The Bhikkhu the Buddha Conception

The Bhikkhu the Buddha's Conception

Part II—The Bhikkhu: the Buddha’s Conception of Him

The Bhikkhu the Buddha’s Conception of Him PDF in English

पंचम खंड: संघ

भाग दुसरा: भिक्खू आणि त्यांच्याविषयी भगवान बुद्धाची कल्पना

The Bhikkhu the Buddha Conception

Previous page                                    Next Page

 

१. भिक्खू कसा असावा यासंबंधी बुद्धाची कल्पना

१. भिक्खूकडून आपल्या काय अपेक्षा आहेत हे स्वतः बुद्धाने भिक्खुंना सांगितले ते असे-

२. “जो कोणी चित्तमल धुवून टाकल्याशिवाय, त्याप्रमाणेच सत्य आणि संयम यांचा मान न राखता काषायवस्त्रे धारण करण्याची इच्छा करतो, तो ती वस्त्रे परिधान करायला लायक नाही. 

३. परंतु ज्याने चित्तमलाचे परिमार्जन केले आहे, ज्याच्या अंगी सद्वणाची वाढ झालेली आहे, जो सत्य आणि संयम पाळावयाला शिकला  आहे तोच  खरोखर  काषायवस्त्रे धारण करण्यास योग्य  आहे. 

४. जो मनुष्य दुसर्याजवळ नेहमी भीक मागतो म्हणून तो काही भिक्खू होऊ शकत नाही. जो धम्माचे पालन करतो तोच भिक्खू होय. केवळ भिक्षा मागणारा भिक्खू ठरत नाही. 

५. ज्याला दुष्टपणा स्पर्श करीत नाही, जो अव्यभिचारी आहे, जो सावधानपणे जगात परिभ्रमण करतो, तोच खरोखर भिक्खु होय. 

६. सामान्यजनांना अप्राप्य असे मुक्तिसुख, विनय, शील, पांडित्य, एकांतवास, आणि ध्यान यामुळेच लाभत नसून हे भिक्खू ज्याने वासनांचा ( आस्त्रवाचा ) क्षय केला त्यालाच ते सुख संपादन करता येते, असे निश्चितपणे म्हणता येईल.

७. ज्याच्या वाणीत संयम आहे, जो विचारपूर्वक बोलतो, जो लीन आहे, जो धम्म स्पष्ट करतो, अशा भिक्खूचे भाषण मधुर असते.

८. धम्मात आनंद मानणारा, धम्मात रममाण असणारा, धम्माचे चिंतन करणारा, धम्माचे सदैव स्मरण ठेवून त्याप्रमाणे प्रमाण वागणारा असा भिक्खू सद्धम्मपासून च्युत होणार नाही. 

९. जे आपल्याला लाभले आहे त्याची अवहेलना करू नये. दुसर्याला लाभलेल्याची स्पृहा करू नये. दुसर्याचा मत्सर करू नये. जो भिक्खू दुसर्याचा मत्सर करतो त्याला मानसिक समाधान लाभत नाही.

१०. अल्पच का होईना, परंतु जे मिळाले आहे त्याचा जो अव्हेर करीत नाही, जो शुद्धजीवी आहे, प्रमादरहित आहे अशाची देवसुद्धा प्रशंसा करतात. 

११. जो आपले नामरूप म्हणजेच आपण असे समजत नाही आणि जो नष्ट झाले आहे त्याबद्दल दु:ख करीत नाही त्यालाच खरोखर भिक्खु म्हणावे. 

१२. जो भिक्खु मैत्रीत रमलेला आहे, जो बुद्धणासनात प्रसन्न असतो तो वासनाच्या ( आस्त्रव ) क्षयाने प्राप्त होणारे सुखमय शांतिपद-निब्बाण प्राप्त करतो.

१३. हे भिक्खु, तू ही नाव रिकामी कर. रिकामी झाली म्हणजे ती हलकी होईल. राग आणि द्वेष यांचा नाश केलास तर तू निर्वाणाला जाशील.

