Terminology Fundamental Difference

Terminology Fundamental Difference

Part 2 – How Similarities in Terminology Conceal Fundamental Difference

How Similarities in Terminology Conceal Fundamental Difference PDF in English

चतुर्थ खंड: धर्म आणि धम्म

भाग दुसरा: पारिभाषिक शब्दसाम्यामुळे होणारे मौलिक भेद कसे अस्पष्ट राहतात?

Terminology Fundamental Difference

Previous page                                             Next Page

 

पुनर्जन्म

१. प्रास्ताविक

१. मुत्यूनंतर काय होते? हा प्रश्‍न वारंवार विचारला जातो.

२. भगवान बुद्धाच्या समकालीनांमध्ये ह्याविषयी दोन भिन्न मते होती. पहिले मत शाश्वततावाद आणि दुसरे मत म्हणजे उच्छेदवाद. 

३. आत्मा अमर असल्यामुळे जीवन शाश्वत आहे. पुनर्जन्माने जीवन पुढे चालू राहते असे शाश्वततावादी मानीत असत. 

४. मृत्यु म्हणजे सर्वनाश, मृत्यूनंतर काही उरत नाही, हा उच्छेदवाद्यांचा सिद्धान्त.

५. भगवान बुद्ध हा शाश्वततावादी नव्हता. कारण शाश्वततावादात पृथक्‌ आणि अमर अशा आत्म्याचे अस्तित्व कल्पावे लागते आणि त्यास तर बुद्धाचा विरोध होता. 

६. भगवान बुद्ध हा उच्छेदवादी होता काय? आत्म्याचे अस्तित्व मानीत नसल्याने, बुद्ध हा स्वाभाविकत: उच्छेदवादी असेल अशी अपेक्षा असणार. 

७. परतु आपण वस्तुत: उच्छेदवादी नसता आपणावर तसा आरोप केला जातो अणी बुद्धाने अलगहप्पम्म द्व सुत्तात तक्रार केली आहे. 

९. तो म्हणतो, “माझी शिकवण वेगळी असता, काही श्रमण आणि ब्राम्हण चुकीने आणि अप्रामाणिकपणाने वस्तुस्थिती धाब्यावर बसवून मी उच्छेदवादी आहे आणि मानवजातीचे विघटन, विनाश आणि संपूर्ण उच्छेद होणार आहे असे शिकवितो, असा मजवर आरोप करतात.”

१०. “खरोखर मी तसे शिकवीत नाही आणि तरीसुद्धा हे भले लोक चुकीने किंवा अप्रामाणिकपणाने मजवर खोटा आरोप करून मला उच्छेदवादी बनवू पाहतात!” 

१०. हे विधान जर खरोखर बुद्धाचे असेल, बुद्ध धम्मावर ब्राम्हणी सिद्धान्त लादण्यासाठी घुसडलेले प्रक्षिप्त विधान नसेल, तर एक गंभीर समस्या उभी राहते ( ती समस्या अशी ) :

११. भगवान बुद्ध तर आत्म्याचे स्वतंत्र अस्तित्व मानीत नाही, मग तो आपण उच्छेदवादी नाही असे कसे म्हणू शकतो? 

१२. यातून एक प्रश्‍न उद्भवतो तो असा की, भगवान बुद्ध पुनर्जन्म मानतो काय? 

२. पुनर्जन्म कशाचा

१. भगवान बुद्ध पुनर्जन्म मानतो काय?

२. याचे उत्तर ‘होय’ असे आहे.

३. या प्रश्‍नाचे दोन भाग पाडणे योग्य ठरेल (अ ) पुनर्जन्म कोणत्या वस्तुचा आणि ( आ ) पुनर्जन्म कोणत्या व्यक्तीचा?

४. या दोन प्रश्‍नांचा एकेक प्रश्‍न वेगळा घेऊन विचार करणे बरे पडेल.

५. पुनर्जन्म कशाचा? या प्रश्‍नाचा प्रथम विचार करू या.

६. या प्रश्‍नाकडे बहुधा दुर्लक्ष केले जाते. हे दोन्ही प्रश्‍न एकत्र केल्यामुळेच अतिशय वैचारिक गोंधळ उत्पन्न झालेला आहे.

७. भगवान बुद्धाच्या मते माणसाच्या अस्तित्वाचे चार घटक पदार्थ आहेत; (अ) पृथ्वी, (आ) आप,     ( इ) तेज, ( ई) वायु.

८. प्रश्‍न असा आहे की, मनुष्यदेह मृत झाल्यावर त्याच्या या चार भौतिक घटकांचे काय होते? मृत शरीराबरोबर तेही मृत होतात काय? काही लोक म्हणतात, ‘होय”.

९. भगवान बुद्ध म्हणतो, ‘नाही’, ते घटक पदार्थ आकाशात जे समान पदार्थ सामूहिक रूपाने आहेत त्यात मिळून  जातात. 

१०. जेव्हा हे चार घटक आकाशात तरंगणार्या समूहाला मिळतात तेव्हा एक नवा जन्म घडतो. 

११. पुनर्जन्माचा भगवान बुद्धाला अभिप्रेत असणारा अर्थ असा आहे.

१२. या नव्या जन्मातील घटक पूर्वीच्या एका विशिष्ट मृत शरीरातील असू शकतील.

१३. इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, शरीर मरते पण त्याचे भौतिक घटक पदार्थ सदैव जगत राहतात.

१४. अशा प्रकारचा पुनर्जन्म बुद्ध मानतो.

१५. सारीपुत्त आणि महाकोट्टीत्त यांच्या संवादात या विषयावर चांगलाच प्रकाश पडला आहे.

१६. असे म्हणतात की, एकदा भगवान श्रावस्ती येथील अनाथपिंडकाच्या जेतवन आरामात वस्ती करीत असता 

महाकोट्टीत्त आपले सायंकाळचे ध्यान संपवून सारीपुत्ताकडे गेला आणि त्याने सारीपुत्ताला आपल्या मनात डाचत असलेल्या काही प्रश्‍नांचे स्पष्टीकरण विचारले.

१७. खालील प्रश्‍न त्यांपैकी होते.

१८. महाकोट्टित्त :- ध्यानाच्या पहिल्या अवस्थेत किती गोष्टी दूर केल्या जातात आणि किती मागे राखल्या जातात?

१९. सारीपुत्त :- पाच दूर केल्या जातात; पाच मागे राखल्या जातात. विषय वासना, दुर्बुद्धी, आळस, चिंता आणि शंका या दूर केल्या जातात आणि निरीक्षण, चिंतन, उत्साह, समाधान आणि चित्ताची एकाग्रता ह्या मागे राखल्या जातात. 

२०. महाकोट्टीत्त – डोळे, कान, नाक, जिव्हा आणि स्पर्श ही पंचेन्द्रिये घ्या. त्यांचे विषय पृथक्‌ आणि क्षेत्रे पृथक् आहेत. त्याचा विचार करू लागलो असता असा प्रश्‍न पडतो की, त्यांचे अंतिम अधिष्ठान कोणते? या पंचेन्द्रियाचे विषय आणि त्यांची क्षेत्रे यांचा उपभोक्ता कोण? 

२१. सारीपुत्त :- मन. 

२२. महाकोट्टीत्त  – ही पंचेन्द्रिये कणावर अवलंबून आहेत?

२३. सारीपुत्त :- चेतनेवर 

२४. महाकोट्टीत्त  : -चेतना कशावर अवलंबून असते?

