विकदृष्ट्या हिरण्यगर्भ हा परमेष्ठी आणि नारायण यांच्या मध्यभागी होता. हिरण्यगर्भ म्हणजे सुवर्णगर्भ (बीज) या विश्वाच्या महान शक्‍तीसूनच इतर सर्व शक्‍तींची आणि ऐहिक व पारलौकिक जीवांची उत्पत्ती झाली.

१७. हिरण्यगर्भ म्हणजे अग्नी. सौरतत्व नावाचे या विश्वाच्चा उत्मत्तीचे तत्व अग्नीपासूनच बनले आहे.

१८. अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तूंचा मूल पदार्थ पाणी होय, असे गृहीत धरणे आणि मग त्याच्यावर चैतन्य शक्‍तीचा आरोप करून त्यापासून हे सर्व जग निर्माण झाले असा निष्कर्ष काढणे या गोष्टी विश्वकर्म्यच्या दृष्टीने अगदी अपुर्या आणि असमाधानकारक होत. रूपांतराचे तत्व अंगभूत असलेले पाणी हा जर मूळ पदार्थ असेल तर पाणी अस्तित्वात कसे आले आणि त्याने आपत्यातील चैतन्यशक्‍ती निर्मिति-तत्व, भौतिक सामर्थ्य नियम आणि इतर सर्व गोष्टी कशापासून अस्तित्वात आल्या हा प्रश्‍न आपल्यापुढे शिल्लक राहतोच.

१९, विश्वकर्म्याचे मत असे होते की, परमेश्वर हीच चैतन्यशक्‍ती होय. परमेश्वर हाच प्रारंभी असतो, आणि परमेश्वर हाच अंतीही असतो. तो दृश्य विश्वाच्या पूर्वीपासून आहे; सर्व वैश्विक शक्‍ती अस्तित्वात येण्यापूर्वी तो अस्तित्वात होता. ज्याने हे विश्व निर्माण केले आणि कार्यान्वित केले तो एकमेव परमेश्वरच होय. परमेश्वर एक आहे आणि एकमेव आहे. तो अज (जन्म नसलेला) आहे, आणि अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तु त्याच्यातच वास करीत असतात. तो सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान असा आहे. तो निर्माता आणि संहारकर्ता आहे. जनक म्हणून त्याने आपल्याला उत्पन्न केले, आणि संहारक या नात्याने अस्तित्वातील सर्व वस्तूंचे भवितव्य त्याला माहीत आहे.

२०. बुद्धांना सर्वच वैदिक ऋषी आदरणीय वाटले नाहीत. फक्त दहा वैदिक ऋषींनाच त्यांनी अति प्राचीन आणि मंत्रांचे खरेखुरे जनक मानले.

२१. परंतु नैतिक पातळी उंचावणारे असे मंत्रांमध्ये त्यांना काहीही आढळले नाही.

२२. त्यांच्या मते वेद हे ओसाड वाळवंटाप्रमाणे निरुपयोगी आहेत.

२३. म्हणून ज्यापासून काही शिकता येईल असे मंत्रात काही नसल्यामुळे बुद्धांनी मंत्र बाजूला सारले.

२४. त्याचप्रमाणे वैदिक ऋषींच्या तत्वज्ञानात त्यांना काहीही आढळले नाही. सत्य प्राप्त करून घेण्यासाठी ते चाचपडत होते; परंतु ते त्या सत्याप्रत पोचले नाहीत.

२५. त्यांचे सिद्धांत म्हणजे तर्कशास्त्राचा किंवा वस्तुस्थितीचा आधार नसलेल्या केवळ कल्पना होत्या. तत्वज्ञानात त्यांनी जी भर घातली तिच्यामुळे कोणतीही सामाजिक मूल्ये निर्माण झाली नाहीत.

२६. म्हणून वैदिक ऋषींचे तत्वज्ञानही निरुपयोगी म्हणून त्यांनी ते अमान्य केले.

२. तत्ववेत्ता कपिल

१. भारतवर्षातील प्राचीन तत्ववेत्यांत कपिल हा अग्रगण्य होता.

२. त्याचा तत्वज्ञानविषयक दृष्टिकोन अनन्य होता आणि तत्वज्ञ म्हणून त्याचे स्थान अद्वितीय होते. त्याच्या तत्वज्ञानाला सांख्य तत्त्वज्ञान असे ओळखले जाई.

३. त्याच्या विचारांतील मूलतत्वांचे स्वरूप थक्क करून टाकणारे होते.

