Part III—His End
His End PDF in English
सप्तम खंड: भ्रमणिकाची अंतिम यात्रा
भाग तिसरा: महा परिनिर्वाण
His End
१. वारसाची नियुक्ती
१. एकदा भगवान बुद्ध धनुर्धारी नामक शाक्य कुटुंबाच्या आग्रवनात वस्तीस होते.
२. त्या वेळी पावामध्ये नुकतेच निगष्ठनाथपुत्राचे (महावीराचे) देहावसान झाले होते. त्याच्या मृत्यूनंतर निगण्ठियात दुही होऊन भांडणे सुरू झाली होती. त्यांचे दोन पक्ष आपापसांत झगडताना एकमेकांना वाग्बाणांनी घायाळ करीत होते.
३. श्रामणेर चुन्द पावामध्ये वर्षावास संपवून स्थविर आनन्दास भेटण्यास आला असताना बोलला, “निगण्ठनाथपुत्राचे नुकतेच पावा येथे देहावसान झाले आहे. त्याच्या मृत्यूनंतर निगण्ठियांत दुही माजली असून ते आपापसांत झगडताना परस्परांना वाग्बाणांनी घायाळ करीत आहेत. ह्याचे कारण त्यांना कोणीच रक्षणकर्ता नाही.”
४. त्यावर स्थविर आनन्द म्हणाला, “ही महत्वाची हकीकत भगवान बुद्धांना सांगणे इष्ट आहे. आपण त्यांच्याकडे जाऊ या आणि त्यांना ती कथन करू या.”
५. “ठीक, महाशय.” चुन्द बोलला.
६. त्यावर आनन्द व चुन्द दोघे भगवान बुद्धापाशी गेले आणि त्यांना अभिवादन करून निगण्ठियांची हकीकत कथन केली व आपला वारस नियुक्त करण्याची त्यांनी विनंती केली.
७. चुन्दाचे निवेदन ऐकून भगवान बुद्ध म्हणाले, “चुन्द, विचार कर की, जगात एक आचार्य निर्माण होतो. अर्हत्, सम्यक्-संबुद्ध, तो आपल्या सद्धर्माचा सुयोग्य प्रसार करतो, जो शांतिदायक, प्रभावी, मार्गदर्शक व सुबोध असा आहे; पण त्याचे शिष्य मात्र धर्मज्ञानात प्रगत झालेले नाहीत आणि त्यांच्या निधनानंतर तो धर्म त्यांचे रक्षण करण्यास असमर्थ ठरतो;”
८. “अशा आचार्यांचे निधन त्यांच्या शिष्यांना दु:खदायक आणि त्यांच्या धर्मालाही विघातक ठरते.”
९. “पण चुन्द, जगात एक अर्हत् व सम्यक्-संबुद्ध आचार्य निर्माण झाला आहे. त्याने आपल्या धर्माचा सुयोग्य व सुबोध प्रचार केला आहे. ज्याचा सद्धर्म प्रभावशाली मार्गदर्शक असून शांतिदायक आहे, ज्याचे शिष्य सद्धर्मात पारंगत आहेत असा तो सद्धर्म त्या शिष्यांना उच्चतर जीवनाचे सम्यक् स्वरूप दर्शवीत असताना त्या आचार्याचे देहावसान होते;”
१०. “अशा आचार्यांचे निधन शिष्यांना दु:खदायक होत नाही. मग वारसाची गरज कुठे भासते ?”
११. दुसर्या एका प्रसंगी आनन्दाने पुनहा तोच प्रश्न काढल्यावर भगवान म्हणाले, “आनन्दा ! माझ्या धर्माबाबत ज्यांचे एकमत नाही असे दोन भिक्खू तरी तुला आढळलेत काय ?”
१२. “नाही, पण आज जे भगवानांच्या निकट आहेत ते भगवानांच्या मृत्यू- नंतर कदाचित ‘विनया’ बाबत, संघाच्या नियमांबाबत वाद निर्माण करण्याचा संभव आहे आणि असला वाद सर्वांच्या दुःखाला कारणीभूत होऊ शकेल.”
१३. “आनन्द, “’विनया’ बाबत, भिक्खूच्या नियमाबाबतचे वाद क्षुल्लक ठरतात; पण भिक्खूसंघात धम्माबद्दल जर वाद निर्माण झाले तर ते मात्र चिंतादायक होईल.”
१४. “धम्मासंबंधीचे वादविवाद हुकूमशहा मिटवू शकत नाहीत. वारस जर हुकूमशहासारखा वागणार नसेल तर तो काय करू शकणार ?”
१५. “धम्मासंबंधीचे वादविवाद हुकूमशहा मिटवू शकणार नाही.”
१६. “कोणत्याही वादाबाबत संघच निर्णय घेऊ शकेल. संघाने एकत्र येऊन एकमत होईपर्यंत विचारविनिमय केला पाहिजे आणि एकदा निर्णय झाल्यानंतर त्याचे परिपूर्ण पालन केले पाहिजे.”
