Part II — Different Views of the Buddha’s Dhamma
Different Views of the Buddha’s Dhamma PDF in English
तृतीय खंड: भगवान बुद्धाने काय शिकविले?
भाग दुसरा: भगवान बुद्धाच्या धम्मासंबंधी
Different Views of the Dhamma
१. इतरांच्या मताने बुद्धाने काय शिकविले?
१. भगवान बुद्धाची शिकवणूक कोणती?
२. त्या प्रश्नासंबंधी त्याच्या कोणत्याही दोन अनुयायांत किंवा बौद्ध धम्माच्या अभ्यासकांत एकमत नाही.
३. काहीच्या मते समाधी हा त्याच्या शिकवणकोचा मुख्य गाभा आहे.
४. काहीच्या मते त्यात विपश्यना (म्हणजे एक प्रकारचा प्राणायाम) महत्वाची आहे.
५. काहीच्या मते बौद्ध धम्म म्हणजे केवळ दीक्षितांनाच सांगावयाचा गुप्त मंत्र आहे. तर इतरांना, तो एक, सर्वांना उद्देशून उघडपणे सांगितलेला धम्म वाटतो.
६. काहींच्या मते ती एक रूक्ष दर्शनपद्धती आहे.
७. काहीच्या मते तो केवळ गूढवाद आहे.
८. काहीच्या मते ते एक ऐहिक जीवनापासून स्वार्थी पलायन आहे.
९. काहीच्या मते हृदयातील सर्व वासना आणि भावना यांचा पद्धतशीर विरोध शिकविणारे ते शास्त्र आहे.
१०. बौद्ध धम्मासबंधीचा आणखी पुष्कळच भिन्नमतांचा संग्रह करता येईल.
११. ही मतभिन्नता आश्चर्यकारक आहे.
१२. यांपैकी काही मते एकांगी विचारवंतांची आहेत. असे लोक म्हणजे ज्यांना बौद्धधम्माचे सार, समाधी, विपश्यना किंवा दीक्षितांना प्राप्त होणार्या गुप्त मंत्रात आहे असे वाटते ते लोक.
१३. दुसरी मते, प्राचीन भारतीय इतिहासाच्या अम्यासकांनी बौद्धधम्मासंबंधी जे लिहिले त्या बहुसंख्य लेखकांच्या लेखनाचा परिणाम होय. या लेखकांचा बौद्ध धम्म हा मूळ अभ्यासाचा विषय नसतो. त्यांचा या विषयाचा अभ्यास केवळ आकस्मिक आणि नैमित्तिक स्वरूपाचा असतो.
१४. त्यांच्यापैकी कोणीही बौद्ध धम्माचे अभ्यासक नसतात.
१५. धम्माचा उद्गम आणि विकास याचा विचार करणारे जे मानवशास्त्र त्याचेही ते अभ्यासक नसतात.
१६. प्रश्न असा उद्भवतो की, भगवान बुद्धाला काही सामाजिक संदेश सांगावयाचा नव्हता काय?
१७. या प्रश्नाचे उत्तर देण्याचा आग्रह धरला असता बौद्ध धम्माचे विद्यार्थी दोन मुद्यांचा हवाला देतात. ते म्हणतात-
१८. भगवान बुद्धाने अहिंसा शिकविली.
१९. भगवान बुद्धाने शांती शिकविली.
२०. त्यांना आणखी असा प्रश्न केला की, भगवान बुद्धाने त्याशिवाय दुसरा काही सामाजिक संदेश दिला काय?
२१. भगवान बुद्धाने न्याय शिकविला काय?
२२. भगवान बुद्धाने प्रेम ( मैत्री) शिकविले काय?
२३. भगवान बुद्धाने स्वातंत्र्य शिकविले काय?
२४. भगवान बुद्धाने समता शिकविली काय?
२५. भगवान बुद्धाने बंधुता शिकविली काय?
२६. भगवान बुद्ध कार्ल मार्क्सला उत्तर देऊ शकतो काय?
२७. बौद्ध धम्माची चर्चा करताना हे प्रश्न प्रायः क्वचितच उपस्थित केले जातात.
२८. माझे असे उत्तर आहे की, भगवान बुद्धाला एक सामाजिक संदेश द्यावयाचा होता. तो वरील सर्व प्रश्नांची उत्तरे देतो; परंतु ही सर्व उत्तरे आधुनिक लेखकांनी आपल्या लेखनात अगदी गाडून टाकली आहेत.
२. भगवान बुद्धाने स्वतः केलेले वर्गीकरण
१. भगवान बुद्धाने आपल्या धम्माचे एक वेगळेच वर्गीकरण केले आहे.
२. पहिल्या वर्गाला त्याने धम्म ही संज्ञा दिली.
३. त्याने एक नवा वर्ग निर्मिला आणि त्याला अधम्म असे नाव दिले. तथापि तो धम्म ह्याच नावाने ओळखला गेला.
४. त्याने तिसराही एक वर्ग निर्मिला आणि त्याला सद्धम्म अशी संज्ञा दिली.
५. हा तिसरा वर्ग म्हणजे धम्माच्या तत्वज्ञानाचे दुसरे नाव होय.
६. भगवान बुद्धाचा धम्म समजण्यासाठी धम्म, अधम्म आणि सद्धम्म ह्या तीनही वर्गांची ओळख करून घेतली पाहिजे.