Part I—The Meeting of those Near and Dear
The Meeting of those Near and Dear PDF in English
सप्तम खंड: भ्रमणिकाची अंतिम यात्रा
भाग पहिला: निकटवर्तीयांच्या भेटी
Meeting of Near and Dear
१. धम्मप्रचाराची केंद्र
१. धम्मदूतांच्या नियुक्तीनंतर भगवान बुद्ध स्वत: कोणत्या एका ठिकाणीच बसून राहिलेत असे नाही. आपले धम्मदूताचे कार्यही त्यांनी सुरू ठेवले.
२. आपलें धम्मप्रचाराचे कार्य काही विशिष्ट स्थळे निवडून त्या ठिकाणी त्यांनी केंद्रित केले होते असे वाटते.
३. अशा केंद्रांपैकी ‘श्रावस्ती’ व *राजगुह'” ही प्रमुख होती.
४. त्यांनी श्रावस्तीला सुमारे ७५ वेळा व राजगृहाला सुमारे २४ वेळा भेट दिली होती.
५. आणखी इतर काही स्थळीही धम्मप्रचाराची छोटी केंद्रे होती.
६. जसे कपिलवस्तु इथे ते सहा वेळा गेले होते, वैशाली इथेही ते सहा वेळा गेले आणि कम्मासधम्म इथे चार वेळा.
२. त्यांच्या भेटीची स्थाने
१. आपल्या धम्मप्रचाराच्या प्रवासात उपयुक्त लहानमोठ्या केंद्रांशिवाय इतरत्रही त्यांनी भेटी दिल्या.
२. ते उक्कठा, नादिका, साला, अस्सपुर, धोषिताराम, नालन्दा, आप्पण, एतुमा येथे गेले.
३. ते ओपसाद, इच्छा-नडगंल, चण्डाल-कप्प, कुशिनारा येथे गेले.
४. ते देवदह, पावा, अम्बसण्डा, सेतव्या, अनुपिया आणि उजुन्ना येथे गेले.
५. त्यांनी भेट दिलेल्या स्थळांची नावे पाहिली म्हणजे असे समजते की, शाक्यदेश, कुरुदेश व अंगदेश ह्या ठिकाणी त्यांनी प्रवास केला होता.
६. सामान्यत: असे म्हणावयास हरकत नाही की, त्यांनी सर्व उत्तर भारताची यात्रा केली होती.
७. ह्या स्थानाची संख्या जरा कमी वाटते; पण त्यामध्ये अंतर किती आहे ? लुम्बिनीपासून राजगृह अडीचशे मैलांपेक्षा कमी लांब नाही. ह्यावरून अंतराची थोडीशी कल्पना येऊ शकेल.
८. ही सर्व यात्रा भगवान बुद्धांनी पायी केली. त्यांनी बैलगाडीचासुद्धा उपयोग केला नाही.
९. ह्या यात्रेत त्यांना वाटेत राहण्यासाठी कुठेही जागा उपलब्ध नव्हती. नंतर मात्र त्यांच्या गृहस्थ उपासकांनी विहार व विश्रांतीस्थाने बांधल्यामुळे त्यांची व त्यांचा भिक्खुंची प्रवासात विश्राम करण्याची सोय होऊ शकली. बहुधा भगवान बुद्ध रस्त्यालगतच्या वृक्षाच्या छायेत [येत राहात असत.
१०. त्यांचा संदेश स्वीकारण्यास जे सिद्ध होते त्यांचे संदेह व अडचणींचे निवारण करीत, जे जे त्यांना विरोध करण्यास उद्युक्त झाले होते त्यांच्याशी वादविवाद करून उत्तर देत व जे अजाण बालकाप्रमाणे मार्गदर्शनासाठी येत त्यांना सन्मार्ग दाखवित भगवान बुद्धांची एका स्थळापासून दुसर्या स्थळापर्यंत, एका गावापासून दुसर्या गावापर्यंत यात्रा चालू राही.
११. भगवान बुद्ध जाणून होते की, जे लोक त्यांचा उपदेश ऐकण्यास येत असत ते सर्वच बुद्धिमान नव्हते, तसेच निविकल्प मनोवृत्तीचे नव्हते.