१४. पाच बंधनांना तोडून टाकावे. पाच बंधनांचा त्याग करावा. पाच बंधनांवर मात करावी. पाच बंधनांच्या पलीकडे गेलेल्या भिक्खुला ओघतीर्ण म्हणतात. 

१५. हे भिक्खू, ध्यान कर. प्रमादात राहू नको. आपले चित्त कामोपभोगात रमू देऊ नकोस. 

१६. प्रज्ञेशिवाय ध्यान शक्‍य नाही. ध्यानाशिवाय प्रज्ञा नाही. ज्याच्याजवळ प्रज्ञा आणि ध्यान दोन्हीही आहेत असा पुरुष निर्वाणाच्या जवळ आहे.

१७. ज्या भिक्खूने एकान्तवास केला आहे, ज्याचे मन शांत आहे, त्याला धम्माचे सम्यक्‌ आकलन झाले असता अलौकिक आनंद होतो.

१८. प्रज्ञायुक्त भिक्खूच्या जीवनाला इंद्रियांवर ताबा ठेवणे, संतुष्ट असणे, धम्माने घालून दिलेल्या निर्बंधाचे ( प्रतिमोक्षाचे ) पालन करणे, ज्याचे जीवन शुद्ध आहे, जे आलस्यरहित आहेत अशा थोर मित्रांची संगत ठेवणे यापासून प्रारंभ होतो.

१९. आपली उपजीविका प्राप्त भिक्षेवर करील, आपली कर्तव्ये यथायोग्य पार पाडील तो आनंदभरात आपल्यादुःखाचा अंत करील. 

२०. स्वतःला स्वत:च जागे कर, स्वतःच स्वतःची परीक्षा कर असा आत्मरक्षित आणि सावधान चित्त झाल्यावर हे भिक्खु, तू सुखाने राहशील. 

२१. कारण मनुष्य स्वत:च आपला स्वामी आहे. तो स्वतःच आपली गती आहे. म्हणून ज्याप्रमाणे व्यापारी उमद्या घोड्याला आपल्या ताब्यात ठेवतो ता त्याप्रमाणे मनुष्याने आपले नियमन  करावे. 

२२. जो भिक्खु अप्रमादी राहण्यात आनंद मानतो, जो अविकाराचे भय मानतो, तो आपले लहानमोठे बंध जाळून संचार करीत असतो. 

२३. जो भिक्खु चिंतनात आनंद मानतो, अविचाराचे भय मानतो, तो कधीही आपल्या पूर्ण अवस्थेपासून च्युत होत नाही, तो सदैव निब्बाण सान्निध्य अनुभवतो.

२४. गौतमाचे शिष्य हे सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार रात्रंदिवस बुद्धाचे ध्यान करतात. 

२५. गौतमाचे शिष्य हे सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार रात्रंदिवस संघावर एकाग्र झालेले असतात.

२६. गौतमाचे शिष्य हे सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार धम्माचे ध्यान रात्रंदिवस करतात. 

२७. गौतमाचे शिष्य सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार स्वशरीराच्या सर्व क्रियांचे रात्रंदिवस ध्यान करतात.

२८. गौतमाचे शिष्य सदैव जागृत असतात आणि त्यांचे मन रात्रंदिवस करुणेत समाधान मानते. 

२९. गौतमाचे शिष्य सदैव जागृत असतात. त्यांचे मन रात्रंदिवस चिंतनात आनंद मानते.

३०. संसारत्याग बिकट आहे. संसारोपभोग बिकट आहे. विहारवास बिकट आहे. गृहवास दुःखदायक आहे. समाजाबरोबर एकत्र राहणे आणि सर्व गोष्टी त्यांच्याबरोबर समानतेने सेवणे हे दु:खकर आहे. परिभ्रमण करणार्या भिक्खूसमोर दुःखच वाढून ठेवलेले आहे. 

३१. ज्याच्या ठिकाणी धम्मश्रद्धा आहे, शील आणि यश यांनी जो ऐश्वर्यवान आहे तो कुठेही गेला तरी सर्वत्र पूजनीय ठरतो.

 

२. भिक्खु आणि तपस्वी

१. भिक्खू म्हणजे तपस्वी काय? याचे उत्तर ‘नाही’ असे आहे.