२५. सारीपुत्त – उष्णतेवर.

२६. महाकोटटित्त :- उष्णता कशावर अवलंबून असते?

२७. सारीपुत्त :- चेतनेवर.

२८. महाकोट्टीत्त  – तुम्ही म्हणता उष्णता चेतनेवर अवलंबून असते व चेतना उष्णतेवर अवलंबून असते, याचा खरोखर अर्थ तरी काय लावायचा?

२९ सारीपुत्त पुत्त :-मी तुला एक उदाहरण देऊन स्पष्ट करतो. . ज्याप्रमाणे दिव्यातील प्रकाश ज्योतीचे दर्शन घडवितो आणि ज्योतीमुळे प्रकाश उद्भवतो, त्याप्रमाणेच चेतना ही उष्णतेवर आणि उष्णता चेतनेवर अशी ती दोन्हीही तत्वे अन्योन्याश्रयी आहेत.

३०. महाकोट्टीत्त  :- शरीर हे निश्चेतन काष्ठासारखे दूर फेकण्यापूर्वी शरीरातील कोणत्या गोष्टी त्यास सोडून जातात?

३१. सारीपुत्त – चेतना, उष्णता आणि विज्ञान ( जाणीव ).

३२. महाकोट्टीत्त  :- इंद्रिय संज्ञा आणि भाव-भावना ज्या भिक्खूने आपल्या समाधीत निग्रहित आणि शांत केल्या आहेत तो भिक्खू आणि मृत शरीर या दोहोंमध्ये भेद काय? 

३३. सारीपुत्त – मृत शरीरात काया, वाचा आणि मन ह्यांच्याच क्रिया केवळ थांबलेल्या असतात, तर इंद्रियाचे सामर्थ्यही उच्छिन्न झालेले असते. उलटपक्षी, ध्यानस्थ भिक्खूमध्ये चेतना व उष्णता ही कायम असून इंद्रियशक्‍ती शाबूत असते, जरी त्याचे श्वासोच्छास, वितर्क-विचार आणि संज्ञा थांबलेल्या आणि शांत असल्या तरी. 

३४. मृत्यु अथवा उच्छेद यांचे हे श्रेष्ठ आणि परिपूर्ण विवेचन ठरण्याचा संभव आहे. 

३५. या संवादात एक व्यंग आहे. महाकोट्टीत्त्ताने सारीपुत्ताला एक प्रश्‍न विचारावयाला हवा होता, तो म्हणजे उष्णता म्हणजे काय? 

३६. याचे सारीपुत्ताने काय उत्तर दिले असते याची कल्पना करणे सोपे नाही. एक गोष्ट मात्र निःस्संदेह आहे की, उष्णता म्हणजे शक्‍ती ( Energy ).

३७. अशा रीतीने स्पष्ट केल्यास, “शरीर मृत झाल्यावर काय होते?” या प्रश्‍नाचे योग्य उत्तर शरीर शक्‍ती  उत्पन्न करण्याचे थांबविते  असे होते. 

३८. परंतु हाही उत्तराचा एकच भाग ठरतो. कारण मृत्यूचा एक अर्थ असाही आहे की, शरीरातून जी शक्‍ती बाहेर पडते ती विश्वात संचार करणार्या शक्तिसमूहात मिळून जाते. 

३९. म्हणून मृत्यूचे अथवा उच्छेदाचे दोन अर्थ आहेत. एका पैलूचा अर्थ शक्‍तीचे उत्पादन थांबणे. दुसर्या पैलूचा अर्थ विश्वात संचार करणार्या शक्तिसंग्रहात नवी भर पडणे.   

४०. उच्छेद या शब्दाच्या अर्थाला असे दोन पैलू पडत असल्याने बुद्ध स्वतःला पूर्णतया उच्छेदवादी म्हणत नसे. आत्म्याच्या कक्षेपर्यंतच तो उच्छेदवादी होता. शरीराच्या भौतिक घटका ( Matter ) बाबत मात्र तो उच्छेदवादी नव्हता. 

४१. असा अर्थ लावला तर बुद्ध स्वत:ला उच्छेदवादी का म्हणवून घेत नसे हे कळणे सोपे होते. तो शरीर घटकाचे पुनर्जीवन मानतो; तो आत्म्याचा पुनर्जन्म मानत नाही.

४२. भगवान बुद्धाच्या मताचा असा अर्थ लावला तर तो शास्त्राशी सुसंवादी आहे. 

४३. याच अर्थाने बुद्ध केवळ पुनर्जन्म मानतो असे म्हणता येईल.

४४. शास्त्र म्हणते, शक्‍ती कधीही नाश पावत नाही. मृत्यूनंतर सर्व उच्छेद होतो आणि मागे काहीच उरत नाही ही विवारसरणी भौतिक शास्त्राविरुद्ध आहे. कारण ही विचारसरणी शक्‍तीचे ( Energy ) सामूहिक सातत्य या प्रमाणाशी जुळत नाही.

४५. केवळ याच रीतीने वर सांगितलेली पुनर्जन्माची समस्या सोडविता येते. 

 

३. पुनर्जन्म कोणाचा ?

१. सर्वात बिकट प्रश्‍न म्हणजे पुनर्जन्म कोणाचा?

२. एखादा मृत झालेला मनुष्य परत नवा जन्म घेतो का?

३. या सिद्धांतावर बुद्धाचा विश्वास होता काय? असणे असंभाव्य दिसते. 

४. मृत मनुष्याचे सर्व भौतिक अंश एकत्र येऊन, त्यांनी एक नवा देह बनविला तरच त्या मनुष्याचा पुनर्जन्म घडणे शक्‍य आहे. 

५. जर नवा देह वेगवेगळ्या मृत मनुष्यांच्या भिन्न, भिन्न भौतिक अंशांच्या मिश्रणांनी बनत असला तर पुनर्जन्म शक्‍य आहे, परंतु तो त्या एकाच मृत मनुष्याचा पुनर्जन्म असू शकत नाही. 

६. भिक्खूणी खेमा हिने हा मुद्दा पसेनदी राजाला चांगलाच स्पष्ट करून सांगितला आहे. 

७. एकदा तथागत श्रावस्तीजवळील अना्थपिडिकाच्या जेतवनारामात राहात होते. 

८. त्या समयी कोशल जनपदात परिभ्रमण करून खेमा ही श्रावस्ती आणि साकेत ह्या नगरांच्या दरम्यान असलेल्या तोरणवत्थूमध्ये राहात होती. 

९. या वेळी कोसल राजा पसेनदी साकेतहून श्रावस्ती येथे जात होता. एक रात्र तो तोरणवत्थू येथे राहिला. 

१०. पसेनदीने एका माणसाला बोलावून सांगितले, “हे बघ. सन्माननिय अशा एखाद्या भिक्खूला किंवा ब्राम्हणाला घेऊन ये.”

११. “ठीक आहे,” असे बोलून तो तोरणवत्थूत राजसन्मानास योग्य असा भिक्खु अथवा ब्राम्हण शोधू लागला; परंतु तसा कोणीही त्याला आढळला नाही. 