१२. त्यांनी आपल्या भिक्खूंना सूचना दिली होती की, श्रोतृवर्ग तीन प्रकारचा असू शकतो.
१३. निर्बुद्ध–ज्या मूर्खाला काहीही दिसू शकत नाही, तो पुन्हापुन्हा भिक्खूकडे जातो, त्यांचे भाषण आदि-मध्य- अंत असे संपूर्ण ऐकतो, पण त्याला काहीच उमजत नाही. त्याला बुद्धी मुळीच नसते.
१४. ह्याहून चांगला म्हणजे जो मन एकाग्र करु शकत नाही असा. तो पुन:पुन्हा भिक्खूंकडे जातो, त्यांचे भाषण आदि-मध्य अन्त असे संपूर्ण ऐकतो आणि तसे करीत असताना त्याला ते सर्व उमजतेही; पण तिथून उठल्यावर मात्र काहीच त्याच्या ध्यानात राहात नाही. त्याचे मन कोरे असते.
१५. ह्याहूनही श्रेप्ठ म्हणजे प्रगल्भ ज्ञानी माणूस. तो पुन:पुन्हा भिक्खूकडे जातो, त्यांचे भाषण आदि-मध्य अन्त असे संपूर्ण ऐकतो. तसे करताना त्याला ते सर्व उमजते, सर्व काही स्मरणात राहते. स्थिर, निश्चल आणि धर्म व धार्मिक विषयांत तज्ज्ञ.
१६. असे असूनही भगवान बुद्ध धर्मप्रचारामाठी गावोगावी न कंटाळता जात असत.
१७. भिक्खूंप्रमाणे त्यांच्याशी तीनपेक्षा जास्त चीवर कधीही नसत. ते फक्त दिवसातून एकदाच अन्नग्रहण करीत आणि दररोज सकाळी दारोदार भिक्षा मागून अन्न जमवित.
१८. कोणत्याही माणसाने इतके कठीण काम पार पाडले नसेल आणि तेही इतक्या प्रसन्नतेने.
३. माता-पुत्राची आणि पति-पत्नींची अंतिम भेट
१. आपल्या मृत्यूपूर्वी महाप्रजापती व यशोधरा ह्यांची भगवान बुद्धाशी भेट होऊ शकली.
२. कदाचित ही त्यांची अंतिम भेट असावी.
३. प्रथम महाप्रजापती त्यांच्याजवळ गेली आणि तिने त्यांची पूजा केली.
४. तिने कृतज्ञतेने त्यांचे आभार मानले. कारण त्यांनी तिला सद्धर्माने प्राप्त होणारे समाधान दिले होते. कारण तिला अध्यात्मिक जन्म लाभला होता. कारण त्यांच्यामुळे तिच्या शरीरात धम्माचा विकास झाला होता. कारण त्यांच्याच धम्मरूपी दुधाचे पान तिने केले होते. कारण त्यांच्याच सहाय्याने तिने भवसागर पार केला होता–बुद्धाची जननी समजली जाण्यात तिचा केवढा तरी गौरव झाला होता !
५. आणि नंतर तिने आपली विनंती त्यांच्यापाशी सादर केली- “आता ह्या देहाचा त्याग करुन मृत्यूचा स्वीकार करावा अशी माझी इच्छा आहे. हे दु:खनाशिन् भगवान ! मला हे करण्यास अनुमती दे !”
६. यशोधरेने भगवान बुद्धांना उद्देशून म्हटले की, ती आता अठ्ट्याहत्तर वर्षांची झाली आहे. त्यावर भगवान बुद्ध म्हणाले की, त्यांचेही आता ऐंशीआवे वर्ष सुरू आहे.
७. यशोधरेने सांगितले की, आजची रात्र ही तिची अखेरची आहे. महाप्रजापतीपेक्षा तिचा स्वर अधिक संयमित होता. महाप्रजापतीप्रमाणे तिने त्यांच्याशी मरणाची अनुमती मागितली नाही किंवा त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या आश्रयाचीही याचना केली नाही.
८. उलट ती त्यांना म्हणाली, “मीच माझे आश्रयस्थान आहे.”
९. आपल्या जीवनातील सर्व विघातक प्रवृत्तींवर तिने विजय मिळवला होता.