१७. “वादाचा निर्णय बहुमतानेच व्हायला पाहिजे. वारसाची नियुक्ती हा त्यावर उपाय होऊ शकत नाही.”
२. अन्तिम धर्म-दीक्षा
१. त्या समयी सुभद्र नावाचा परित्राजक कुशिनारा येथे राहात होता. सुभद्र परिव्राजकाच्या कानावर लोकवार्ता पडली. “असे म्हणतात की, आज रात्रीच्या अखेरच्या प्रहरी गौतम बुद्धांचे परिनिर्वाण होणार आहे.”तेव्हा सुभद्र परिव्राजकाच्या मनात आले.
२. “काही वयोवृद्ध गुरू आणि शिष्य परिव्राजकांना असे म्हणताना मी ऐकले आहे की, ह्या जगात अर्हत्, सम्यक्- सम्बुद्ध असे तथागत वारंवार निर्माण होत नाहीत आणि आज रात्रीच्या अखेरच्या प्रहरी श्रमण गौतमांचे परिनिर्वाण होणार आहे. माझ्या मनात एक संदेह उत्पन्न झाला आहे आणि श्रमण गौतमांबद्दल मला खात्री वाटते की, ते मला असला उपदेश देतील की, जेणे करून माझ्या संदेहाचे निराकरण होईल.”
३. सुभद्र परिव्राजक उपमार्गाने मल्लांच्या शालवनात गेला. तिथे स्थविर आनन्द होता. सुभद्र त्याला म्हणाला, “स्थविर आनन्द, मला श्रमण गौतमांचे दर्शन होईल काय ?”
४. त्याचे शब्द ऐकून स्थविर आनन्द त्याला म्हणाला, “पुरे, पुरे सुभद्र ! तथागतांना आता मुळीच त्रास देता कामा नये. ते पार थकून गेले आहेत.”
५. सुभद्र परिव्राजकाने दुसर्यांदा व तिसर्यांदा पुन्हा तीच विनंती केली. स्थविर आनन्दाने तीनही वेळा त्याला तेच उत्तर दिले.
६. सुभद्र परिव्राजक आणि स्थविर आनन्दाचा चाललेला हा संवाद तथागतांनी ऐकला. त्यांनी आनन्दाला हाक मारून म्हटले, , “आनन्दा, सुभद्राला अडवू नकोस. सुभद्राला तथागतांचे दर्शन घेण्याची अनुमती असावी. सुभद्राला जे काही माझ्यापाशी मागावयाचे असेल ते त्याला ज्ञानासाठी ह्वे असेल. मला त्रास देण्याच्या इच्छेने नव्हे. आणि जे उत्तरादाखल मी सांगेन ते तत्काळ त्याला समजेल.”
७. तेव्हा स्थविर आनन्द परिव्राजकाला म्हणाला, “सुभद्रा, आत प्रवेश कर. तथागतांची तुला परवानगी आहे.”
८. तेव्हा सुभद्र परिव्राजक तथागतांच्या समीप गेला आणि त्यांना अभिवादन करून कुशलवर्तमानाचे बोलणे झाल्यावर तो एका बाजूस जाऊन बसला. बसल्यावर तथागतांना उद्देशून तो बोलला,
९. “श्रमण गौतम, ज्यांना अनुयायी आहेत आणि श्रोते आहेत, जे प्रसिद्ध आहेत, जे गणाचार्य काहेत, जे पंथसंस्थापक आहेत, ज्यांना जनता धर्मात्मा मानीत आली आहे असे श्रमण आणि वब्राम्हण-पूर्णकाश्यप, मख्खली गोशाल, अजित केशकम्बल, पकुच कच्चायन, सज्जय वेलट्टीपुत्र, तसेच निगण्ठनाथपुत्र – ह्या सर्वांना ते म्हणतात तसे आपल्या आपणच सत्यज्ञान प्राप्त झाले आहे की नाही ? की, काहींना झाले आणि काहींना झाले नाही ?”
१०. “सुभद्र ! काहींना ज्ञान प्राप्त झाले, की काहींना झाले नाही ह्या असल्या गोष्टीत तू पडू नकोस. मी तुला धर्म्मोपदेश करतो तो नीट ध्यान देऊन श्रवण कर. लक्ष दे. मी सांगतो.”
११. “भगवान ! फार चांगले.” असे बोलून सुभद्र परिव्राजकाने भगवान बुद्धांकडे एकाग्रतेने ध्यान दिले. त्यावर भगवान बोलले;
१२. “सुभद्र ! ज्या धम्ममतामध्ये आर्यअष्टांगिक मार्ग नाही त्यात श्रमण असू शकत नाही. ज्या धम्ममतात आर्यअष्टांगिक मार्ग आहे त्यात श्रमणही असतो.”
१३. “सुभद्र ! माझ्या धम्ममतात आर्यअष्टांगिक मार्ग आहे म्हणून ह्या धम्मात ( स्त्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी व अर्हत् असे ) चार प्रकारचे श्रमण आहेत. दुसर्या धम्ममतात श्रमणाचा अभाव आहे; पण सुभद्र, जर ह्या धम्ममताच्या अनुयायांनी सम्यक् जीवन व्यतीत केले तर ह्या जगतात अर्हतांचा अभाव कधीच आढळणार नाही.”
