Part IV—The Bhikkhu and the Laity
The Bhikkhu and the Laity PDF in English
पंचम खंड: संघ
भाग चवथा: भिक्खू आणि उपासक
The Bhikkhu and the Laity
१. भिक्षापाश
१. संघ ही सुसंघटित संस्था असून त्याचे सभासदत्व सर्वांनाच मोकलळे नव्हते.
२. केवळ परिव्रज्या स्वीकारल्याने परिव्राजकाला संघाचे सभासदत्व लाभत नसे.
३. उपसंपदा स्वीकारल्यानंतर परिव्राजक संघसभासद बने.
४. संघ ही स्वतंत्र संस्था होती. संस्थापकावर ती अवलंबून नव्हती.
५. ती स्वायत्त संस्था असून आपल्याला आवडेल त्याला सभासदत्व देऊ शके. विनयनियमाला अनुसरून ती कोणाचेही सभासदत्व हिरावून घेऊ शके.
६. भिक्खूला उपासकाशी जोडणारे एकच बंधन म्हणजे भिक्षा.
७. भिक्खू हा भिक्षेवर अवलंबून असे. भिक्षा घालणारा म्हणजे उपासक.
८. उपासकांची सुसंघटित अशी व्यवस्था नव्हती.
९. संघात कोणालाही प्रवेश देताना संघदीक्षा हा समारंभ करावा लागे.
१०. संघदीक्षेमध्ये, संघप्रवेश त्याप्रमाणेच धम्मप्रवेश या दोहोंचा अंतर्भाव होई.
११. परंतु ज्यांना धम्मप्रवेश हवा असेल, परंतु संघप्रवेश करावयाचा नसेल त्यांच्याविषयी वेगळी धम्मदीक्षा नसे. संघप्रवेश म्हणजे घर सोडून अनिकेत बनणे.
१२. धम्म प्रवेशासाठी धम्मदीक्षा नसणे ही एक गंभीर उणीव होती. ज्या अनेक कारणांनी भारतात बौद्धधर्माचा र्हास झाला, त्यांपैकी हे एक कारण आहे.
१३. या दीक्षाविधीच्या अभावी उपासक एका धर्मातून दुसर्या धर्मात भ्रमण करू शके, आणि अधिक वाईट गोष्ट म्हणजे दोन धर्म एकाच वेळेला आचरण्याची त्याला मुभा मिळत असे.
२. परस्परावरील परिणाम
१. तथापि धर्मावरणात चुकणाऱ्या उपासकाला मार्गावर आणण्याचे साधन भिक्षापाश हे एक होते.
२. यासंबंधीचे अंगुत्तर-निकायातील नियम लक्षात घेण्याजोगे आहेत.
३. या नियमाशिवाय भिक्खूने दुर्वरतन अथवा दुराचरण केल्यास तत्संबंधी दुसर्या भिक्खूकडे तक्रार करण्याचा उपासकाला सर्वसामान्य अधिकार होता.
४. अशी तकार बुद्धाकडे आल्यावर आणि त्याने ती पडताळून पाहिल्यावर विनयपिटकांतील तत्संबंधीच्या नियमाला पुस्ती जोडून अशा प्रकारचे आचरण, संघाविष्ट केलेला अपराध या सदरात सामील केले.
५. विनयपिटक हे दुसरे तिसरे काही नसून उपासकांनी केलेल्या तक्रारींचा योग्य न्याय देण्याचे साधन आहे.
६. भिक्खू आणि उपासक यांच्यामधील संबंध अशा प्रकारचा होता.
३. भिक्खूचा धम्म आणि उपासकाचा धम्म
१. बौद्ध धर्माचे काही टीकाकार बौद्धधर्म हा धर्मच नव्हे असे म्हणतात.
२. अशा टीकेकडे लक्ष देण्याचे कारण नाही. परंतु त्यांना जर उत्तर द्यावयाचे तर ते असे : बौद्ध धम्म हाच खराखुरा धम्म आहे आणि ज्यांना हे मान्य नसेल त्याने आपली धम्माची व्याख्या सुधारली पाहिजे.
३. दुसरे काही टीकाकार या थरापर्यंत जात नाहीत. ते असे म्हणतात बौद्धधर्म हा केवळ भिक्खूंनी पाळावयाच्या धर्म आहे. सामान्य माणसाशी त्याचा संबंध नाही बौद्धधम्माने सामान्य माणसाला आपल्या परिसराच्या बाहेर ठेवले आहे.