१२. शेवटी तोरणवत्थूमध्ये राहावयास आलेली भिक्खूणी खेमा त्याला दिसली. तिला भेटून तो कोसलराज पसेनदीकडे गेला आणि म्हणाला, 

१३. “महाराज, आपल्या सन्मानास योग्य असा भिक्खू अथवा ब्राम्हण येथे कोणी दिसत नाही. परंतु येथे खेमा नावाची तथागतांची एक शिष्या आहे. तिच्यासंबंधी अशी वार्ता प्रसृत आहे की, ती विचारसंपन्न, विचक्षण, बहुश्रुत, वादविवादात कुशल आणि प्रत्युत्पन्नमतीची अशी अर्हत्‌ स्ती आहे. महाराजांनी तिचा सन्मान केल्यास तो योग्यच होईल.” 

१४. हे ऐकल्यावर कोसलराज पसेनदी भिक्खुणी खेमाला भेटण्यास गेला. तिच्या समीप गेल्यावर तिला अभिवादन करून तो बाजूला बसला आणि म्हणाला, 

१५. या विषयासंबधी आपले म्हणणे काय आहे? “मृत्यूत्तर तथागताचे अस्तित्व राहते काय?” 

१६. “महाराज, हे गूढ तथागतांनी स्पष्ट केलेले नाही.” 

१७. “तथागतांचे मृत्यूनंतर अस्तित्व राहते काय? असा प्रश्‍न विचारला असता त्याचे उत्तर तथागतांनी सांगितले नाही असे म्हणतात व दुसर्या प्रश्‍नाचीही तशीच उत्तरे देतात. तथागतांनी हे गूढ उकलून न सांगण्याचे काय कारण असावे बरे?” 

१८. “महाराज, या बाबतीत मी आपणालाच एक प्रश्‍न विचारीन आणि आपणास योग्य वाटेल तसे त्याचे उत्तर द्या. महाराज, आपणाजवळ असा कोणी गणिती आहे काय की जो गंगेतील वाळूकणांची शेकड्यांनी, हजारांनी अथवा लक्षांनी गणती करू शकेल?”

१९, “नाही तसा कोणीच नाही.” 

२०. “मग तुमच्यावजवळ असा कोणी गणिती आहे काय की जो समुद्रात इतके करोड, इतके हजार, इतके लाख माप पाणी आहे हे सांगू शकेल?” 

२१. “नाही. असा कोणीच नाही.” 

२२. “असे का?” 

२३. “कारण, समुद्र खोल, अमर्याद, अगाध आहे.” 

२४. “त्याप्रमाणे महाराज, तथागतांनी देह परित्यक्‍त केल्यावर ते मुळापासून छेदलेल्या तालवृक्षासारखे परत पुन्हा उगवणार नाहीत. तथागतांच्या देहासंबंधी काय सांगता येईल? तथागत शरीर विमुक्‍त झाल्यावर समुद्रासारखेच अमर्याद आणि अगाध आहेत. अशा स्थितीत तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व आहे अथवा नाही किंवा आहे आणि नाही असे कोणतेही विधान लागू शकत नाही.” 

२५. “तथागतांची त्याच्या वेदनांवरून व्याख्या करू गेल्यास त्या वेदना तथागतांनी परित्यक्‍त केलेल्या आहेत. आमूलाग्र नाहीशा केलेल्या आहेत. वेदना विमुक्त असे तथागत, थोर समुद्राप्रमाणे अमर्याद आणि अगाध आहेत.तेव्हा मृत्यूनंतर तथागतांचे अस्तित्व राहते अथवा राहात नाही; किवा राहते आणि राहात नाही, ही विधाने तथागतांना लागू पडत नाहीत.” 

२६. “त्याप्रमाणेच संज्ञा, संस्कार, विज्ञान यांच्या आधारे तथागतांची व्याख्या करू लागल्यास तीही त्याना लागू पडत नाही. कारण या सर्वांपासून समूळ विमुक्‍त झालेले तथागत हे थोर समुद्रासारखे अमर्याद आणि अगाध आहेत. तेव्हा मृत्यूनंतर तथागतांच्या अस्तित्वासंबधी अथवा अनस्तित्वासंबंधी विधान त्यांना लागू पडत नाही.” 

२७. खेमाचे हे शब्द ऐकून कोसल राजा पसेनदी आनंदित झाला. आपल्या जागेवरून उठला, तिला नमस्कार केला आणि तो निघून गेला. 

२८. दुसर्या एका प्रसंगी पसेनदी तथागताकडे गेला असता त्यांना अभिवादन करून त्याने विचारले, 

२९. “भगवान, मग तथागतांना मृत्यूत्तर अस्तित्व नाही असे म्हणता येईल काय?” 

३०. “महाराजा, यासंबंधी मी काहीच म्हटलेले नाही.”

३१. “भगवान, मग तथागतांना मृत्यूत्तर अस्तित्व आहे असे म्हणता येईल काय?”

३२. “महाराज, मी तसेही म्हटलेले नाही.” 

३३. नंतर त्याने खेमाला विचारलेलेच दुसरे प्रश्‍न विचारले.

३४ “भगवान, मी जेव्हा आपणाला विचारतो, मृत्यूत्तर तथागतांना अस्तित्व आहे काय अथवा नाही काय, तर आपण म्हणता, ‘मी ते सांगितलेलेच नाही.’ तर भगवान, ह्या न सांगण्याचे कारण काय?” 

३५. “महाराजा, मी आता तुला एक प्रश्‍न विचारतो आणि तुला योग्य वाटेल तसे उत्तर दे.” त्या ठिकाणी भगवंतांनी खेमासारखेच पसेनदीला प्रश्‍न विचारले. 

३६. “भगवान. ही खरोखर आश्चर्याची गोष्ट आहे की, गुरुशिष्यांनी दिलेली उत्तरे अर्थशा आणि अक्षरश: समान, सुसंवादी, सुसंगत आणि उच्चतम आहेत. 

३७. “भगवान, एका समयी मी भिक्खुणी खेमाकडे गेलो होती आणि तिला याच गोष्टीसंबंधी विचारले होते आणि भगवंतासारखेच तिने अक्षरश: उत्तर दिले.” 

३८. “भगवान, आम्ही कामाची माणसे. आम्हांला पुष्कळ कामे आहेत. आम्ही जातो.”

३९. “जा, या वेळी जे तुला करणे उचित आहे ते कर.”

४०.या शब्दांनी आनंदित होऊन भगवंतांना अभिवादन करून कोसल राजा पसेनदी आपल्या मार्गाला लागला.

 

कर्म

१. बौद्ध आणि ब्राम्हणी कर्मसिद्धान्त समान आहेत काय.

१. बौद्धधम्मात कर्मसिद्धान्ताइतका इतर कोणत्याही सिद्धान्ताने गोंधळ निर्माण केलेला नाही.

२. बौद्ध धर्मात त्याचे स्थान कोणते? आणि त्याचा विशेष अर्थ काय आहे हे अगोदरच सांगितलेले आहे.

३. अज्ञ हिंदू न समजता केवळ शब्दसाम्यावरून असे म्हणतात की, बौद्धधर्म अथवा ब्राम्हणी वा हिंदुधर्म एकच आहेत.

४. सूज्ञ आणि सनातनी ब्राम्हणही असेच म्हणतात, परंतु त्यात त्यांचा हेतु अज्ञ बहुजनसमाजाची बुद्धि-पुरस्सर गैरसमजूत करणे हा असतो.