१४. “मी एकोणतीस वर्षांचा असताना सत्याच्या शोधासाठी बाहेर पडलो.”
१५. “सुभद्र ! सद्धम्माचा पक्ष स्वीकारल्याला आता पन्नासाहून अधिक वर्षे होऊन गेली असतील.”
१६. तथागतांनी असे सांगितल्यावर सुभद्र परिव्राजक बोलला, “आपल्या मूखीचे हे शब्द अत्युत्कृष्ट आहेत. खरोखरच अत्युत्कृष्ट! ”
१७. “जसे कोणी फेकून दिलेल्याची प्रतिष्ठापना करावी किंवा झाकलेले खुले करावे किंवा मार्गभ्रष्टाला सन्मार्ग दाखवावा किंवा अंधारात दीप प्रज्वलित करावा की, जेणेकरून नेत्र असलेल्याला दिसावे.”
१८. “तसे मला तथागतांनी सत्याचे ज्ञान करून दिले म्हणून मी बुद्ध, धम्म आणि संघाचा आश्रय स्वीकारतो.”
१९. “सुभद्र ! ज्याने पूर्वी दुसर्या धम्माची दिक्षा घेतली असेल त्याला जर संघात प्रवेश करावयाची इच्छा असेल तर त्याला चार महिने प्रतीक्षा करणे प्राप्त आहे.”
२०. “जर तसा दंडक असेल तर मीही चार महिने प्रतीक्षा करीन.”
२१. पण तथागत म्हणाले, “माणसामाणसात फरक असतो हे मी मान्य करतो.” असे म्हणून त्यांनी आनन्दाला हाक मारली व ते बोलले, “आनन्द ! सुभद्राला आताच संघात दाखल करून घे !”
२२. “बरे, जशी आपली आज्ञा.” असे बोलून आनन्दाने संमती दर्शवली.
२३. सुभद्र परिव्राजक मग आनंदाला म्हणाला, “तुम्ही भाग्यवान आहात आनन्द ! महाभाग्यवान ! तुम्हाला स्वत: तथागतांनी धर्मजलाचे सिचन करून दिक्षा दिली व भिक्खूसंघात शिष्यत्व प्रदान केले.”
२४. “सुभद्र ! तुझ्या बाबतीतही तसेच झाले आहे.” स्थविर आनन्द म्हणाला.
२५. अशा रीतीने तथागतांच्या अनुज्ञेने सुभद्र परिव्राजकाला भिक्खूसंघात स्वीकृत करण्यात आले. ज्याला स्वत: तथागतांनी दीक्षा दिली असा तोच अखेरचा श्रावक.
३. अन्तिम शब्द
१. भगवान बुद्ध आनन्दाला नंतर म्हणाले,
२. “आनन्दा ! कदाचित तू असे म्हणशील, ‘गुरूंची वाणी आता लोपली. आता आम्हांस कोणी गुरू उरला नाही.’पण आनन्द, तुला असे वाटता कामा नये; जो धम्म आणि विनय मी शिकविला, सांगितला आहे तोच माझ्या पश्चात तुमचा गुरू !”
३. “आणि आनन्द ! भिक्खु परस्परांशी बोलताना मित्रभावाने एकमेकांना हल्ली संबोधतात; पण माझ्या पश्चात ही प्रथा बंद झाली पाहिजे, ज्येष्ठ जेव्हा कनिष्ठाला हाक मारील तेव्हा त्याच्या नावाने, गोत्र नावाने किवा ‘मित्र म्हणून त्याने त्याला संबोधावे व कनिष्ठ जेव्हा ज्येष्ठाला हाक मारील तेव्हा त्याने त्याला ‘ भगवान्’ किंवा ‘ भन्ते’ असे संबोधावे.”
४. “ आणि आनन्द ! माझ्या पश्चात जर संघाला आवश्यक वाटले तर किरकोळ अथवा गौण नियम त्याने रद्द करावेत.”
५.“ आणि आनन्द ! तुला माहीतच आहे की, भिक्खू छन्न कसा हट्टी, विकृत आणि बेशिस्त आहे.”
६. “ आनन्द ! माझ्या पश्चात छन्नाला सर्वोच्च शिक्षा दिली जावी.”
७. “ भगवान ! सर्वोच्च शिक्षा म्हणजे काय ?”
८. “ छन्न काय वाटेल ते बोलो, कोणी त्याच्याशी बोलू नये. त्याची कानउघाडणी करू नये, त्याला शिकवू नये. त्याला एकटे सोडून द्यावे. कदाचित ह्यामुळे तो सुधारेल.”
९. नंतर भगवान बुद्ध भिक्खूंना उद्देशून बोलले.