४. भगवान बुद्धाच्या संवादात भिक्खूचा उल्लेख इतका वारंवार आढळतो की, बौद्धधम्म हा केवळ भिक्खूचाच धम्म होय, या टीकेला बळकटी येते.
५. म्हणून हा विषय अधिक स्पष्ट करणे जरूर आहे.
६. भिक्खूचा आणि उपासकाचा धम्म समान होता काय? किवा भिस्खूला बंधनकारक असा धम्माचा एक भाग असून तो उपासकाला बंधनकारक नाही, अशी वस्तुस्थिती आहे काय?
७. भगवान बुद्धाने आपली प्रवचने केवळ भिक्खू संघाला उद्देशून केली आहेत. म्हणून ती केवळ त्यांचासाठीच आहेत, उपासकांसाठी नाहीत. परंतु असे समजण्याचे कारण नाही. भगवान बुद्धाने जे शिकवेले ते दोघांनाही लागू पडणारे आहे.
८. पंचशील, अष्टांगमार्ग आणि दशपारमिता यांचा उपदेश करताना बुद्धाच्या मनात उपासक होते, हे त्या त्रयींच्चा स्वरूपावरूनच लक्षात येण्याजोगी गोष्ट आहे; आणि ते सिद्ध करण्याला कुठल्याही विवेचनाची जरूरी नाही.
९. ज्यानी गृहत्याग केला नाही, जे क्रियाशील गृहस्थी जीवन जगत आहेत, त्यांना पंचशील, अष्टांगमार्ग आणि पारमिता अत्यंत आवश्यक आहेत. गृहत्याग केलेल्या म्हणजे क्रियाशील गहस्थी जीवनापासून दूर असलेल्या अशा भिक्खूच्या हातून या त्रयींचे उल्लंघन होणे संभवनीय नाही. ते संभवनीय आहे गृहस्थाच्या बाबतीत.
१०. भगवान बुद्धाने आपल्या धर्मोपदेशाला प्रारंभ केला तेव्हा तो प्राधान्याने उपासकांनाच उद्देशून असला पाहिजे.
११. तथापि इथे तर्कावर विसंबून राहण्याची आवश्यकता नाही. बौद्ध धम्मावरील टीकेचे खंडन करावयाला प्रत्यक्ष पुरावाही आहे.
१२. त्या बाबतीत खालील प्रवचनाकडे लक्ष पुरवावे.
१३. एकदा भगवान श्रावस्ती येथील अनाथपिंडिकाच्या जेतवनारामात राहात असता धम्मिक आणि इतर ५०० उपासक त्यांच्याकडे गेले. अभिवादन केल्यावर धम्मिक बाजूच्या आसनावर बसला आणि भगवंतांना उद्देशून म्हणाला,
१४. “भगवान, गृहत्याग करणारे भिक्खू आणि गृहस्थ उपासक या दोघांचीही प्रगती करणारा आचार कोणता ?’
१५. ‘इथे भिक््खूसह बसलेल्या उपासकांना ते मोक्षदायी सत्य ऐकू द्या.
१६. भगवंत म्हणाले, ‘ऐका, भिक्खूहो, कान देऊन ऐका, आणि सांगितलेल्या नियमांचे पालन करा.
१७. ‘दुपार झाल्यानंतर भिक्षेसाठी परिभ्रमण करू नका त्यापूर्वीच योग्य वेळी आपली भिक्षा गोळा करा. अवेळी येणारा अतिथी पाशात गुरफटतो.’
१८. ‘अन्नभिक्षा मागण्यापूर्वी रूप, गंध, शब्द, रुची आणि स्पर्श यासंबंधीच्या आसक्तीला आपल्या मनातून काढून टाका.”
१९, भिक्षा मिळताक्षणीच एकटेच मागे फिरा आणि एकटेच बसून अविचलित म्हणजे बाह्य पदार्थामागे न धावणाऱ्या अशा स्थिर चित्ताने विचार करा.!
२०. “धर्मशील लोकांशी बोलताना, हे भिक्खूहो, भाषणाचा विषय धम्म हाच असू द्या.
२१. भिक्षा, आपली राहती खोली, बिछाना, पाणी, सान ही केवळ साधने आहेत; ह्यांहुन त्यांना अधिक महत्व नाही असे माना.
२२. ‘ह्या गोष्टींचा केवळ साधन म्हणून अनासक्तीने उपयोग करणारा भिक्खू हा कमलदल ज्याप्रमाणे पाण्याच्या थेंबाने कलंकित होत नाही त्याप्रमाणे सदैव निष्कलंक राहील.
