What is Dhamma

Religion and Dhamma

Part III — What is Dhamma

What is Dhamma PDF in English

तृतीय खंड: भगवान बुद्धाने काय शिकविले?

What is Dhamma

Previous page                                  Next page

 

१. जीवन-शुचिता राखणे म्हणजे धम्म

(क)

(१) 

१. जीवन-शुचितेचे तीन प्रकार आहेत. देहशुचिता म्हणजे काय?

२. माणसाने हिंसा, चोरी आणि मिथ्याचार यांच्यापासून विरत होणे याला देहशुचिता म्हणतात.

३. वाकशूचिता म्हणजे काय?

४. वाकशूचिता म्हणजे असत्य भाषणापासून विरत होणे.

५. आणि मनःशुचिता म्हणजे काय?

६. मनःशुचितेत भिक्षूला कामवासना झाल्यास कळते की, आपल्यामध्ये वैषयिक कामवासना उत्पन्न झाली आहे आणि जर तशी उत्पन्न झाली नसेल तर तेही त्याला कळते. त्याप्रमाणेच आता उत्पन्न न झालेली कामवासना कशी उत्पन्न होते आणि तशी उत्पन्न झाल्यावर तिचा त्याग कसा करता येतो आणि अशी कोणत्या प्रकारे पुढे कधीही उत्पन्न होणार नाही, हे सर्व त्याला कळते.

७. त्याच्या ठिकाणी द्वेष ( व्यापाद ) उत्पन्न झाल्यास त्याला कळते. त्याप्रमाणेच द्वेषाचा उद्भव, त्याचा त्याग आणि भविष्यात द्वेष कसा उत्पन्न होणार नाही, हे सर्व त्याला कळते. 

८. त्याच्या ठिकाणी आळस, तंद्रा (स्त्यान-मृद्ध ) उद्धटपणा, शंका, गोंधळ उत्पन्न झाल्यास त्याची त्याला जाणीव होते. त्याप्रमाणेच या सर्व मानसिक दुःस्थितींचा उद्गम कसा होतो, त्याचा त्याग कसा करता येतो आगि तद्विरहित चित्तस्थिती कशी साधायची असते यांचे ज्ञान असणे म्हणजेच मानसिक शुचिता.

९. “जो काया वाचा मन शुद्ध पवित्र आहे, जो निष्पाप, स्वच्छ आणि पावित्र्ययुक्‍त आहे, 

१०. त्याला लोक ‘निष्कलंक’ म्हणतात.”

(ख)

(२) 

१. शुचितेचे तीन प्रकार आहेत कायेची, वाचेची आणि मनाची शुचिता.

२. कायेची शुचिता म्हणजे काय?

३. कायाशुचितेत मनुष्य हिंसा, चोरी, काम-मिथ्याचार यापासून परावृत्त होतो. याला कायाशुचिता म्हणतात.

४. वाकशुचिता म्हणजे काय?

५. वाकशुचितेत मनुष्य असत्य आणि व्यर्थ बडबड यांपासून दूर राहतो. त्याला वाकशुचिता म्हणतात.

६. मन:शुचिता म्हणजे काय?

७. मनःशुचितेत मनुष्य लोभ आणि ईर्षा यांपासून परावृत्त होऊन सम्यक्‌ दृष्टी धारण करतो. याला मन:शुचिता म्हणतात, शुचितेचे हे तीन प्रकार आहेत.

 (ग)

(३)

 १. पाच प्रकारच्या दुर्बलता आहेत. त्या साधनेला बाधक ठरतात. त्या कोणत्या?

२. जीवहिसा, चोरी, काममिथ्याचार, असत्य भाषण, आळस वाढविणार्या मद्याचे सेवन.

३. ह्या पाच दुर्बलता साधनेतील अपयशाची पाच कारणे आहेत.

४. साधनेतील ह्या पाच बाधा दूर केल्यावर चार प्रकारच्या सावधानतेचा ( स्मृति-उपस्थानांचा ) मनात उद्भव घडेल असे वागले पाहिजे. 

५. पहिल्या सावधानतेत भिक्षु, ऐहिक जीवनातील सर्वसामान्य असा लोभ आणि असंतोष यांवर विजय मिळवून, प्रयत्नपूर्वक जागरूकतेने आणि स्वाधीन चित्ताने, कायेला ती केवळ काया असे मानून ( कायानुपश्यना करीत ) जीवन व्यतीत करतो.

६. वेदनांना त्या केवळ वेदना आहेत असे मानून ( वेदनानुपश्यना करीत ) जीवन व्यतीत करतो.

७. चित्त, हे चित्त आहे असे मानून ( चित्तानुपश्यना करीत ) जीवन व्यतीत करतो.

८. चित्तात उत्पन्न होणारे विचार ( धर्म ) ते केवळ चित्तधर्म आहेत, असे मानून  ( धर्मानुपश्यना करीत ) प्रयत्नपूर्वक, जागरूकतेने आगि स्वाधीनचित्ताने सर्व सामान्य लोभ आणि असंतोष यांच्यावर विजय मिळवितो.

९. जेव्हा साधनेतील पाच दुर्बलता दूर होतात तेव्हा चार सावधानतांचा ( स्मृति-उपस्थानाचा ) उदय होतो. 

(घ)

(४) 

१. घात ( अपयश ) तीन प्रकारचे आहेत. शीलघात, चित्तघात, आणि दृष्टिघात. 

२. शीलघात म्हणजे काय? जीवहत्या, चोरी कामभोगासंबंधी मिथ्याचार, असत्य भाषण, निदा, कटु भाषण, व्यर्थ बडबड-हे सर्व शीलघातात अंतर्भूत होतात. 

३. चित्तघात कोणत्या प्रकारचे असतात? 

४. लोभ आणि दृष्टपणा हे चित्तघात होत.

५. दृष्टिघात कोणत्या प्रकारचे असतात?

