Part I – Buddha’s Place in Buddha’s Dhamma
His Place in His Dhamma PDF in English
तृतीय खंड: भगवान बुद्धाने काय शिकविले ?
भाग पहिला: धम्मामध्ये बुद्धाचे स्थान
His Place in His Dhamma
१. भगवान बुद्धाने आपल्या धम्मात स्वतःसाठी
विशेष स्थान राखलेले नाही
१. ख्रिस्त हा स्वतःला खिश्चन धर्माचा प्रणेता मानीत असे.
२. शिवाय तो आपणाला देवपुत्र मानीत असे.
३. माणसाने ख्रिस्त हा देवपुत्र आहे असे जोपर्यंत मानले नाही, तोपर्यंत त्याला मुक्ती नाही अशी ख्रिस्ताची अट होती.
४. अशा रीतीने ख्रिस्ताने ख्रिस्ती धर्मीयांची मुक्ती, ख्रिस्ताला प्रणेता व देवपुत्र मानण्यावर अवलंबून ठेवल्याने त्याने ख्रिस्ती धर्मात स्वतःसाठी विशेष स्थान निर्माण केले.
५. इस्लाम धर्माचा प्रणेता, महंमद हा स्वत:ला परमेश्वराचा पैगंबर ( प्रेषित ) मानीत असे.
६. याशिवाय तो असे मानीत असे की, माणसाने दोन अटी मान्य केल्या शिवाय त्याला निजात (मुक्ती ) नाही.
७. इस्लाम धर्मातील मुमुक्षूने प्रथम महंमदास देवाचा ( प्रेषित ) मानले पाहिजे.
८. इस्लाम धर्मातील मुमुक्षूने नंतर महंमद हा परमेश्वराचा शेवटचा पैगंबर आहे असे मानले पाहिजे.
९. इस्लाम धर्मात वरील दोन अटी मानण्याऱ्यानाच मोक्षाचा मार्ग खुला आहे.
१०. मुसलमानांचा मोक्ष हा महंमदाला ‘देवप्रेषित’ समजण्यावर अवलंबून ठेवल्यामुळे महंमदाने आपणा स्वतःला इस्लामी धर्मात स्थान निर्माण केले आहे.
११. भगवान बुद्धाने अशी कधीही अट घातली नाही.
१२. शुद्धोदन आणि महामाया यांचे आपण औरस पुत्र आहोत ह्यापलीकडे स्वतःसंबधी तो अधिक काही म्हणत नाही.
१३. येशू ख्रिस्त आणि महंमद यानी आपापल्या धर्मशासनात स्वतःसाठी जशी विशेष स्थाने निर्मिली, मोक्षाच्या मार्गात आपले महत्व सांगितले, तसे भगवान बुद्धाने केलेले नाही.
१४. ह्यामुळेच त्यांच्या वैयक्तीक जीवनासंबंधी विपुल माहिती उपलब्ध असता नाही ती आपल्यापर्यंत येऊन पोहोचली नाही.
१५. पहिली बुद्धसंगीती ही बुद्धाच्या निर्वाणानंतर लवकरच भरविली गेली हे सर्वश्रुतच आहे.
१६. या संगीतीच्या अध्यक्षस्थानी काश्यप हा होता आणि त्या वेळी बुद्धाच्या कपिलवस्तुचेच रहिवाशी आणि ज्यांनी त्याच्याबरोबर त्याच्या निर्वाणकाळापर्यंत परिभ्रमण केले ते आनंद आणि उपाली त्या संगीतीला उपस्थित होते.
१७. परंतु अध्यक्ष काश्यपाने काय केले?
१८. त्याने आनंदाला धम्माचे पठण करायला सांगून संगीतीला प्रश्न केला, ‘हे बरोबर आहे काय?” ज्या ज्या वेळी संगीती होकारात्मक उत्तर देई, त्या त्या वेळी काश्यप त्या प्रश्नावर अधिक चर्चा होऊ न देता तो प्रश्न तिथेच संपवी.