५. सुशिक्षित ब्राम्हणांना माहित असते की, बुद्धाचा कर्मसिद्धान्त ब्राम्हणी कर्मसिद्धान्तापेक्षा भिन्न आहे आणि तरीही ते म्हणत राहतात की, बौद्धधर्म आणि ब्राम्हणी अथवा हिंदुधर्म एकच आहेत.

६. त्यांच्या द्वेषबुद्धीने चालविलेल्या अपप्रचाराला या दोन धर्मांतील कर्म सिद्धान्वविषयक समान परिभाषेने साहाय्य होते.

७. म्हणून वस्तुस्थिती काय आहे याचे सूक्ष्म परीक्षण करणे आवश्यक आहे.

८. शब्दांचे कितीही साम्य असले तरी बुद्धाच्या कर्मसिद्धान्ताचा अभिप्राय हा ब्राम्हणी कर्मसिद्धान्ताच्या अभिप्रायापेक्षा वेगळा आहे.

९. या दोन्ही सिद्धान्तांत आधारभूत प्रमाणे ही इतकी भिन्न आहेत की, त्यापासून निष्पन्न होणारा निष्कर्ष समान असणे शक्‍य नाही.

१०. हिंदू कर्मसिद्धान्ताची मुख्य तत्वे खालीलप्रमाणे आहेत. 

११. हिंदू कर्मसिद्धान्त हा आत्म्याच्या अस्तित्वावर आधारलेला आहे. उलटपक्षी बौद्ध धर्म आत्म्याचे अस्तित्व मानीत नसल्यामुळे तो आत्म्यावर आधारलेला नाही. 

१२. ब्राम्हणी कर्मसिद्धान्त हा आत्म्याच्या जन्माजन्मावर आधारलेला आहे. 

१३. आत्म्याचा पुनर्जन्म होतो असे मानल्यामुळे कर्म हे जन्मजन्मान्तरी चालू राहते. 

१४. बौद्ध धर्म आत्माच मानीत नसल्यामुळे हेही बौद्ध कर्मसिद्धान्तास लागू होत नाही. 

१५. देहाव्यतिरिक्‍त आत्म्याला अस्तित्व आहे यावर हिंदूधर्म आधारलेला आहे. देह मृत झाला तरी आत्मा मरत नाही. आत्मा देहातून निघून जातो. 

१६. ही विधाने बौद्ध सिद्धान्ताला लागू नाहीत.

१७. हिंदू कर्मसिद्धान्ताप्रमाणे माणसाने कर्म केले तर त्या कर्माचे विविध परिणाम होतात. त्याचा पहिला परिणाम म्हणजे कर्त्यावर होणारा आणि दुसरा आत्म्यावर होणारा. 

१८. कर्त्याच्या प्रत्येक कर्माचा आत्म्यावर संस्कार होतो.

१९ जेव्हा मनुष्य मरतो आणि त्याचा आत्मा त्याला सोडून डू जातो त्या वेळी त्याच्या आत्म्यावर असे अनेक संस्कार झालेले असतात. 

२०. आणि या संस्कारामुळे पुढील जन्मी त्याला कोणते अधिकार मिळणार हे ठरत असते. 

२१. हिंदूंचा हा सिद्धान्त आत्म्याचे अस्तित्व न मानणार्या बौद्ध कर्मसिद्धान्ताशी विसंगत आहे. 

२२. वरील कारणास्तव बौद्ध कर्मसिद्धान्त आगि हिंदू कर्मसिद्धान्त हे एकच असू शकत नाहीत.

२३. म्हणून हे दोन्हीही एकच आहेत असे मानणे केवळ मूर्खपणाचे ठरेल.

२४. जास्तच जास्त इतकेच म्हणता येईल की, या शाब्दिक मायाजाळापासून सावध राहा. 

 

२. गतकर्माचा भविष्य जन्मावर परिणाम होतो असे बुद्ध मानतो काय ?

१. कर्मसिद्धान्त बुद्धाने सांगितला. ‘कराल तसे भराल” असे सांगणारा तो पहिलाच होय.

२. तो कर्मसिद्धान्वावर इतका भर देत असे की, त्याच्या म्हणण्याप्रमाणे कर्मसिद्धान्ताच्या दृढ परिपालनाविना नैतिक सुव्यवस्था अशक्य आहे. 

३. भगवान बुद्धाचा कर्मसिद्धान्त हा ‘कर्म’ आणि त्याचा वर्तमान जीवनावर परिणाम ह्यापुरता मर्यादित होता. 

४. तथापि अधिक विस्तृत असाही एक कर्मसिद्धान्त आहे आणि या कर्मसिद्धान्ताप्रमाणे गतजन्मीच्या कर्माचा कर्मात अंतर्भाव होतो.

५‌. माणुस गरीब कुळात जन्मास आला तर या सिद्धान्ताप्रमाणे त्याचे कारण त्याचे गतजन्माचे दुष्कर्म. तो श्रीमंताच्या ]मंताच्या घरात जन्मला तर त्याचे चे कारण गतजन्मीचे सत्कर्म,  ६. जन्मत:च माणसात काही व्यंग असले तर त्याचेही कारण त्याचे गतजन्मीचे दुष्कर्म.

७. हा अत्यंत दुष्ट सिद्धान्त आहे. कर्माचा असा अर्थ लावला तर माणसाच्या श्रमाला काहीच स्थान उरणार नाही. सर्व काही गतजन्मीच्या त्याच्या कर्माने पूर्वनियोजित केल्यासारखे होईल. 

८. हा विस्तृत कर्मसिद्धान्त बोद्धप्रणीतच आहे, असा अनेक वेळा भगवान बुद्धावर आरोप करण्यात येतो. 

९. परंतु भगवान बुद्ध खरोखरच हा सिद्धान्त मानीत होता काय? 

१०. ह्या सिद्धान्ताची बरोबर परीक्षा करण्यासाठी तो ज्या शब्दांत सामान्यत: सांगितला जातो त्यापेक्षा वेगळ्या शब्दात सांगणे योग्य होईल. 

११. गत कर्म हे माणसासमवेत जाते असे म्हणण्यापेक्षा ते वारसा म्हणून येते हे म्हणणे अधिक सयुक्तिक आहे.

१२. शब्दाच्या ह्या परिवर्तनामुळे वांशिकतेच्या नियमांवर कर्मसिद्धांताची कसोटी लावता येते. त्याप्रमाणेच ह्या शब्दपरिवर्तनाने त्या सिद्धांताच्या अभिप्रेत आणि रूढ अर्थाला बाध येत नाही. 

१३. जे दोन प्रश्‍न येरव्ही माणसाला या सिद्धान्ताविषयी विचारणे शक्‍य झाले नसते, ते तोच सिद्धान्त निराळ्या भाषेत मांडल्यामुळे, शक्‍य झाले आहे. हे जे दोन प्रश्‍न आहेत त्या दोन प्रश्‍नांची उत्तरे दिल्याशिवाय हा सिद्धान्त स्पष्ट होत नाही. 

१४. पहिला प्रश्‍न हा की, गत कर्माचा वारसा कसा लाभतो? त्याची प्रक्रिया कशी असते? 

१५. दुसरा प्रश्‍न असा की, वांशिकतेच्या दृष्टीने गत कर्माचे रूप कसे असते? ते वंशानुगत मातापितरांपासून  चालत आलेले असते, की नंतर स्वतः संपादलेले असते? 

१६. आपल्या मातापितरांपासून आपल्याला काय मिळते? 