२. स्वतः भगवंतांनीच निग्नोध या नावाच्या परिव्राजकाबरोबर झालेल्या संवादात या प्रश्‍नाचे नकारात्मक उत्तर दिले आहे.

३. एकदा भगवंत राजगृहाजवळील गृध्चकूटावर राहात होते. त्या वेळी उदुंबरीका राणीच्या उद्यानामध्येराहणार्या पुष्कळशा परिव्राजकामध्ये निग्नरोध नावाचा एक परिव्राजक होता. 

४. त्या सुमारास भगवंत गृध्रकूटावरून उतरून सुमगंधा नदीच्या काठावर, ज्या ठिकाणी मोरांना दाणे घालीत. तिथे मोकळ्या हवेत येरझारा करीत होते. त्या वेळी निग्नोधाने भगवन्तांना येरझारा घालताना पाहिले. तेव्हा तो आपल्या परिव्राजका अनुयायांना म्हणाला, कृपा करून शांत रहा. श्रमण गौतम सुमगंधेच्या तीरावर आहेत. त्याच्या सांगण्यावरून सर्व परिव्राजक स्तब्ध राहिले.

५. नंतर भगवंत परिव्राजक निग्नोधाजवळ गेले, निग्नोध त्यास म्हणाला, “भगवंत, या. मी आपले स्वागत करतो. आपण येथे आगमन करण्याचा निश्चय करण्यापूर्वी पुष्कळच विचार केला असावा. ह्या इथे सिद्ध असलेल्या आसनावर आपण बसावे.

६. पुढे केलेल्या आसनावर भगवंत स्थानापन्न झाले. निरोध भगवंतापेक्षा एका ठेंगण्या आसनावर त्यांच्याच बाजूला बसला. 

७. नंतर निग्नोध भगवंतांना म्हणाला, ‘ श्रमण गौतम आमच्या ह्या चमूत आले आहेत. म्हणून मी त्यांस एक प्रश्‍न विचारतो. भगवतांचा धर्म काय ? आपल्या शिष्यांना ते काय धर्मविनय शिकवितात ? आणि असे भगवंतानी आत्मसुखप्राप्ती शिकविलेले शिष्य कशाला शरण जातात ? त्यांच्या सदाचरणाची मुख्य तत्वे कोणती?”

८. ‘ हे निग्नोध, ज्याचा दुष्टिकोन, निष्ठा आणि श्रद्धा भिन्न आहेत त्या आपल्या शिष्यांना आत्मसुखप्राप्तीसाठी मी काय शिकवितो? त्यांचे अंतिम शरण्य काय आणि त्यांची सदाचरणाची मुख्य तत्वे कोणती ? हे विनभ्यास, विनाशिक्षण समजणे कठीण आहे.

९. ‘ परंतु हे निग्नोध, तू आपल्या स्वत:च्या सिद्धांताविषयी आणि खडतर जीवन-निष्ठेविषयी मला प्रश्‍न विचार. आत्मपीडेपासून काय साधते आणि काय साधत नाही याविषयी मला प्रश्‍न कर.’

१०. यावर निग्नोध भगवन्तांना म्हणाला, ‘ भगवन्त, आम्ही आत्मक्लेशाचे तप करतो. आमच्या मते आत्मक्लेश अत्यावश्यक आहेत, म्हणून आम्ही त्यांचा स्वीकार करतो. त्यापासून काय साधते आणि काय साधत नाही हे सांगा.’