१९. यानंतर त्याने उपालीला विनयाचे पाठ म्हणायला सांगितले आणि संगीतीला विचारले, ‘हे बरोबर आहे काय?” संगीतीने होकारात्मक उत्तर देताच त्या प्रश्नावर अधिक चर्चा न वाढविता अध्यक्ष काश्यप तो प्रश्न तिथेच संपवी.
२०. ह्या पठणानंतर वस्तुतः काश्यपाने संगीतीत उपस्थित असलेल्या कोणाला तरी भगवान बुद्धांच्या जीवनातील काही हा महत्वाच्या घटना कथन करण्याची आज्ञा द्यावयास होती.
२१. परंतु काश्यपाने असे काहीच केले नाही. त्याने असा विचार केला असावा की, संघाला आपण विचारलेल्या केवळ दोन प्रश्नांशीच कर्तव्य आहे.
२२. काश्यपाने भगवान बुद्धाच्या जीवनातील प्रमुख घटनांचे संकलन केले असते तर आज आपणाला भगवान बुद्धाचे संपूर्ण चरित्र उपलब्ध झाले असते.
२३. भगवान बुद्धाच्या जीवनातील घटनांचे संकलन करण्याचे काश्यपाला का सुचले नसावे?
२४. केवळ उपेक्षा हे त्याचे उत्तर होऊ शकत नाही. ह्याचे उत्तर म्हणजे भगवान बुद्धाने आपल्या धम्मशासनात आपणा स्वतःसाठी विशेष स्थान निर्मिलेले नाही हेच होय.
२५. भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म या दोन अगदी अलग गोष्टी होत.
२६. भगवान बुद्ध स्वत:ला आपल्या धम्मशासना पासून अलग मानीत असे. याचे दुसरे उदाहरण म्हणजे आपला उत्तराधिकारी नेमण्यास त्याने दिलेला नकार.
२७. दोन तीन वेळेला त्याच्या अनुयायांनी, त्याच्या पश्चात अधिकार ज्याने चालवायचा त्याचा निर्देश करण्याची विनंती केली.
२८. आणि प्रत्येक वेळी भगवान बुद्धाने तसे करण्याचे नाकारले.
२९. धम्म हाच आपला स्वत:चा उत्तराधिकारी, असे त्याचे प्रत्येक वेळी उत्तर असे.
३०. धम्म हा स्वत:च्या सामर्थ्यानेच जगला पाहिजे. त्याच्या मागील माणसांच्या सत्तेने नव्हे.
३१. ज्या धम्माला जगायला पाठीमागे माणसांच्या सत्तेचे बळ लागते. तो धम्मच नव्हे.
३२. धम्माची सत्ता चालावयास प्रत्येक वेळी, संस्थापकाचे नाव घेणे आवश्यक भासत असेल, तर तो धम्मच नव्हे.
३३. धम्म आणि त्यातील आपले स्थान यांसबंधी भगवान बुद्धाचा दुष्टीकोन अशा प्रकारचा होता.
२. बुद्धाने मोक्षदानाचे आश्वासन दिले नाही. तो म्हणे, मी ‘मार्गदाता’ आहे, मोक्षदाता” नव्हे.
१. बहुतेक धर्म हे साक्षात्कारी धर्म म्हणून वणिले जातात, परंतु भगवान बुद्धाचा धम्म हा साक्षात्कार नव्हे.
२. साक्षात्कारी धर्म म्हणजे ‘मी तुमचा निर्माता आहे, माझी पूजा करून आत्म्याला मोक्ष मिळवून द्या’ असे प्राणिमात्रास सांगणारा देवाचा संदेश.
३. हा संदेश बहुधा एखाद्या नियुक्त व्यक्तीच्या म्हणजे प्रेषिताच्या मार्फत पाठविलेला असतो. त्या संदेशाचा प्रेषिताला साक्षात्कार झालेला असतो. आणि प्रेषित लोकांना तो साक्षात्कार उघड करून सांगतो. मग त्याला धर्म असे म्हणतात.
४. प्रेषिताचे काम म्हणजे त्याच्या धर्माशी इमान राखणाऱ्याचा मोक्ष-लाभ निश्चित करणे.