१०. “ जर कोणा भिक्खूच्या मनात कदाचित बुद्धाबाबत, धम्माबाबत, संघाबाबत, मार्गाबाबत किंवा मार्गाच्या वाटेबाबत संदेह किंवा गोंधळ असेल तर भिक्खूवर्गहो, आताच तो त्याने विचारावा. मागाहून पश्चात्ताप करू नये की, आमचे गुरु समोर असताना त्यांना प्रत्यक्ष शंका सांगण्याची हिंमत झाली नाही.”
११. असे सांगितल्यावर भिक्खू गप्प राहिले.
१२. तेव्हा तथागतांनी दुसर्यांदा, तिसर्यांदा तेच शब्द उच्चारले आणि तिसर्या वेळीही भिक्खुंनी मौन सोडले नाही.
१३. तेव्हा तथागत म्हणाले, “ कदाचित गुरूचा मान राखावा म्हणून तुम्ही विचारत नसाल; पण भिक्खूहो, तुम्ही मला मित्रासमान मानून काय विचारायचे ते विचारा !”
१४. तरीही भिक्खू अबोलच राहिले.
१५. तेव्हा आनन्द तथागतांना म्हणाला, “ आश्चर्य आहे, अद्भत आहे. भगवान ! ह्या माझ्या संघाने मला आज निश्चिन्त केले. ह्या भिक््खुंपैकी एकाच्याही मनात बुद्धाबाबत, धम्माबाबत, संघाबाबत, मार्गाबाबत किंवा मार्गाच्या वाटेबाबत यत्किचितही संदेह नाही.”
१६. “ आनन्द ! तू हे विश्वासाने बोलतोस; पण तथागतांना ही जाणीव आहे की, एकाही भिक्खूच्या मनात कसलाही संदेह किंवा गोंधळ नाही. ह्या माझ्या पाचशे भिक्खुंतला सर्वात मागासलेला निदान स्त्रोतापन्न तरी खास असेलच. त्याला अधोगतीपासून सुटण्याची खात्री आहे. त्याला संबोधी प्राप्त करून घेण्याची खात्री आहे.”
१७. तेव्हा तथागत भिक्खुंना उद्देशून बोलले :
१८. “ भिक्खूहो, मी तुम्हाला पुन्हा स्मरण देतो की, सर्व संस्कार अनित्य आहेत. आपला मार्ग अप्रमादपूर्वक आक्रमण करा !”
१९. तथागतांचे हेच अखेरचे शब्द होते.
४. शोकग्रस्त आनन्द
१. जसजसे वय होत चालले तसतशी भगवान बुद्धांना आपली काळजी घेण्यासाठी एखाद्या सेवकाची जरुरी वाटू लागली.
२. प्रथम त्यांनी नन्दाची निवड केली. त्यानंतर त्यांनी आनन्दाची निवड केली. तथागतांच्या अंतिम समयापर्यंत व्यक्तिगत सेवक म्हणून त्याने त्यांची सेवा केली.
३. आनन्दाला तथागतांनी सेवक न मानता आपला प्रियतम सहचर म्हणून मानले.
४. जेव्हा भगवान बुद्ध कुशीनारा येथे आले व दोन शालवृक्षांच्यामध्ये त्यांनी वास्तव्य केले तेव्हा आपला अंतकाळ जवळ येत चालल्याचे पाहून आता आनन्दाला विश्वासात घ्यावे असे त्यांनी योजिले.
५. म्हणून त्यांनी आनन्दाला हाक मारली आणि म्हणाले, “आनन्द ! ह्या शालवृक्षांमध्ये कुशीनाराच्या ह्या उपवनात रात्रीच्या तिसर्या प्रहरी तथागतांचे परिनिर्वाण होईल.”
६. तथागतांनी असे सांगितल्यावर स्थविर आनन्द म्हणाला, “भगवान ! आपण बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी, जगाच्या अनुकम्पेसाठी तसेच देव व मानवांच्या कल्याणासाठी कल्पान्तापर्यंत राहण्याची कृपा करा.”
७. आनन्दाने त्रिवार अशी विनंती केली. “बस्स, बस्स, आनन्द ! तथागतांची अधिक विनवणी करू नकोस, अशी विनंती करण्याचा समय निघून गेला.”
८. “आनन्द ! आता मी वृद्ध झालो आहे. वयस्क झालो आहे. माझा जीवनप्रवास आता संपत आला आहे. माझी आयुर्मर्यादा मी गाठली आहे. माझी ऐंशी वर्षे आता उलटली. ज्याप्रमाणे एखादे जुने शकट वापरुन झिजून एखादे दिवशी मोडून पडते तीच अवस्था तथागतांच्या देहाचीही झाली आहे.” हे श्रवण केल्यावर आनन्द तिथून निघून गेला.
९. स्थविर आनन्द दिसला नाही तेव्हा तथागतांनी भिक्खूंना विचारले, “आनन्द कुठे आहे ?” “स्थविर आनन्द निघून गेले आणि ते शोक करीत आहेत.” भिक्खू म्हणाले.
१०. तथागतांनी एका भिक्खूला बोलावले व ते म्हणाले, “ जा आणि आनन्दाला सांग की, तुला तथागत बोलावताहेत.”
११. “जशी आपली आज्ञा.” भिक्खू बोलला.