६. दुष्टिघातामुळे माणुस असा विकृत दृष्टिकोन स्वीकारतो की, दान, त्याग, परित्याग यांमध्ये काहीच गुण नाही. सदाचार आणि दुराचार यांना काही फल नाही की त्याचा परिणामही घडत नाही. इहलोक नाही की परलोक नाही, आई नाही की बाप नाही, आणि प्राणी स्वोत्पन्नही नाही. या जगामध्ये ज्यांनी अत्युच्च शिखर गाठले आहे,पूर्णता मिळविली आहे, ज्यांना आपल्या आंतरिक शक्‍तीने या ऐहिक जगापली कडल्या जगाचा साक्षात्कार झाला आहे, आणि जे त्या जगाच्या अस्तित्वाची घोषणा करू शकतात असे श्रमण आणि ब्राम्हण या जगात नाहीत, असे जे समजतात त्या लोकांच्या ठिकाणी हे भिक्षूहो, दृष्टिधात झाला आहे असे समजावे.

७. भिक्खुंनो ! शीलघात, चित्तघात आणि दृष्टिघात या तीन घातांमुळे प्राण्याला मरणानंतर दुर्गती प्राप्त होते,असे हे तीन घात आहेत.

८. भिक्खुंनो, लाभ तीन प्रकारचे असतात. ते म्हणजे शीललाभ, चित्तलाभ, दृष्टिलाभ.

९. शीललाभ म्हणजे काय?

१०. “हिंसा, चोरी, मिथ्याचार, असत्य भाषण, निदा, कटु भाषण, व्यर्थ बडबड यांच्यापासून परावृत्त होणे म्हणजे शीललाभ होय.”

११. चित्तलाभ म्हणजे काय?

१२. “लोभ आणि दुष्टपणा यांपासून दूर राहणे म्हणजे चित्तलाभ होय.”

१३. दृष्टिलाभ म्हणजे काय?

१४. “दान, त्याग, परित्याग यांमध्ये काही पुण्य आहे, सदाचार आणि दुराचार यांची फळे आणि परिणाम भोगावे लागतात, इहलोक आपि परलोक आहे, आईबाप आणि स्वोत्पन्न प्राणी आहेत, ज्यांना या जगापलीकडील दुसर्या जगाचा साक्षात्कार झाला आहे आणि जे तशी त्याची घोषणा करू शकतात असे श्रमण आणि ब्राम्हण आहेत, अशी दृढ समजूत म्हणजे दृष्टिलाभ. भिक्षुन्नो! या समजुतीला दृष्टिलाभ म्हणतात.”

१५. या तीन लाभांमुळेच प्राण्याला शरीरनाशानंतर दैववान स्वर्गीय सुगती लाभते. भिक्खुंनो, असे हे तीन लाभ आहेत. 

२. जीवनात पूर्णता साधणे म्हणजे धम्म होय

१. तीन प्रकारच्या पूर्णता असतात.

२. कायिक, वाचिक आणि मानसिक.

३. मानसिक पूर्णता कोणत्या प्रकारची असते?

४. आसवे अथवा चित्तमल पुरा नष्ट होऊन ह्या जीवनात संपूर्ण चित्त-विमुक्‍तीचा अनुभव घेणे, प्रज्ञेने आसवांपासून विमुक्‍ती मिळवून त्याच अवस्थेत सतत वर्तणे ह्यासच मानसिक पूर्णता म्हणतात.

५. आणखीही पारमिता आहेत, आणि भगवान बुद्धाने त्या सुभूतीला सांगितल्या.

६. सुभूति: बोधिसत्वाची दान-पारमिता कोणत्या प्रकारची असते?

७. तथागत: बोधिसत्व चित्ताच्या अवस्थांची जाणीव ठेवून अंतर्बाह्य वस्तुचे दान करतो आणि त्या सर्व प्राणिमात्रांना दिल्यावर ‘बोधि’ ला त्या अर्पण करतो. दुसर्यांनाही तो तसे करण्याची प्रेरणा देतो. कुठल्याही वस्तूबद्दल त्याच्या मनात आसक्ती नसते. ह्या अवस्थेला दान-पारमिता म्हणतात. 

८. सुभूतिः बोधिसत्वाची शील-पारमिता कशी असते? 

९. तथागत: या पारमितेत तो स्वतः सदाचाराची दहा पथ्ये पाळीत असतो, आणि इतरांना तसे करण्याची  प्रेरणा देतो.

१०. सुभूतिः: बोधिसत्वाची क्षान्ति-पारमिता कशी असते? 

११. तथागत: या पारमितेत तो स्वतः क्षमाशील होऊन इतरांना तसे होण्याची प्रेरणा देतो. 

१२. सुभूतिः: बोधिसत्वाची वीर्य-पारमिता कशी असते? 

१३. तथागत: या पारमितेत तो पाचही पारमितांच्या परिपूर्तीत अखंड मग्न राहतो, आणि इतरांनाही तसेच करण्याची प्रेरणा देतो. 

१४. सुभूति: बोधिसत्वाची समाधी ही पारमिता कशी असते? 

१५. तथागत: या पारमितेत कौशल्याने तो ध्यान साधतो; तथापि तो तत्संबंधित रूप-लोकात परत जन्म घेत नाही, आणि इतरांनाही तो तसेच करण्याची प्रेरणा देतो. 

१६. सुभूति: बोधिसत्वाची प्रज्ञा-पारमिता कशी असते? 

१७. तथागत : या पारमितेत तो कोणत्याही एका धर्मात ( भौतिक अथवा आधिभौतिक ) मग्न न राहता सर्व धर्माच्या अभिजात स्वरूपाचे चिंतन करीत असतो, आणि तसे करण्यास इतरांना प्रेरणा देतो. 

१८. अशा पारमिता अंगी बाणविणे यालाच धम्म म्हणतात. 

३. निब्बाण प्राप्त करणे हा धम्म आहे

१. निब्बाणासारखे परमसुख दुसर्या कशानेही लाभत नाही असे भगवान बुद्धाचे वचन आहे.

२. भगवान बुद्धाने शिकविलेल्या सर्व सिद्धांताचा निब्बाण हा केन्द्रवर्ती सिद्धान्त आहे. 