४. सत्याला पुराव्याचा आधार पाहिजे. सांख्य तत्त्वज्ञानाचे हे पहिले तत्व होय. पुराव्याखेरीज सत्य असू शकत नाही.

५. सत्य सिद्ध करण्यासाठी कपिलाने सिद्धतेचे फक्त दोन मार्ग मानले.

  • (१) प्रत्यक्ष ज्ञान, आणि

  • (२) अनुमान.

६. प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे आपल्या समोरील वस्तुचे आपल्या मनाला होणारे आकलन.

७. अनुमान तीन प्रकारचे आहे.

  • (१) कारणावरून कार्य ओळखणे, जसे ढगांच्या अस्तित्वावरून पावसाचे अनुमान काढणे;

  • ( २) कायीवरून कारण ओलखणे, जसे दरीतून वाहाणान्या ओहोलाला पूर आत्यावरून डोंगरावर पाऊस पडत असल्याचे अनुमान काढणे; आणि

  • (३) साम्य, जसे-मनुष्य जेव्हा हालचाल करतो तेव्हा तो जागा बदलत असतो असे आपण अनुमान काढतो. त्याचप्रमाणे ज्या अर्थी तारे निरनिराळ्या ठिकाणी दिसतात त्या अर्थी त्यांना गती असली पाहिजे.

८. त्याचे दुसरे तत्व सृष्टीच्या उत्पत्तीसंबंधी होते. सृष्टीची उत्पत्ती आणि तिचे कारण.

९. हे विश्व निर्माण करणारा कोणी तरी निर्माता आहे हा सिद्धान्त कपिलाने अमान्य केला. ज्याप्रमाणे मातीतून मडके तयार होते किंवा सुतापासून कापड तयार होते, त्याप्रमाणे उत्पन्न वस्तूंचे अस्तित्व पहिल्यापासूनच कारणात असते असे त्यांचे मत होते.

१०. विश्व एखाद्या निर्मात्याने निर्माण केले हा सिद्धान्त अमान्य करण्यासाठी कपिलाने पुढे केलेला हा पहिला आधार होय.

११. परंतु आपल्या मताच्या पुष्टयर्थ त्याने इतरही काही आधार दिले आहेत.

१२. असत्‌ हे कोणत्याही कृतीचा विषय होऊ शकत नाही. वास्तवतः: नवे असे काहीच उत्पन्न होत नाही. सुष्ट वस्तू ही ज्या पदार्थापासून बनते त्यापेक्षा ती निराळी नसते. ती ज्या पदार्थापासून बनलेली असते त्या पदार्थाच्या स्वरूपात ती अगोदरपासूनच अस्तित्वात असते. अशा निश्चित पदार्थापासून केवळ निश्चित स्वरूपाचीच वस्तु तयार होऊ शकते आणि काही विशिष्ट स्वरूपाच्या पदार्थापासूनच विशिष्ट स्वरूपाचा पदार्थ निर्माण होतो.

१३. मग या इंद्रियगोचर विश्वाचे मूळ कोणते?

१४. कपिल म्हणतो, उत्क्रान्त वस्तु (व्यक्‍त) आणि अनुत्क्रान्त (अव्यक्त) वस्तु यांनी हे इंद्रियगोचर विश्व बनले आहे.

१५. व्यक्‍त वस्तू या अव्यक्‍त वस्तूंचे मूळ असू शकत नाहीत.

१६. व्यक्‍त वस्तूंचा आकार मर्यादित असतो; आणि विश्वाच्या मुळाचे जे स्वरूप त्याच्याशी तर हे विसंगत आहे.

१७. सर्व व्यक्‍त वस्तूंचे परस्परांशी काही अशी साम्य असते, आणि म्हणून एक दुसरीचे अंतिम मूळ आहे असे म्हणता येत नाही. शिवाय ज्या अर्थी त्या सर्व एखाद्या मुळापासून अस्तित्वात येतात त्था अर्थी त्या वस्तू स्वतः मूल घटक होऊ शकत नाहीत.

१८. नंतर कपिलाने असे विधान केले आहे की, जरी कार्य हे कारणाचे बनलेले असते तरीही ते कारणापेक्षा निराळे असले पाहिजे. म्हणून विश्व हे अंतिम कारण असू शकत नाही. दुसऱ्या एखाद्या अंतिम कारणाचा तो परिणाम असला पाहिजे.