१२. आनन्द आला आणि तथागतांच्या समीप जाऊन बसला.
१३. “आनन्द ! आता रडू नकोस ! मी तुला मागेच सांगितले नाही का, की आपल्या आवडत्या व निकट वस्तूंपासून अलग व्हावे लागणे, त्यांचा त्याग करणे, त्यांचा संबंध तोडावा लागणे हे स्वाभाविकच आहे?”
१४. “आनन्द ! तुझ्या अमाप प्रेमळ कार्यामुळे, दयाशील सुस्वभावामुळे तू दीर्घकालपर्यंत माझा अगदी निकटवर्ती झाला आहेस.”
१५. “आनन्द ! तू हुशार आहेस. निष्ठेने प्रयत्न कर म्हणजे तूसुद्रा विषयासक्ती, स्वार्थ, मोह व अज्ञान ह्यांसारख्या दुर्गुणांपासून मुक्त होशील.”
१६. नंतर आनन्दाबद्दल भिक्खूंना उद्देशून ते बोलले, “आनन्द बुद्धीमान आहे. भिक्खूहो ! आनन्द बुद्धीमान आहे.”
१७. “तथागतांची आपण केव्हा भेट घ्यावी. हे तो जाणतो; भिक्खू-भिक्खुणींनी कोणत्या समयी भेट घ्यावी हे तो जाणतो. उपासक उपासिकांची भेटण्याची योग्य वेळ कोणती, राजा किंवा राजमंत्र्याची वेळ कोणती, तसेच दुसर्या आचार्यांची व शिष्यांची वेळ कोणती हेही त्याला ठाऊक आहे.”
१८. “भिक्खूहो ! हे आनन्दाचे चार विशेष आहेत.”
१९. “आनन्दाला भेटल्यावर सर्वांना समाधान मिळते. त्याला पाहुन त्यांना आनंद होतो. सर्वांना आनन्दाचे बोलणे ऐकून सुख मिळते. आनन्द जेव्हा अबोल होतो तेव्हा ते बेचैन होतात.”
२०. ह्यानंतर आनन्दाने पुन्हा तथागतांच्या परिनिर्वाणाचा विषय काढला. तथागतांना उद्देशून तो बोलला, “तथागतांनी ह्या उजाड नगरीत ह्या जंगलामध्ये देहत्याग करू नये. चम्पा, राजगृह, श्रावस्ती, साकेत, कोसाम्बी, वाराणशीसारखी मोठी मोठी नगरे आहेत. ह्यांपैकी कोणत्या तरी नगरात त्यांनी परिनिर्वाण प्राप्त करावे.”
२१. “आनन्द ! असे बोलू नकोस, आनन्द ! असे बोलू नकोस. ही कुशिनारादेखील केशवती नावाची महासुदर्शन राजाची राजधानी होती.”
२२. नंतर तथागतांनी आनन्दावर दोन कामे सोपवली.
२३. त्यांनी आनन्दाला सांगितले की, चुन्दाने दिलेल्या अन्नामुळे तथागतांना मृत्यू आला अशी वार्ता पसरणार नाही ह्याची खबरदारी घेणे. त्यामुळे चुन्द संकटात सापडेल अशी भीती वाटते. त्यांनी सांगितले की, ह्या बाबतीत लोकांच्या मनातील भ्रम आनन्दने दूर करावा.
२४. आणखी एक गोष्ट त्यांनी आनन्दास करण्यास सांगितली आणि ती म्हणजे कुशिनाराचा मल्लांना जाऊन सांगणे की, तथागत ह्या उपवनात आले असून रात्रीच्या तिसर्या प्रहरी त्यांचे परिनिर्वाण होईल.
२५. “तुझ्यावर दोष ग्रेईल अशी संधी तू देऊ नकोस. मल्ल कदाचित म्हणतील; ‘आमच्या गावात तथागतांचा मृत्यू झाला आणि आम्हाला हे समजले नाही. त्यांचा अखेरच्या क्षणी त्यांना भेटण्याची संधीही आम्हाला मिळाली नाही.”
२६. त्यानंतर स्थविर अनुरुद्ध व स्थविर आनन्द ह्या उभयतांनी धार्मिक चर्चेत उरलेली रात्र व्यतीत केली.
२७. पूर्वी प्रकट केल्याप्रमाणे, रात्रीच्या तिसर्या प्रहरात तथागतांना परिनिर्वाण प्राप्त झाले.
२८. जेव्हा तथागतांचे परिनिर्वाण झाले तेव्हा काही भिक्खू व आनन्द हात पसरून रुदन करू लागले; काही तर दु:खातिशयाने जमिनीवर गडबडा लोळू लागले व म्हणू लागले, “ तथागतांना फारच लवकर परिनिर्वाण आले. ह्या सुखी माणसाने फारच लवकर जीवनत्याग केला. जगातून फारच लवकर प्रकाश निघून गेला.”
२९. वैशाखी पौणिमेच्य रात्री तिसर्या प्रहरात तथागतांचे परिनिर्वाण झाले. त्यांचे परिनिर्वाण इ. स. पूर्व ४८३ मध्ये झाले.