५. धर्माशी इमान राखणार्यांचा मोक्ष म्हणजे, जर ते प्रेषिताला देवदूत मानीत असतील आणि त्याने आणलेल्या देवाच्या च्या आज्ञा पाळीत असतील तर त्याची नरकातील पाठवणीपासून सुटका का करणे.
६. भगवान बुद्ध आपण प्रेषित किंवा देवदूत आहोत, असला अधिकार कधीच सांगत नसे आणि असे कोणी मानल्यास त्याचे खंडण करीत असे.
७. अधिक महत्वाचा मुद्दा म्हणजे भगवान बुद्धाचा धम्म हा एक शोध होता आणि म्हणून जे धर्म साक्षात्कारी म्हणून समजले जातात त्यापासून तो अगदी वेगळा समजला पाहिजे.
८. भगवान बुद्धाचा धम्म हा एक शोध आहे, असे म्हणण्याचे कारण पृथ्वीवरील मानवी जीवनाच्या सखोल अभ्यासातून तो उद्भवलेला आहे. ज्या स्वाभाविक प्रवृत्तीत मनुष्य जन्म घेतो, त्यांच्या क्रिया-प्रक्रिया आणि इतिहास व परंपरा ह्यांच्यामुळे त्यांना मिळालेले इष्टानिष्ट वळण ह्यांच्या संशोधनाचा परिणाम म्हणजे बुद्ध धम्म.
९. सर्व प्रेषित मोक्षाचे आश्वासन देतात. मोक्षाचे आश्वासन न देणारा भगवान बुद्ध हाच एक गुरु आहे. मोक्षदाता आणि मार्गदाता यांमध्ये त्याने विभाजक रेषा काढली आहे. एक मोक्ष देणारा आहे तर दुसरा केवळ मार्ग दाखविणारा आहे.
१०. भगवान बुद्ध हा केवळ मार्गदाता होता. मोक्ष हा ज्याचा त्याने आपल्या श्रमाने मिळवावयाचा आहे.
११. आपले हे मत, मोग्गलान ह्या ब्राम्हणाला खालील सूक्तात भगवान बुद्धाने स्पष्ट करून सांगितले आहे.
१२. एकदा भगवान श्रावस्तीत मिगार मातेच्या पूर्वाराम प्रासादात उतरले होते.
१३. नंतर मोग्गलान हा गणक ( हिशेब ठेवणारा ) ब्राम्हण तथागतांजवळ आला आणि स्नेहाने अभिवादन करून त्यांच्या बाजूला बसला. कुशल! क्षेम विचारल्यावर चारल्यावर तो गणक मोग्गलान तथागताला म्हणाला.
१४. “श्रमण गौतमा, ज्याप्रमाणे माणसाला या प्रासादाचे दर्शन क्रमश: होते. पाऊल पुढे पडते, क्रमश: पुढील मार्ग दिसतो. हळूहळू पायऱ्या चढून शेवटची पायरी येते, त्याप्रमाणे आम्हा ब्राम्हणांचे शिक्षण क्रमश: घडते, म्हणजेच आमचे वेदाध्ययन घडते.”
१५. “श्रमण गौतमा, ज्याप्रमाणे अंकगणनेत आणि धनुविद्येत पायरी पायरीने प्रगती होते, त्याप्रमाणेच आम्हा ब्राम्हणांची आपल्या शिक्षणक्रमात क्रमश: प्रगती होते.
१६. “जेव्हा आम्ही शिकवणी देतो तेव्हा शिष्याला एकी एक, दुरकी दोन, तिरकी तीन, चौके चार, असे शंभरांपर्यंत पाढे शिकवितो. गौतमा, आता सांग, तुझ्या धम्मामध्ये अशाच तर्हेंचे प्रगतीशील शिक्षण तुझ्या शिष्यांना मिळते काय?”
१७. “होय ब्राम्हणा, असेच मिळते. ब्राम्हणा, एखाद्या अश्वविद्येतील निपुण पुरुषाचे उदाहरण घेऊ. तो प्रथम जातिवंत घोडा घेऊन, त्याला लगाम घालून पहिला धडा देतो. नंतर तो त्याला अधिकाधिक शिकवू लागतो.”