१९. अव्यक्त वस्तूचे प्रत्यक्ष ज्ञान का होऊ शकत नाही. तिच्यायोगे तिचे प्रत्यक्ष ज्ञान होईल अशी क्रिया इंद्रियगोचर का होत नाही याचे कपिलाने पुढीलप्रमाणे उत्तर दिले आहे.

२०. “त्याची कारणे निरनिराळी असू शकतील. एक असे कारण असू शकेल की, ज्याप्रमाणे ज्यांच्या अस्तित्वाबद्दल शंका नसते अशा वस्तुही प्रत्यक्ष दिसत नाहीत त्याचप्रमाणे अव्यक्‍त वस्तूंच्या सूक्ष्म स्वरूपामुळे त्या इंद्रियगोचर होत नसतील; किवा अतिशय दूर असल्यामुळे किंवा अतिशय सान्निध्य असल्यामुळे अथवा तिसरीच एखादी वस्तूची मध्येच असल्यामुळे किवा तत्सदृश पदार्थाशी झालेल्या संकरामुळे किवा एखाद्या अधिक तीव्र संवेदनेचे अस्तित्व किंवा निरीक्षकाचे अंधत्व किवा त्याच्या ज्ञानेंद्रिायाचा किवा मनाचा एखादा दोष यामुळेही अव्यक्‍त वस्तु अदृश्य राहात असतील.”

२१. कपिलाला विचारण्यात आले, “मग विश्वाचे मूळ कोणते? विश्वाचा व्यक्‍त भाग आणि अव्यक्‍त भाग यांतील फरक कशामुळे होती?” असे कपिलास विचारण्यात आले.

२२. कपिलाने उत्तर दिले, “व्यक्‍त वस्तूंना कारण असते आणि अव्यक्‍त वस्तूंनाही कारण असते. पण  दोहोंचेही मूळ मात्र कारणातीत आणि स्वतंत्र असते.”

२३. व्यक्‍त वस्तु संख्येने पुष्कळ आहेत आणि अवकाश व काल यांच्या बाबतीत मर्यादित आहेत. त्याचे मूळ एकच, -शाश्वत आणि सर्वव्यापी. व्यक्‍त वस्तू क्रियाशी आणि सावयव असतात; सर्वाचे मूळ कारण सर्व वस्तूंमध्ये अंतर्भूत असते परंतु ते निष्क्रिय आणि एकसंघ असते.

२४. कपिल म्हणतो की, अनुत्क्रान्त वस्तुच्या विकासाची प्रक्रिया सत्त्व, रजस आणि तमस या तिच्या तीन घटकांमुळे घडत असते. यांना तीन गुण असे म्हणतात.

२५. माणसाच्या सुखाचे कारण होणार्या आणि त्यांचा आविष्कार करणार्या नैसर्गिक प्रकाशाशी यापैकी पहिल्या घटकांचे सादृश्य आहे. दुसरा घटक प्रवृत्ती किवा क्रियाशीलता निर्माण करतो; तिसरा घटक जड असून तो नियमन करतो आणि निष्क्रिय व उपेक्षेची स्थिती निर्माण करतो.

२६. या तीन घटकांचे परस्परांशी असलेले संबंध मूलतःच अत्यंत निकटचे असतात, ते एकमेकांवर मात करतात, एकमेकांना आधारही देतात आणि परस्परांत मिसळूनही जातात. हे घटक ज्योत, तेल आणि वात या दिव्याच्या घटकांप्रमाणे असतात.

२७. जेव्हा या तीन गुणांत समतोल असतो आणि एक दुसर्यापेक्षा वरचढ होत नाही, तेव्हा हे विश्व अचेतन होते व त्याची उत्क्रांत थांबते.

२८. जेव्हा या तीन गुणांचा समतोल नसतो आणि एक दुसर्यापेक्षा वरचढ होतो, तेव्हा हे विश्वच सचेतन होते आणि त्याची उत्क्रांती सुरू होते.

२१. गुणांचा समतोल का जातो या प्रश्‍नाला उत्तर देताना कपिल म्हणतो की, दुःखाच्या अस्तित्वामुळे या तीन गुणांचा समतोल बिघडतो.

३०. कपिलाच्या तत्वज्ञानातील हे असे सिद्धांत होते.

३१. सर्व तत्ववेत्यांपैकी कपिल मुनीच्या तत्वज्ञानाचा बुद्धावर फार मोठा प्रभाव पडला होता.

३२. ज्याची शिकवण तर्कशास्त्र आणि वास्तवता यांवर आधारलेली आहे. असा कपिल हा एकच तत्वज्ञ  असल्याचे बुद्धांना आढळून आले.