११. ‘ निग्रोध, कल्पना कर की, एक परिव्राजक वस्त्ररहित फिरतो आहे. त्याला काही विशिष्ट वाईट सवयी आहेत.तो आपले हात चाटतो, आपल्याकडे येणार्यांना मान देत नाही. त्याच्यासाठी मुद्दाम आणलेले किंवा तयार केलेले तो काहीच घेत नाही. आमंत्रणे स्वीकारीत नाही. ज्यात अन्न शिजविले आहे त्या भांड्यातले, उंबरठ्याच्या आत ठेवलेले, उखळातले, काट्याकुट्यातले, जात्यातले वगैरे काही घेत नाही; त्याप्रमाणेच एकत्र भोजन करीत असलेल्या दोन माणसांचे, गर्भवती स्त्रीचे, बाळंतिणीजवळचे, संभुक्‍त स्त्रीजवळचे, दुष्काळातले, कुत्रा जवळ असला तर तेथले, ज्या ठिकाणी माशा फणफणत आहेत तेथले अन्न तो स्वीकारीत नाही; मत्स्य, मांस, तीव्र मादक पेये, किंवा पेज घेत नाही असा तो परिव्राजक असेल. तो कदाचित एकाच घरचे मागणारा, एकच घास खाणारा, किंवा दोन घरी मागणारा, दोन घास खाणारा; सात घरी मागणारा, सात घास खाणारा असेल तो एकदोन अथवा सात दानांवर उपजीविका करीत असेल, तो प्रतिदिवशी एकदाच किंवा दोन दिवसांतून एकदा, किंवा सात दिवसांतून एकदा अन्नभक्षण करीत असेल. अशा रीतीने नियमाप्रमाणे अर्ध्या अर्ध्या महिन्याच्या अंतराने अन्नसेवन करण्याची त्याची पद्धत असेल, तो शाक अथवा वनात उगवणारे गवणा तांदूळ, अथवा निवार बीजे, अथवा चामड्याचे तुकडे, अथवा आटा, अथवा भाताचा कोंडा, भाताचे पीठ, अथवा कणी, अथवा तेलबीजे, अथवा गवत अथवा गाईचे शेण, अथवा रानातील वार्याने पडलेली फळे, फुले खाऊन तो राहात असेल. तो जाडेभरडे तागाचे कापड, अथवा प्रेतावरून फेकून दिलेल्या चिंध्या अथवा तिरीटा झाडाची वल्कले, अथवा काळविटाची कातडी, अथवा कुशतंतू, अथवा मनुष्य-केसापासून अथवा घोड्याच्या केसापासून बनविलेली कांबळी, अथवा घुबडाच्या पिसांपासून बनविलेले कपडे वापरीत असेल, त्याला डोक्याचे व दाढीचे केस उपटून काढण्याची सवय जडलेली  असेल, तो सदैव उभा राहणारा, टांचावर बसणारा आणि टांचावर बसूनच पुढे सरकण्याचे श्रम करणारा, काट्याच्या अथवा लोखंडाच्या बिछान्यावर पहुडणारा, लाकडी कडा फळीवर वर अथवा जमिनीवर वर एकाच कुशीवर झोपणारा असेल, तो मळ आणि धूळ धारण करणारा, उघड्यावर राहणारा, वाटेल तेथे बसणारा,घाण खाणारा, पेय न पिणारा किंवा केवळ थंडपाणी पिणारा आणि सकाळ, दुपार,सायंकाळ स्वान करणारा असा तो असेल.

१२. हे सर्व करणार्या, हे निग्नोध, त्याने आत्मक्लेशाचे व्रत पाळले किंवा नाही, यापैकी तुम्ही काय मानणार? “भगवन्त, या सर्व गोष्टी त्याने केल्या तर आत्मक्लेशाचे तप त्याने पूर्ण केले असे आम्ही मानणार ! 

१३. ‘हे निग्नोधा ! ह्या आत्मक्लेशाचे तप करणारा माझ्या मते अनेक परीने कलंकित झालेला असतो.

१४. “भगवन्त, कलंकित कसा?” 

१५. ‘निग्नोध, जेन्हा परिव्राजक एखाद्या तपाचे व्रत धरतो, तेव्हा त्यायोगेच संतुष्ट होऊन, आपले ध्येय साधले आहे असे तो मानू लागतो; आणि निग्नोधा, हाच पीरव्राजकाला जडणारा दोष आहे. 

१६. ‘आणि निग्रोधा, जेव्हा परिव्राजक तपाचे व्रत धरतो, तेव्हा स्वतःला उच्च समजून दुसर्यांचा तिरस्कार करू लागतो. हा सुद्धा परिव्राजकीय आचरणातील कलंक आहे. 

