Part I — The Sangha
The Sangh PDF in English
पंचम खंड: संघ
भाग पहिला: संघ
The Sangha
१. संघ आणि त्याची संघटना
१. भगवंताच्या अनुयायांची दोन वर्गांत विभागणी होत असे. भिक्खु आणि गृहस्थ अथवा उपासक.
२. संघ ही भिक्खुंची संघटना. उपासकांची संघटना नव्हती.
३. बौद्ध भिक्खू हा मुख्यत: परिव्राजक असे. परिव्राजक ही संस्था बौद्ध भिक्खुंच्या संस्थेह्न जुनी आहे.
४. प्राचीन परिव्राजक म्हणजे कौटुंबिक जीवनाचा त्याग करून इतस्ततः परिभ्रमण करणार्या लोकांचा समुदाय.
५. आचार्य आणि दार्शनिक यांच्या साहचर्यात यावे, त्यांची प्रवचने ऐकावी आणि नीतिशास्त्र, तत्वज्ञान, सृष्टी, गूढवाद इत्यादी विषयांवर त्यांच्याशी चर्चा करावी. तेणेकरून सत्यज्ञान मिळवावे हा त्यांच्या परिभ्रमणाचा हेतू असे.
६. काही प्राचीन परिव्राजक दुसरा गुरू मिळेपर्यन्त एका गुरूपाशी राहात. तर काही कोणालाही गुरू न मानता एकटेच राहात असत.
७. ह्या प्राचीन परिव्राजकांच्या वर्गात स्त्री-परिव्राजकही असत. त्या कधी पुरुष परिव्राजकांबरोबर राहात तर कधी स्वतंत्रपणे राहात.
८. ह्या प्राचीन पपरिव्राजकांचा संघ नसे. वर्तनाचे नियम नसत. ज्या ध्येयासाठी झटायचे असे ध्येयही त्यांच्यासमोर नसायचे.
९. भगवंतांनीच प्रथम आपल्या अनुयायांचा एक संघ अथवा भ्रातृभावाने एकत्र आलेला समुदाय बनविला आणित्यांच्या वर्तणुकीचे नियम आणि ज्या ध्येयाची साधना करून ते प्राप्त करून घ्यायचे ते त्यांच्यापुढे ठेविले.
२. संघप्रवेश
१. संघात कोणालाही प्रवेश मिळे.
२.त्याला जातीचे बंधन नसे.
३. त्यांत पुरुषाप्रमाणे स्त्रियांनाही बंदी नव्हती.
४.संघप्रवेशाला सामाजिक प्रतिष्ठेची आवश्यकता नसे.
५.संघात जातीला स्थान नव्हते.
६ .संघात सामाजिक प्रतिष्ठेप्रमाणे उच्च-नीच असा भेद पाळला जात नसे.
७.संघात सर्व समान मानले जात असत.
८. संघामध्ये माणसाचे महत्व त्यांच्या अंगच्या गुणांवर ठरविले जात असे; कुळावर नसे.
९ . भगवंत म्हणत असत, संघ हा एका महासागरासारखा असून भिक्खु म्हणजे महासागराला येऊन मिळणार्या नद्या होत.
१०. नद्यांना स्वतंत्र नावे व अस्तित्वे असतात.
११. परंतु नदी एकदा महासागराला मिळाली म्हणजे तिचे नाव आणि अस्तित्व लोप पावते.
१२. ती इतरांबरोबर मिळून एकरूप होते.
१३. संघाचीही स्थिती तशीच आहे. भिक्खूने एकदा संघात प्रवेश केला की तो समुद्राच्या पाण्याप्रमाणे एकरूप होऊन जातो.
१४. त्याची जात, त्याची सामाजिक प्रतिष्ठा व कुळ ही लोप पावतात असे भगवंत म्हणत.
१५. संघात जो एक भेद मानला जात असे तो लिंगविषयक; भिक्खू संघ आणि भिक्खुणी संघ, ह्या दोन वेगळ्या संस्था असत.
१६. संघातील घटकांचे श्रमणेर आणि भिक्खु असे दोन वर्ग पाडले जात.
१७. वीस वर्षाखालील प्रत्येक मनुष्य श्रमणेर मानला जाई.
१८. त्रिशरण आणि दशशीला ग्रहण केलेला प्रत्येक मुलगा श्रमणेर बने.
१९, ‘त्रिशरण’ म्हणजे मी बुद्धाला शरण आहे, मी धम्माला शरण आहे आणि मी संघाला शरण आहे.
२०. ‘दशशीला? म्हणजे मी हिंसा करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी ब्रम्हचर्य पाळीन, मी असत्य बोलणार नाही, मी मद्यपान करणार नाही.