३३. तथापि कपिलाने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचा त्यांनी स्वीकार केला नाही. बुद्धांनी कपिलाच्या फक्त तीन गोष्टी ग्रह्म धरल्या.

३४. सत्य हे पुराव्याने सिद्ध झाले पाहिजे व क्रियेला बुद्धिवादाचा आधार असला पाहिजे, हे त्यांनी मान्य केले.

३५. देव अस्तित्वात आहे किंवा त्याने विश्व निर्माण केले हे गृहीत धरण्यास तर्कशास्त्राचा किवा वस्तुस्थितीचा कोणताही आधार नाही हे त्यांनी मान्य केले.

३६. जगात दु:ख आहे हे त्यांनी मान्य केले.

३७. कपिलाच्या शिकवणुकीतील बाकीचा भाग आपल्या उद्दिष्टांच्या दृष्टीने अनावश्यक म्हणून त्यांनी सोडून दिला.

३. ब्राम्हणे

१. वेदानंतरचे धार्मिक ग्रंथ ब्राम्हणे या नावाने ओळखले जातात. दोहोंनाही पवित्र ग्रंथ मानले जात होते. वस्तुतः ब्राम्हणे हा वेदांचाच एक भाग होय; दोन्ही ग्रंथ सारख्याच महत्वाचे मानले जात असून त्यांना “श्रुति” या नावाने संबोधितात.

२. ब्राम्हण तत्वज्ञान हे चार सिद्धांतावर आधारलेले आहे.

३. पहिला सिद्धांत असा की, वेद हे केवळ पवित्र आहेत असे नसून ते अचूक आहेत आणि त्यांचा अधिकार वादातीत आहे.

४. ब्राम्हण तत्वज्ञानाचा दुसरा सिद्धांत असा की, योग्य ते वैदिक यज्ञ केले, धार्मिक विधी आणि समारंभ पार पाडले आणि ब्राम्हणांना दक्षिणा दिली तरच आत्म्याला मुक्ति मिळते. म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्यातून त्याची सुटका होते.

५. वेदांत सांगितलेली आदर्श धर्माचीच कल्पना ब्राम्हणांपाशी होती असे नव्हे, तर आदर्श समाजाविषयीही त्यांची एक कल्पना होती.

६. या आदर्श समाजरचनेला त्यांनी चातुर्वर्ण्य असे नाव दिले. चातुर्वर्ण्याची कल्पना वेदांत सांगितलेली आहे आणि ज्या अर्थी वेद हे स्वथलनातील व वादातीत आहेत त्याअर्थी समाजरचनेची. चतुर्वर्ण्य पद्धतीसुद्धा बंधनकारक आणि वादातील आहे.

७. ही समाजपद्धती काही विशिष्ट नियमांवर आधारलेली होती.

८. पहिला नियम असा की, समाज चार वर्णात विभागला जावा

                    (१) ब्राम्हण, (२) क्षत्रिय, (३) वैश्य आणि (४) शूद्र.

९. दुसरा नियम असा की, या वर्णात सामाजिक समता असू शकत नाही; वर्गवार विषमतेच्या नियमाने ते परस्परांशी बांधले गेले पाहिजेत.

१०. सर्वांच्यावर ब्राम्हण असले पाहिजेत; ब्राम्हणांचा खालोखाल पण वैश्यांच्या वर क्षत्रिय, क्षत्रियांच्या खालोखाल परंतु शूद्रांच्या वर वैश्य आणि शूद्र हे सर्वांच्या खाली असले पाहिजेत.

११. हक्‍क आणि अधिकार यांच्या बाबतीत या चार वर्णात समानता असू शकत नव्हती. हक्क व अधिकार यांचा प्रश्‍न वर्गवार विषमतेच्या नियमांवर आधारलेला होता.

१२. ब्राम्हणाला त्याच्या इच्छेप्रमाणे हवे असतील ते सर्व हक्क आणि अधिकार असत. पण ब्राम्हणांना जे हक्क व अधिकार मिळत ते क्षत्रियाला मिळत नसत. त्याला वैश्यापेक्षा जास्त हक्क व अधिकार मिळत. वैश्याला शूद्रापेक्षा अधिक हक्क व अधिकार असत पण क्षत्रियाला मिळणारे हक्‍क व अधिकार त्याला मिळत नसत; आणि शूद्राला तर अधिकार नव्हतेच पण खास हक्‍क तर मुळीच नव्हते. तीन वरिष्ठ वर्णांना न दुखविता जगणे एवढाच त्याला हक्क होता.