३. निब्बाण म्हणजे काय? बुद्धप्रणीत निब्बाण हे बुद्धपूर्व लोकानी सांगितलेल्या निब्बाणापेक्षा अर्थाने आणि आशयाने वेगळे आहे. 

४. बुद्धपूर्व लोक निब्बाण म्हणजे आत्म्याचा मोक्ष असे मानीत असत. 

५. चार प्रकारचा मोक्ष पूर्वी मानला जात असे. पहिला लौकिक म्हणजे खा-प्या, मजा करा-या जड-स्वरूपाचा. दुसरा यौगिक, तिसरा ब्राम्हणी आणि चौथा औपनिषदिक.

६. ब्राम्हणी आणि औपनिषदिक निब्बाण कल्पनेत एक साम्य होते. या दोनही कल्पनांत आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व आहे, असे मानले जाई. भगवान बुद्धाने या सिद्धांतांचा निषेध केला आहे म्हणून निब्बाणविषयक ब्राम्हणी आणि औपनिषदिक शिकवणुकीचे खंडन करणे भगवान बुद्धाला कठीण गेले नाही. 

७. निब्बाणाची लौकिक-कल्पना ही अत्यंत जड स्वरूपाची असल्यामुळे भगवान बुद्धास ती कधीच प्रिय नव्हती. कारण या लौकिक-कल्पनेत माणसाच्या प्राणी म्हणून ज्या ऐंद्रिय भुका असतात, त्यांचे शमन करणे, ह्यापलीकडे दुसरा आशय नाही. त्यात आध्यात्मिक असे काहीच नव्हते.

८. असली निब्बाणाची कल्पना मान्य करणे ण म्हणजे बुद्धाच्या मते मानवाची अत्यंत हानी करण्यासारखे खख आहे.

९. कारण ऐंद्रिय भुकांचे शमन करणे म्हणजे अधिक भुका निर्माण करण्यासारखे आहे. अशा प्रकारचा जीवनमार्ग कोणत्याही प्रकारचे सौख्य मिळवून देऊ शकत नाही. उलट त्याने येणार्या सुखाने अधिक दुःख निश्चितपणे वाट्यास येते.

१०. योगातील निब्बाण कल्पना म्हणजे एक केवळ तात्पुरती अशी अवस्था होती. त्याने मिळणारे सुख हे नकारात्मक स्वरूपाचे होते, आणि ते मिळविण्यासाठी सर्व संसार-पराडमुख व्हावे लागते. त्याच्या योगाने वेदना टाळता येतात; परंतु सुख मिळत नाही, आणि सुख मिळालेच तर ते योग चालू आहे तोपर्यंतच. ते स्थायी स्वरूपाचे नव्हते. अस्थायी स्वरूपाचे होते.

११. भगवान बुद्धाची निब्बाणविषयक कल्पना त्याच्या पूर्वीच्या मतप्रणाली पेक्षा वेगळी होती.

१२. त्याच्या निब्बाण कल्पनेत तीन विचारांचा अंतर्भाव होतो. 

१३. आत्म्याच्या मोक्षाऐवजी प्राण्याचे सुख हा एक विचार.

१४. जिवंतपणी ह्या सर्व संसारात असताना मिळणारे सुख हा दुसरा विचार. आत्म्याचा मोक्ष आणि मृत्यूनंतर आत्म्याला मोक्ष मिळणे हे दोन विचार बुद्धाच्या निब्बाण कल्पनेला अगदी अपरिचित आहेत. 

१५. भगवान बुद्धाच्या निब्बाण कल्पनेतील मूल आधार असा तिसरा विचार म्हणजे सदैव प्रज्वलित असणार्या विकारांच्या ज्वालांवर निग्रह साधणे. 

१६. गयेत राहात असताना बुद्धाने भिक्खूंना जे प्रवचन दिले त्याचा मुख्य विषय राग आणि द्वेष हे प्रज्वलित अग्नीसारखे होत हा आहे. तो म्हणाला, 

१७. “भिक्खू, अखिल संसार हा म्हणजे एक पेटता अग्नीच आहे आणि संसारातील कोणकोणत्या वस्तु जळत आहेत? 

१८. भिक्खुंनो! चक्षुरिंद्रिय हे पेटलेले आहे. रूप पेटलेले आहे. चक्षुसंस्कार हे पेटलेले आहेत. डोळ्यांनी होणारी जाणीव ( चक्षुसंस्कार ) ही पेटलेली आहे. चक्षुसंस्कारा पासून उद्भवणार्या सुखकारक, दुःखकारक,  अदु:खकारक गोष्टी ह्याही जळत आहेत.

१९. आणि त्या कशामुळे पेटलेल्या आहेत?

२०. त्या रागाय्रीने, द्वेषाय्नीने, मोहाय्नीने, जन्म, जरा, मृत्यु, दुःख, दौर्मनस्य त्याप्रमाणेच उपायास आणि निराशा यामुळे जळत आहेत.

२१. भिक्खुंनो! श्रोत्रेंद्रिय जळत आहे. शब्द जळत आहे. प्राणेंद्रिय जळत आहे. गंध जळत आहे. जिव्हा जळत आहे. रस जळत आहे. शरीर जळत आहे. चित्तातील संकल्प-विकल्प जळत आहेत. चित्तसंस्कारापासून ज्या सुखवेदना, दुःखवेदना, अदु:खवेदना उत्पन्न होतात. त्या सर्व वेदना जळत आहेत. 

२२. आणि ह्या कशामुळे जळत आहेत?

२३. त्या रागाय्रीने, मोहाय्नीने, जन्म, जरा, मृत्यु, दुःख, दौर्मनस्य याप्रमाणेच उपायास त्यांच्यामुळे जळत आहेत.

२४. हे जाणल्यावर, भिक्षूंनो! प्रज्ञावान श्रेष्ठांच्या मनात उपेक्षा ( विरक्ती )उत्पन्न होते. या उपेक्षेमुळे त्यांच्या ठिकाणचे रागाय़्री आदि विकार मावळतात आणि विकाराच्या अभावामुळे तो मुक्‍त होतो आणि मुक्‍त  झाल्यावर त्याला आपल्या मुक्‍तीची जाणीव होते.