२१. मी अवेळी अन्नसेवन करणार नाही. मी असभ्य आणि अनैतिक कृत्य करणार नाही. मी अलंकाराने आपले शरीर भूषविणार नाही. मी ऐषआरामापासून दूर राहीन. मी सुवर्ण आणि रौप्य यांचा लोभ धरणार नाही.
२२. अशा ह्या दहा प्रतिज्ञा आहेत. ह्या प्रत्येक श्रमणेराने घ्यावयाच्या दहा प्रतिज्ञा आहेत.
२३. श्रमणेराला कोणत्याही काळी संघ सोडून उपासक बनता येत असे. श्रमणेर हा भिक्खुंच्या स्वाधीन असून भिक्खुंच्या सेवेत आपला काळ व्यतीत करीत असे. त्याने परिव्रज्या घेतलेली नसे.
२४. भिक्खु व्हायला दोन अवस्थांतून जावे लागे; पहिली परिव्रज्या आणि दुसरी उपसंपदा. उपसंपदा घेतल्यावरच तो भिक्खू ठरे.
२५. ज्या श्रमणेराला भिक्खु होण्यासाठी परित्रज्या घेण्याची इच्छा असेल त्याला ज्या भिक्खूला उपाध्यायपदाचा अधिकार असे त्याच्याकडे जावे लागे. भिक्खू म्हणून दहा वषें घालविल्याशिवाय भिक्खूला उपाध्यायपद प्राप्त होत नसे.
२६. उपाध्यायाने श्रमणेरला त्याचा परिव्राजक म्हणून स्वीकार केल्यावर त्याच्या सेवेत आणि संरक्षणात राहावे लागे.
२७. हा शिक्षणाचा काळ संपल्यानंतर उपसंपदेसाठी खास बोलाविलेल्या संघ सभेत उपाध्यायाला श्रमणेरावर उपसंपदेचा अनुग्रह करावा अशी संघाला विनंती करावी लागे.
२८. जो भिक्खूपदाचा प्रार्थी आहे, तो परिव्राजक त्या पदाला योग्य आहे की नाही. याची खात्री संघाला करून घ्यावी लागे. ही खात्री करून घेण्यासाठी परिव्राजकला काही हा ठराविक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागत.
२९. जेव्हा संघ उपसंपदेची अनुमती देईल तेव्हाच परिव्राजकला भिक्खुपद पद मिळे.
३०. भिक्खुणी संघात प्रवेशासंबंधीचे नियम भिक्खूसंघ प्रवेशाच्या नियमासारखेच असत.
३. भिक्खु आणि त्याच्या प्रतिज्ञा
१. उपासक आणि श्रमणेर शीलप्रतिपालनाच्या अटीने आपणाला बांधून घेतो.
२. भिक्खू शील ग्रहण करतो ते व्रत म्हणून, शीलव्रताचे उल्लंघन करणार नाही अशी त्याला प्रतिज्ञा करावी लागते. उल्लंघन झाल्यास तो शिक्षेस पात्र ठरतो.
३. भिक्खु ब्रम्हचर्याची प्रतिज्ञा करतो.
४. भिक्खू चोरी न करण्याची प्रतिज्ञा करतो.
५. भिक्खू वृथा वल्गना न करण्याची प्रतिज्ञा करतो.
६. भिक्खु जीवहत्या न करण्याची प्रतिज्ञा करतो.
७. नियम ज्याची अनुज्ञा देत नाही त्या वस्तु जवळ न बाळगण्याची भिक्खु प्रतिज्ञा करतो.
८. भिक्खूला खालील आठ वस्तु फक्त जवळ बाळगता येतात :
( १ ) शरीर आच्छादनासाठी तीन चीवरे; ती म्हणजे
- (1) कंबरेस गुंडाळण्याचे अंतरवासक,
- (2 ) अंगावर घ्यावयाचे उत्तरासंग आणि
- (3) थंडीवार्यापासून रक्षण करण्यासाठी संघाटी हे वस्त्र.
( २) करगोटा;
( ३ ) भिक्षापात्र;
( ४ ) वस्तरा;
( ५ ) सुई धागा;
( ६ ) पाणी गाळण्याचा कपडा.
९. भिक्खु निर्धन राहण्याची प्रतिज्ञा करतो. अन्नासाठी त्याने भिक्षा मागितली पाहिजे. भिक्षेवरच त्याने आपली उपजिवीका केली पाहिजे. दिवसासून एकच वेळ त्याने भोजन घेतले पाहिजे. ज्या ठिकाणी संघासाठी विहार बांधला नसेल त्या ठिकाणी त्याने झाडाखाली राहिले पाहिजे.