१८. “ब्राम्हणा, अगदी त्याप्रमाणेच तथागत शिकाऊ माणसाला हाताशी धरतात आणि त्याला पहिला पाठ असा देतात. बंधु! शीलवान हो आणि कर्तव्याच्या जाणीवेने स्वत:ला संयमित कर.”(प्रतिमोक्षाचे नियम पाळीत जा. )
१९. “सदाचारसंपन्न हो! क्षुद्र दोषातही भय आहे, हे ओळखून स्वत:चे वर्तन ठेव. विनयाचे परिपालन कर.”
२०. हे सर्व तो शिकल्यानंतर तथागत त्याला असा दुसरा पाठ देतात, “ ये! श्रमणा ये! डोळ्यांनी वस्तु पाहिली असता तिच्या बाह्य देखाव्याने अथवा तपशिलाने भारला जाऊ नकोस.”
२१. संयमरहित चक्षुरिंद्रियाने रूपग्रहण करताना ज्या सतृष्ण वृत्ती पाण्याच्या पुराप्रमाणे माणसाच्या चित्ताला बुडवून टाकतात त्या दुर्वृत्तींना ताब्यात ठेवण्याचा सतत प्रयत्न करीत रहा. चक्षुरिंद्रियाविषयी सावधान रहा. चक्षुरिंद्रिये संयमित ठेव.
२२. इतर इंद्रियांबाबतही असाच निग्रह कर. जेव्हा कानाने एखादा आवाज ऐकतोस, नाकाने वास घेतोस, जिव्हेने रुची घेतोस, शरीराने वस्तुला स्पर्श करतोस आणि ज्या वेळी तुझ्या मनाला त्या वस्तूंची जाणीव होते, त्या वेळी त्या वस्तुंच्या सामान्य दर्शनाने अथवा तपशिलाने मोहून जाऊ नकोस.”
२३. शिष्यांनी असे इंद्रिय-प्रभुत्व मिळविले की, नंतर तथागत त्याला दुसरा असा पाठ देतात, “श्रमणा ये, हात राखून खात जा, खाताना चित्त सावध राहू दे. केवळ एक खेळ, किंवा शरीराचे चोचले अथवा वैयक्तीक शरीरसौष्ठव राखण्यासाठी म्हणून खाऊ नकोस. तर शरीरयष्टी ठीक राहावी, तिचे पोषण व्हावे, तिला इजा होऊ नये आणि श्रेष्ठ जीवन जगता यावे यासाठी अन्न भक्षण करावे. भोजनसमयी मनात सदोदित हा विचार असावा की, मी माझ्या पहिल्या वेदनांचा निग्रह करीत आहे. नव्या वेदना उत्पन्न होऊ देणार नाही. माझी जीवनयात्रा निर्दोष आणि सुखपूर्ण होईल.”
२४. नंतर हे ब्राम्हणा, श्रमण अन्नभक्षणाचा निग्रह शिकला की, तथागत त्याला पुढे असा पाठ देतात, “ श्रमणा, ये! जागृततेचा ( सती ) अभ्यास कर. दिवसा, चालता बसता, तू चित्तशुद्धीचा प्रयत्न कर! रात्रीच्या पहिल्या प्रहरीसुद्धा येरझा ऱ्या करीत किंवा एका जागी बसून चित्तशुद्धीची साधना करीत राहा. दुसऱ्या प्रहरी उजव्या कुशीवर सिंहासारखा एक पाय दुस ऱ्या पायावर ठेवून पडून राहा आणि सावध राहून बुद्धीपुरस्सर व एकाग्रतेने चित्तशुद्धीचा विचार कर. तिसर्या प्रहरी ऊठ आणि येरझारा करीत किंवा बसून आपले चित्त, चित्तमलापासून परिशुद्ध कर.”