२५. निब्बाणामुळे सुख कसे मिळते? या दुसर्या प्रश्‍नाचे उत्तर देणे आता आवश्यक आहे. 

२६. एक सर्वसामान्य समजूत आहे की, माणसाला पुरेसे मिळाले नाही की, तो दुःखी होतो, परंतु ही समजूत काही त्रिकाळ सत्य नाही. भोवती समृद्धी आणि संपन्नता असूनसुद्धा मनुष्य दुःखी राहतो. 

२७. हा लोभाचा परिणाम आहे आणि लोभ हा गरीब आणि श्रीमंत या दोघांच्याही जीवनाचा शाप आहे.” 

२८. हा विचार भिक्खूंना दिलेल्या एका प्रवचनात भगवान बुद्धाने स्पष्ट केला आहे. 

२९. लोभाने लुब्ध आणि रागाने क्षुब्ध, मोहाने मूढ झाल्यामुळे माणसे स्वत:च्या व इतरांच्या दुःखाबद्दलचे  विचार मनात घोळवू लागतात आणि त्यामुळे त्यांना मानसिक वेदना आणि पीडा अनुभवाव्या लागतात. 

३०. परंतु जर लोभ, राग, मोह यांचा पूर्ण उच्छेद केला तर माणुस स्वतःच्या दु:खाने दुःखी होत नाही, त्याचप्रमाणे दुसर्याच्या दु:खाने दु:खी होत नाही. अथवा मानसिक वेदना आणि पीडा अनुभवीत नाही.

३१. आणि असे झाले की, बंधूंनो! ते हवेसे वाटणारे आणि आकर्षक आणि जे बुद्धिवान श्रावकांनाच साध्य असे ते निब्बाणभविष्य जीवनात नव्हे तर ते इहजन्मी हस्तगत होऊ शकते.

३२. माणसाला दग्ध करणारे आणि त्याला असुखी करणारे असे, दु:खाचे मूळ कशात आहे, हे वरील  प्रवचनात स्पष्ट झाले आहे. माणसांच्या रागद्वरेषावर अग्नीचे रूपक योजून बुद्धाने येथे माणसाच्या असुखाचे परिणामकारक स्पष्टीकरण केले आहे.

३३. रागद्रेषाच्या आधीन होने मनुष्य दुःखी होतो. राग, द्वेष हे विकार म्हणजे मनुष्याच्या निब्बाणस्थितीपर्यंत पोहोचण्याच्या मार्गात अडचणी निर्माण करणार्या शुंखलाच आहेत. ज्या क्षणी मनुष्य ह्या विकारांपासून मुक्‍त होतो त्या क्षणीच तो निब्बाण मार्ग आक्रमू लागतो. 

३४. भगवान बुद्धाच्या मते ह्या विकारांचे तीन प्रकारचे वर्ग आहेत. 

३५. पहिल्या वर्गात तृष्णेतून उद्भवणारे कामुकता आणि लोभ हे विकार येतात. 

३६. दुसर्या वर्गात वितृष्णेतून उद्भवणारे घृणा, क्रोध आणि द्वेष हे दोष येतात.

३७. तिसर्या वर्गात अविद्येतून उद्गवणारे जडता, मूर्खता आणि मूढता हे दोष येतात. 

३८. पहिल्या (राग) व दुसर्या (द्वेष) अग्नीचा संबंध भावना आणि दुसर्या संबंधीचा दृष्टिकोन आणि भूमिका यांच्याशी निगडित आहे. तर तिसर्या प्रकारचा अग्नी (मोह) हा जे सर्व विचार सत्यापासून भिन्न असतात त्यांच्याशी निगडित आहे. 

३९. भगवान बुद्धाच्या निब्बाण सिद्धांतासंबंधी काही गैरसमजुती आहेत.

४०. निब्बाण शब्दाचा व्युत्पत्तीदृष्टय़ा अर्थ फुंकर घालून विझविणे किंवा मालविणे असा आहे.

४१. या शब्दाच्या व्युत्पत्तीचा आधार घेऊन टीकाकारांनी निब्बाणसिद्धांत अर्थहीन बनविला आहे.

४२. ते असे मानतात की, निब्बाण म्हणजे सर्व मानवी विकार मालविणे , आणि ही क्रिया मृत्यूसमान आहे.

४३. असा वाकडा अर्थ लावून त्यांनी निब्बाण सिद्धांत हास्यास्पद बनविण्याचा प्रयत्न केला आहे. 

४४. टीकाकार लावतात तसा निब्बाणाचा अर्थ बुद्धाला अभिप्रेत नव्हता. हे जो कोणी अग्नी-प्रवचना( अश्रिस्कंधोपम सूक्ताचा ) भाषादृष्ट्या अभ्यास करतील त्यांच्या लक्षात येईल.

४५. अग्निस्कंधोपम सूक्तात जीवन म्हणजे अग्नी आणि मृत्यु म्हणजे तो मालविणे असे म्हटलेले नाही. तिथे  म्हटले आहे की, रागाग्री, द्रेषाग्री आणि मोहाग्नी जळत आहेत.

४६. सर्व प्रकारज्या प्रवृत्तींना पूर्णपणे मालवून टाकावे असे अग्नीसूक्त म्हणत नाही. ते एवढेच म्हणते की, पेटत्या ज्वालेला अधिक इंधन पुरवू नका.

४७. दुसरी गोष्ट अशी की, टीकाकार निब्बाण आणि परिनिब्बाण यांत भेद न करण्यात चुकले आहेत.

४८. उदानात असे सांगितले आहे, “जेव्हा शरीर नाश पावते, पाहाणे थांबते, संज्ञा नाहीशा होतात, चलन-वलनादी क्रिया थांबतात, चेतना जाते, तेव्हा परिनिब्बाण घडते. परिनिब्बाण म्हणजे पूर्णपणे मालविणे, नाहीसे होणे.”

४९. निब्बाण ह्या शब्दाच्या ठिकाणी वरील अर्थ नाही. निब्बाण म्हणजे धम्म मार्गावर वाटचाल करता येईल इतका पुरेसा आपल्या प्रवृत्तीवर ताबा असणे. यापेक्षा निब्बाण शब्दात अधिक अर्थ अभिप्रेत नव्हता.