१७. शास्त्र सांगते, जेव्हा वीर्यजंतूचा ( Sperm ) गर्भाशयातील अंड्यांशी संयोग होतो तेव्हा प्राण्याच्या जीवनाला प्रारंभ होतो. वीर्यजंतूच्या शिराचा अंड्यातील केन्द्राणूत प्रवेश होणे म्हणजे उत्पत्तीचा प्रारंभ. 

१८. प्रत्येक मनुष्यप्राण्याचा उगम हा मातेच्या गर्भाशयातील अंडे आणि पित्याचा वीर्यजंतू यांच्या संयोगाने म्हणजे दोन सजीव पदार्थांच्या दोन कणांच्या युतीने होत असतो. 

१९. ह्या विषयासंबंधी चर्चा करण्यासाठी जो यक्ष बुद्धाकडे आला होता, त्याला माणसाची उत्पत्ती मातापितरांमुळेच होते, असे बुद्धाने सांगितले. 

२०. त्या वेळी भगवान बुद्ध राजगृहाजवळील इंद्रकर पर्वतावर वास करीत होते. 

२१. यक्ष त्यांच्या जवळ जाऊन म्हणाला, “भगवान म्हणतात, पार्थिव आकार (रूप ) म्हणजे जीव नव्हे; मग जीव सशरीर कसा होतो? जीवाला ह्या अस्थि, हे जठर कोठून मिळतात! आईच्या गर्भाशयात हा आत्मा कसा लटकलेला असतो?” 

२२. याला भगवंतांनी उत्तर दिले, “प्रथम कलल होतो. नंतर अर्बुद. त्यापासून पेशी वाढते आणि पेशीपासून घन होऊन तो वृद्धी पावत राहतो. या घनांत पुढे केस, लव, नखे येऊ लागतात आणि जे काही अन्न, पेय आई घेते त्यावरच पर्यायाने आईच्या  गर्भाशयातील बालक जगते आणि वाढते. 

२३. हिन्दु सिद्धान्त मात्र वेगळा आहे. 

२४. तो सिद्धान्त म्हणतो की, शरीर वंशानुगत मातापित्यांपासून प्राप्त होते. परंतु आत्म्याचे तसे नाही. तो शरीरात बाहेरून आत ठेवलेला आहे अर्थात कोठून? हे काही हा सिद्धान्त सांगू शकत नाही. 

२५. आता गतकर्माचे स्वरूप कसे असते? या दुसर्या प्रश्‍नाकडे वळताच एका गोष्टीसंबंधी निश्चिती केली पाहिजे. ती म्हणजे, कर्म हा वंशानुगत गुणविशेष समजावयाचा की स्वत:च संपादलेला गुण समजावयाचा? 

२६.या प्रश्‍नाचे उत्तर आल्याशिवाय वंशानुक्रमाच्या शास्त्रीय सिद्धान्ताची त्याला कसोटी लावता येत नाही. 

२७. परंतु या किंवा त्या दृष्टीने त्याचे उत्तर आले तरी हा कर्मसिद्धान्त हा अर्थपूर्ण आहे किंवा अर्थहीन आहे, हे ठरविण्यास शास्त्र सहाय्य करू शकेल काय? 

२८. शास्त्रानुसार मुलात आईबापाचे गुण विशेष उतरतात. 

२९. हिंदू कर्मसिद्धान्ताप्रमाणे बालकाला त्याच्या आईबापापासून देहापलीकडे काहीच मिळत नाही. हिंदू सिद्धान्ताप्रमाणे गत कर्म हे मुलाने आपल्या जन्माबरोबर, स्वतः आपण आपल्यासाठी, आणलेला वारसा आहे. 

३०. त्यात आईबापाचा काहीच भाग नसतो. सर्व काही बालक आपल्याबरोबरच आणते. 

३१. अशा प्रकारचा सिद्धान्त बुद्धीस पटणारा ठरत नाही.

३२. वर सांगितल्याप्रमाणे बुद्ध असल्या बुद्धिविसंगत सिद्धान्तावर विश्वास ठेवीत नाही. ( या विषयाची चर्चा करताना मनुष्य आपल्या चांगल्या वाईट कर्माच्या परिणामांपासून मुक्‍त होतो काय? त्या प्रश्‍नाचे स्थाविर नागसेनाने राजा मिलिंदाला उत्तर दिले आहे.) 

३३. “जर पुनरुत्पत्ती झाली नाही तर तो आपल्या कर्माच्या परिणामापासून मुक्‍त होतो. जर पुनरुत्पत्ती झाली तर तो मुक्‍त होणार नाही.” 

३४. राजा मिलिंद म्हणाला, “नागसेन, एक उदाहरण देऊन आपले म्हणणे अधिक स्पष्ट कर.” 

३५. “राजा, असे समज, एक मनुष्य दुसर्या माणसाचे आंबे चोरतो. चोरणारा शिक्षापात्र ठरतो काय?” 

३६. “होय.” 

३७. “परंतु दुसर्या माणसाने ज्या आंब्याचे बीज जमिनीत लावले होते ते आंबे त्याने चोरलेले नाहीत, मग तो शिक्षापात्र का?”

३८. “कारण, त्याने जे आंबे चोरले ते लावलेल्या आंब्याचेच परिणामस्वरूप होते.”

३९. “त्याप्रमाणेच हे राजा, हे नामरूप चांगले अथवा वाईट कर्म करते आणि त्या कर्मापासून दुसरे नामरूप जन्मास येते म्हणून पाहिले नामरूप आपल्या दुष्कर्मापासून विमुक्‍त राहू शकत नाही.” 

४०. “वा! छान नागसेना!” 

४१. राजा पुढे म्हणाला, “जेव्हा ह्या नामरूपाने कर्म केले तेव्हा त्या कर्माचे पुढे काय होते? 

४२. “ ज्याप्रमाणे सावली माणसाला सोडीत नाही. , त्याप्रमाणे गत कर्मही त्याच्याबरोबर जाईल.”

 ४३. “ पण मग ही कर्मे आहेत असे म्हणून कोणाला ती कर्मे दाखविता येतात का?”

४४. “ नाही.”

४५. “ एक उदाहरण देऊन हे अधिक स्पष्ट कर.” 

४६. “ वृक्षाला जी फळे अद्यापि यावयाची आहेत ती, हे राजा, दाखविता येतील काय?”

४७. “ती भावी फळे येथे आहेत किवा तेथे आहेत, असे कोणाला म्हणता येईल काय?”

४८. “निसंशय नाही.”

४९. “त्याप्रमाणेच हे राजा, जोपर्यंत जीवनाचे सातत्य खंडित झाले नाही, तोपर्यंत कृतकर्मे दाखविता येत नाही.”

५०. “वा, छान नागसेना.”

 

३. गतकर्मांचा भविष्यजीवनावर परिणाम होतो, असे बुद्ध         

मानतो काय? ( पुढे चालू )

१. अशा रीतीने बुद्धाचा कर्मसिद्धान्त शास्त्रास धरून आहे.

२. पूर्वजन्मीचे कर्म वारसा म्हणून भावी जन्मात प्राप्त होते. यावर तो विश्वास ठेवीत नाही. 

३. जन्म हा मातापितरांपासून आहे आणि बालकाला जन्मत: जो वारसा लागतो तो त्याच्या आईबापांकडून; असे बुद्ध मानीत असल्यामुळे बालक हे स्वतःच वारसा घेऊन येते, यावर तो कसा विश्वास ठेवणार? 