१३. चातुर्वर्ण्याचा तिसरा नियम व्यवसायाच्या विभागणीसबंधी होता.अध्ययन, अध्यापन आणि धार्मिक विधी करणे हा ब्राम्हणांचा व्यवसाय होता. क्षत्रियाचा व्यवसाय लढाई  करणे हा होता. व्यापार हा वैश्यांवर सोपविण्यात आला होता. आणि तीन वर्गाची सेवा करणे हा शूद्रांचा व्यवसाय होता. निरनिराळया वर्गाना दिलेले व्यवसाय हे खास त्या त्या वर्गासाठी होते. एका वर्गाच्या व्यवसायांत दुसऱ्याला शिरता येत नसे.

१४. चातुर्वर्ण्याचा चवथा नियम शिक्षणाच्या हक्कासंबंधी होता. चातुर्वर्ण्य पद्धतीने शिक्षणाचा हक्‍क ब्राम्हण, क्षत्रिय व वैश्य या पहिल्या तीन वर्णानाच दिला होता. शूद्रांना शिक्षणाचा हक्क नाकारण्यात आला. चातुर्वर्ण्याच्या नियमाने शिक्षणाचा हक्‍क केवळ शूद्रांनाच नाकारण्यात आला नव्हता; तर ब्राम्हण, क्षत्रिय आणि वैश्य या वर्णातील स्त्रियांना देखील तो नाकारण्यात आला.

१५. आणखी एक पाचवा नियम होता. या नियमानुसार माणसाचे आयुष्य चार आश्रमात किंवा टप्प्यांत विभागले गेले होते. पहिल्या आश्रमाला ब्रम्हचर्य म्हणत; दुसर्याचे नाव गृहस्थाश्रम असे होते. तिसर्याला वानप्रस्थ आणि चवथ्याला संन्यास अशी नावे होती.

१६. पहिल्या आश्रमाचे उद्दिष्ट अध्ययन व शिक्षण हे होते. दुसर्याचे उद्दिष्ट वैवाहिक जीवन जगणे हे होते.  तिसऱ्याचे उदिष्ट वैराग्य जीवनाची म्हणजे गृहत्याग न करता कौटुंबिक बंध तोडून टाकणार्या जीवनाची ओळख करून देणे हे होते. चवथ्या आश्रमाचे उद्दिष्ट माणसाला ईश्वराचा शोध घेण्यास व त्याच्यात विलीन होष्यास समर्थ करणे हे होते.

१७. या आश्रमाचे फायदे फक्‍त तीन वरिष्ठ वर्णाच्या पुरुषांनाच घेता येत असत.पहिला आश्रम शूद्र व स्त्रिया यांच्यासाठी नव्हता. त्याचप्रमाणे चवथाही आश्रम शूद्र व स्त्रियांना वर्ज्य होता.

१८. चातुर्वर्ण्य नावाची अशी होती दिव्य आदर्श समाजरचना, तिला चातुर्वर्ण्य असे नाव देण्यात आले होते. ब्राम्हणांनी नियमाला आदर्शाचे स्वरूप दिले आणि कुठल्याही पळवाटा किंवा उणीवा न ठेवता तो आदर्श प्रत्यक्षात उतरविला.

१९. ब्राम्हण तत्वज्ञानातील चवथा सिद्धान्त कर्मवाद होय. आत्याच्या जन्ममरणाच्या फेऱ्याच्या सिद्धान्ताचा तो एक भाग होता. ब्राम्हणांचे कर्मवादाचे तत्वज्ञान हे  पुनर्जन्म घेऊन जेव्हा आत्मा नव्या देहात प्रवेश करतो ता तेव्हा तो कुठे जातो?” या प्रश्‍नाला दिलेले उत्तर होय. यावर ब्राम्हणी तत्वज्ञानाचे उत्तर असे की, आत्मा कुठे जातो हे माणसाच्या पूर्वजन्मातील कृत्यांवर अवलंबून आहे. दुसऱ्या  शब्दांत सांगावयाचे म्हणजे ते त्याच्या कर्मावर अवलंबून असते.

२०. ब्राम्हणी तत्वज्ञानातील पहिल्या सिद्धान्ताला बुद्धाचा तीव्र विरोध होता. वेद हे स्वथलनातीत आहेत व त्याचा अधिकार वादातीत आहे हे त्यांचे म्हणणे भगवान बुद्धाने नाकबूल केले.

