Leaving Vesali

Leaving Vesali

Part II—Leaving Vesali

Leaving Vaishali PDF in English

सप्तम खंड: भ्रमणिकाची अंतिम यात्रा

भाग दुसरा: वैशालीचा निरोप

Leaving Vesali

Previous page                                    Next Page

 

१. वैशालाली प्रणाम

१. आपल्या अंतिम प्रवासास निघण्यापूर्वी भगवान बुद्ध राजगृही गृधकूट पर्वतावर राहात होते.

२. तिथे काही काळ वास्तव्य केल्यानंतर ते म्हणाले, “आनन्द ! चल आपण अम्बलठिठकेला जाऊ या.” 

३. “जशी आपली आज्ञा.” आनन्द सम्मतिदर्शक स्वरात म्हणाला. महाभिक्खूसंघ सोबत घेऊन ते अम्बलठिठकेला  गेले.

४. काही काळ अम्बलठिठकेला वास्तव्य करून ते नालन्दाला गेले. 

५. नालन्दाहून ते मगध देशची राजधानी असलेल्या पाटलीग्रामास गेले. 

६. पाटलीग्रामाहून कोटिग्रामाला आणि कोटीग्रामाहून नादिका येथे ते गेले. 

७. ह्या प्रत्येक स्थानी ते काही दिवस थांबले आणि भिक्खू संघासाठी किंवा उपासकांसाठी त्यांनी तिथे प्रवचने केली.

८. नादिकेहून ते वैशालीस गेले.

९. वैशाली हे महावीराचे जन्मस्थान होते आणि म्हणूनच जैनधर्माचा तो एक दुर्गही होता.

१०. तरी पण लवकरच तिथल्या नागरिकांना आपल्या धम्माकडे वळविण्यात बुद्ध यशस्वी झाले. 

११. असे सांगतात की, अवर्षणामुळे वैशालीत असा दुष्काळ पडला की, त्यामुळे अनेक लोक मृत्युमुखी पडले.

१२. वैशालीच्या जनतेने सभा बोलावून ह्याबद्दल तक्रार केली.

१३. पुष्कळ वादविवाद होऊन अखेर सर्वांनी भगवान बुद्धांना नगरास येण्याचे निमंत्रण देण्याचा निर्णय घेतला. 

१४. बिम्बिसार राजाचा मित्र व वैशालीचा एक लीच्छवी पुरोहित-पुत्र महाली ह्याला निमंत्रण करण्यासाठी पाठविण्यात आले.

१५. भगवान बुद्धानी निमंत्रणाचा स्वीकार केला व पाचशे भिक्खुंसह ते निघाले. वज्जियांच्या प्रदेशात त्यांनी  प्रवेश केला न केला तोच विजेच्या गडगडाटासह वादळ होऊन मुसळधार वर्षाव झाला व दुष्काळाची समाप्ती झाली.

१६. वैशालीच्या जनतेने भगवान बुद्धांचे जे अपूर्व स्वागत केले त्याचे कारण मुख्यत: हेच होय. 

१७. भगवान बुद्धांनी त्यांची हृदये जिंकल्यामुळे वैशालीच्या जनतेने सहजच उत्साहाने त्यांना प्रतिसाद दिला. 

१८. नंतर वर्षावासाचा समय आला. भगवान बुद्ध वर्षावासासाठी वेळूवनास गेले आणि भिक्खूंना वैशालीतच वर्षावास करण्यास त्यांनी सांगितले.

१९. वर्षावासानंतर भगवान पुन्हा वैशालीला आले. कारण वैशालीचा निरोप घेऊन पुढील प्रवासास जाण्याचे त्यांनी योजिले होते.

२०. एके दिवशी भगवान बुद्धांनी सकाळीच वस्त्रे परिधान केली आणि भिक्षापात्र घेऊन भिक्षेसाठी वैशालीत त्यांनी प्रवेश केला. भिक्षाटनानंतर त्यांनी भोजन केले. मग वैशालीकडे गजराजाप्रमाणे दृष्टिक्षेप टाकून त्यांनी आनन्दास सांगितले, “आनन्दा, वैशालीची ही माझी अखेरची दृष्टिभेट आहे.”

२१. असे म्हणून त्यांनी वैशालीजनांचा निरोप घेतला.

२२. त्या पुरातन नगराच्या उत्तर सीमेवर जेव्हा त्यांनी त्यांचा निरोप घेतला तेव्हा त्या लिच्छवीजनांना त्यांनी आपले भिक्षापात्र स्मृती म्हणून प्रदान केले. 

२३. ही त्यांची वैशालीची अखेरची भेट होती. त्यानंतर पुनर्भेटीसाठी ते जगले नाहीत. 

 

२. पावा येथे वास्तव्य

१. भगवान बुद्ध वैशालीहून भण्डयरामास गेले.

२. भण्डग्रामाहून हठिग्रामास व तिथून भोग-नगरास ते गेले.

३. भोग-नगराहून ते पावा येथे गेले.

४. पावा येथे भगवान बुद्ध चुन्द नामक लोहाराच्या आम्रवनात वास्तव्यासाठी गेले.

५. भगवान बुद्ध पावा येथे आले असून ते आपल्या आम्रवनात उतरले आहेत असे चुन्दाने ऐकले.

६. चुन्द आम्रवनात गेला आणि भगवानाच्या समीप जाऊन बसला. भगवानांनी त्याला धर्मोपदेश केला.