४. त्याच्या विश्वासासंबंधीचे अनुमान स्वीकारले नाही तरी चालेल; कारण या विषयासंबंधी प्रत्यक्ष पुरावा एका सूत्रात आढळतो. ते सूत्र म्हणजे, “चूळ, दुःख-खंद सूत्त’ या सुत्तात भगवान बुद्ध आणि जैन यांचा संवाद आहे. 

५. या संवादात भगवान बुद्ध म्हणतो – तुम्ही म्हणता की, आम्ही पूर्वी पाप केले होते, त्याचे आम्ही आपल्या कठोर तपस्येने परिमार्जन करतो. वर्तमानकाळात काया, वाचा आणि मन यांचा निरोध केल्याने आमच्या पूर्वजन्मींच्या पापाचा निरास होईल. मग तपस्येने मागिल पापांचा निगम झाल्यावर आणि नवी पापकर्मे करावयाचे थांबल्यावर आमचा भविष्यकाळ शुद्ध होतो. भविष्यकाळ शुद्ध केल्याने गतकाळ परिणामहीन णामहान होतो. गतकाळ परिणामहीन झाल्याने दु:खाचा निरास होऊ लागतो आणि त्यामुळे दु:खकारक वेदना नाहीशा होतात. दु:खकारक वेदना नाहीशा झाल्यावर दुःखच नाहीसे हाते.

६. ह्या माझ्या भाषणाला त्या निगण्ठांनी होकार दिल्यावर मी त्यांना विचारले, “पूज्य माणसांनो, तुम्हांला पूर्वजन्म होता किंवा पूर्वजन्म नव्हता हे तुम्हांस माहीत आहे काय?” 

७. ‘नाही! आम्हांला काहीच माहीत नाही! 

८. ‘गतजन्मी पापामुळे तुम्ही सदोष अथवा निर्दोष होता याबद्दल तुम्हांला काही ज्ञान आहे काय? 

९. “नाही! आम्हांस काहीच माहीत नाही!’ 

१०. ‘गतजन्मी या किंवा त्या विशिष्ट पापामुळे तुम्हांला दोष लागला होता किंवा नाही हे तुम्हांला माहीत आहे  का?”

११. ‘नाही; ते आम्हांस काहीच माहित नाही.’ 

१२. दूसरी गोष्ट अशी की, माणसाची स्थिती आनुवंशिकतेपेक्षा त्याच्या भोवतालच्या परिस्थितीवर अधिक अवलंबून असते. असे बुद्ध मानतो. 

१३. देवधम्म सुत्तात तो म्हणतो, काही श्रमण ब्राम्हण अशा मताचे आहेत की, जे काही सुखकर अथवा दु:खकर अनुभव व्यक्‍तीला येतात ते गतजन्मीचेच परिणाम होत. म्हणून ते म्हणतात, गतजन्मीच्या पापकर्माचे परिमार्जन केल्याने आणि नवी पापकर्मे करण्याचे थांबविल्याने भविष्य काळात सोसावयाचे काहीच उरत नाही. पापकर्मे क्षपष पावतात नि पाप कर्माचा क्षय झाल्याने दु:खाचा उच्छेद च्च होतो. दु:खाचा उच्छेद झाल्याने वेदना नाहीशाहोतात आणि वेदनांचा क्षय झाल्याने अखिल दु:खाचा उच्छेद होतो, असे निगण्ठांचे म्हणणे आहे. 

१४. प्राण्यांचे सुखकारक आणि दुःखकारक अनुभव हे जन्मकाळच्या परिस्थिती मुळे उद्लवतात असे निगण्ठ म्हणत असतील तर त्यांचे ते म्हणणे दोषास्पद आहे; आणि जन्मकालीन परिस्थिती त्याचे कारण नाही असे ते म्हणत असले तरीसुद्धा त्यांचे म्हणणे दोषास्पद ठरते. 

१५. भगवान बुद्धाची ही विधाने आपल्या प्रश्‍नांच्या दृष्टीने महत्वाची आहेत. जर बुद्ध गतजन्मीच्या कर्मावर विश्वास ठेवीत असेल तर त्यासंबधी शंका का निर्माण करतो? वर्तमान जीवनातील सुखकर अथवा दुःखकर अनुभव हे परिस्थितिसापेक्ष आहेत असे मानणारा बुद्ध गतजन्मीच्या कर्मावर विश्वास कसा ठेवील ? 

१६. गतजन्मीच्या कर्माचा सिद्धान्त हा शुद्ध ब्राम्हणी सिद्धान्त आहे. ते आत्म्याचे अस्तित्व मानतात, आत्म्याचे अस्तित्व आणि पूर्वकर्माचा आत्म्यावर परिणाम होतो असे मानतात म्हणून ‘गतजन्मीचे कर्म वर्तमान काळात प्रभावशाली ठरते!’ याच्याशी ते सुसंगत आहे परंतु आत्म्याचे अस्तित्व न मानणार्या बौद्ध सिद्धान्ताशी ते अगदी विसंगत आहे.

१७. ज्याला भगवान बुद्धाचा सिद्धान्त समजला नाही किंवा जो बुद्धिपुरस्सर बौद्ध धर्म आगि हिंदू धर्म सदृश आहेत असे दाखविण्याचा अट्टाहास करतो त्याने हा सिद्धांत बौद्ध धर्मात घुसडविला असला पाहिजे.

१८. भगवान बुद्धाने हा सिद्धान्त शिकविलेला असण्याची शक्‍यता नाही, हे वरील कारणावरून स्पष्ट होईल. 

१९, याशिवाय भगवान बुद्धाने हा सिद्धान्त शिकविला नसावा या म्हणण्याला दुसरा एक सर्वसामान्य आधार आहे.

२०. पूर्वकर्म हे भावी जीवनाचे नियंत्रण करते. हा हिंदु सिद्धान्त अन्यायमूलक आहे. असल्या सिद्धान्ताचा शोध लावण्याचा हेतू काय असावा? 

२१. त्याचा एकमेव हेतू शासन अथवा समाज यांना दरिद्री लोकांच्या दु:स्थितीच्या उत्तरदायित्वातून मुक्‍त करणे हा असावा.

२२. नाहीतर असल्या अमानुष आणि बुद्धिविसंगत सिद्धान्ताचा शोधच लागला नसता. 

२३. महाकारुणिक हे ज्याचे बिरुद प्रसिद्ध आहे तो असला सिद्धान्त उचलून धरील, अशी कल्पनाही करवत नाही.

अहिंसा

१. अहिसेचे भिन्न अर्थ आणि तिचे आचरण

१. अहिंसा म्हणजे जीवहिसा न करणे, हा बुद्धाच्या शिकवणूकीचा अत्यंत महत्वाचा भाग आहे.

२. करुणा आणि मैत्री या दोहोंशी तिचा जिव्हाळ्याचा संबंध आहे.

३. तथापि असा एक प्रश्‍न विचारला जातो की, बुद्धप्रणित अहिंसा ही सर्वकालीन अनुलंघ्य असे कर्तव्य होते की ती प्रसंगसापेक्ष होती? 

४. जे लोक भगवान बुद्धाची शिकवणूक मानतात त्यांना तिला सर्वकालिन अनुल्लंघ्य असे कर्तव्य मानणे कठीण जाते. ते म्हणतात की, सर्वकाळ अहिंसेनेच वागले तर पुष्कळ वेळा सतचे असतला आणि गुणाचे दुर्गुणाला बलिदान द्यावे लागते.