२१. त्यांच्या मते निर्दोष व वादातीत असे काहीही नाही. कोणत्याही गोष्टीची फेरतपासणी आणि फेरविचार करण्यास प्रत्यवाय नसावा.

२२. माणसाला सत्य-यथार्थ सत्य-समजले पाहिजे. भगवान बुद्धाच्या मते विचारस्वातंत्र्य सर्वात महत्वाची. व आवश्यक बाब होती. आणि सत्य शोधून काढण्याचा विचारस्वातंत्र्य हा एकमेव मार्ग आहे अशी त्याची खात्री होती.

२३. वेद अपौरुषेय आहेत असे मानणे याचा अर्थ विचारस्वातंत्र्याला संपूर्ण नकार देणे असा होय

२४. या कारणास्तव ब्राम्हणी तत्वज्ञानाचा सिद्धान्त भगवान बुद्धांना दोषार्ह वाटला.

२५. ब्राम्हणी तत्वज्ञानातील दुसऱ्या सिद्धान्तालाही त्यांचा तितकाच विरोध होता. यज्ञामध्ये काही तथ्य सल्याचे त्यांना मान्य होते. परंतु खरा यज्ञ आणि खोटा यज्ञ यात त्यांनी भेद केला.

२६. दुसऱ्याच्या हितासाठी स्वहिताचा त्याग करणे हा खरा यज्ञ होय असे त्यांनी मानले. वैयक्तिक स्वार्थासाठी देवाला प्रसन्न करण्यासाठी एखाद्या पशूचा बळी देणे हा त्यांच्या मते खोटा यज्ञ होय.

२७. ब्राम्हणांचे यज्ञ हे बहुधा देवाला संतुष्ट करण्यासाठी पशूंचे बळी देऊन केलेले यज्ञ असत. अशा यज्ञाचा खोटे यज्ञ म्हणून त्यानी धिक्कार केला. आत्म्याच्या मुक्‍तीसाठी जरी असे यज्ञ केले गेले तरीही त्यांना ते मान्य नव्हते.

२८. यज्ञविरोधी असलेले लोक ब्राम्हणांचा उपहास करून म्हणत, “पशूचा बळी देऊन जर एखाद्याला स्वर्गप्राप्ती होत असेल तर, मग त्याने स्वत:च्या बापाचाच बळी का देऊ नये? स्वर्गात जाण्याचा तो अधिक जलद मार्ग ठरेल.”

२९. भगवान बुद्ध या विचाराशी अंतःकरणपूर्वक सहमत होते.

३० यज्ञाचा सिध्दांत भगवान बुद्धांना जितका तिरस्करणीय वाटत होता तितका चातुर्वरर्ण्याचाही सिद्धान्त त्याना नापसंत होता.

 ३१. चातुर्वर्ण्याच्या नावाने ब्राम्हणी धर्माने केलेली समाजरचना त्यांना नैसर्गिक समाजरचना वाटली नाही. तिच्यातील वर्गरचना सक्‍तीची आणि जुलमी होती. विशिष्ट वर्गाच्या मतलबानुसार तयार केलेली अशी ती समाजरचना होती. ता. मोकळा आणि स्वतंत्र समाज त्याना पसंत होता.

३२. ब्राम्हणांची चातुर्वर्ण्यपद्धती ही कधीही न बदलनारी कायम स्वरूपाची अशी समाजरचना होती. एकदा ब्राम्हण झाला की तो कायमचा ब्राम्हण. एकदा क्षत्रिय झाला की, तो कायमचा क्षत्रिय, एकदा वैश्य झाला की, तो कायमचा वैश्य आणि शूद्र तो कायमचा शूद्र ही समाजरचना व्यक्‍तीच्या जन्मावरून प्राप्त झालेल्या दर्जावर आधारलेली होती. या व्यवस्थेत माणसाचा दुर्गुण कितीही भयंकर असला तरी त्यामुळे त्याचा दर्जा कमी होत नसे; आणि त्याचा सद्रण कितीही मोठा असला तरी त्याचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने या सद्रणाला काहीही किंमत नसे. योग्यता आणि प्रगति यांना या समाजरचनेत स्थान नव्हते.

३३. विषमता प्रत्येक समाजात असते; पण ब्राम्हणी धर्मात तिचे स्वरूप अगदी निराळे होते. ब्राम्हणांनी सांगितलेली विषमता हे त्या समाजाचे अधिकृत तत्व होते. समाजावर वाढलेले ते केवळ बांडगूळ नव्हते. ब्राम्हणी. धर्माचा समतेवर विश्वास नव्हता. वस्तुत: समतेला त्याचा विरोध होता.