१०. भिक्खू आज्ञापालनाची प्रतिज्ञा करीत नाही. आपल्याहून श्रेष्ठाचा मान राखणे, औपचारिक नम्रता दाखविणे, ह्या गोष्टी श्रमणेराकडून अपेक्षित असतात. भिक्खूची मुक्ती आणि गुरू म्हणून उपयुक्तता ही त्याच्या साधनेवर अवलंबून असते. त्याने वरिष्ठाच्याऐवजी धम्माची आज्ञा पाळावयाची असते. त्याच्या वरिष्ठाजवळ प्रज्ञा अथवा मोक्ष दानाचे दैवी सामर्थ्य असते असे तो मानीत नाही. अधःपतन अथवा उद्धार हा ज्याच्या त्याच्या स्वाधीन आहे, म्हणून त्याला विचारस्वातंत्र्य असले पाहिजे.
११. प्रतिज्ञाभंग घडल्यास भिक्खूच्या हातून पाराजिका हा दोष होतो. पाराजिका दोषास शिक्षा म्हणजे संघातून हकालपट्टी करणे.
४. भिक्खू आणि धार्मिक दोष
१. भिक्खु कडून घडलेला प्रतिज्ञाभंग हा त्याने धर्माविरुद्ध केलेला अपराध असे समजले जाते.
२. या अपराधाशिवाय भिक्खूच्या बाबतीत इतरही काही अपराध मानले जात. त्यांना संघादिसेस अशी संज्ञा होती.
३. विनयपिटकात अशा तेरा अपराधांची यादी आढळते.
४. ते पाराजिकासारखे आहेत.
५. भिक्खु आणि प्रतिबंध
१. संघादिसेस आणि पाराजिका यांशिवाय भिक्खूला काही प्रतिबंध अथवा नियम पाळावे लागत. गृहस्थासारखा भिक्खु वाटेल ते करू शकत नाही.
२. यापैकी एका प्रतिबंध प्रणालीला निस्सगीय पार्चित्तिय अशी संज्ञा असून, त्यात भिक्खुने पाळावयाचे सव्वीस प्रतिबंध समाविष्ट होतात.
३. हे प्रतिबंध चीवरे, लोकरीचा बिछाना, भिक्षापात्र, आणि औषधी यांच्या स्वीकृती-अस्वीकृती संबंधी आहेत.
४. काही प्रतिबंध स्वर्ण आणि रौप्य यांचे दान षेणे वा न घेणे यासंबंधी आहेत. काही संघाला मिळालेली मालमत्ता स्वतः स्वीकारण्याच्या आणि देवघेवीच्या कामी नेमलेल्या भिक्खुसंबंधी आहेत.
५. याप्रतिबंधाच्या उल्लंघनास निस्सणीय म्हणजे परतफेड आणि प्राचित्तिय म्हणजे पश्चात्ताप व्यक्त करणे ह्या शिक्षा सांगितलेल्या आहेत.
६. ह्या प्रतिबंधाशिवाय भिक्खूला पाचित्तिय या नावाचे ब्यान्नाव निर्बंध पाळावे लागतात.
६. भिक्खु आणि शिष्टाचाराचे नियम
१. भिक्खूचे वर्तन चांगले असावे. त्याची चालचलणूक इतरांना आदर्शवत वाटेल अशी असावी.
२. यासाठी भगवंतांनी शिष्टाचाराचे अनेक नियम केलेले आहेत.
३. शिष्टाचाराच्या नियमाना सेखिय धम्म अशी संज्ञा असून त्यांची संख्या एकंदर पंचाहत्तर आहे.
७. भिक्खु आणि दोषपरीक्षा
१. कसे वागायचे आणि कसे वागायचे नाही यासंबंधीचे नियम केवळ औपचारिक नव्हते. त्यांना कायद्याचे स्वरूप असून त्यात आरोप ठेवणे, न्यायपरीक्षा आणि शिक्षा यांचा अंतर्भाव होई.
२. योग्य रीतीने नियोजिलेल्या न्यायमंडळाशिवाय भिक्खूला शिक्षा करता येत नसे.
३. हे न्यायमंडळ ज्या ठिकाणी भिक्खूच्या हातुन अपराध घडला त्या ठिकाणी राहणार्या भिक्खुंचे बनविलेले असे.
४. न्यायमंडळासाठी लागणारी भिक्खुंची आवश्यक संख्या उपस्थित असल्याशिवाय भिक्खुची न्यायपरीक्षा होत नसे.
५. आरोप निश्चित असल्याशिवाय कोणत्याही न्यायपरीक्षेला कायदेशीर स्वरूप येत नसे.