३०. पाली भाषेतल्या ग्रंथात असे म्हटले आहे :
दिवा तपति आदिच्चो
रत्ति आभाति चन्दिमा
सन्नद्धो खत्तियो तपति
झायी तपति ब्राम्हणो
अथ सब्बं अहोरत्ति
बुद्धो तपति तेजसा ।।
३१ सूर्य केवळ दिवसाच प्रकाशतो आणि चन्द्र केवळ रात्रीलाच प्रकाशमान करतो. आपली शस्त्रास्त्रे धारण केल्यावर क्षत्रिय तेजस्वी दिसतो. जेव्हा ध्यानस्थ असतो तेव्हाच ब्राम्हण तेजपुंज दिसतो. पण बुद्ध मात्र स्वयंतेजाने दिवस-रात्र सतत प्रकाशित राहतो.’
३२. निःसंदेह तो जगाचा प्रकाश होता.
५. मल्लांचा विलाप आणि एका भिक्खूची प्रसन्नता
१. तथागतांच्या आदेशानुसार आनन्दाने मल्लांकडे जाऊन त्यांना ही घटना विदित केली.
२. जेव्हा ही घटना समजली तेव्हा त्यांच्या स्त्रिया, तरुण पुरुष व कुमारिका दुःखित, खिन्न आणि शोकविव्हल झाले.
३. काहींनी केस विस्कटून, हात पसरून व जमिनीवर गडबडा लोळून शोक प्रदर्शित केला.
४. त्यानंतर आपल्या कुमार-कुमारिका व स्त्रियांसह मल्ल तथागतांच्या अंतिम दर्शनासाठी उपवनातील शालवाटिकेत गेले.
५. तेव्हा स्थविर आनन्दाने विचार केला: “जर मी कुशिनाराच्या मल्लांना तथागतांच्या मृत देहाला वंदन करण्यासाठी एकेकटे जाऊ दिले तर फार काळ व्यतीत होईल.
६. म्हणून त्याने कुटुंबाकुटुंबांचे गट केले. प्रत्येक कुटुंब तथागतांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करून निरोप घेई.
७. ह्या समयी पुष्कळ भिक्खूंच्या समवेत महास्थविर महाकाश्यप पावा ते कुशिनारा ह्या मार्गाने यात्रा करीत होते.
८. त्याच वेळी पावाला जाणार्या मार्गाने एक नग्न परिव्राजक येत होता.
९. महास्थविर महाकाश्यपांना तो नग्न परिव्राजक दुरून दिसला. तो जवळ आल्यावर त्यांनी त्याला विचारले, “मित्रा, तू आमच्या गुरूंना ओळखत असशीलच?
१०. “होय मित्रा, मी त्यांना ओळखतो.” “श्रमण गौतमाचे निधन होऊन आज एक सप्ताह झाला.”
११. हे वृत्त ऐकताच भिक्खू गण शोकविव्हल होऊन रुदन करू लागला.
१२. ह्या भिक्खूगणात उतार वयात संघात दाखल झालेला सुभद्र नावाचा एक भिक्खू होता.
१३. तो म्हणाला, “पुरे ! आता विलाप पुरे ! आता शोक पुरे ! आपण श्रमण गौतमांच्या निर्बंधांतून मुक्त झालो हे बरे. ‘हे तुम्हांस शोभते; हे शोभत नाही’ अशा त्यांच्या निर्बंधांनी आपण हैराण झालो होतो. आता आपल्याला हवे ते करता येईल आणि नको ते करावयाची गरज पडणार नाही ! त्यांचे निधन झाले हे बरे नाही का झाले ? मग रडता कशासाठी ? शोक कशाला करता? ही तर आनंदाची घटना आहे.”
१४. तथागत हे असे मोठे व शिस्तीचे कठोर भोक्ते होते.
६. अन्तिम संस्कार
१. कुशिनाराच्या मल्लांनी मग स्थविर आनन्दाला विचारले, “तथागतांच्या देहाची काय व्यवस्था करायची?”
२. आनन्द म्हणाला, “लोक महाराजांची जशी उत्तरक्रिया क्रिया करतात तशीच तथागतांची उत्तरक्रिया क्रिया आपण करावी.”
३. “महाराजांची उत्तरक्रिया कशी केली जाते ?”
४. आनन्दाने उत्तर दिले, “महाराजांचा देह नव्या कोर्या वस्त्रात अवगुंठित करतात. तदनंतर तो कापसाने गुंडाळतात. नंतर पुन्हा नव्या वस्त्राने गुंडाळतात. असे एकामागून एक दोन्ही प्रकारचे पाचशे फेरे होईपर्यंत करतात. नंतर तो देह लोखंडाच्या कढईसारख्या पात्रात ठेवून त्यावर तसेच लोखंडी झाकण ठेवून तो बंद करतात. नंतर सर्व प्रकारची सामग्री आणून चिता रचतात. अशा पद्धतीने महाराजांची उत्तरक्रिया केली जाते.”