१०. ती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यास आली होती. कारण त्यांनीच तिला मार्ग दाखविला आणि शक्ती दिली होती.
४. पिता-पुत्रांची अंतिम भेट
१. एकदा भगवान बुद्ध राजगृहाच्या वेळुवनात राहात होते. त्याच वेळी राहुल अम्बलठिठका येथे राहात होता.
२. संध्याकाळ होता होता भगवान बुद्ध समाधी संपवून राहुलकडे गेले. त्यांना दुरुन येताना पाहून राहुलने त्यांच्यासाठी आसन सिद्ध केले व पादप्रक्षालनासाठी पाणी ठेवले.
३. राहुलने ठेवलेल्या आसनावर बसून भगवान बुद्धांनी आपले पाय धुतले. राहुलने त्यांना अभिवादन केले व एका बाजूस जाऊन तो बसला.
४. राहुलला उद्देशून भगवान बुद्ध म्हणाले, “ जाणूनबुजून खोटे बोलण्याचा ज्याला संकोच वाटत नाही त्याने शक्य असलेले कोणतेही पाप कर्म करायचे बाकी ठेवलेले नाही असे मी म्हणतो. म्हणून राहुल ! तू अशी शिस्त लावून घे की, थट्टेतसुद्धा खोटे बोलले जाणार नाही.”
५. “ तसेच प्रत्येक गोष्ट करताना व प्रत्येक शब्द बोलताना व प्रत्येक विचार मनात आणताना तू पुन्हा पुन्हा चिंतन कर.”
६. तुला एखादी गोष्ट करावयाची असेल तेव्हा तू नीट विचार कर की, ती करण्याने तुला, इतरांना किवा दोघांनाही अपाय होईल काय, आणि म्हणून ती दु:खोत्पादक किंवा दु:खपरिणत आहे काय ? विचारांती जर तुला वाटले की, ती तशीच आहे तर ती तू करू नकोस.”
७. “ पण जर तुझी खात्री पटली की, तिच्यात अपाय नसून हितच आहे तर ती तू करावी.”
८. “ प्रेमळ मैत्रीत तुझा विकास व्हावा. असे होण्याने द्वेषभावना नष्ट होईल.”
९. “करुणेत तुझा विकास व्हावा. असे होण्याने पीडा नष्ट होईल.”
१०. “ परहितसंतोषात तुझा विकास व्हावा. असे होण्याने पराऊगमुखता नष्ट होईल.”
११. “ संयमित शांत वृत्तीत तुझा विकास व्हावा. असे होण्याने विसंगती नष्ट होईल.”
१२. “ देह भ्रष्टतेच्या चिंतनात तुझा विकास व्हावा. असे होण्याने विकारवशता नष्ट होईल.”
१३. “ नश्वरतेच्या जाणीवेत तुझा विकास व्हावा. असे होण्याने अहंकार गळून पडेल.”
१४. असे भगवान बुद्धांनी सांगितले. त्यांच्या उपदेशाने राहुल हषित होऊन प्रसन्न झाला.
५. भगवान बुद्ध आणि सारिपुत्त ह्यांची अंतिम भेट
१. भगवान बुद्ध श्रावस्तीच्या जेतवनातील गन्धकुटी विहारात राहात होते.
२. पाचशे भिक्खुंसह सारिपुत्त तिथे आला.
३. त्यांना अभिवादन करून सारिपुत्त म्हणाला की, पृथ्वीवरील आपल्या जीवनाचा अंतिम दिवस समीप आला आहे. भगवान बुद्ध आता आपणाला देहत्यागाची परवानगी देतील काय ?
४. भगवान बुद्धांनी सारिपुत्ताला विचारले की,परिनिर्वाणासाठी त्याने स्थान निश्चित केले आहे काय ?
५. सारिपुत्ताने त्यांना सांगितले, “मगध देशातील नालेक नावाच्या गावी माझा जन्म झाला. ज्या घरात माझा जन्म झाला ते घर अजूनही तिथे आहे. ते माझे घर माझ्या परिनिर्वाणासाठी मी निवडले आहे.”
६. भगवान बुद्ध म्हणाले, “प्रिय सारिपुत्ता ! तुला बरे वाटेल ते कर.”