५. ह्या प्रश्‍नाचे अधिक स्पष्टीकरण करणे सयुक्तिक होईल. अहिंसा या विषयाने पुष्कळच गोंधळ निर्माण केला आहे.

६. बौद्ध देशातील लोकांनी तिचा अर्थ काय लावला आणि कसे परिपालन केले आहे? 

७. हा प्रश्‍न महत्वाचा असून तो विचारार्ह आहे. 

८. सिलोनमधील भिक्खु स्वतः रणांगणात उतरले होते. आणि लोकांनाही परकीय आक्रमणाविरुद्ध यूद्ध करण्यास त्यांनी उद्युक्त केले होते. 

९. उलटपक्षी ब्रम्हदेशातील भिक्खुंनी परकीय आक्रमणाविरुद्ध स्वतः शस्त्र धरले नाही आणि लोकांनाही शस्त्र न धरण्याचा उपदेश केला.

१०. ब्रम्ही लोक अंडी खातात पण मासे खात नाहीत.

११. अशा रीतीने दोन भिन्न देशांत अहिंसेचा वेगळा अर्थ लावून तिचे परिपालनही वेगळ्या रीतीने केलेले दिसते.

१२. अलीकडे जर्मन बौद्ध मंडळाने एका ठरावाने पंचशीलेतील अहिसा सोडून चार शीले मान्य केली आहेत. 

१३. अहिंसेच्या सिद्धान्वाबाबत अशी वस्तुस्थिती आहे. 

 

२. अहिसेचा खरा अर्थ

१. अहिंसेचा अर्थ काय?

२. भगवान बुद्धाने अहिंसेची व्याख्या कोठेच दिलेली नाही. वस्तुत: अहिंसेचा निश्चित शब्दांत तो क्वचितच उल्लेख करतो. 

३. म्हणून प्रासंगिक पुराव्याच्या गव्याच्या आधाराने गन अहिसेचा उपदेश करण्यात त्याचा काय उद्देश होता त्याचा शोध घेतला पाहिजे. 

४. यावरील प्रासंगिक पुरावा म्हणजे कोणी भिक्षा म्हणून मांस देऊ केले तर ते ग्रहण करण्याला बुद्धाचा विरोध नव्हता. 

५. ज्या प्राण्याची हत्या करण्यात भाग घेतला नाही त्या प्राण्याचे मांस ग्रहण करण्याला भिक्खुंना प्रतिबंध नव्हता.

६. भिक्षा म्हणून दिलेले मांस भिक्खूंनी खाऊ नये, या देवदत्ताच्या आग्रहाला बुद्धाचा विरोध होता. 

७. दुसरा यासंबंधीचा पुरावा म्हणजे यज्ञांत प्राण्याचा बळी देऊ नये ह्याला त्याचा विरोध होता आणि असे त्यांनी स्वतः म्हटलेलेही आहे. 

८. ‘अहिंसा परमो धर्मः’ हा आत्यंतिक सिद्धान्त जैन धर्मात आहे; बौद्ध धर्मात नाही. 

९. दुसरा एक अधिक प्रत्यक्ष आणि प्रासंगिक असा पुरावा आहे आणि त्यात बुद्धाने जवळ जवळ अहिंसेची व्याख्याच केली आहे. त्यात तो म्हणतो. ‘सर्वांवर प्रेम करा म्हणजेच तुम्हाला कोणाचीही हत्या करण्याची इच्छा होणार नाही.’ अहिंसेच्या तत्वाचे हे नकारार्थी स्पष्टीकरण नसून स्वीकारात्मक स्पष्टीकरण आहे. 

१०. असे दिसते की, ह्यावरून बुद्धाचा अहिसेचा सिद्धान्त हत्या करू नका, असे सांगण्याऐवजी सर्वांवर प्रेम करा असे सांगणारा होता. 

११. वरील विधानावरून बुद्धाला अहिंसेचा कोणता अर्थ अभिप्रेत होता हे सहज समजून येईल. 

१२. जीवहत्येची इच्छा व जीवहत्येची आवश्यकता ह्यांमध्ये बुद्ध फरक करीत असे, हे स्पष्ट होते. 

१३. ज्या ठिकाणी जीवहत्या करण्याची आवश्यकता असते त्या ठिकाणी त्याने जीवहत्येला प्रतिबंध केला नाही. 

१४. ज्या ठिकाणी जीवहत्येची इच्छा ह्याशिवाय जीवहत्येला कारण नव्हते त्या ठिकाणी त्यांनी जीवहत्येला प्रतिबंध केला.

१५. भगवान बुद्धाच्या अहिसा सिद्धान्ताचा असा अर्थ लावल्यास वैचारिक गोंधळ उत्पन्न होणार नाही. 

१६. हा सिद्धान्त चांगला भक्‍कम आणि सर्वांस मान्य होण्याजोगा नैतिक सिद्धान्त आहे.

१७. ही गोष्ट खरी की, जीवहत्येची आवश्यकता आहे की नाही याचा निर्णय तो व्यक्‍तीवर सोपवितो. परंतु नाही तरी हा निर्णय दुसर्या कुणावर कसा सोपविता येणार? माणसाच्या अंगी प्रज्ञा ( शहाणपण ) असते आणि त्याने तिचा उपयोग केला पाहिजे.

१८. जीवहत्येची आवश्यकता वा अनावश्यकता यामध्ये व्यवच्छेदक रेषा नीतिमान माणसाला ओढता येते एवढा विश्वास त्याच्यावर ठेवला पाहिजे. 

१९. ब्राम्हणी धर्मात हिंसेची इच्छा आहे. 

२०. जैन धर्मात कधीही हिंसा न करण्याची इच्छा आहे. 

२१. भगवान बुद्धाची अहिंसा हे त्याच्या मध्यम मार्गास धरून आहे.

२२. दुसर्या शब्दांत सांगावयाचे म्हणजे बुद्धाने तत्व ( Principle ) आणि नियम ( Rule ) यांत भेद केलेला आहे.

त्याने अहिसेला नियमाचे रूप दिले नाही. ते एक तत्व किंवा जीवनाची पद्धती म्हणून त्याने तिचे विवेचन केले आहे. 

२३. आणि असे करण्यात तो अत्यंत शहाणपणाने वागला यात संशय नाही. 

२४. तत्वामध्ये तुम्हाला तदनुसार वर्तन करण्याचे स्वातंत्र्य असते, नियमांत नसते. नियम तुम्हाला मोडतो अथवा तुम्ही नियमाला मोडता. 

 

संसरण

१. आत्म्याचा एका देहातून दुसर्या देहात प्रवेश (संसरण) 

१. भगवान बुद्धाने पुनर्जन्म प्रवचिला आहे; परंतु त्याने आत्म्याचे संसरण ( एका देहातून दुसर्या देहात प्रवेश ) प्रवचिले नाही. 

२. भगवान बुद्धानी दोन परस्परविरोधी सिद्धान्तांचे प्रवचन केले, असे त्यांच्यावर दोषारोपण करणारे काही कमी लोक नव्हते.

३. असे टीकाकार प्रश्‍न करीत की, ‘संसरणाशिवाय पुनर्जन्म कसा शक्‍य आहे? 

४. ते म्हणत, ‘आणि इथे तर संसरणाशिवाय पुनर्जन्माची गोष्ट केली आहे. हे संभवनीय तरी आहे काय?”