३४. ब्राम्हणी धर्माचे केवळ विषमतेने समाधान झाले नाही. वर्गवार विषमता हे त्याचे सार होते.

३५. समाजात सुसंवाद निर्माण करण्याचे तर दूरच राहो, पण वर्गवार विषमतेने समाजात चढत्या प्रमाणात द्वेष आणि उतरत्या प्रमाणात तिरस्कार निर्माण केला असून ती अखंड कलहाचे कारण होईल असे बुद्धाला वाटले.

३६. चार वर्णाचे व्यवसाय देखील निश्चित केले गेले होते. व्यवसायाची निवड करण्याचे स्वातंत्र्य कुणाला नव्हते.शिवाय हे व्यवसाय काम करष्याची कुशलता यानुसार निश्चित करण्यात आले नव्हते. तर ते जन्मावरून निश्चित केले गेले होते.

३७. चातुर्वर्ण्याच्या नियमांचे काळजीपूर्वक निरीक्षण केल्यावर भगवान बुद्ध अशा निष्कर्षाला येऊन पोहोचले की, ब्राम्हणी धर्माने ज्या तात्त्विक पायावर समाजरचना उभारली तो पाया, जरी स्वार्थी नसला तरी तो चुकीचा खास होता.

३८. त्याना हे स्पष्ट दिसले की, चातुर्वर्ण्याने सर्वांच्या हितसंबंधाकडे तर लक्ष दिले नाहीच आणि सर्वाच्या कल्याणाचा पुरस्कार तर मुळीच केला नाही, तर खरोखर मूठभर लोकांच्या हितासाठी बहुसंख्य लोकांना राबविण्यासाठीच चातुर्वर्ण्याची योजना जाणूनबुजून करण्यात आली होती. या योजनेनुसार स्वत:ला  मानवश्रेष्ठ म्हणवून घेणाऱ्या वर्गाची सेवा करणे माणसाला भाग पाडण्यात आले.

३९. दुर्बलांना दडपण्यासाठी व पिळण्यासाठी आणि त्यांना पूर्णपणे दास्यांत ठेवण्यासाठी ही योजना करण्यात आली होती.

४०. बंडाची प्रवृत्ति पूर्णपणे मारून टाकण्यासाठीच ब्राम्हणांनी कर्मवाद तयार केला होता असे बुद्धाचे मत होते.  मनुष्याच्या दुःखाला त्याच्या स्वत:शिवाय दुसरा कोणीही जबाबदार नव्हता. दु:खाची स्थिती तो बंड करून बदलू  शकत नव्हता. कारण पूर्वजन्मातील कर्मामुळेच या जन्मातील त्याची दुःखी अवस्था ठरविष्यात आली. होती.

४१. ब्राम्हण तत्वज्ञानाने ज्यांची माणुसकी पार नष्ट करून टाकली होती त्या शूद्र आणि स्त्रिया या दोन वर्गांना या समाज व्यवस्थेविरुद्ध बंड करण्याचे सामर्थ्य नव्हते.

४२. विद्यार्जनाचा हक्क त्यांना नाकारण्यात आला होता. याचा परिणाम असा झाला की, त्यांच्यावर लादलेल्या अज्ञानामुळे आपली अशी हीन अवस्था का झाली हे त्यांना कळत नव्हते. ब्राम्हणी धर्माने त्यांचे जीवन अर्थशून्य करून टाकले होते हे त्यांना समजले नव्हते. या ब्राम्हणी तत्वज्ञानाविरुद्ध बंड करण्याऐवजी ते त्याचे भक्‍त बनले व त्याचा ते पुरस्कार करू लागले.

४३. शस्त्र धारण करणे हा आपले मानवी स्वातंत्र्य मिळविण्याचा शेवटचा उपाय आहे. परंतु शूद्रांना शस्त्र  धारण करण्याचा हक्‍क नाकारण्यात आला होता.

४४. ब्राम्हणी धर्माच्या वर्चस्वाखाली स्वार्थी ब्राम्हण, सामर्थ्यवान व भयंकर क्षत्रिय आणि धनवान वैश्य यांच्या  कटाचे बळी म्हणून शूद्रांना असाहाय्य असे करून ठेवण्यात आले होते.