५०. निब्बाण हा निर्दोष जीवनाला प्रतिशब्द आहे हे बुद्धाने राधला एके ठिकाणी स्पष्ट करून सांगितले आहे.

५१. एकदा स्थविर राध तथागताकडे गेला. तथागतांना अभिवादन केल्यावर त्यांच्या समीप बसून त्याने विचारले, “भगवान, निब्बाण म्हणजे काय?”

५२. भगवंतानी उत्तर दिले, “निब्बाण म्हणजे निर्दोष जीवन.”

५३. “भगवान्‌, परंतु निब्बाणाचा उद्देश काय?”

५४. “राध, निर्दोष जीवन हा निब्बाणाचा उद्देश आहे. निब्बाण हे जीवनाचे ध्येय आणि साध्य आहे.”

५५. निब्बाण म्हणजे मालविणे किंवा नाश नव्हे हे बुद्धाने सारिपुत्ताला पुढील प्रवचनात स्पष्ट केले आहे :

५६. एकदा भगवान श्रावस्तीतील अनाथ पिंडिकांच्या आश्रमात वास करीत होते. सारीपुत्तही त्या वेळी त्या ठिकाणी राहात होता. 

५७. भिक्खुंना उद्देशून भगवन्त म्हणाले, “भिक्षुंनो, ऐहिक संपदेऐवजी धम्माचे तुम्ही दायाद व्हा.  तुमच्याविषयी वाटणार्या करुणेने तुम्हाला धम्मातील वाटा मिळावा, म्हणून मी तुम्हांला धम्माचे दायाद बनवीत आहे. 

५८. असे बोलून भगवान आपल्या गंधकुटीत गेले.

५९. सारीपुत्त मागे राहिला आणि भिश्षूंनी त्याला निब्बाणाचा अर्थ स्पष्ट करण्यास सांगितले.

६०. तेव्हा सारीपुत्त म्हणाला, “लोभ हा दोष आहे. द्वेष हा दोष आहे.” 

६१. “हा लोभ आणि हा द्वेष घालविण्याचा मार्ग, मध्यममार्ग होय. हा मार्ग आपल्याला पाहायला शिकवितो, जाणायला शिकवितो आणि ज्ञान देतो. तो आपणाला शांती, अभिज्ञा, बोधी आणि निब्बाण यांजकडे नेतो.” 

६२. “हा मध्यममार्ग कोणता? हा मध्यममार्ग म्हणजे अष्टांगमार्ग होय. त्याशिवाय दुसरा नाही. सम्यक्‌ दृष्टी,सम्यक्‌ संकल्प, सम्यक्‌ वाणी, सम्यक्‌ कर्मान्त, सम्यक्‌ आजीविका, सम्यक्‌ प्रयत्न (व्यायाम ), सम्यक्‌ स्मृती आणि सम्यक्‌ समाधी. भिक्षूंनो, हा मध्यममार्ग आहे.” 

६३. “होय. क्रोध, द्वेष, ईर्षा, मत्सर, कृपणता, लालचीपणा, ढोंग, लबाडी, उद्धटपणा, मोह, प्रमाद, हे सर्व दुष्ट विकार आहेत.” 

६४. मोह आणि प्रमाद यांचा परिहार मध्यममार्गाने होतो; त्याच्या योगाने पाहायला दृष्टी मिळते. हा मार्ग आपणाला पाहायला शिकवितो आणि ज्ञान देतो आणि आपणाला शांती, अभिज्ञा, बोधी आणि निब्बाण यांकडे नेतो. 

६५. निब्बाण हे दुसरे काही नसून तो अष्टांगमार्ग आहे. 

६६. अशा रीतीने सारिपुत्ताने निब्बाणाचे प्रवचन केले आणि भिक्षूंना ते ऐकून आनंद वाटला. 

६७. निब्बाणात जो मूलभूत विचार आहे तो म्हणजे अष्टांगमार्ग. अष्टांगमार्गाशिवाय निब्बाणाला दुसरा अर्थ नाही. 

६८. प्रवृत्तींचा संपूर्ण अच्छेद आणि परिनिब्बाण ही दोन टोके आहेत आणि निब्बाण हा त्यातील मध्यममार्ग आहे.

६९. हे लक्षात घेतले असता निब्बाणाच्या कल्पनेसंबधीच्या गोंधळाचा निरास होईल.

४. तृष्णा-त्याग म्हणजे धम्म

१. धम्मपदामध्ये भगवान बुद्ध म्हणतो, सर्वात अधिक लाभदायक गोष्ट म्हणजे आरोग्य आणि सर्वात मौल्यवान धन म्हणजे संतोष.

२. या संतोषवृत्तीचा अर्थ दीनपणा किंवा परिस्थितीपुढील शरणागती हा नव्हे. 

३. कारण तसा अर्थ करणे बुद्धाच्या शिकवणुकीविरुद्ध आहे.

४. निर्धन लोक धन्य होत असे बुद्धाने कधीही म्हटलेले नाही.

५. पीडिताने आपली परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करू नये, असे बुद्धाने कधीही सांगितलेले नाही.

६. उलट तो ऐश्वर्याचे स्वागतच करतो. दीनपणे प्राप्त परिस्थितीत खितपत पडण्यापेक्षा वीर्याने म्हणजे उत्साहपूर्वक प्रयासाने ती परिस्थिती बदलण्याचा तो उपदेश करतो.

७. जेव्हा भगवान बुद्ध म्हणतो की, संतोष हे सर्वश्रेष्ठ धन होय, तेव्हा त्याच्या म्हणण्याचा अर्थ एवढाच की, माणसाने अमर्याद अशा लोभाच्या आधीन होऊ नये. 