२५. हे ब्राम्हणा, तो श्रमण जागृततेचा अभ्यासी झाल्यावर तथागत त्याला दुसरा पाठ देतात, तो असा “श्रमणा ये! जागरूकता आणि स्मृती ( सम्यक् जाणीव ) यांनी युक्त हो. पुढे जाताना किंवा मागे येताना आत्मसंयम राखीत जा. पुढे किंवा मागे पाहताना, वाकताना किंवा विसावा घेताना, अंगात वस्त्रे घालताना किंवा वस्त्रे आणि भिक्षापात्र नेत असताना, खाताना, चघळताना, स्पर्श करताना, शरीर व्यापार करताना चालताना, उभे असताना, निद्रिस्त असताना किंवा सावध असताना, बोलताना किंवा मौन धारण केलेले असताना सदैव स्मृतीयुक्त म्हणजेच जाणीवपूर्वक संयम राखीत जा.”
२६. नंतर हे ब्राम्हणा, त्या शिष्याला आत्मसंयम साधता आला तर तथागत त्याला पुढील पाठ देतात. “श्रमणा ये. एखादे एकांताचे स्थान शोधून, मग ते अरण्य असो, एखादा वृक्ष असो, पर्वतगुहा असो, पर्वतगुंफा असो, स्मशानस्थान असो, वनगुल्म असो, आकाशाखालील मोकळी जागा असो, अथवा गवत-पे ढ्यांच्या राशी जवळची जागा असो. तसे एखादे एकांत स्थान तू शोधून काढ आणि अन्नभक्षण केल्यानंतर आसनमांडी ठोकून, शरीर ताठ ठेवून चार प्रकारच्या ध्यानांचा अभ्यास कर.”
२७. “हे ब्राम्हणा, जे श्रमणशिष्य आहेत, ज्यांनी मनोनिग्रह अद्यापी साधलेला नाही; परंतु तो तसा साधण्याची ज्यांना इच्छा आहे त्याना मी असे क्रमिक शिक्षण देतो.”
२८. “परंतु ज्यांनी अर्हतपद प्राप्त केले आहे, ज्यांनी आसवांचा नाश केला आहे, ज्यांनी आपल्या जीवनाचा उद्देश साधला आहे, जे कृतकृत्य झाले आहेत, ज्यांनी आपल्या शिरावरील भार उतरून दिला आहे, मोक्ष मिळविला आहे, ज्यांनी भवबंधनाचा उच्छेद केला आहे, प्रज्ञेने जे विमुक्त झाले आहेत, त्यांना वरील अभ्यासक्रम आपले वर्तमान जीवन सुखपूर्ण आणि जागरूकतेने संयमित राखण्यास उपकारक ठरतो.”
२९. तथागताचे हे भाषण ऐकून तो गणक ब्राह्मण म्हणाला.
३०. “परंतु गौतमा, मला हे सांग की, तुझे सर्व शिष्य अशा तर्हेची परिपूर्णता किंवा निर्वाण मिळवू शकतात काय? किंवा काहीना ते मिळविताना अपयश येते काय?”
३१. “ब्राम्हणा, माझ्या काही श्रावकांना असा उपदेश केला असताना आणि त्याचा त्यांनी अभ्यास केला असताना काहीना निर्वाण साधता येते आणि काहीना ते साधता येत नाही.”
३२. परंतु गौतमा, याचे कारण काय? तिथे ते निर्वाण आहे, इथे हा निर्वाणाकडे जाण्याचा मार्ग आहे. इथे श्रमण गौतमासारखा थोर गुरु आहे. मग ज्यांना तू असा उपदेश केला आहेस, शिक्षण दिले आहेस, त्यांच्यापैकी काहीनाच फक्त निर्वाण साध्य व्हावे व काहीना होऊ नये हे कसे?”
३३. “ब्राम्हणा, त्या प्रश्नाचे तुला मी उत्तर देतो. परंतु प्रथम माइया एका प्रश्नाचे तुला योग्य वाटेल तसे उत्तर द्यावे लागेल. सांग, तुला राजगृहाचा रस्ता पुरा माहीत आहे काय?”
३४. “होय; मला तो पूर्ण माहीत आहे.”