१७. “निग्नोधा, आणि जेव्हा परिव्राजक तपाचे व्रत घेतो तेव्हा तो त्या व्रताने, त्या तपाच्या कल्पनेने उन्मत्त आणि मोहित होऊन निष्काळजी बनतो, हासुद्धा एक कलंकच आहे. 

१८. ‘निग्नोधा, जेव्हा तपस्वी परिव्राजक तपाचे व्रत धरतो, तेव्हा त्या योगाने त्याला देणग्या, कीर्ती मिळते, लोकांचे लक्ष त्याच्याकडे लागते. तो आत्मसंतुष्ट होऊन आपले ध्येय मिळाले आहे असे मानू लागतो. हाही  परिव्राजकातील कलंकच आहे.

१९. ‘अशा देणग्या, कीर्ती आणि लोकांची नजर आपल्याकडे ओढून घेतल्याने तो परिव्राजक स्वत:ला मोठा समजून दुसर्याचा द्वेष करू लागतो, हा सुद्धा परित्राजकाचा दोष आहे.

२०. ‘आणि पुन्हा, हे निग्नोध, दान, देणग्या आणि कीर्ती मिळविल्यावर आणि लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतल्यानंतर तो उन्मत्त बनून निष्काळजी होतो. हा सुद्धा तपस्व्यामधला कलंक होय.

२१. आणि पुन्हा, हे निग्नोधा, जेव्हा तपस्वी आपल्या साधनेला प्रारंभ करतो किंवा जेव्हा एखादे व्रत स्वीकारतो तेव्हा अन्नाअन्नात भेद करू लागतो. तो म्हणतो, हे मला योग्य आहे, ते मला योग्य नाही. त्याला जे अयोग्य वाटते त्याचा तो बुद्धिपुरस्सर निषेध करतो. आणि ज्याला जे अन्न योग्य वाटते त्यासंबंधी त्याला लोभ वाटतो. त्याने तो मोहित होतो. त्याचीच तो हाव धरतो. ह्या प्रकारच्या अन्नात काही धोका नाही, हानिकारकता नाही असे मानून तो त्याचा उपभोग घेतो. हाही तपस्व्याच्या ठायीचा कलंक होय.

२२. ‘आणि पुन्हा हे निग्नोधा, दान, धर्म, कीर्ती, लोकप्रियता, मान यांच्या लोभामुळे तो असा विचार करतो की, राजा मला मान देईल, माझा सन्मान करील. त्याचे कर्मचारी, क्षत्रिय, ब्राम्हण, गृहस्थ आणि मोठमोठे आचार्यही मला मान देतील. हाही तपस्व्याच्या ठायीचा कलंक आहे.

२३. ‘आणि हे निग्नोध, पुन्हा तो तपस्वी एखाद्या संन्याशी अथवा ब्राम्हणासंबंधी कुरकुरू लागतो की, तो अमुक मनुष्य सर्व प्रकारच्या अन्नावर आपली उपजीविका करतो. तो कंदमूळ, फळ, शाक आणि धान्य, बी, बिया, जात्यासारख्या आपल्या जबड्याने दर चघळतो. तरीसुद्धा लोक त्याला पवित्र मानतात. ( दुसर्यांना तिरस्करणीय मानण्याची वृत्ती ) हा सुद्धा तपस्व्याच्या ठायी कलंक आहे. 

२४. ‘आणि हे निग्नोधा, पुन्हा ज्या वेळी तो तपस्वी एखाद्या श्रमणाचा, ब्राम्हणाचा लोक दानधर्माने मानसन्मान करतात त्या वेळी म्हणतो, सुखोपभोग करणार्या ह्या माणसाचा लोक सन्मान करीत आहेत. दानधर्म करून त्याची पूजा करीत आहेत, आणि मी खरोखर खडतर तप आचरीत असता मला मात्र मान देत नाहीत; दानधर्म करून माझी पूजा करीत नाहीत. अशा रीतीने तो मत्सराधीन होतो आणि लोकांसंबंधी कुरकुर करू लागतो. हा सुद्धा तपस्व्याच्या ठायी कलंक आहे. 