८. भिक्खु रथपाल म्हणतो, ‘माझ्यासमोर कित्येक श्रीमंत मनुष्य आहेत की, ते मुर्खपणाने यत्किचितही दान न करता केवळ धन जमविण्याच्या उद्योगात यागात गर्क असतात; त्यांची तृष्णा कधीही शमत नाही. ज्या राजांची राज्ये समुद्रापर्यंत पसरलेली लेला असतात त्यांचाकडे पाहावे तर ते आपले साम्राज्य समुद्रापलीकडे फैलावण्यासाठी सारखे धडपडत असतात. प्राप्त आहे त्यापेक्षा अधिक प्राप्त व्हावे अशी इच्छा करीत राजे आणि त्यांची प्रजा या पृथ्वीतलावरून नष्ट होते. पाहिजे होते ते मिळालेले नाही या विचारातच त्यांचा देहत्याग घडतो. कामभोगाचे पुरेपूर माप कोणाच्याच पदरात पडत नाही. 

९. महानिदान सूक्तांत भगवान बुद्धाने आनंदाला लोभ-संयमनाची महती सांगितली आहे; तेथे तो म्हणतो, 

१०. “आनंद, लाभाच्या इच्छेने तृष्णा निर्माण होते, आणि जेव्हा त्या इच्छेचे मालमत्ता मिळविण्याच्या इच्छेत पर्यवसान होते, आणि जेव्हा ही स्वामित्वाची इच्छा मिळविलेले हातातून निसटू द्यायचे नाही असा चिवटपणा धारण करते, तेव्हा त्या इच्छेचे लोभात रूपान्तर होते.” 

११. लोभ अथवा अमर्याद धनसंग्रहाच्या इच्छेसंबंधी सतत सावध राहिले पाहिजे. 

१२. ही तृष्णा किवा हा लोभ आक्षेपार्ह का समजायचा? याचे कारण बुद्ध आनंदाला सांगतो ते असे की, पुष्कळच वाईट आणि दृष्ट गोष्टींचा त्याच्यापासून उद्लव होतो. मारामारी, आघात, झगडे, वादप्रतिवाद, भांडण, निदा, असत्य ह्या सर्वांचे मूळ तृष्णा अथवा लोभ यांत आहे. 

१३. वगकलहाचे हे यथातथ्य विश्लेषण आहे यात शंका नाही.

१४. म्हणूनच भगवान बुद्धाने लोभ आणि तृष्णा आपल्या काबूत ठेवली पाहिजे या शिकवणुकीवर भर दिला. 

५. सर्व संस्कार अशाश्वत आहेत असे मानणे म्हणजे धम्म

१. अनित्यतेच्या सिद्धांताला तीन पैलू आहेत.

२. अनेक तत्वांनी बनलेल्या वस्तु अनित्य आहेत.

३. व्यक्‍तीगत रूपाने प्राणी अनित्य आहे.

४. प्रतीत्य समुत्पन्न वस्तुचे आत्मतत्व अनित्य आहे.

५. अनेक तत्वे मिळून बनलेल्या वस्तूंची अनित्यता बौद्धतत्ववेत्ता असंग याने चांगल्या प्रकारे स्पष्ट केली आहे.

६. असंग म्हणतो, ‘सर्व वस्तु ह्या हेतू आणि प्रत्यय ह्यांमुळे उत्पन्न होतात. त्यांना त्यांचे असे अगदी स्वतंत्र अस्तित्व नसते. हेतू प्रत्ययांचा उच्छेद झाला की, वस्तूंचे अस्तित्व ठरत नाही. 

७. सजीव प्राण्याचे शरीर म्हणजे पृथ्वी, आप, तेज, आणि वायू-या चार महाभूतांचा परिणाम होय; आणि ह्या चार भूतांचे पृथक्करण झाले की, हा प्राणी, प्राणी म्हणून उरत नाही. 

८. अनेक तत्वे मिळून झालेली वस्तु अनित्य आहे ह्या वचनाचा अभिप्राय वरील प्रकारचा आहे. 

९. सजीव प्राण्याच्या अनित्यतेचे वर्णन ‘तो नाही, तो होत आहे’, ह्या शब्दात करता येईल. 

१०. ह्या अर्थाने पाहिले असता, जो प्राणी भूतकाळात जीवन व्यतीत करीत होता तोच प्राणी वर्तमानकाळात असू  शकत नाही. आणि तोच प्राणी भविष्यकाळात असू शकणार नाही. भविष्यकाळी जो प्राणी असेल तो पूर्वी नव्हता आणि तोच आजही नाही. वर्तमानकाळी जो प्राणी आहे तोच पूर्वी नव्हता आणि पुढेही तोच असणार नाही. 

११. थोडक्यात सांगायचे म्हणजे मनुष्यप्राणी हा परिवर्तनशील आणि संवर्धनशील आहे. आपल्या जीवनाच्या कोणत्याही दोन क्षणी तो तोच असू शकत नाही. 

१२. अनित्यतेच्या सिद्धांताचा तिसरा पैलू सामान्य माणसाला समजायला कठीण आहे. 

१३. प्रत्येक सजीव प्राणी केव्हा ना केव्हा तरी मरणार हे समजायला सोपे आहे. 

१४. परंतु तो जिवंत असताना सारखा बदलत आहे किंवा बनत आहे हे समजावयास कठीण आहे. 

१५. हे परिवर्तन कसे शक्‍य आहे? याला भगवान बुद्धाचे उत्तर असे : ‘सर्वच अनित्य असल्यामुळे हे शक्‍य आहे.

१६. ह्याच विचारसरणीतून पुढे शून्यवादाचा उदय झाला. 

१७. बौद्ध शून्यवाद म्हणजे पूर्णपणे अनास्तित्ववाद नव्हे. त्याचा अर्थ एवढाच की, ह्या ऐहिक जगात प्रतिक्षणी परिवर्तन चालू आहे. 

१८. शून्यतेमुळेच सर्व अस्तित्व शक्‍य होते ही गोष्ट फार थोड्यांच्या लक्षात येते. शून्यतेशिवाय काहीही शक्‍य झाले नसते. सर्व वस्तूंच्या स्वभावाच्या अनित्यतेवरच इतर दुसर्या वस्तूंचे अस्तित्व अवलंबून आहे. 