२३. ‘आता उपासकांना प्रगतिपथावर नेणार्या आचारासंबंधी मी बोलतो.
२४. ‘हत्या करू नका. मृत्यूची शिक्षा देऊ नका किंवा कत्तल करण्याची आज्ञा देऊ नका सबळ, दुर्बळ कोणत्याही प्रकारच्या सजीव प्राण्याची हिसा करू नका. सकल प्राणिमात्रावर प्रेम करा.
२५. ‘कोणीही उपासकाने बुद्या चोरी करू नये किंवा चोरी करण्याची आज्ञा देऊ नये. दुसरे देतील तेवढेच घ्यावे.
२६. ‘उपभोग ही अग्निंगर्ता समजून त्यापासून दूर राहा. ब्रह्मचर्य शक्य झाले नाही तरी निदान कोणत्याही विवाहित परस्त्रिशी व्यभिचार करू नका.
२७. ‘राजगृही अथवा चव्हाट्यावर थांबू नका किंवा तेथे खोटे भाषण करण्याला प्रोत्साहन देऊ नका, किंवा तसे करण्याची अनुज्ञा देऊ नका. हा निर्बंध सदैव पाळा.
२८. ‘मद्यपान करू नका दुसर्याला मद्य पाजू नका मद्यपानात रमण्याची अनुज्ञा देऊ नका हा निर्बंध सदैव पाळा. मद्यपानाने मनुष्य कसा उन्मत्त होतो हे लक्षात ठेवा.
२९. ‘मद्यपानाने मूर्ख मनुष्य पापाचरणास उद्युक्त होतो आणि आपल्या इतर स्वैराचारी बांधवांना पापास प्रवृत करतो. म्हणून त्या उन्मादकारक व्यसनापासून, त्या मूर्खाच्या स्वर्गापासून सदैव दूर राहा.
३०. ‘हिसा, चोरी, असत्य भाषण, सुरापान, व्यभिचार ह्यांपासून परावृत्त व्हा.
३१. ‘सप्ताहामागून सप्ताह, उपोसथाचे व्रत ग्रहण करा आणि श्रद्धाभय अंत:करणाने अष्टशीलांचे पालन करा.
३२. ‘प्रात:काळी पवित्र श्रद्धामय चित्ताने वरील उपोसथ व्रत स्वीकारल्यानंतर यथाशक्ती भिक्खुंना अन्न आणि पेय द्या.
३३. ‘आपल्या आईबापांचा सन्मान राखा. उपजीविका सन्यार्गाने करा.
३४. ‘असा एकनिष्ठ उपासक दिव्य जगात प्रवेश करील.
३५. ह्यावरून स्पष्ट होईल की, धम्म हा दोघांना समान आहे.
३६. परंतु त्या दोघांचाकडून आचारावयाच्या निर्बंधात फरक आहे.
३७. भिक्खूला पाच व्रते अनिवार्य आहेत.
३८. आपण हत्या करणार नाही, असे व्रत त्याला धारण करावे लागते.
३९. दुसर्यांनी न दिलेली दुसऱ्याची मालमत्ता आपण स्वतःच्या मालकीची करणार नाही असे व्रत त्याला धारण करावे लागते. कधीही असत्य भाषण करणार नाही असे व्रत त्याला धारण करावे गव लागते.
४१. स्त्रीसुखापासून परावृत्त राहण्याचे व्रत त्याला धारण करावे लागते.
४२. उन्मादक पेय पिणार नाही असे व्रत त्याला धारण करावे लागते.
४३. हे सर्व नियम उपासकालाही बंधनकारक आहेत.
४४. फरक आहे तो एवढाच की, भिक्खूच्या बाबतीत हे नियम अनुल्लंघनीय व्रतासारखेच आहेत उलटपक्षी उपासकाच्या बाबतीत ते नैतिक कर्तव्य असून त्यांचे परिपालन स्वच्छेने करावयाचे असते.
४५. ह्याशिवाय त्यांच्यामध्ये लक्षात घेण्याजोगे दोन फरक आहेत;
४६. भिक्खूला खाजगी मालमत्ता ठेवता येत नाही. उपासकाला खाजगी मालमत्ता धारण करता येते.
४७. भिक्खूला परिनिब्बाणामध्ये प्रवेश करण्याचे स्वातंत्र्य आहे. उलटपक्षी उपासकाला निब्बाण हे पुरेसे मानले जाते.
४८. भिक्खू आणि उपासकामधील भेद आणि साम्य असे आहे.
४९. तथापि धम्म हा दोघांनाही समान आहे.