२५. आणि हे निग्नोधा, तो तपस्वी रहस्यमय गूढता धारण करतो. तुम्हांला अमुक एक मान्य आहे काय असा आपण प्रश्‍न केला असता ते अमान्य असूनही तो ते मान्य आहे असे म्हणतो, आणि मान्य असूनही अमान्य आहे असे म्हणतो. अशा रीतीने तो बुद्धिपुरस्सर असत्य भाषण करतो. हाही त्या तपस्व्याच्या ठायीचा कलंक आहे. 

२६. ‘ आणि हे निग्नोधा, पुन्हा तो तपस्वी क्रोधाधीन होण्याचा आणि शत्रुत्व धरण्याचा संभव आहे. हाही त्या तपस्व्याच्या ठायीचा कलंकच आहे. 

२७. ‘आणि हे निग्नोधा, पुन्हा तो तपस्वी ढोंगी आणि फसवा, त्याप्रमाणेच मत्सरी आणि कृपण बनण्याचा संभव आहे. तो कपटी, कावेबाज, निर्दय, पोकळ डौली होतो. दुसर्यासंबंधी दुष्ट वासना बाळगून तो त्यांच्या आहारी जातो. भ्रामक मते मनाशी बाळगून दैवी तर्कातील सिद्धान्तावर तो श्रद्धा ठेवू लागतो. आपल्या अनुभवांना चुकीचा अर्थ चिकटवू लागतो. लोभी बनून त्यागभावना विसरू लागतो. हाही त्या तपस्व्याच्या ठायीचा कलंक आहे.

२८. ‘निग्रोधा, ह्या सर्व गोष्टी तप आणि आत्मक्लेश ह्यांच्या मार्गातील कलंक आहेत असे तुला वाटत नाही काय?” 

२९. ‘होय भगवान ! तप आणि आत्मक्लेशाच्या मार्गातील हे सर्व कलंकच आहेत. ह्यांपैकी एखाद्याच कलंकाने काय, परंतु सर्वच्या सर्वच कलंकांनी तपस्वी दूषित होण्याचा संभव आहे !’

३०. भिक्खुंनी हे कलंक आपल्याला जडू देता कामा नये.

 

३. भिक्खु आणि ब्राम्हण

१. भिक्खु आणि ब्राम्हण हे एकच काय ? ह्या प्रश्‍नाचे उत्तर नकाराथींच आहे. 

२. ह्या विषयावरील चर्चा कोणत्याही एका ठिकाणी आलेली नाही. ती सर्वत्र विखुरलेली आहे; परंतु भिक्खू आणि ब्राम्हण यांमधील भेद सारांशरूपाने असे देता येतील 

३. ब्राम्हण हा पुरोहित असतो. जन्म, विवाह आणि मृत्यु यांचे आनुषंगिक संस्कार करणे हे त्याचे मुख्य कार्य होय. 

४. माणसाला जन्मजात पाप चिकटलेले असते. आणि त्याचे विधिपूर्वक प्रक्षालल करणे आवश्यक आहे, या कल्पनांमुळे त्याप्रमाणेच ईश्वर आणि आत्मा या सिद्धान्तावरील श्रद्धेमुळे हे संस्कार आवश्यक ठरले. 

५. या संस्कारासाठी पुरोहिताची आवश्यकता आहे. उलटपक्षी भिक्खु हा जन्मजात पाप, ईश्वर, आत्मा यांवर विश्वास ठेवीत नाही. ह्यामुळे संस्काराचे कारणच उरत नाही. म्हणून भिक्खू हा पुरोहित होत नाही. 

६. ब्राम्हण हा जन्माने ब्राम्हण असतो. भिक्खु हा बनावा लागतो. 

७. ब्राम्हणाला जात असते. भिक्खूला जात नसते. 

८. ब्राम्हण हा सदोदित ब्राम्हणच राहतो. कोणत्याही गुन्ह्याने वा पापाने ब्राम्हणाचे ब्राम्हणत्व लोप पावत नाही.