७. भगवान बुद्धांच्या चरणांवर डोके ठेवून सारिपुत्त म्हणाला, “आपल्या चरणवन्दनाच्या प्रतिष्ठेच्या एकमेव आशेसाठी एक सहस्त्र कल्पांपर्यंत मी पारमितांचा अभ्यास केला होता. माझी ही इच्छा आता सफळ झाली आहे, आणि त्यामुळे माझ्या आनंदाला पारावार उरलेला नाही.”
८. “पुनर्जन्मावर आपला विश्वास नाही. त्या अर्थी हीच आपली अन्तिम भेट. माझ्या अपराधांबद्दल भगवानांनी मला क्षमा करावी. माझी अखेर आता समीप आली आहे.”
९. “सारिपुत्त क्षमा करण्यासारखे काहीच उरलेले नाही.” भगवान बुद्ध म्हणाले.
१०. जेव्हा सारिपुत्त जाण्यासाठी उठला तेव्हा त्याच्या सन्मानार्थ भगवान बुद्ध उठले आणि गन्धकुटी विहाराच्या सज्जात जाऊन उभे राहिले.
११. तेव्हा सारिपुत्त भगवानांना म्हणाला, “जेव्हा आपले पहिले दर्शन घडले तेव्हा मला आनंद झाला. आता आपले दर्शन झाले त्यामुळे मला अत्यानंद झाला. आपले हे शेवटचे दर्शन आहे हे मी जाणून आहे. पुन्हा आपले दर्शन होणार नाही.”
१२. आपले दोन हात जोडून भगवानांकडे पाठ न करता सारिपुत्त तिथुन निघून गेला.
१३. त्यावर उपस्थित भिक्खूवर्गास भगवान बुद्ध म्हणाले, “आपल्या ज्येष्ठ बंधूच्या मागे जा.” भिक्खूवर्ग प्रथमच भगवानांना सोडून सारिपुत्तामागे त्यांच्या आज्ञेप्रमाणे गेला.
१४. आपल्या गावी पोहोचल्यावर सारिपुत्ताने आपल्या घरातील ज्या खोलीत त्याचा जन्म झाला होता त्याच खोलीत देह ठेवला.
१५. सारिपुत्तांचे दहनसंस्कार केले गेले व त्याच्या अस्थी भगवान बुद्धांपाशी नेल्या गेल्या.
१६. सारिपुत्ताच्या अस्थी स्वीकारल्यावर भगवान बुद्ध भिक्खुंना म्हणाले, “तो सर्वोच्च विद्वान होता. त्याव्यापाशी संग्रहवृत्तीचा लेशही नव्हता. तो उत्साही आणि कष्टाळू होता. त्याला पापाची घृणा वाटत असे. भिक्खुंनो, त्याच्या अस्थींकडे ध्यान द्या. क्षमाशीलतेत तो पृः थ्वीसमान होता. त्याने आपल्या मनात क्रोधाला कधीही प्रवेश करू दिला नव्हता. कोणत्याही इच्छेच्या आहारी तो गेला नव्हता. विकारवशतेवर त्याने विजय मिळविला होता. करुणा, बंधुभाव आणि प्रीती ही त्याच्या ठायी परिपूर्ण होती.
१७. त्याच सुमारास महामोग्गलायन राजगृहासमीप एका एकान्तविहारात राहात होता. भगवान बुद्धांच्या शत्रूंनी नियुक्त केलेल्या मारेकर्यांनी त्याची हत्या केली.
१८. महामोग्गलायनाच्या दु:खद मृत्यूचे वृत्त भगवान बुद्धांना सांगितले गेले. सारिपूत्त आणि महामोग्गलायन हे त्यांचे प्रमुख शिष्य होते. त्यांना धम्म सेनापती असे म्हटले जात असे. आपली धम्म-परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी तेया उभयतांवर अवलंबून होते.
१९. आपल्या हयातीत झालेल्या त्यांच्या निधनाने भगवान बुद्ध अधिक व्यथित झाले होते.
२०. आता श्रावस्तीत राहण्यात त्यांना स्वारस्य उरले नाही म्हणून तिथून निघण्याचे त्यांनी ठरविले.