५. ( परंतु बुद्धाच्या सिद्धान्तात ) परस्परविरोधी असे काहीच नाही. संसरणाशिवाय पुनर्जन्म शक्‍य आहे.

६. हे सर्व नागसेनाने राजा मिलिंदाला दिलेल्या उत्तरात चांगल्या प्रकारे स्पष्ट होते. 

७. बेक्ट्रियाचा राजा मिलिंद याने नागसेनाला विचारले, “भगवान बुद्ध संसरण मानीत होते काय?” ८. नागसेनाने उत्तर दिले, ‘होय.’ 

९, “ह्यामध्ये परस्परविरोध नाही काय?” 

१०. नागसेन-‘नाही.’ 

११. ‘आत्म्याशिवाय पुनर्जन्म संभवनीय आहे काय?’

१२. नागसेन – अर्थात; निश्चित शक्‍य आहे.

१३. ‘हे कसे शक्‍य आहे, हे समजावून सांग बरे?”

१४. ‘नागसेन, जिथे संसरण नाही तिथे पुनर्जन्म कसा शक्‍य आहे?” राजाने विचारले.

१५. ‘हो शक्‍य आहे.’

१६. ‘कसे शक्‍य आहे हे उदाहरणाने स्पष्ट कर.

१७. ‘राजा, समज, माणसाने एक दिवा दुसर्या दिव्याने पेटवला तर असे म्हणता येईल काय की, पहिल्या दिव्याने दुसर्या जागी संसरण केले?” 

१८. अर्थात नाही.

१९. “राजा, त्याप्रमाणे संसरणाविना पुनर्जन्म शक्‍य आहे.

२०. ‘ह्याची अधिक उदाहरणे देऊन स्पष्ट कर बरे.

२१. ‘बालपणी आपल्या गुरूपासून शिकलेली एखादी कविता, हे राजा, तुला आठवते काय?”

२२. ‘होय, आठवते!

२३. ‘तर मग त्या कवितेचे गुरुमुखापासून संसरण होऊन ती तुमच्या मुखात आली काय?”

२४. अर्थात नाही.

२५. याप्रमाणेच संसरणाविना पुनर्जन्म होतो.

२६. ‘वा, छान! नागसेन!

२७. “नागसेन, आत्मा अशी काही चीज आहे काय?”

२८. “यथार्थ दृष्टीने पाहिले असता, राजा, आत्मा अशी काही चीज नाही.

२९. ‘वा, छान! नागसेन!

 

२. गैरसमजुतीचे कारण-

१. भगवान बुद्ध जो उपदेश करीत तो ऐकणारा श्रोतृवृंद भिक्‍्खुंचा असे.

२. कोणत्याही एका विषयावर भगवान बुद्धाचे म्हणणे काय आहे ते भिक्खुंनीच लोकांपर्यंत पोहोचविले. 

३. लेखनकला अद्यापि विकसित झाली नव्हती. त्यामुळे भिक्खुंनी जे ऐकले ते पाठ करुन ठेवावे लागे. प्रत्येक भिक्खूने जे काही ऐकले ते जसेच्या तसे पाठ करुन ठेवण्याची त्यानी काळजी घेतली नाही. परंतु असे काही भिक्खू होते त्यांनी ते पाठ करून ठेवणे हा आपला व्यवसायच केला. त्यांना भणक म्हणत.

४. बौद्ध त्रिपिटक आणि अट्ट्कथा हे साहित्य समुद्रासारखे विशाल आहे. ते सर्व पाठ करणे म्हणजे असाधारण काम होते.

५. पुष्कल वेळा भगवान बुद्धाने जो उपदेश केला त्याचे वृत्तांत-कथन यथातथ्य झाले नाही.

६. भगवान बुद्धांच्या जीवनकाळी त्यांच्या उपदेशाचे गैर कथन झाल्याच्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आल्या होत्या. 

७. उदाहरण म्हणून अशा पाच स्थळांचा उल्लेख करता येईल. पहिला उल्लेख ‘अलग हृपम* सुत्तात आहे. दुसरा  “महाकम्मविभाग’ सुत्तात, तिसरा ‘कण्णकट्टल’ सुत्तात, चौथा ‘महातण्हासंखय’ सुत्तात, आणि पाचवा “जीवन सुत्तात. 

८. अशा प्रकारे तथागताच्या उपदेशाचे गैर निवेदन कदाचित अनेक स्थळी झालेले असावे. कारण भिक्खु भगवान बुद्धापाशी जाऊन अशा प्रसंगी, आम्ही काय करावे, असे विचारताना आढळतात.

९. ‘कर्म’ आणि ‘पुनर्जन्म’ ह्या विषयासंबंधी विशेषत: बुद्धोपदेशाचे निवेदन अनेक वेळा वस्तुस्थितीस सोडून झालेले आहे. 

१०. कर्म आणि ‘पुनर्जन्म’ ह्या विषयाच्या सिद्धान्तांना ब्राम्हणी धर्मातही स्थान आहे. ह्याचा परिणाम असा झाला की, ब्राम्हणी सिद्धान्त सहजगत्या बौद्ध धम्मात घुसडता आले. 

११. यासाठी त्रिपिटकात जे बुद्धवचन म्हणून मानले गेले आहे ते बुद्धवचनच आहे असे मानताना फार सावधगिरी राखली पाहिजे. 

१२. यासंबंधी एक कसोटी विद्यमान आहे. 

१३. भगवान बुद्धाच्या बाबतीत एक विधान निश्चितपणे करता येते की, बुद्धीला विसंगत आणि तर्काला सोडून आहे ते ते बुद्धाचे नव्हे. म्हणून इतर गोष्टी यथायोग्य असून जे जे बुद्धीला व तर्काला धरून असे ते ते बुद्धवचन मानायला प्रत्यवाय नाही. 

१४. दुसरी गोष्ट अशी की, जी चर्चा मनुष्याच्या कल्याणाला पोषक नाही अशा चर्चेच्या फंदात भगवान बुद्ध कधीच पडत नाहीत. म्हणून जे जे माणसाच्या कल्याणाला पोषक नाही ते ते बुद्धाच्या नावावर खपविले जात असले तरी वस्तुत: ते बुद्धवचन म्हणून मानता येणार नाही. 

१५. तिसरीही एक कसोटी आहे. ती ही की, भगवान बुद्धांनी ज्या विषयासंबंधी ते निश्चित आहेत, आणि ज्या विषयासंबंधी ते निश्चित नाहीत अशी विषयांची दोन प्रकारांत वर्गवारी केली होती. जे विषय पहिल्या वर्गात पडतात त्यांच्यासंबंधी त्याने आपले विचार निश्चयात्मक व अंतिम अशा रूपाने मांडले आहेत. जे विषय दुसर्या वर्गात पडतात त्यासंबंधीही त्याने आपले विचार व्यक्‍त केले आहेत. परंतु ते तात्पुरते (म्हणजे बदलूही शकतात. )  

१६. ज्या तीन प्रश्‍नांसंबंधी संदेह अथवा मतभेद आहेत त्या विषयांबाबत भगवान बुद्धाचे विचार काय होते हे ठरविताना त्या चर्चेच्या वेळी वरील तिन्हीही कसोट्या लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

Previous page                                             Next Page


 The Buddha and His Dhamma, by Dr. B. R. Ambedkar
error: Content is protected !!