६. कोणतीही न्यायपरीक्षा आरोपीच्या अनुपस्थितीत केल्यास तिला कायदेशीर स्वरूप येत नसे.
७. आरोपीला स्वत:च्या बचावाची पूर्ण संधी दिली नसल्यास कोणतीही न्यायपरीक्षा कायदेशीर मानली जात नसे.
८. ज्याच्यावरील आरोप सिद्ध झाला आहे त्या भिक्खूला खालीलप्रमाणे शिक्षा देण्यात येत-
(I) तर्जनीय कर्म ( ताकीद देऊन सोडणे )
(II) नियस्सकर्म ( वेडा म्हणून जाहीर करणे )
(III) प्रत्रार्जनीय कर्म (संघातून हकालपट्टी )
(IV) उत्क्षेपणीय कर्म (बहिष्कार )
(V) परिवासकर्म ( विहारांतून बाहेर घालविणे )
९. विहारांतून बाहेर घालविल्यावर अब्भानकर्माचा उपयोग करता येत असे. अब्भानकर्म म्हणजे संघाचे रद्द केलेले सभासदत्व परत देणे. अब्भानकर्म हे विहारातून बाहेर घालविल्यानंतर भिक्खूने आपली वागणूक नीट ठेवून संघाचे समाधान केले आणि संघाने क्षमा केली तरच केले जात असे.
८. भिक्खु आणि अपराध स्वीकृती
१. भिक्खूसंघविषयक जी अगदी नवीन आणि अपूर्व अशी संस्था भगवंतानी निर्मिली ती म्हणजे उपोसथ अथवा हातून घडलेल्या अपराधाची स्वीकृती ही संस्था होय.
२. अपराध किंवा दोष यासंबंधी केलेल्या नियमांचे परिपालन करावयाला लावणे शक्य आहे हे भगवंतांच्या लक्षात आले होते. परंतु ज्यांचे उल्लंघन झाले असता दोष अथवा अपराध घडत नसे असेही काही प्रतिबंध भगवंतांनी घालून दिले होते. त्यांच्या मते प्रतिबंधांचा शीलनिर्मिती आणि शीलसंवर्धन ह्यांच्याशी अतिशय दाट संबंध असल्यामुळे त्यांचेही परिपालन करणे अपराधासंबंधीच्या नियमांच्या परिपालना इतकेच आवश्यक आहे.
३. परंतु या प्रतिबंधाचे परिणामकारक रीतीने परिपालन करण्याचा मार्ग त्यांना आढळेना. म्हणून त्यांनी लोकांसमोर या प्रतिबंधाच्या उल्लंघनाची उघड कबुली देणे हा उपोसयाचा प्रकार शोधून काढला. हा प्रकार म्हणजे भिक्खूची सदसद्विवेक बुद्धी संघटित करून वाममार्गी त्याचे पाऊल न पडेल अशी काळजी घेणारी शक्ती निर्माण करणे.
४. उपोसथ अथवा अपराधाची कबूली देणे हे पतीमोख्ख या भिक्खु नियमांच्या उल्लंघनापुरते मर्यादित होते.
५. उपोसथासाठी त्या त्या ठिकाणच्या भिक्खुंची सभा भरवावी लागे. दर पंधरवड्यात अशा तीन सभा भरविल्या जात. पहिली चतुर्दशीला, दुसरी पंचमीला, आणि तिसरी अष्टमीला. त्या दिवशी भिक्खूला उपवास करावा लागे, म्हणूनच कबलीच्या बलाच्या दिवसाला वसाला उपोसथ पासथ म्हणतात.
६. सभेत एक भिक्खु पतीमोख्खातील एकेक प्रतिबंध (नियम ) वाचून दाखवी आणि उपस्थित भिक्खुंना उद्देशून तो म्हणे, ‘तुम्ही स्तब्ध आहात यावरून तुमच्यापैकी कोणीही या प्रतिबंधनाचे उल्लंघन केलेले नाही असे मी गृहीत धरतो.’ हे वाक्य त्रिवार उच्चारून तो मग पुढल्या प्रतिबंधाकडे वळे.
७. अशाच तर्हेंची उपोसथाची सभा भिक्खुणी संघातही होई.
८. प्रतिबंध उल्लंघनाची कबुली दिल्यास पुढे आरोप ठेवून न्यायपरीक्षा चाले. ९. अपराध घडला असूनही एखाद्या भिक्खूने तो कबूल केला नाही, तर त्याला तो अपराध करताना ज्या भिक्खूने पाहिले असेल त्या भिक्खूने तो सभेत सांगावयाचा. असे झाल्यावर मग अपराधी भिक्खूवर आरोप ठेवून त्याच्या न्यायपरीक्षेला सुरुवात होई.