३५. “बरे. मग ह्या रस्त्यासंबधी पुरी माहिती दिली असताना एक मनुष्य चुकीचा मार्ग धरतो आणि पश्चिमेकडेचालू लागतो.”
३६. “नंतर दुसरा मनुष्य येतो, तो मार्गनिर्देशासबंधी तुला विनंती करतो, तू त्याला त्याच सूचना करतोस, तो तुझ्या सूचनेप्रमाणे वागतो आणि सुरक्षितपणे राजगृहाला जाऊन पोहोचतो.”
३७. ब्राम्हण बोलू लागला, “त्याला मी काय करणार? फक्त मार्ग दाखविणे हे माझे काम आहे.”
३८. “ब्राम्हणा, मग मी काय करतो, हे तू ताडले असशीलच. तथागत फक्त मार्गच दाखवितो.”
३९. या सूकतावरून स्पष्ट होते की, बुद्ध हा मोक्षाची आश्वासने देत नाही. तो फक्त मार्ग दाखवितो.
४०. आणि मोक्ष म्हणजे काय?
४१. महंमद आणि येशू ख्रिस्त यांच्या शिकवणुकीत मोक्ष म्हणजे प्रेषिताच्या मध्यस्थीने नरकात जाण्यापासून जीवाला वाचवणे.
४२. भगवान बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे मोक्ष म्हणजे निर्वाण ! आणि निर्वाण म्हणजे रागलोभादी विकाराचा निग्रह.
४३. अशा धर्मात मोक्षाचे वचनबद्ध आश्वासन कसे मिळणार?
३. भगवान बुद्धाने स्वतःसंबंधी अथवा आपल्या धममासंबंधी अपौरुषेयतेचा दावा मांडला नाही. त्याचा धम्ममाणसाने माणसासाठी शोधून काढलेला आहे. तो अपौरुषेय म्हणजे साक्षात्कारी स्वरूपाचा नाही.
१. प्रत्येक धर्माच्या संस्थापकाने आपण किंवा आपली शिकवणूक दैवी असल्याचा हक्क सांगितला आहे.
२. मोझेसने आपली उत्पत्ती दैवी असल्याचे म्हटले नाही, परंतु आपल्या शिकवणुका मात्र दैवी असल्याचे म्हटले आहे. त्याने आपल्या अनुयायांना सांगितले आहे की, दुधामधाच्या प्रदेशात ज्यांना जावयाचे असेल त्यांनी ही शिकवणूक मान्य केली पाहिजे. कारण तो जिव्होवाची म्हणजे ईश्वराचीच शिकवण आहे.
३. येशू ख्रिस्ताने आपण देवपुत्र असल्याचे स्वतःच सांगून दैवीपणावर हक्क सांगितला आहे, स्वाभाविकपणे त्याची शिकवणही दैवी झाली आहे.
४. कृष्ण तर म्हणत असे, मी स्वतः देव आहे आणि गीता हा माझा शब्द आहे.
५. भगवान बुद्धाने मात्र आपल्या शासनासंबंधी किवा स्वत:संबंधी कधीही असा दावा मांडला नाही.
६. तो तर असे म्हणत असे की, आपण इतर माणसासारखे आहोत आणि आपला संदेश म्हणजे एका माणसाने आपणास दिलेला संदेश आहे.
७. आपला संदेश प्रमादातीत आहे, असे त्याने कधीच म्हटले नाही.
८. तो म्हणतो, माझा संदेश म्हणजे माझ्या मताप्रमाणे मोक्षाकडे जाण्याचा एकमेव सत्य मार्ग आहे.
९. त्याचे अधिष्ठान म्हणजे जगातील सर्व माणसांचा जगासंबंधीचा अनुभव !
१०. तो म्हणत असे की, त्यात कितपत सत्य आहे, हे पाहण्यासाठी त्यासंबंधी कोणताही प्रश्न विचारायला आणि त्याचे परीक्षण करायला सर्वांना स्वातंत्र्य आहे.
११. कोणाही धर्मसंस्थापकाने आपल्या धर्माला अशा प्रकारची कसोटी लावण्याचे आव्हान दिलेले नाही.