७. ह्यामुळे आनन्दित होऊन चुन्द भगवानांना म्हणाला, “उद्या माझ्या घरी भिक्खुंसहवर्तमान भगवानांनी येऊन भोजन घेण्याची कृपा करावी.” 

८. आणि भगवान बुद्धांनी मौनानेच जणू सम्मती दर्शविली. भगवानांनी आपल्या आमंत्रणाचा स्वीकार केला हे जाणून चुन्दाने प्रयाण केले. 

९. दुसर्या दिवशी चुन्दाने आपल्या घरी खीर वगैरे मिष्टानाबरोबर ‘सूकर-मह्वां’चीही सिद्धता केली. तयारी होताच त्याने भगवानांना कळविले, “भगवान, वेळ झाली. भोजन तयार आहे !”

१०. भगवानांनी वस्त्रे परिधान केली आणि भिक्षापात्र घेऊन भिक्खूंसह वर्तमान ते चुन्दाच्या घरी आले आणि त्याने सिद्ध केलेल्या भोजनाचे ग्रहण केले. 

११. भोजनानंतर भगवानांनी चुन्दास पुन्हा धर्मोपदेश केला आणि आसनावरून उठून ते निघाले. 

१२. चुन्दाने सिद्ध केलेले भोजन भगवानांना मानवले नाही. त्यामुळे त्यांना घोर आजार जडला. अतिसारामुळे त्यांना मरणप्राय वेदना होऊ लागल्या. 

१३. पण भगवानांनी ‘स्मृति-सम्प्रजन्य’ चा नियोग करून सर्व सहन केले.

१४. आम्रवनात परतल्यानंतर मलशुद्धी झाल्यानंतर भगवान आनन्दाला बोलले, “चला, आपण कुशिनाराला जाऊ या.” आणि मग सर्व जण पावाहून निघाले. 

 

३. कुशिनारा येथे आगमन

१. भगवान बुद्ध थोडासा रस्ता चालून गेले तोच त्यांना विश्रांतीची जरूरी भासू लागली. 

२. मार्गातून थोडेसे बाजूला जाऊन एका वृक्षाखाली ते बसले आणि आनन्दाला म्हणाले, “आनन्दा, वस्त्राची घडी 

करून माझ्याकरिता बिछाईत कर. मी थकलो आहे. काही काळ विश्रांतीची मला गरज आहे.”

३. “जशी आपली आज्ञा !” आनन्द म्हणाला आणि त्यांच्या आज्ञेप्रमाणे त्याने वस्त्राची चौघडी करून बिछाईत तयार केली.

४. भगवान बुद्ध त्यावर आसनस्थ झाले. 

५. आसनस्थ झाल्यावर ते आनन्दाला म्हणाले, “आनन्दा थोडे पाणी आण. तहान लागली आहे. पाणी प्यावे म्हणतो.”

६. आनन्द म्हणाला, “ककुत्थ नदी इथून जवळच आहे. तिचे पाणी स्वच्छ, चविष्ट, शीतल आणि पारदर्शक आहे. प्रवाहात उतरणेही सुलभ व आल्हाददायक आहे. भगवानांनी तिथे चलावे. म्हणजे पाणी पिता येईल आणि हातपाय धुऊन बरे वाटेल. ह्या जलाशयाचे पाणी निर्मल नाही, घाणेरडे आहे.” 

७. भगवान बुद्धांचा देह इतका दुर्बल झाला होता की, ते नदीजवळ जाऊ शकत नव्हते. जवळच्या जलाशयातल्या पाण्यावरच त्यांनी समाधान मानले.

८. आनन्दाने पाणी आणले आणि भगवानांनी ते प्राशन केले. 

९. थोडा वेळ विश्रांती घेऊन भगवान बुद्ध भिक्खूंसह कुकुत्थ नदीकडे गेले. तिथे आल्यावर ते पाण्यात उतरले आणि त्यांनी स्थान व जलप्राशन केले. दुसर्या तीरावरून ते बाहेर आले आणि आम्रवनाकडे त्यांनी प्रयाण केले.

१०. तिथे पोहोचल्यावर त्यांनी बिछाईत पसरण्यास पुन्हा सांगितले. “मी थकलो आहे, जरा पडावे असे वाटते.” त्यांच्या आज्ञेप्रमाणे वस्त्राच्या चौघडीची बिछाईत करण्यात आली आणि भगवान त्यावर विश्रांतीसाठी आडवे  झाले.

११. काही काळ विश्रांती घेतल्यानंतर भगवान उठून बसले आणि आनन्दाला म्हणाले, “आनन्दा ! आपण मल्लांच्या शालवनात जाऊ या. हिरण्यवतीच्या दुसर्या तीरावर कुशिनारात ते उपवन आहे.” 

१२. आनन्दाबरोबर ते तिथे जाऊन पोहचले व दोन शालवृक्षांच्या मध्ये आपल्या वस्त्राच्या चौघडीची बिछाईत घालण्यास सांगताना आनन्दाला ते म्हणाले, “मी थकलो आहे, इथे पडावे असे वाटते.” 

१३. आनन्दाने बिछाईत तयार केली आणि भगवान बुद्ध त्यावर जाऊन पहुडले.

Previous page                                    Next Page


 The Buddha and His Dhamma, by Dr. B. R. Ambedkar
error: Content is protected !!