४५. अशा या समाजरचनेत बदल घडविणे शक्‍य होते काय? ही समाजव्यवस्था ईश्वरप्रणीत समजली जात असल्यामुळे ती बदलता येणे शक्‍य नाही हे बुद्धाला माहीत होते. ती फक्त नष्ट करून टाकणेच शक्‍य होते.

४६. या कारणांसाठी खर्या जीवनमार्गाला विरोधी म्हणून ब्राम्हणी तत्वज्ञान बुद्धाने अमान्य केले.

४. उपनिषदे आणि त्यांची शिकवण

१. उपनिषदे हे वाडमयातील वेगळ्या प्रकारचे ग्रंथ होत. उपनिषदे वेदांचा भाग नव्हेत. कोणताही धार्मिक कायदा यात सांगितलेला नाही.

२. असे असूनही उपनिषदे हा धार्मिक वाडमयाचाच एक भाग झाला.

३. उपनिषदांची संख्या बरीच मोठी आहे. त्यांतील काही महत्वाची अहेत, काही मूळीच महत्वाची नाहीत.

४. त्यांपैकी काही उपनिषदे वैदिक सिद्धान्ती, ब्राम्हण पुरोहित, यांच्या विरुद्ध असल्याबद्दल गणली जात.

५. वैदिक अभ्यास म्हणजे अज्ञान व अविद्या यांचा अभ्यास होय, याविषयी या सर्वाचे एकमत होते.

६. चार वेद आणि वैदिक शास्त्रे यांचे ज्ञान हे हलक्या दर्जाचे ज्ञान होय. याविषयी या सर्वांचे एकमत होते.

७. वेद हे ईश्वरनिर्मित आहेत, हे अमान्य करण्यात त्यांचे एकमत होते.

८. यज्ञ व त्यांचे फल, और्ध्यदेहिक आहुती आणि ब्राम्हणांना द्यावयाची दक्षिणा या ब्राम्हणी तत्वज्ञानातील मूलभूत गोष्टींना चिकटविण्यात आलेले सामर्थ्य नाकारण्याच्या बाबतीत त्या सर्वाचे एकमत होते.

९. तथापि उपनिषदांचा हा काही मुख्य विषय नव्हता. त्यांनी केलेली चर्चा ब्रम्ह व आत्मा यांच्यावर केंद्रित झाली आहे

१० विश्वाला बंधनात ठेवणारे ब्रम्ह हे सर्वव्यापी तत्व असून आत्म्याने परमात्म्माचे ज्ञान करून घेण्यातच आत्म्याची मुक्‍ती आहे.

११. उपनिषदाचा मुख्य सिद्धान्त असा की, ब्रम्ह हे सत्य आहे आणि आत्मा म्हणजे ब्रम्हच होय. उपाधीत गुंतल्यामुळे आत्म्याला मी ब्रम्ह आहे याची जाणीव होत नाही.

१२. प्रश्‍न असा होता की, ब्रम्ह हे सत्य आहे काय? उपनिषदांचे सिद्धान्त मान्य करावयाचे की नाही हे या प्रश्‍नाच्या उत्तरावर अवलंबून होते.

१३. ब्रम्ह हे सत्य आहे हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा बुद्धाला मिळाला नाही. म्हणून उपनिषदांचे म्हणणे त्यांनी.अमान्य केले.

१४. उपनिषदांच्या कर्त्यांना याविषयी प्रश्‍न विचारले गेले नव्हते असे नाही.जे प्रश्‍न विचारले गेले होते ते असे होते.

१५ अशा प्रकारचे प्रश्‍न याज्ञवल्क्यासारख्या महर्षीला विचारण्यात आले होते. बृहदारण्यकोपनिषदांत  याज्ञवल्क्याने महत्वाची कामगिरी बजावली आहे.

१६. त्याला विचारण्यात आले, ‘ब्रम्ह म्हणजे काय? आत्मा म्हणजे काय?” या प्रश्‍नावर “नेति! नेति! मला  माहीत  नाही! मला माहीत नाही !” एवढेच याज्ञवल्क्य सांगू शकला.

१७. “ज्याच्याविषयी कुणालाच काही माहीत नाही ते सत्य कसे असू शकेल?” असा बुद्धाचा प्रश्‍न होता. उपनिषदांचे म्हणणे केवळ कल्पनेवर आधारलेले असल्यामुळे ते नाकारण्यात बुद्धाला कोणतीही अडचण  भासली नाही.

Previous page                                                      Next page


The Buddha and His Dhamma, by Dr. B. R. Ambedkar
error: Content is protected !!