९. परंतु भिक्खु एकदा भिक्खु झाल्यावर नेहमीच भिक्खू राहील असे नाही. भिक्खू हा बनविला जातो. म्हणून जर त्याचे वर्तन भिक्खूपणाला योग्य नसेल तर त्याचे भिक्खूत्व हिरावून घेतले जाऊ शकते. 

१०. ब्राम्हण व्हायला मानसिक अथवा नैतिक शिक्षणाची आवश्यकता नाही. याच्याकडून केवळ अपेक्षा केली जाते ती ही की, त्याला आपल्या धर्मविधीची माहिती असावी.

११. भिक्खूची परिस्थिती याच्या अगदी उलट आहे. मानसिक आणि नैतिक शिक्षण हे त्याच्या जीवनाला रक्‍तासारखे आवश्यक आहे. 

१२. ब्राम्हणाला स्वतःसाठी वाटेल तितकी मालमत्ता जमविण्याची सवलत आहे. भिक्खूला मात्र तसे करता येत नाही.

१३. हा दोहोंतील भेद लहानसहान नाही. मालमत्ता ही माणसाच्या मानसिक आणि नैतिक स्वातंत्र्याला मर्यादा घालून त्याच्या आचारविचारांना नियंत्रित करते. ती आचार-विचारांमध्ये संघर्ष निर्माण करते; म्हणून ब्राम्हण परिवर्तनाच्या विरुद्ध असतात. कारण परिवर्तन म्हणजे त्यांच्या बाबतीत अधिकार व संपत्तीचा नाश ठरतो. 

१४. भिक्खु हा संपत्तिरहित असल्याने तो मानसिक व नैतिक दृष्टया स्वतंत्र असतो. प्रामाणिकपणा आणि सच्छील यांच्या आड स्वार्थी हेतू त्याच्या बाबतीत तरी येऊ शकत नाही. 

१५. ब्राम्हण ही जात असली तरी प्रत्येक ब्राम्हण ही स्वतंत्र व्यक्ती आहे. कोणत्याही धार्मिक संघटनेच्या नियमांनी तो बांधलेला नाही. आपले नियमन तो आपण स्वतःच करणारा. आपल्या जातीशी तो ज्या सामान्य हितसंबंधांनी बांधलेला आहे ती हिते अगदी भौतिक असतात.

१६. उलटपक्षी भिक्खू हा सदैव संघाचा एक घटक असतो. संघाचा घटक असल्याशिवाय कोणी भिक्खू असू शकेल हे शक्‍य नाही. भिक्खु हा स्वत:चे नियम स्वत:सारखे करीत नसून तो संघाने नियंत्रित असतो. संघ ही एक आध्यात्मिक संघटना आहे.

 

४. भिक्खु आणि उपासक

१. धम्मामध्ये भिक्खूचा धम्म आणि उपासकाचा धम्म यांत विशेष भेद करण्यात आला आहे. 

२. भिक्खू हा ब्रम्हचर्याला बांधलेला आहे. ही गोष्ट उपासकाची नाही. त्याला लग्न करता येते.

३. भिक्खूला घर अथवा कुटुंब असू शकत नाही. ह्याच्या उलट उपासकाला घर आणि कुटुंब असू शकते.

४. भिक्खूला मालमत्ता बाळगता येत नाही. उपासकाला ती ठेवता येते.

५. भिक्खूला हत्या न करण्याचा निर्बंध आहे. उपासकाला तसा निर्बंध नाही.

६. पंचशीलाचे नियम दोघांनाही पाळावयाचे असतात. परंतु भिक्खूला ते प्रतिज्ञार्प असतात. ते मोडल्यास तो शिक्षेस पात्र होतो. उपासकाच्या बाबतीत ते पाळण्याजोगे नियम या स्वरूपाचे असतात.

७. पंचशीलांचे परिपालन हे भिक्खूच्या बाबतीत सक्‍तीचे असते. उपासकाच्या बाबतीत ते त्याच्या इच्छेवर अवलंबून असते.

८. भगवंतांनी असा हा भेद का केला असावा ? काही तरी सबळ कारण असल्याशिवाय ते असा भेद करणार नाहीत.