१९. जर वस्तु सतत परिवर्तनशील नसत्या, नित्य व अपरिवर्तनशील असत्या, तर एका प्रकारापासून दुसर्या  प्रकारात जीवनाचे जे उत्क्रमण आणि सजीव वस्तूंचा जो विकास चालला आहे त्याला विराम मिळाला असता. 

२०. जर मनुष्यप्राणी मरणाधीन अथवा परिवर्ततशील नसता आणि एकाच स्थितीत तसाच राहिला असता, तर काय परिणाम झाला असता? असे झाले असते तर मानवजातीची प्रगती खुंटली असती.

२१. शून्य म्हणजे अभाव असे मानले असते तर मोठीच अनवस्था उद्भवली असती. 

२२. परंतु तसे मानलेले नाही. शून्य हा एक बिंदूसमान पदार्थ असून त्याला आशय आहे, परंतु त्याला लांबी रुंदी नाही. 

२३. भगवान बुद्धाचा उपदेश असा की, सर्व वस्तु अनित्य आहेत. 

२४. भगवान बुद्धाच्या ह्या सिद्धांतापासून बोध काय घ्यावयाचा हा अति महत्वाचा प्रश्‍न आहे.

२५. या अनित्यतेच्या सिद्धांतापासून असा बोध घ्यावयाचा की, कोणत्याही वस्तुसंबंधी आसक्ती राखू नका. 

२६. लोकांनी मालमत्ता, मित्र इत्यादीसंबंधी अनासक्‍तीचा अभ्यास करण्यासाठीच भगवान बुद्धाने म्हटले की, सर्व वस्तु अनित्य आहेत. 

६. ‘कर्म’ हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहेहे मानणे म्हणजे धम्म

१. ह्या पार्थिव जगात एक प्रकारची सुव्यवस्था आहे. खालील घटनांनी ती सिद्ध होते.

२. आकाशातील ग्रहगोलांच्या चलनवलनात-गतीत-एक प्रकारची सुव्यवस्था आहे.

३. क्रतुचक्रामध्येही सुव्यवस्था आहे.

४. काही विशिष्ट व्यवस्थेनुसारच बीजांचे वृक्ष होतात. वृक्षांपासून फळ उत्पन्न होते आणि फळापासून परत “बीज* निर्माण होते.

५. बौद्ध परिभाषेत या व्यवस्थेला नियम म्हणतात. एकामागून एक सुव्यवस्थित निर्मिती दर्शविणार्या नियमांना त्रतुनियम, बीजनियम असे संबोधितात.

६. समाजामध्येही याच प्रकारचा नैतिक क्रम आहे. तो कसा उत्पन्न होतो? कसा राखला जातो? 

७. जे ईश्वराच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात त्यांना या प्रश्‍नाचे उत्तर देणे कठीण नाही. त्याचे उत्तर सरळ आहे.

८. ते म्हणतात, ‘संसाराचा नैतिक क्रम हा ईश्वराच्या इच्छेचा परिणाम आहे. ईश्वराने संसार निर्माण केला आणि “इश्वर’ हाच या संसाराचा कर्ता, धर्ता आहे. तोच भौतिक आणि नैतिक नियमांचा कर्ता आहे. 

९. त्यांच्या मते नैतिक नियम माणसांच्या भल्यासाठी असतात; कारण ते ईश्वरी आज्ञास्वरूप आहेत. आपल्या निर्मात्या ईश्वराची आज्ञा पाळणे त्यांना क्रमप्राप्त आहे आणि ईश्वराच्या आज्ञेच्या परिपालनाने हा नैतिक क्रम चालू राहतो.

१०. जे नैतिक व्यवस्था ही ईश्वरी इच्छेचा परिणाम आहे असे मानतात त्यांचे विचार वरील प्रमाणे असतात. 

११. ही व्याख्या मुळीच समाधानकारक नाही. कारण ईश्वर हा नैतिक नियमांचा जनक असेल, ह्या नैतिक नियमांचा आरंभ आणि अंत तोच असेल आणि माणसाला ईश्वराची आज्ञा पाळण्यापासून सुटका नसेल तर ह्या संसारात इतकी नैतिक अव्यवस्था का आढळते? 

१२. ह्या ईश्वरी नियमाच्या मागे असा कोणता अधिकार आहे? ईश्वरी नियमांचा व्यक्तीवर काय अधिकार आहे? हे सयुक्तिक प्रश्‍न आहेत. परंतु जे लोक नैतिक व्यवस्था ही ईश्वरी इच्छेचा परिणाम आहे असे मानतात त्यांच्या जवळ या प्रश्‍नांना उत्तर नाही. 

१३. ही अडचण दूर करण्यासाठी हा सिद्धान्त थोडा बदलला गेला आहे. 

१४. असे म्हटले जाते की, परमेश्वराच्या आज्ञेनेच सृष्टी निर्माण झाली. हेही सत्य आहे की, ह्या सर्व विश्वाने परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे व मार्गदर्शनाप्रमाणेच आपल्या कार्यास आरंभ केला. हेही खरे आहे की, त्याने त्या सर्व विश्वाला एकदाच कायमची गती, शक्‍ती दिली आणि तीच त्या विश्वाच्या सर्व क्रियाशीलतेचे मूळ आहे. 

१५. परंतु या उपरान्त ईश्वराने सृष्टीला प्रारंभी जे नियम घालून दिले आहेत. त्या नियमांनुसार कार्य करण्याचे स्वातंत्र्य बहाल केले आहे.

१६. म्हणूनच नैतिक व्यवस्था ईश्वरी इच्छेनुसार घडत नसेल तर तो दोष सृष्टीचा (प्रकृतीचा ) आहे, ईश्वराचा नाही. 

१७. सिद्धान्तांत असा बदल करूनही वरील अडचण सोडविली जात नाही. या सिद्धांतातील बदलामुळे ईश्वरावर जबाबदारी (नैतिक व्यवस्थेची) फक्त पडत नाही. परंतु प्रश्‍न उरतोच की, ईश्वराने आपल्या नियमाचे परिपालन करण्याचे सृष्टीवर (प्रकृतीवर) का सोपवावे? असल्या गैरहजर ईश्वराचा उपयोग काय? 