५. मल्ल म्हणाले, “तसेच आपण करू.”
६. मग मल्ल बोलले, “तथागताच्या देहाला अग्निसंस्कार करण्यास आता उशीर झाला आहे. उद्या ते करू या.”
७. नंतर कुशिनाराच्या मल्लांनी आपल्या सेवकांना आज्ञा केली. “तथागतांच्या उत्तरक्रियेची तयारी करा. सुगंध, पुष्पमाला गोळा करा. तसेच वादकांनाही बोलावून घ्या !”
८. नृत्य, भजन, गायन, पुष्पमाला, सुगंध, वस्त्राची आच्छादने, फुलांची तोरणे इत्यादिकांनी तथागतांच्या देहाला मानसन्मान व आदरांजली अर्पण करण्यात दूसरा दिवसही निघुन गेला. असाच तिसरा, चौथा, पाचवा आणि सहावा दिवसही गेला.
९. सातव्या दिवशी कुशिनाराच्या मल्लांनी विचार केला, “आज तथागतांचा देह हालवू या आणि त्यांची उत्तरक्रिया करू या.”
१०. नंतर मल्लांच्या आठ प्रमुखांनी ताटीला खांदा देण्यासाठी सिद्ध व्हावे म्हणून स्थाने केली व नवी वस्त्रे परिधान केली.
११. नंतर तथागतांचा देह उचलून मुकुटबन्धन नामक पूर्वेकडे असलेल्या चैत्याकडे नेला. तिथे देह उतरवून त्यांनी अग्निसंस्कार केले.
१२. काही कालानंतर तथागतांच्या नश्वर देहाची रक्षा झाली.
७. रक्षेसाठी संघर्ष
१. तथागतांच्या देहाला अग्नीने भस्मसात केल्यानंतर कुशिनाराच्या मल्लांनी रक्षा व अस्थी गोळा केल्या व सभागारात त्या ठेवून भाले व धनुष्यांचा त्यांच्याभोवती कोट केला. कोणी त्या सर्व किंवा त्यांचा अंश चोरू नये म्हणून तिथे पहारा बसवला.
२. सप्ताहपर्यंत नृत्य, गायन, वादन, पुष्पमाला व सुगंध इत्यादी उपचारांनी मल्लांनी त्या रक्षा-अस्थींना मानसन्मान व आदरांजली अर्पण केली.
३. मगधदेशाचा राजा अजातशत्रू ह्याच्या कानी आले की,तथागतांचे कुशिनारा येथे परिनिर्वाण झाले.
४. त्याने मल्लांकडे दूत पाठविला आणि तथागतांच्या अवशेषांचा थोडा अंश मिळावा म्हणून विनंती केली.
५. ह्याचप्रमाणे वैशालीच्या लिच्छवियांकडून, कपिलवस्तूच्या शाक्यांकडून, अहकप्याच्या वल्लियांकडून, रामगामच्या कोलीयांकडून आणि पावाच्या मल्लांकडूनही दूत आले.
६. अस्थींचा हिस्सा मागणार्यांत वेठद्रीपाचा एक ब्राम्हणही होता.
७. एवढ्या मागण्या आलेल्या पाहून कुशिनाराचे मल्ल म्हणाले, “तथागतांचे परिनिर्वाण आमच्या गावात झाले. तथागतांच्या अवशेषाचा अंशही आम्ही कुणाला देणार नाही. त्यांच्यावर फक्त आमचाच हक्क आहे.”
८. परिस्थिती चिघळत चाललेली पाहून द्रोण नावाचा एक ब्राम्हण मध्यस्थीसाठी पुढे आला. तो म्हणाला, “माझे दोन शब्द ऐका !”
९, द्रोण म्हणाला, “ज्या तथागतांनी आपणास संयमाचे शिक्षण दिले त्याच नरवरांच्या अस्थींच्या हिशशासाठी संघर्ष, रक्तपात आणि युद्ध व्हावे हे अनुचित होय !”
१०. “आपण सर्वांनी एकमताने, मित्रत्वाने व दिलजमाईने अस्थींचे सारखे आठ हिस्से करण्याचे ठरवावे आणि प्रत्येक राज्यात त्यांवर स्तूप उभारावेत की, जेणेकरून त्या त्या ठिकाणी त्यांची पूजा जनतेला करता येईल.”
११. कुशिनाराच्या मल्लांनी मान्यता दर्शविली आणि ते म्हणाले, “हे ब्राम्हणा ! तूच ह्या अवशेषांचे सारखे आठ हिस्से करून सुयोग्य वाटणी कर.”
१२. “ठीक आहे!” द्रोणाने संमती व्यक्त केली.
१३. नंतर त्याने तथागतांच्या अवशेषांचे सारखे आठ हिस्से केले.
१४. हिस्से करून झाल्यावर द्रोण म्हणाला, “मला हे रक्षापात्र द्याल तर त्यावर मीही एक स्तुप बांधून काढीन.”
१५. सर्वांनी ते पात्र त्याला देण्यास मान्यता दर्शविली.