९. भगवंतांनी त्या भेदाचे कारण कुठेही स्पष्ट केलेले नसल्यामुळे ते तर्काने जाणावे लागते. काहीही असले तरी ते कारण जाणणे आवश्यक आहे.

१०. आपल्या धम्माच्या साहाय्याने इहलोकी सदाचरणाचे राज्य स्थापन करावे असा भगवंतांचा उद्देश होता यात संशय नाही. म्हणूनच तर भगवंतांनी आपला धम्म भिक्खु अथवा उपासक असा भेद न करता सर्वाणा शिकविला.

११. परंतु भगवंताना माहीत होते की, सामान्य माणसाला केवळ धम्म शिकविल्याने सदाचरणावर आधारलेला आदर्श समाज निर्माण होणे शक्‍य नाही.

१२. आदर्श हा व्यवहार्य असला पाहिजे. एवढेच नव्हे तर तो व्यवहार्य कसा आहे हे उदाहरणाने यथार्थ पटविले पाहिजे. तेव्हा लोक त्याच्यासाठी झटतात आणि तो कृतीत उतरविण्याचा प्रयत्न करतात.

१३. ही अशी झटण्याची वृत्ती निर्माण करण्यासाठी आणि सामान्य माणसाला हा आदर्श अव्यवहार्य नसून व्यवहार्य आहे हे पटविण्यासाठी त्या आदर्शानुसार वर्तन ठेवणार्या समाजाचे चित्र सामान्य माणसापुढे ठेवणे आवश्यक आहे.

१४. संघ म्हणजे भगवंतांनी शिकविलेल्या धम्माचे आचरण करणार्या समाजाचा नमुना आहे. 

१५. म्हणूनच भगवंतांनी भिक्खू आणि उपासक ह्यांच्यामध्ये भेद केला. भिक्खु म्हणजे बुद्धाचा आदर्श समाजाचा मार्ग दाखविणारा प्रकाश आणि शक्‍य तो त्या भिक्खूच्या पावलावर पाऊल ठेवून जाणे हे उपासकाचे काम आहे. 

१६. दुसर्या एका प्रश्‍नाचे उत्तर देणे आवश्यक आहे आणि तो प्रश्‍न म्हणजे भिक्खुचे कार्य काय?

१७. भिक्खूने केवळ व्यक्‍तिगत साधनेला वाहून घ्यावयाचे की त्याने लोकांना मार्गदर्शन करून त्यांची सेवा करावयाची?

१८. त्याने दोन्हीही कार्ये केली पाहिजेत.

१९, व्यक्‍तिगत साधनेशिवाय तो मार्गदर्शनास लायक ठरत नाही. म्हणून तो स्वत: प्रथम संपूर्ण सर्वश्रेष्ठ, धार्मिक, ज्ञानसंपन्न अशी व्यक्‍ती असली पाहिजे, यासाठीच त्याने व्यक्‍तित साधना करण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे. 

२०. भिक्खु गृहत्याग करतो; परंतु तो जगापासून निवृत्त होत नाही. गृहत्याग करण्यात त्याचा हेतु, ज्यांना गृहासंबंधी आसक्ती वाटते परंतु ज्याचे जीवन दुःख आणि दैन्य यांनी व्याप्त असून जे असहाय्य असतात, अशा गृहस्थांची किंवा अशा लोकांची सेवा करण्याची संधी व स्वातंत्र्य मिळावे हा असतो.

२१. धम्माचे मूलतत्व करुणा हे आहे आणि त्या तत्वानुसार प्रत्येकाने प्राणिमात्रावर प्रेम केले पाहिजे आणि त्याची सेवा केली पाहिजे. भिक्खु करुणेच्या परिपालनास अपवाद नाही.

२२. भिक्खु आध्यात्मिक संस्कारात कितीही परिपूर्ण असला तरी, जर तो मानवजातीच्या दु:खाबाबत उदासीन असेल तर तो ‘भिक्खु’ या संज्ञेला पात्र ठरत नाही. त्याला इतर काही संज्ञेने संबोधिता येईल पण भिक्खु या संज्ञेने नाही.

Previous page                                    Next Page


 The Buddha and His Dhamma, by Dr. B. R. Ambedkar
error: Content is protected !!