१८. सृष्टीत नैतिक क्रम कसा राखला जातो या प्रश्‍नाला भगवान बुद्धाने दिलेले उत्तर अगदी भिन्न आहे. 

१९. तथागतांचे उत्तर सोपे आहे. ते असे, नैतिक व्यवस्था ही ईश्वर सांभाळीत नसून ती कम्म (कर्म)  नियमाप्रमाणे सांभाळली जाते.

२०. सृष्टीची नैतिक व्यवस्था चांगली असेल अथवा वाईट असेल, परंतु भगवान बुद्धाच्या मते ती माणसावर सोपविलेली आहे. इतर कोणावर नाही. 

२१. ‘कम्म’ (कर्म) म्हणजे मनुष्याकडून केले जाते ते कार्य आणि विपाक म्हणजे त्याचा परिणाम. जर नैतिक व्यवस्था वाईट असेल तर त्याचे कारण मनुष्य अकुशल कम्म करतो हे आहे. नैतिक व्यवस्था चांगली असेल तर त्याचा अर्थ इतकाच की, मनुष्य कुशल कम्म (सत्कर्म ) करीत आहे. 

२२. भगवान बुद्ध केवळ कर्मासंबंधीच बोलत नाहीत. ते ज्यांना कम्मनियम म्हणून ओळखतात त्या कम्माच्यानियमांचेही विवेचन करतात.

२३. कम्मनियमाचा बुद्धप्रणीत अभिप्राय असा की, ज्याप्रमाणे दिवसामागून रात्र येते त्याप्रमाणेच कर्मामागून त्याचा परिणाम येतो. हा एक नियम आहे.

२४. कुशल कर्मापासून होणारा लाभ प्रत्येक कुशल कर्म करणाराला मिळतो आणि अकुशल कर्माचा दुष्परिणाम कुणालाही टाळता येत नाही.

२५. म्हणून भगवान बुद्धाचा उपदेश असा; असे कुशल कर्म करा म्हणजे मानवतेला चांगल्या नैतिक व्यवस्थेचा लाभ होईल.  कारण कुशल कम्मानेच नैतिक व्यवस्था राखली जाते. अकुशल कम्म करू नका, कारण त्यामुळे नैतिक व्यवस्थेची हानी होते आणि मानवता दुःखी होते. 

२६. हे शक्‍य आहे की, कम्म आणि कम्माचा होणारा परिणाम, या दोहोंमध्ये काही कालांतर असते. असे बहुधा घडते. 

२७. या दृष्टीने कम्माचे तीन विभाग करता येतात :

  • (१) दिट्ट धम्म वेदनीय कम्म ( तात्काळ फल देणारे कम्म ), 

  • (२) उपपज्जवेदनीय कम्म ( ज्याचा परिणाम फार कालांतराने होतो ते कम्म,

  • (३) अपरापरियवेदनीय कम्म (अनिश्चित काळाने फळ देणारे कम्म ).

२८. कम्म हे कधी कधी ‘अहोसी’ कम्म होऊ शकते, म्हणजे त्याचा काहीच परिणाम होत नाही. अहोसी कम्मामध्ये ज्या कम्मांचा त्यांच्या अंगच्या दुर्बलतेमुळे. विपाक अथवा परिणाम होत नाही, किंवा जी कम्मे अन्य सबळ कम्मामुळे बाद होतात त्यांचा समावेश होतो. 

२९. या सर्व गोष्टी विचारात घेऊनही भगवान बुद्धाच्या ‘कम्माचा नियम अनिवार्य आहे’ या सिद्धान्ताला बाधा येत नाही.

३०. कम्माचा विपाक फक्‍त कर्त्याला भोगावा लागतो आणि याशिवाय दुसरा 1 त्यात काहीच आशय नाही, एवढेच काही कम्म सिद्धान्तात अभिप्रेत नाही. एवढाच त्यात अभिप्राय आहे असे मानणे चूक आहे. कधी कधी एकाच्या कम्माचा त्याच्याऐवजी दुसर्यालाच परिणाम भोगावा लागतो; तथापि हे सर्व कम्म नियमाचेच परिणाम आहेत, कारण तोच कम्मनियम नैतिक व्यवस्था सांभाळतो किवा मोडतो.

३१. व्यक्‍ती येतात, जातात; पण विश्वाची नैतिक व्यवस्था कायम राहते आणि त्याप्रमाणेच ही व्यवस्था बनविणारा कम्मनियमही अप्रतिहत राहतो.

३२. याच कारणास्तव भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये अन्य धर्मांत ईश्वराला जे स्थान दिले आहे ते नीतीला प्राप्त झाले आहे. 

३३. यास्तव विश्वातील नैतिक व्यवस्था कशी राखली जाते याला भगवान बुद्धाने दिलेले उत्तर इतके सरळ  आणि निर्विवाद आहे. 

३४. असे असूनही या उत्तराचा खरा अर्थ क्वचितच समजावून घेतला जातो. प्रायः जवळजवळ नेहमीच त्याचा चुकीचा अर्थ लावला जातो, चुकीचा सांगितला जातो, अथवा त्याची चुकीची व्याख्या केली जाते. नैतिक व्यवस्था कशी राखली जाते या प्रश्‍नाला उत्तर म्हणूनच भगवान बुद्धाने कर्मसिद्धान्त मांडला. .या सत्याची फारच थोड्यांना जाणीव असते.

३५. तथापि कम्म सिद्धान्त मांडण्यात बुद्धाचा हाच हेतू होता.

३६. कम्म नियमांचा संबंध केवळ सर्वसाधारण नैतिक व्यवस्थेशी आहे. व्यक्‍तीच्या सन्माग्याशी किंवा दुर्भाग्याशी त्याचा संबंध नाही. 

३७. त्याचे प्रयोजन विश्वातील नैतिक व्यवस्था राखणे हे आहे. 

३८. ह्या कारणास्तव ‘कम्मनियम’ हा धम्माचे एक प्रमुख अंग आहे.

Previous page                                  Next page


The Buddha and His Dhamma, by Dr. B. R. Ambedkar
error: Content is protected !!