१६. अशा रीतीने तथागतांच्या अस्थि-रक्षेची विभागणी झाली आणि संघर्ष शांतीने आणि सलोख्याने मिटला.
८. बुद्ध-भक्ती
१. ह्या घटना घडण्याचे स्थान श्रावस्ती….
२. त्या वेळी पुष्कळसे भिक्खू तथागतांसाठी चीवर तयार करण्यात दंग होते. तीन महिन्यांत चीवर तयार झाले की, तथागत यात्रेला निघतील असे त्यांना वाटले.
३. त्या वेळी इसीदत्त आणि पूर्ण ह्या नावाचे दोन राज्याधिकारी काही कामानिमित्त साधुका येथे राहिले होते. त्यांना असे कळले की, ‘पुष्कळसे भिक्खू तथागतांसाठी चीवर तयार करण्यात दंग आहेत. तीन महिन्यात चीवर तयार झाले की, तथागत यात्रेला निघतील असे त्यांना वाटते.’
४. तेव्हा इसीदत्त आणि पूर्ण ह्यांनी एका माणसाला रस्त्यावर उभे राहण्यास सांगितले. त्याला सांगितले, “जेव्हा भगवान, अर्हत, सम्यक्-सम्बुद्ध तुला येताना दिसतील तेव्हा धावत य्रेऊन आम्हाला कळव.”
५. दोन तीन दिवस त्या माणसाने तिथे राहून त्यांची प्रतीक्षा केल्यानंतर त्याला दूरवरून तथागत येताना दिसले. धावत येऊन त्याने इसीदत्त आणि पूर्ण ह्यांना सांगितले, “भगवान, अर्हत्, सम्यक्-सम्बुद्ध येत आहेत. आपल्याला जे काही करावयाचे असेल ते करावे.”
६. तेव्हा इसीदत्त आणि पूर्ण हे राज्याधिकारी तथागतांना समोरे गेले आणि त्यांच्या समीप गेल्यावर त्यांनी तथागतांना अभिवादन केले व ते तथागतांच्या मागून पावले टाकीत चालू लागले.
७. नंतर तथागत राजमार्ग सोडून बाजूला गेले. तिथे एका वृक्षाच्या खाली त्यांच्यासाठी सिद्ध करण्यात आलेल्या आसनावर ते बसले. इसीदत्त व पूर्ण ह्यांनी त्यांना अभिवादन केले व ते एका बाजूला बसले. बसल्यावर ते तथागतांना म्हणाले,
८. भगवान, आम्हाला जेव्हा समजले की, आपण कोशल देशात यात्रेसाठी जाणार आहात तेव्हा तथागत आमच्यापासून दूर चालले ह्याचे आम्हाला वाईट वाटले.”
९. “भगवान, आम्हाला जेव्हा समजले की, आपण श्रावस्ती सोडून कोशल देशात यात्रेसाठी चालला आहात, तेव्हा तथागत आमच्यापासून दूर जाणार ह्या विचाराने आम्ही पुन्हा विवश व खिन्न झालो.”
१०. “भगवान, आणि आम्हाला जेव्हा समजले की, तथागत कोशल सोडून मल्ल देशात जाणार आहेत, नव्हे गेलेही; तेव्हा आम्ही निराश व खिन्न झालो.”
११. “भगवान पुन्हा आम्ही ऐकले की, तथागत मल्लदेश सोडून वज्जीदेशात जाणार.. आणि ते गेलेही.. की ते वज्जीदेश सोडून काशीला जाणार.. आणि ते गेलेही.. की ते काशी सोडून मगध देशात यात्रेला जाणार आणि ते गेले, तेव्हा तथागत आमच्यापासून दूर चालले म्हणून आम्ही निराश व खिन्न झालो.”
१२. “पण भगवान, आम्हाला जेव्हा समजले की, तथागत मगध सोडून काशीला येणार आणि ते तसे निघाले; तेव्हा आम्हाला आनंद झाला आणि आमची हृदये उचंबळून आली, की तथागत आमच्याजवळ आले.”
१३. “आणि जेव्हा आम्ही ऐकले की, तथागत काशीमध्ये संचार करीत आहेत तेव्हा आम्हाला तसाच आनंद झाला.”
१४. (नंतर तथागतांच्या काशी ते वज्जी, वज्जी ते मल्लदेश, आणि मल्लदेश ते कोशलपर्यंतच्या संचाराचे तसे वर्णन करून ते म्हणाले, )
१५. “पण भगवान, जेव्हा आम्ही ऐकले की, तथागत कोशलदेशाहून श्रावस्तीच्या दिशेने संचारास निघाले तेव्हा तथागत आमच्या अगदी समीप येणार म्हणून आम्हांला आनंद झाला व आमची हूदये उचंबळून आली.”
१६. “जेव्हा आम्ही ऐकले की, तथागत श्रावस्तीमध्ये अनाथपिण्डिकाच्या जेतवनविहारात वस्तीला राहिले आहेत तेव्हा तथागत आमच्या निकट आहेत ह्याचा आम्हाला आनंद होऊन आमची हृदये उचंबळून आली.”